मन्ना डे यांची कारकीर्द सुरू झाली सचिनदेव बर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली, पण त्यांना सूर सापडला तो शंकर- जयकिशन या जोडीमुळे. सचिनदांनी लावलेली शिस्त आणि शंकर-जयकिशननं सुरावर ठेवलेला विश्वास हीच पुढे मन्ना डे- किंवा त्यांना प्रिय असलेल्या उच्चाराप्रमाणे मान्ना दे – यांची शिदोरी ठरल्याचं दिसतं. आयुष्यातल्या या उभारीच्या काळाबद्दल त्यांनी स्वतच सांगितलेल्या या आठवणी,
‘जीबनेर जलसाघरे’ या त्यांच्या बंगाली आत्मचरित्राच्या अनुवादातून सभार..
सर्वार्थानं मी सचिनदांचा असिस्टंट- सहकारी होतो. सुरेखसं संगीत दिलेली गाणी, सचिनदा प्रथम मला शिकवत, नंतर ती गायकांकडून बसवून घ्यायला मला सांगत. रोज त्यांची रिहर्सल घ्यायला सांगत. अशावेळी खरंच मला जरा रागच यायचा. दिवसेंदिवस तो वाढतच होता. सारखं मनात यायचं इतके सुंदर सुंदर सूर देऊन सचिनदा गाणी तयार करतात पण मला एकही गाणं गायला सांगत नाहीत. मी गाऊ शकतो, मला गायची खूप इच्छाही आहे आणि हे सचिनदांना चांगलं माहीतही आहे. ही जी गाणी, मी गायकांकडून बसवून घेतो ती इतर कोणी ऐकली तर नक्कीच त्यांना समजून येईल की त्या गायकांपेक्षा हीच गाणी मी आणखी कितीतरी चांगल्या प्रकारे गाऊ शकतो. माझ्या गळ्यातून ती गाणी आणखी जास्त हृदयस्पशी होतील, असं असताना सचिनदा मला एकदासुद्धा तशी संधी का देऊन पाहात नाहीत?
माझा स्वाभिमान दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पण त्यातून तक्रार किंवा विरोधाचं वादळ उठलं नाही. स्वत:च्या मनालाच दु:ख कष्ट व्हायचे. कष्ट वाढायचे.
अखेरीस तो सुदिन आला. माझ्या भाग्यदेवतेनं माझ्यावर कृपादृष्टी टाकली. एक दिवस अचानक सचिनदा म्हणाले, ‘‘माना तुझ्यासाठी एक गाणं तयार केलंय. तू ते गाणं गा बरं सुंदर रीतीनं.’ त्या वेळी सचिनदा ‘मशाल’ सिनेमाला संगीत देत होते. या सिनेमासाठी प्रदीपजी म्हणजे कवी प्रदीप यांनी सुंदर सुंदर गाणी लिहिली होती. त्यातल्याच ‘ऊपर गगन विशाल’ ह्या गाण्याला सचिनदांनी अप्रतिम संगीत दिलं होतं. त्या गाण्याचे सूर आणि शब्द यांचा मेळ इतका सुरेख साधला होता की गाणं ऐकताक्षणी मला ते अतिशय आवडलं.
ह्या गाण्यानंच माझ्या संगीत जीवनाचा इतिहास घडवला. मला माहीत आहे- त्या गाण्याला अजूनही, साठ वर्षांनंतरही लोकांच्या मनात ममत्वाचं स्थान आहे.
गाण्यातल्या आशयानुसार, सुरानुसार गाणे योग्यप्रकारे गायलं गेलं तर सुरांचं सांगणं, गाण्याचं सांगणे हे गाण्याच्या भाषेतच बंदिस्त राहात नाही. गाण्याचा आत्मा, अंतरंग, आशय भाषेच्या साखळदंडातून मुक्त करून त्याला वैश्विक करता येतं- सुरांच्या माध्यमातून आणि ते करायला मी सक्षम आहे हे मला त्या दिवशी उमगलं.
या प्रसंगानिमित्तानं आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ‘मशाल’ सिनेमातलं ‘ऊपर गगन विशाल’ हे गाणं सचिनदांनी माझ्याकडून गाऊन घेतलं तरी माझ्या लक्षात आलं होतं की त्यांना हे गाणं, मी माझ्या काकांसारख्या गंभीर गळ्यानं गावं अशी त्यांची इच्छा होती. मीही काकांप्रमाणे खुल्या गंभीर आवाजात ते गाणं म्हटलं होतं. मी ते गाणं जरी त्या पद्धतीनं गायलो तरी सर्वकाळ सुरुवातीपासूनच माझ्या गाण्यात माझे काका किंवा दुसऱ्या कोणा गायकाची सावली पडू नये, याकरिता मी प्रयत्नशील असे. लोकांनी, ‘मी अमक्या तमक्यासारखा गातो’ असं म्हणता कामा नये. काका आणि इतर गुणीजनांजवळ विविध प्रकारचं गाणं शिकलो तरी त्यांच्या गायकीचा कसलाही प्रभाव माझ्या गाण्यात येऊ नये असे मला नेहमीच वाटत आलंय. सर्वाकडून चांगलं तेवढं घेऊन, ते माझ्या गाण्यात, माझ्या स्वत:च्या गायकीत कामी आणून माझ्या सुराला आणि सुरांच्या व्याप्तीला मी श्रीमंत करून सोडलंय. माझ्या गाण्यात पूर्णपणे नवीन प्रकारची गायकी, गाण्याचा ढंग असावा असं नेहमीच मला वाटतं. माझं गाणं दुसऱ्या कोणासारखं न होता ते केवळ माझ्यासारखंच व्हावं.
सचिनदा निर्मितीच्या वेळी भयंकर गंभीर असायचे. त्या वेळी त्यांच्या मनात ते गाणं, गाण्याचे शब्द आणि सूर याखेरीज काहीही असायचं नाही. पण त्या संगीतशिशूला पूर्ण रूपात जन्म दिल्यावर, पुन्हा ते पूर्वीसारखं हसत खेळत. विनोदात रमत. खूपच विनोदी होते ते. त्यांना सर्व बाबतीत नेहेमी थट्टा-विनोद करायला आवडायचा. त्या विनोदातही सूक्ष्म बुद्धिमत्तेची चुणूक दिसायची. अशा तऱ्हेच्या सूक्ष्म विनोदात थोडी गैरसोयही असते. म्हणजे असं की सगळ्यांना तो विनोद समजत नाही. खरं काय म्हणायचं हे उमगत नाही, आणि तीच सर्वात निराशाजनक गोष्ट असते. एखादा चांगल्यापैकी उच्चप्रतीचा विनोद कोणी केला आणि आजूबाजूच्या लोकांना तो कळलाच नाही तर ती मोठी दु:खप्रद गोष्टच. त्याहीपेक्षा व्यथा देणारं काय तर तो विनोद समजावून सांगायचा. सचिनदांबरोबर माझं सहकारीपणाचं नातं आणखीनच दृढ झालं होतं ते या विनोदामुळेच. सचिनदांची अपूर्व विनोदबुद्धी किंवा बुद्धिजन्य विनोद, मला बरोब्बर कळायचा आणि गरज पडली तर त्याला प्रतिसादही द्यायचो. मला वाटतं सेन्स ऑफ ह्यूमर नसेल तर एखादा माणूस ‘कम्प्लीट’ होऊ शकत नाही.
सचिनदांनंतर, ज्यांचा मी आत्यंतिक ऋणी आहे ती महाप्रसिद्ध संगीतकारांची जोडी ‘शंकर जयकिशन, विशेषत: शंकरजी. मी चिरकाल यांच्या कृतज्ञता ऋणात राहीन. त्यांच्यामुळेच स्वत:ला पूर्णत्वानं सिद्ध करायची संधी एक दिवस मला मिळाली.
मुंबईत यांच्याकडे येण्यापूर्वी बऱ्याच संगीत दिग्दर्शकांकडे सहकारी म्हणून मी काम केलंय. बऱ्याच संगीत दिग्दर्शकांशी माझी चांगली जवळीक होती. सचिनदांजवळसुद्धा खूप वर्ष काम केलं, पण मी लक्षपूर्वक पाहिलंय- कधीही, कोणीही संगीतकलाकार किंवा गायक म्हणून असलेलं माझं अस्तित्व उजेडात आणलं नाही किंवा ते तसं करू शकले नाहीत किंवा माझ्या त्या अस्तित्वाविषयीची त्यांना पुरी माहिती, जाणीवही नव्हती. सचिनदांनी ‘ऊपर गगन विशाल’ हे ऐतिहासिक गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं हे खरं आहे, पण वस्तुत: ते गाणं त्यांनी माझ्या काकांच्या बदली एक गायक, म्हणूनच माझ्याकडून गाऊन घेतलं.
त्या दृष्टीनं शंकरजींनीच प्रथम माझ्यातल्या संगीत कलावंताला, माझ्या गायक म्हणून ‘असण्या’ ला शोधून, पूर्णत्वानं बाहेर आणलं. त्यांना ते नीट कळलं होतं. माझ्या ‘त्या अस्तित्वाचा’ पूर्ण विकास करण्यासाठी सर्व प्रकारची गाणी, त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. आज सर्व श्रोते रसिक म्हणतात की- ‘मान्ना दे इज ए व्हर्सटाइल सिंगर.’ लोकांची ही धारणा तयार होण्यामागे शंकरजींचं योगदान अपरिमित आहे. त्यांनीच प्रथम मला रोमँटिक गाणी गायची संधी दिली. त्यांना समजलं होतं की प्रेमगीतं सुंदर रीतीनं, गोडव्यासह शिवाय पुरुषी ढंगात गायची तर मीच एकमात्र ती गाऊ शकतो. सुगम किंवा सुबद्ध (लाइट क्लासिकल) संगीतात जितक्या प्रकारची गाणी होऊ शकतात, विविध शब्दांचे जेवढे म्हणून रंग, रूप, गंध असू शकतात, बहुतेक ते सर्वच प्रकार त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतले. संगीतजगतात मी दुसऱ्या कोणाहीसारखा नाही, मी माझ्या स्वत:सारखाच आहे हे सत्य शंकरजींनाच प्रथम उमगलं होतं आणि हा त्यांचा विश्वास त्यांनी प्रत्येक संगीत रसिकाच्या दरबारात पोहोचवला होता.
त्या सर्व गाण्यांनी केवळ संगीतप्रेमींना, रसिकांना माझ्याकडे आकृष्ट केलं होतं असं नाही तर त्यांचे सूर, सुरांचं वैचित्र्य यासह जेव्हा मी विविध भावातली गाणी एकामागून एक गायली, गाण्याची भाषा शब्द आणि सूर यात परस्पर सामंजस्य राखून गायलो- ह्या सगळ्या गोष्टींनी, प्रसिद्ध संगीतकारांनासुद्धा आकृष्ट केलं होतं. त्या सर्वाना ‘हा तर एक अद्भूत गायक आहे’ असे वाटायला लागलं होतं. हा कोणतंही गाणं असं काही गातो की त्याहून चांगलं काही नाहीच! प्रेमगीत असो, विरहगीत असो, भक्तिगीत असो किंवा हसू, थट्टामस्करीचं गाणं असो. सगळं कसं विलक्षण सुंदर. ही सगळी गाणी गायल्याबरोबर इतर संगीत दिग्दर्शकांचं माझ्याकडे जाणं-येणं वाढलं आणि सुरू झालं माझ्या संगीतजीवनाचं सुवर्णयुग!
शंकर-जयकिशन जोडीनं माझ्यावर आणखी एक फार मोठा उपकार केला आहे. यापूर्वी मी जी गाणी गायली होती ती जास्त करून वृद्ध माणसांच्या तोंडी होती. म्हणजे असं की, मी वाल्मिकीच्या तोंडची गाणी गायली, हनुमानाची नव्हे. तसे सारे सिनेमे बघून खूप वैताग यायचा. लाज वाटल्यामुळे मित्रांशी त्यातल्या गाण्यांविषयी बोलायलाच धजायचो नाही. पुरता दडपला जायचो. पण शंकर-जयकिशनच्या संगीतातली गाणी गाताना ती, नायक किंवा तशाच महत्त्वाच्या व्यक्तीच्या तोंडी असत. तेव्हा खरंच खूप चांगलं वाटायचं. गर्वानं मित्रांशी बोलण्यापूर्वी मला दिसून यायचं की पडद्यामागे कोणी गाणं म्हटलंय हे त्यांना समजलंय. एका वेगळ्याच सुखानुभूतीने मन भरून जायचं. शंकरजींनी मला, माझा आनंद, सुख परत मिळवून दिलं. माझ्यातलं सुंदर व्यक्तित्त्व मला परत मिळवून दिलं. मी त्यांचा चिरकाल ऋणी आहे.
मला आठवतंय- शंकर-जयकिशनच्या संगीतातलं मी गायलेलं पहिलं गाणं, राजकपूरच्या प्रसिद्ध सिनेमातलं ‘आवारा’ मधलं होतं. शैलेंद्रनी लिहिलेलं ‘तेरे बिना आग ये चांदनी’ हे ते गाणं. लता मंगेशकरबरोबर मी हे द्वंद्वगीत गायलं होतं. ही बहुधा १९५१ सालातली गोष्ट. या गाण्यानंतर, खरोखरीच म्हणालो ना, माझ्या गाण्याचं सुवर्णयुग सुरू झालं.