सुधीर गाडगीळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांच्या सुरांनी डोळय़ात पाणी येतं, पोटात कालवाकालव होते, दूर निघून गेलेले दिवस क्षणात जवळ येतात अशा दीदी..त्यांचा सूरप्रवास जवळून पाहता आला़  आता दीदी नाहीत, पण त्यांच्या सुरांची भेट मात्र कायम होणार आह़े

आ मच्याकडे एअरमेक कंपनीचा जुना रेडिओ होता. शाळेच्या काळात शनिवारी दुपारी मराठी गाणी लागायची. जुना रेडिओ तापायला वेळ लागे. बटनांशी खटाटोप करण्याच्या नादात मधलीच ओळ कानावर येई.. ‘घट डोईवर.. घट कमरेवर’, ‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’, ‘सप्तपदी मी रोज चालते..’, यातल्या ‘शतजन्मीचे गं..’ या शब्दांवर रेडिओबर हुकूम गाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमच्या घरातल्या आत्या मंडळींचा आवाज चिरकायचा आणि मग ‘लता’ त्या वयातही ग्रेट वाटायची. तिची सरसरत जाणारी ‘तान’ ही शाळेच्या काळापासूनच मनात रुजली.  कॉलेजच्या काळात मॅटिनी पाहताना नंदा, वहिदा, साधना, सायरा, आशा पारेख यांच्या तोंडून पुन्हा दीदींच्या सुरांचीच भेट व्हायची.. ‘ये समा.. समा है प्यार का’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, इ. इ. याच दरम्यान मी कॉलेज सांभाळून पत्रकारितेत उमेदवारी करू लागलो होतो. तेव्हा नानासाहेब गोरेंमुळे १९६८ ला पुण्याच्या हिराबाग मैदानावर दीदींना पुढय़ात बसून पाहता-ऐकता आले. १९७९ मध्ये प्रथम बोललो आणि नंतर १९८३-८४ पासून मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळय़ाचा निवेदक म्हणून दरवर्षी आणि चारही मंगेशकरांच्या दूरदर्शन मुलाखतींच्या निमित्ताने दीदींशी भरपूर गप्पा मारता आल्या. त्यांना मिळालेल्या जीवनगौरव आणि फाळके पुरस्काराच्या निमित्ताने दोन प्रदीर्घ मुलाखतीही झाल्या.  शुभ्रधवल साडी, त्यावर नाजूक नक्षीकाम, दोन वेण्या पाठीवर सोडलेल्या, चेहऱ्यावर कमालीचा हसरा स्नेहाद्र्र, दोन भुवयांच्या संगमावर कसलासा अंगारा लावलेला. एक भुवयी आक्रसत, खळाळून हसत पदर सारखा करत, उजव्या पायाचं पाऊल वर उचलून पुढे झोका देत, माइक पुढे स्थिरावणाऱ्या आणि सुरांसह शब्द प्रकटत.. ‘मोगरा फुलला’.

हे रूप – हे सूर अनेकदा ऐकले आणि आनंदून गेलेलो आहे. १९९० सालच्या आसपास आशा भोसले रजनीच्या रंगीत तालमीला, ‘ऐरणीच्या देवा तुला’ आशाताईंना दीदींनी म्हणून दाखवल्याचं ऐकलंय. दीदींना पाहताच आपण आदरानं झुकायचो. खुद्द दीदी संस्कृत उच्चार समजून देणाऱ्या अप्पा दांडेकरांपुढे, बाबासाहेब पुरंदरे, पं. नरेंद्र शर्मा यांना चक्क झुकून कमरेत वाकून आदरपूर्वक नमस्कार करताना पाहिलंय. ज्ञानेश्वरांची गीतं, विराण्या, गालीब, मीरा यांच्या रचना म्हणताना, धाकटा गायक-संगीतकार असलेला भाऊ हृदयनाथजींपुढे चाल समजून घ्यायला, तन्मयतेने बसलेल्या अनुभवलेय.

मराठी-हिंदी बरोबरच पंजाबी, बंगाली, उर्दूमध्ये त्या भाषेतील माणसांशी सहजतेने गप्पा करत असल्याचे अनुभवल्याचं शांता शेळकेंनी सांगितलं. बहुभाषिक गाणी गाणाऱ्या दीदींनी आरंभाच्या काळात, ‘किती हंसाल’ आणि ‘पहिली मंगळागौर’ या दोन मराठी चित्रपटात अभिनयही केलाय. त्या नकला फार उत्तम करत आणि पन्हाळय़ावर फोटोग्राफी करण्याची त्यांना आवड होती.  जागेच्या मर्यादेत इथं मी अनेक भेटीतल्या गप्पांपैकी मोजकी प्रश्नोत्तरे देतो.

****

बाबा म्हणजे मा. दीनानाथांकडून तुम्ही नेमकं काय घेतलंत?

 – माझं गाणं हीच बाबांची मला देन आहे. त्यांची सूर लावायची पद्धत, सूर सोडताना ‘जोर’ देणं कमाल होते. मी लहान होते, सगळं आठवत नाही, पण एवढंच सांगेन की स्टेजवर ते विलक्षण गायचे. ‘धि:क्कार मन साहिना’ या गाण्याला मुंबईच्या ग्रँड थिएटरात १४ वन्समोअर घेतलेले मी पाहिलेत. मला आठवतं की बाबांना वन्समोअर मिळाला की ते ‘राग’ बदलून गात. 

****

 ‘आनंदघनया टोपणनावानं तुम्ही संगीत दिलं आहे, ही कल्पना कशी साकारली?

– बाबा म्हणजे भालजींना ‘मोहित्यांची मंजुळा’च्या वेळी संगीतकार मिळेना. कुठली गाणी हो असं विचारता ते म्हणाले, निळय़ा आभाळी, बाई बाई मन मोराचा, शूर आम्ही सरदार हे ऐकल्यावर मी बाबांना म्हटलं, ‘मीच करते म्युझिक’. यावर बाबा म्हणाले, ‘तुला वेड लागले काय? तुझं गायिका म्हणून नाव मोठ्ठं आहे. संगीतकार म्हणून यशस्वी झाली नाहीस तर नाव खराब होईल’. यावर मी म्हटलं, मग टोपणनाव घेऊ आणि ‘निळय़ा आभाळी’ची अस्ताई मी बाबांना फोनवर ऐकवली. बाबांनी ‘जयशंकर’ हे टोपणनाव सुचवलं. मी त्या वेळी आनंदवनभुवनी ऐकत होते. मी म्हटलं आपण ‘आनंदघन’ नाव घेतलं तर! आणि इतिहास घडला. ‘साधी माणसं’ वेळी सारी देशी वाद्यं वापरलीयत.

****

मराठीत तुलनेनं कमी गायलात!

– हिंदीत बिझी होते ना!

****

मॉडर्न सुरात रस कितपत?

– बिटल्स आवडतात.

****

संगीतकार तुम्हाला कितपत स्वातंत्र्य देत?

– शंकर जयकिशन आणि मदन मोहन हे दोघे सारं माझ्यावर सोपवत. राज कपूरांच्या गाण्यातले सारे आलाप माझेच आहेत. 

****

खासदारकीत रस कितपत होता?

– मला राजकारणात फारसा रस नाही. पण माझी ठाम मत आहेत. माझा देश मोठा व्हावा, हीच भावना माझी कायम. 

****

कोणा संगीतकाराची गाणी म्हणताना आव्हान वाटतं?

– मुख्य म्हणजे हृदय. अवघड जागा असतात आणि सज्जाद हुसेन, मदन मोहन, सलील चौधरी, एस.डी. मोठे वाटत.

तर अशा दीदी.  ज्यांच्या सुरांनी डोळय़ात पाणी येतं, पोटात कालवाकालव होते. दूर निघून गेलेले दिवस क्षणात जवळ येतात. आपण स्वत:ला समजतो तसे बेदरकार नाही हे कळून जातं. गायिका, नायिका, फोटोग्राफर, नेमबाज, दानशूर, सारं काही असलेल्या दीदीला आदरपूर्वक प्रणाम!

लोकप्रिय गीते

* आएगा आनेवाला

* कहीं दीप जले कहीं दीप

* उठाए जा उनके सितम

* मोहे भूल गये सावरिया

* दो हंसो का जोडा, बिछड गयो रे

* बरसात में हमसे मिले तुम

* झूम झूम ढलती रात

* गुमनाम है कोई

* मेरे नैना सावन भादो

* घर आया मेरा परदेसी

* जा रे जा बालमवा

* अजीब दास्ताँ है ये

* बेदर्दी बालमा तुझको

* ऐ मेरे वतन के लोगो

* धीरे से आजा रे अखियन में

* ये जिंदगी उसी की है

* जा मैं तोसे नाही बोलू

* तुम ना जाने..

* चाँद फिर निकला

* रुला के गया सपना मेरा

* मेघा छाये आधी रात

* हम प्यार में जलनेवालों को

* जाना था हमसे दूर

* चांद मध्धम है

* आपकी नजरोंने समझा

* लग जा गले

* वो भूली दास्ताँ

* माई री मैं कैसे कहूँ

* सारी सारी रात तेरी याद सताए

* रहें ना रहें हम

* वंदे मातरम

* मन डोले मेरा तन डोले

* झूम झूम ढलती रात

* जागो मोहन प्यारे

* आजा रे परदेसी

* ओ सजना बरखा बहार आयी

* ना जिया लागे ना

* तेरे सूर और मेरे गीत

* जिस दिल में बसा था प्यार तेरा

* बाबुल प्यारे

* सत्यम शिवम सुंदरम

* घर आजा घिर आये बादरवा

* आजा पिया तोहे प्यार दूं

* भाई बत्तुर, भाई बत्तुर

* बाहों में चले आ

* अब के ना सावन बरसे

* आजा निंदिया आजा

* चोरी चोरी कोई आए

* निसदिन बरसत नैन हमारे

* बरसे बुंदिया सावन की

* यारा सिलीसिली

* माई म्हानो सुपना मा

* जागो मोहन प्यारे

* अल्ला तेरो नाम

* ऐ मालिक तेरे बंदे हम

मराठी गीते

* अखेरचा हा तुला दंडवत

* चाफा बोलेना

* अगा करुणाकरा

* अरे अरे ज्ञाना झालासी

* अवचिता परिमळू

* असा बेभान हा वारा

* आनंदी आनंदी आनंद गडे

* आनंदाचे डोही आनंद तरंग

* आज गोकुळात रंग खेळतो हरी

* श्रावणात घन निळा

* लटपट लटपट तुझं चालणं

* मेंदीच्या पानावर

* जीवनात ही घडी

* ऐरणीच्या देवा तुला

* मोगरा फुलला

* सख्या रे घायाळ मी हरिणी

सन्मान

* भारतरत्न (२००१)

* पद्मविभूषण (१९९९)

* पद्मभूषण (१९६९)

* साधी माणसं या चित्रपटासाठी १९६५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

* दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९)

* महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१९९७)

* तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

* मध्य प्रदेश सन्मान (१९८४)

* फ्म्रान्स सरकारचा ‘लीज़्‍ा ऑफ ऑनर’

स्वर्गीय स्वर माधुर्याचा या इहलोकीतील मूर्तिमंत अवतार असलेल्या लताच्या वाढदिवसानिमित्त तिला केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी वृत्तपत्राच्या जाडय़ाभरडय़ा कागदावर अभिवादन करणे म्हणजे एखाद्या अप्सरेच्या स्वागतासाठी तिच्या मृदुचरण कमलाखाली जाडय़ाभरडय़ा गोणपाटाच्या पायघडय़ा अंथरण्याइतके विशोभित आहे. कारण लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसे अभिवादन तिच्या जीवनातील या शुभदिनी करायचे असेल, तर त्यासाठी प्रभातकाळची सूर्यकिरणे दविबदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतंतूच्या लेखणीने लिहिलेले मानपत्रच गुलाबकळीच्या करंडकातून तिला अर्पण करायला हवे.

      आचार्य प्र. के. अत्रे (मराठा- २८ सप्टेंबर १९६४)

‘मधुचंद्र’ हा माझा सिनेमा खूप गाजला आणि मी या यशाच्या मस्तीत होतो. पण, त्यानंतर सात महिने मला कामच नव्हते. मी मद्रासला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो सुलोचनाबाईंना सांगितला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी भालजी पेंढारकर यांच्याकडे शब्द टाकला. मी भालजींना भेटायला गेलो. त्यांनी मला कलावंत  म्हणून कामास ठेवण्यास नकार दिला. पण, त्यानंतर मला एक सिनेमा त्यांनी दिला आणि त्याच सिनेमाला पुढे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याबरोबर मी कोल्हापूर गाठले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते म्हणाले, अरे माझे नाही लतादींदींचे आशीर्वाद घे. कारण, त्यांच्यामुळे तुला हा सिनेमा मी दिला. मी कोल्हापूरवरून थेट मुंबईला त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. पुढे हा जिव्हाळा वाढत गेला. संपूर्ण चित्रपटसृष्टीचा सूर आज हरपला आहे.

राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक

*********

लतादीदींचं संगीत ऐकतच आमची, आमच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढय़ा मोठय़ा झाल्या. त्यांचे संगीत हे जीवनाचा अविभाज्य घटक होते. माझे वडील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि त्यांचा ४० च्या दशकापासून परिचय होता. तेव्हा दोघांचाही संघर्षांचा काळ होता. लता मंगेशकर यांनी त्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्या आमच्या घरी येत. त्यांच्या भगिनी मीनाताई यांच्या विवाहप्रसंगी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये बाबांचे गायन झाले होते. त्यांच्या पुणे, मुंबई इथल्या घरी जाण्याचे भाग्य मला लाभले. त्याही अनेकदा आमच्या घरी आल्या होत्या. आईच्या हातचे थालीपीठ त्यांना आवडायचे. स्वरांची अचूकता, गोडवा, शब्दांचे उच्चारण आणि भावसंगीताचे गायन कसे असावे, याच्या त्या कुलगुरू होत्या. त्यांच्या संगीतामुळे अनेक पिढय़ांचे कान घडले. लतादीदी गेल्या असल्या तरी त्यांचा दैवी स्वर आपल्याबरोबर कायमच राहणार आहे.

श्रीनिवास जोशी

*********

लतादीदींच्या जाण्याने आयुष्य खऱ्या अर्थाने पोरकं झालं आहे. मायेची उब हरवल्याची जाणीव आज होते आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या आणि त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ते सत्य स्वीकारणं कठीण होतं. परंतु, काही गोष्टी अटळ असतात आणि त्या स्वीकाराव्या लागतात; तसंच लतादीदींचं जाणं आता मनाला स्वीकारावं लागतंय. आपल्या घरात लहानपणापासून वडिलधाऱ्यांचा सहवास महत्त्वपूर्ण असतो; संगीत क्षेत्रात तेच अमूल्य महत्त्व लतादीदींचे होते. संगीत क्षेत्रातील माउली सगळय़ांना पोरकं करून गेली. त्यांचं स्थान, योगदान, त्यांची गाणी कायम स्मरणात राहतील.

राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक

*********

खरं म्हणजे ही घटना नि:शब्द करणारी, शब्दांच्या पलीकडची आहे. त्यांना श्रद्धांजली कोणत्या शब्दांत वाहणार असा प्रश्न आहे. त्यांचे बोट धरून कित्येक जण आणि कित्येक जणी संगीताच्या क्षेत्रात आल्या आणि त्यांचे सूर ऐकत मोठय़ा झाल्या. काही सुरांमध्ये दैवी ताकद असते की तो सूर ऐकल्यावर आपल्या काळजाला भिडतो. असा सूर दीदींचा नक्कीच होता. कोणतेही गीत कधीही ऐकले तरी तितकेच भावते. ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून लतादीदींनी ट्वीट करून माझे आणि सुबोध भावे यांचे कौतुक केले होते. हे त्यांचे आशीर्वाद कायम राहतील. मात्र, त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, याची हुरहुर आहे.

आनंद भाटे

*********

या जगात आलेला हा केव्हा तरी जाणारच असतो. तरी काही अलौकिक दैवगुण लाभलेली माणसं कधी जाऊच नयेत, असे वाटत राहते. या यादीत दीदींचं नाव जन्मदात्यांनंतर पहिल्या स्थानावर! प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नातील केवळ प्रेयसीच नव्हे, तर सर्व स्त्रीनात्यांना या स्वर्गीय स्वरांनी चिंब भिजवले आहे. थेट हृदयाच्या तारांना ह्णअष्टह्णह्णस्वरांनी (आठवा स्वर अर्थात ती स्वत:!) दिवसातून एकदातरी छेडणारा हा स्वर आज थांबला. वाटतंय हृदयाच्या खूप जवळचं कोणीतरी काळाने हिसकावून घेतलंय. ती स्वर्गातूनच आलेली होती, जेव्हा केव्हा परतून येईल, आपल्या जीवनाचा स्वर्गच करेल, याच आशेसह भावपूर्ण श्रद्धांजली़

गिरीश कुलकर्णी

*********

देशाला लाभलेला खजिना म्हणजे लताजी. त्यांच्या आवाजाने आपल्या सगळय़ांचे आयुष्य उजळून टाकले आहे. सर्वाना दु:खात त्यांच्या गाण्यांनी मोठा आधार दिला़  त्यांच्या आत्म्याला शांती लाभो़  

शबाना आझमी

*************

लताजी या माझ्यासाठी परमात्म्याप्रमाणे होत्या. बंगाली, उर्दू, हिंदि यांसारख्या अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. माझे वडील संगीतकार आर. के. शंकर हे त्यांच्या पलंगाशी नेहमी लताजींचा फोटो ठेवायचे आणि ध्वनिमुद्रणासाठी जाताना त्यांच्या फोटोला वंदन करून मग निघायचे, इतकी त्यांची श्रद्धा होती. लतादीदी स्टुडिओमध्ये आल्या की चार वाजता एका छोटय़ाशा खोलीत आपल्या बहिणीबरोबर जायच्या आणि हळुवार आवाजात रियाज करायच्या. त्यांच्या त्या कृतीने माझ्यात खूप बदल झाला. एका गाण्यासाठी दिवसेंदिवस योग्य वेळ देत गाण्याचा रियाज पूर्ण करण्याची त्यांची सवय होती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या आठवणी आपल्याला बळ देत राहतील.

ए. आर. रेहमान, प्रसिद्ध संगीतकार

*************

स्वतंत्र भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे पोषण दोन कारणांनी होत होतं. मातेचे दूध आणि लतादीदींचा सूर. भारतीयांच्या जीवनातला एकही क्षण असा नाही की, श्वासांबरोबर सोबतीला लतादीदींचा आश्वासक सूर नाही. हा सूर सर्वसामान्यांच्या जगण्यातला सांस्कृतिक विसावा होता. तो तसाच अविनाशी राहील. आकाशगंगेत आता अढळ ध्रुव ताऱ्यांचा तितकाच अढळ साथीदार आता विराजमान झाला आहे.

सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

*************

लतादीदींनी जो अनुभव दिलाय तेव्हा त्यांचा तेजस्वी सूर, श्वास आणि त्यांचा संगीतमय पॉज आठवतो. त्या पॉजही सुंदर घ्यायच्या. प्रत्येक ओळीतून पोहोचणारा भावही महत्त्वाचा असायचा. माझे जीवन त्यांनी समृद्ध केले. काळजाला भिडून जाणारा त्यांचा स्वर होता.

आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध गायिका

*************

स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहील. बालपणी मी त्यांचे गाणे ऐकत असे तेव्हा मला त्यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हत़े  मुंबईला आलो तेव्हा संघर्षांच्या काळात त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याबरोबर अनेक जाहीर कार्यक्रम केले. माझ्या वाढदिवशी १९९२ मध्ये बेंगळुरुमध्ये त्यांच्याबरोबर गाण्याचा कार्यक्रम होता. समोर लाखो श्रोते होते. त्या वेळी मला त्यांनी भेट म्हणून सोन्याची चेन दिली आणि सर्व श्रोत्यांसमोर ‘प्रिन्स ऑफ सिंगिंग’ अशी एक उपाधीही दिली. मी त्यांच्याबरोबर २०० गाणी गायली आहेत.

उदित नारायण, ज्येष्ठ पार्श्वगायक

*************

मी दीदींबरोबर अनेक गाणी गायली आहेत. मी त्यांच्याबरोबर ‘नया सावन’ हे गाणे ध्वनिमुद्रित करताना थोडा तणावात होतो़  पण त्यांनी त्या वेळी मला खूप सांभाळून घेतले आणि धीर दिला. त्यामुळे त्यांच्याबरोबर पुढे अनेक गाणी गाऊ शकलो.

कुमार सानू, पार्श्वगायक

*************

गाणे कसे गायला हवे, सूर कसे असावे, हे लतादीदींकडूनच शिकाव़े  त्यांनी खूप पिढय़ांबरोबर काम केले आणि त्यांच्याकडून बरेच गायक, संगीतकार खूप काही शिकले. आम्ही फार कमी भेटलो, पण जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचे आशीर्वाद लाभले.

साधना सरगम, पार्श्वगायिका

*************

लता मंगशेकर यांचा आवाज ऐकला नाही, असा एकही दिवस गेला नाही़  त्या माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होत्या़. वयाच्या पंधराव्या वर्षी मला त्यांच्याबरोबर बंगाली गाणे गाण्याची संधी मिळाली. मी त्यांच्यासाठी खूप गाणी डब केली. चित्रीकरणासाठी मी गायचे, त्याची कॅसेट लता मंगेशकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या आवाजात अंतिम गाणे ध्वनिमुद्रित केले जायचे. त्यांच्यासाठी मी खूप गाणी गायली असून, माझ्यासाठी तो सुखद अनुभव होता.

कविता कृष्णमूर्ती, पार्श्वगायिका

*************

माझ्या संगीत क्षेत्रातील कामाची सुरुवातच मुळात लता दीदींबरोबर, त्यांच्या आशीर्वादाने झाली. खळेकाकांचे एक गीत होते, ‘राम भजन कर मन’ ते लतादिदींनी गायले आणि त्यात मी वीणा वाजविली होती. त्यामुळे आज मी जो काही आहे तो लतादीदींच्या आर्शिवादामुळेच. माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला सोन्याची गणपतीची मूर्ती दिली होती. ती मूर्ती माझ्या देव्हाऱ्यात आहे. या मूर्तीच्या रूपाने माझ्या डोक्यावर त्यांचा हात कायम असणार आहे. 

शंकर महादेवन, प्रसिद्ध गायक

*************

आज आत्मा निघून गेल्यासारखे वाटते आहे. लतादीदी आमच्यासाठी ‘सरस्वती’ आहेत. त्या सरस्वतीला प्रत्यक्ष भेटण्याची, तिच्या पायावर माथा टेकण्याची संधी मिळाली नाही. मात्र, फोनवर बोलणे व्हायचे. त्या नेहमी कामाचे कौतुक करायच्या. त्यांच्याबरोबर गाणे करायचे होते तेही राहून गेले. ‘अग बाई अरेच्चा’मध्ये जी आरती आहे, ती लतादीदी गाणार होत्या. पण त्यांचा आवाज खराब झाल्याने त्यांच्याकडून आरती गाऊन घेता आली नाही. आमच्याकडे वेळ कमी होता, म्हणून शेवटी मीच ते गाणे गायिले आणि लतादीदींना ऐकवले. त्यांनी माझे भरभरून कौतुक केले. दीदी देहरूपाने निघून गेल्या, पण गाण्याच्या रूपाने त्या आपल्याबरोबरच आहेत.

अजय गोगावले, प्रसिद्ध गायक, संगीतकार

१९६५ मध्ये लताबाईंच्या चित्रपटातील पार्श्वगायनाला २५ वर्षे झाली. त्या वेळी सर्व प्रमुख मराठी आणि इंग्रजी दैनिकांनी लताबाईंवर विशेषांक प्रकाशित केला होता. त्या वेळी ‘माणूस’ने लताबाईंवर एक विशेषांक प्रकाशित केला. त्यासाठी भालजी पेंढारकर यांची मुलाखत घेण्यासाठी सुधीर दामले आणि मी कोल्हापूरला गेलो. कारण भालजींशी लताबाईंच्या कुटुंबाचे अगदी निकट संबंध होते. भालजी त्यांच्या मुलाखतीत असं म्हणाले, ‘लताच्या खासगी आठवणी मी खूप सांगू शकेन. पण, आवाजाविषयी किंवा गाण्याविषयी मी काय सांगणार? मी इतकंच म्हणतो; श्रीकृष्ण होऊन गेला. त्याच्यानंतर तो त्याची बासरी इथे विसरला आणि ती लताच्या गळय़ात आली.’ ही भालजींची उपमा समर्पक अशीच आहे.

– दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eternal voice of lata mangeshkar lata mangeshkar tribute zws
Show comments