‘शाळा’, ‘शिक्षण’ या शब्दांनाही चिकटलेली स्पर्धा, त्यात मुलांचे हरवलेले बालपण आणि पदव्यांचा ढिगारा रचूनही खरंच आपण काय शिकलो, असा भविष्यात पडणारा प्रश्न.. या दुष्टचक्रात मुलांना ढकलण्याची इच्छा नसलेले पालक आणि सामाजिक क्षेत्रातील व्रतस्थ विद्याताई पटवर्धन, वसंतराव पळशीकर अशांनी ‘अक्षरनंदन’ची संकल्पना पुढे आणली. विद्यार्थ्यांना अनुभवातून, त्यांच्या कलेने शिकविणे हेच या शाळेचे वेगळेपण. किंबहुना म्हणूनच पुण्यासारख्या शहरात मध्यवर्ती असलेल्या ‘सेनापती बापट रस्त्या’वरील या शाळेत आता अक्षरांचे नंदनवन फुलले आहे.
रोजच्या अनुभवाच्या आधारे जे नित्य बदलत असते ते नित्य-नवे शिक्षण. पण शिक्षणाचा लोक एक साचा बनवितात. जिथे साचा बनला तिथे शिक्षण बिघडले.. शिक्षण कसे असावे, हे इतक्या समर्पक शब्दांत सांगण्याची ताकद ज्यांच्या ठायी होती ते म्हणजे विनोबा भावे. गांधीप्रणीत शिक्षणविषयक प्रयोग म्हणजे ‘नई तालीम’. ‘नई तालीम’ला विनोबाजी नित्य-नवे शिक्षण म्हणायचे. ‘नई तालीम’सारखे शिक्षणातले विविध प्रयोग आपल्याकडेच काय तर परदेशातही खूप झाले. अजूनही होत आहेत. कारण नवतेच्या, सर्जनशीलतेच्या शोधात असलेल्यांना शिक्षणातली साचेबद्धता तरी कशी स्वस्थ बसू देईल?
या ‘अस्वस्थते’ची ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ आणि ‘२००५चा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा’ या दोन महत्त्वाच्या धोरणात्मक दस्तावेजांमध्ये प्रथमच दखल घेण्यात आली. त्यात परवलीच्या बनलेल्या ‘प्रयोगशीलता’, ‘कृतिशीलता’ या शब्दांनी साचेबद्धतेमुळे डबके बनलेल्या शिक्षणाला प्रवाही होण्यासाठीचा मार्ग दाखवून दिला आणि आतापर्यंत परिघावर असलेली शिक्षणपद्धती केंद्रस्थानी आली. ‘ज्ञानरचनावादा’ची मांडणी करणाऱ्या या शब्दांशी शिक्षणातल्या साचेबद्धतेचा मात्र उभा वाद. ही साचेबद्धता म्हणजेच शिक्षण, असाच सर्वसामान्यांचा समज असल्याने श्वास कोंडणाऱ्या ‘टायबाज’ शिस्तीला, रंगरंगोटीला, झगमगाटाला भुलून शाळा निवडली जाते. भविष्यातल्या टिकून राहण्याच्या स्पर्धेचे वर्तमानकालीन दुखणे असते, ते निराळेच. त्यावर ‘वाघिणीच्या दुधा’चा सहजसोपा इलाज योजला जातो. पण ज्ञाननिर्मितीच्या बाबतीत अनेक शाळा ‘बडा घर’ म्हणाव्या अशाच.
भ्रमाचा हा भोपळा फुटलेले अनेक पालक मग मातृभाषेतील शिक्षणाची वाट धरायला लागतात. सुदैवाने या वाटेवर ‘दीपस्तंभ’ म्हणाव्या अशा काही मराठी शाळा पाय रोवून उभ्या आहेत. ज्ञान आणि त्यातून मिळणारे जीवनभान हे मातृभाषेतूनच प्रभावीपणे येते, या विचारातून काही विचारी पालकही जाणीनपूर्वक मराठी शाळेची निवड करीत आहेत. विनोबांना अभिप्रेत असलेला ‘नित्य नवेपणा’ शिक्षणात जपला तरच ज्ञाननिर्मितीच्या यज्ञात आपण अपेक्षित दान टाकू शकू, हे या शाळांनाही पटते.
अशाच वेगळ्या ‘नित्य नव्या’ शाळांची आणि तिथल्या शिक्षकांची ओळख दर आठवडय़ाच्या या सदरातून ..
खूप मोठी, चकाचक, दिखाऊ इमारत नाही.. पण मैदान लक्ष वेधून घेणारे! भडक रंगरंगोटी नाही.. तरीही आकर्षक. इथल्या भिंतीही बोलक्या.. काही तरी शिकवून जाणाऱ्या! शाळेच्या नावातूनच वातावरणाची कल्पना यावी.. अक्षरनंदन!
ही शाळा अगदी अस्सल मराठमोळी; भाषा ही शिक्षणाशी जोडणारी ओळख व्हायला हवी यासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणारी. शाळेत दरवर्षी क्षमतेपेक्षा किमान पाचपट प्रवेश अर्ज येतात. ‘ना. ग. नारळकर फाऊंडेशन’ने १९९२ साली ही शाळा सुरू केली. फाऊंडेशनकडून भाषा आणि विज्ञान केंद्र चालवले जात होतेच. त्यातील मर्यादाही जाणवत होत्या. मग विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण’ ही गोष्ट आनंददायी करणारी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला.
भिंतीही बोलक्या
शाळेच्या आवारात आल्यावर इथल्या मोकळ्या वातावरणाची कल्पना येते. प्रत्येक पावलावर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचीही साक्ष मिळते. कुठे एखाद्या कोपऱ्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या आणि जपलेल्या झाडांच्या कुंडय़ा असतात. शिक्षक खोलीत, मुख्याध्यापकांच्या खोलीत विद्यार्थ्यांनी ओरिगामीतून साकारलेली कलाकृती लक्ष वेधून घेतात. विद्यार्थ्यांनी मातीकामातून साकारलेल्या वस्तू कृतिशीलतेची साक्ष देतात. एखाद्या वर्गाच्या भिंती आकडेमोडीने आणि प्रमेयांनी भरलेल्या दिसतील. एखाद्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन भरलेले असते. शाळेच्या या ‘बोलक्या भिंती’ इथल्या प्रयोगांची साक्ष देण्यास पुरेशा आहेत.
करून तर पाहा!
वर्षभरातील विशेष दिवस, सण वेगवेगळ्या उपक्रमांतून शाळेत साजरे होतात. हा प्रत्येक उपक्रम विद्यार्थ्यांना नवे काही शिकवणारा असतो. मग कधी विद्यार्थ्यांना मातीच्या गणपतीच्या मूर्ती तयार करायला शिकवले जाते. कधी कचरावेचकांबरोबर दिवसभर फिरून त्यांची जीवनशैली मुले समजून घेतात. पुरातत्त्व खात्याबरोबर एखादे उत्खनन पाहून येतात. परिसरातील घरांमधून ओला कचरा गोळा करून त्याचे गांडूळ खत तयार करतात.
अभ्यासाचा तासही असा सहज. इंग्रजी वाचू लागलेल्या मुलांसाठी वरच्या वर्गातील मुले इंग्रजीच्या पुस्तिका तयार करतात. दुसऱ्या वर्गातील मुले या पुस्तकांचे परीक्षण करतात. विद्यार्थीच एखादी एकांकिका निवडून किंवा लिहून ती बसवतात. आवडलेल्या कविता निवडून त्याचा शाळेपुरता कार्यक्रम करतात. एखाद्या दिवशी मोठय़ा वर्गातील मुले खालच्या वर्गातील मुलांचे तास शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतात. एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थ याचा शाळेच्या आवारातच दुकान जत्रा भरवली जाते. आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीही करतात. या जत्रेत दुकान घालण्यासाठी शाळेकडून ‘कर्ज’ घेतात. कर्ज घेण्यासाठी ‘जामीन’ही शोधतात. माझी विक्री कशी असेल, याचा अंदाज बांधतात आणि नंतर नफ्यातून कर्जही फेडतात. गणितातील मुद्दल, व्याज याबरोबरच विक्री कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हा हेतू. याशिवाय स्त्री-पुरुष समानता, किशोरवयीन शिक्षण यांचे भानही विद्यार्थ्यांच्या चर्चामधून आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाते.
शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा याबरोबरच विद्यार्थ्यांचे स्वयंपाकघरही लक्षवेधक आहे. शाळेच्या गच्चीत आपणच फुलवलेल्या मळ्यातील भाजी घेऊन मुले स्वयंपाकघरात पदार्थ करतात. अगदी भरतकामापासून ते लाकडी खेळणी तयार करण्याचे शिक्षण मुले आवडीनुसार घेत असतात. यातले कोणतेही उपक्रम विद्यार्थ्यांवर लादले जात नाहीत. मात्र प्रत्येक गोष्ट करून पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
सर्वसमावेशकता हे वैशिष्टय़
मर्यादित विद्यार्थीसंख्या ही या शाळेच्या बाबतीत जमेची बाजू ठरली आहे. ‘अक्षरनंदन’ला कायम विनाअनुदानित म्हणून मान्यता मिळाली आहे. पूर्वप्राथमिक ते माध्यमिक असा शाळेचा विस्तार आहे. राज्य शिक्षण मंडळाशी ही शाळा संलग्न आहे. प्रत्येक वर्गात चाळीस मुलांना प्रवेश दिला जातो. सर्वसमावेशकता हे शाळेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. आर्थिक कारणामुळे शिक्षण न परवडणाऱ्या मुलांना शाळेत शुल्कात सवलत दिली जाते. अपंग, कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही सामावून घेतले जाते. या मुलांसाठी विशेष शिक्षकांची मदत घेतली जाते. शाळेच्या धोरणांची कल्पना पालकांना प्रवेशापूर्वीच दिली जाते.
मिळून मूल्यमापन
शाळेच्या मूल्यमापनाची प्रक्रियाही वेगळी आहे. अभ्यासक्रम किंवा पाठय़पुस्तकावर आधारित परीक्षा घेऊन त्या माध्यमातून मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल, त्यांनी आत्मसात केलेल्या क्षमता, एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट क्षमता असल्यास त्याची नोंद केली जाते. या प्रक्रियेत इयत्तेनुसार थोडेफार बदल होतात. मूल्यमापनाची प्रक्रिया फक्त शिक्षक करत नाहीत. त्यामध्ये पालक आणि स्वत: विद्यार्थीही सहभागी असतात. पालकांनीही मुलांमध्ये जाणवणाऱ्या बदलांची नोंद मूल्यमापन पुस्तिकेत करायची असते. वर्षभरात झालेले उपक्रम, शिकलेल्या गोष्टी, अनुभव यांतील आपल्याला सर्वात काय आवडले, आपण केलेले कोणते काम आवडले याची नोंद विद्यार्थ्यांनी करायची असते.
थोडक्यात मोकळे, आश्वासक वातावरण आणि सतत भरून राहिलेला उत्साह यांमुळे या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची छान गट्टी जमते. विद्यार्थ्यांना अनुभवातून, त्यांच्या कलेने शिकविणे हेच या शाळेचे वेगळेपण आहे. पाठय़पुस्तके, अभ्यासक्रम असा ढाचा जपतानाच अक्षरांचे नंदनवन फुलविण्याचीही किमया शाळेने साध्य केली आहे, ती उगीच नाही!
प्रयोगशील तरीही..
प्रयोगशील शाळा’ अशी ओळख असली तरी शैक्षणिक प्रयोगांच्या मर्यादाही या शाळेने सांभाळल्या आहेत. शाळेतले शिक्षण हे पूर्णपणे मुक्त किंवा अनौपचरिक नाही. वेळापत्रक, गणवेश, पाठय़पुस्तके, शाळातपासणी अशी औपचारिक चौकटही सांभाळली जाते. शासनाच्या नियमांच्या चौकटी खूप लवचीक आहेत. त्याचा आम्ही योग्य वापर करतो. शाळेचे सगळे उपक्रम हे अभ्यासक्रमाच्या कक्षेत राहूनच केले जातात. उपक्रमासाठी उपक्रम केले जात नाही. कोणते कौशल्य आमच्या मुलांसाठी उपयुक्त आहे याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ स्वयंपाक. ते करताना त्यांना शिक्षणाबरोबरच आनंद वाटला पाहिजे. औपचारिक विषय आणि अनौपचारिक माध्यम याची गुंफण घालून शिक्षण दिले जाते. अधिकाधिक माहिती देण्यापेक्षा माहिती मिळविण्याची साधने उपलब्ध करून देणे आणि त्यांनाच माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू आहे.
– लारा पटवर्धन
rasika.mulye@expressindia.com