विश्वास पवार

गहू हे आपल्या आहारातील एक प्रमुख धान्य आहे. या गव्हातील नव्या वाण संशोधनानुसार भारतातील काही राज्यात काळय़ा गव्हाची लागवड केली आहे. महाराष्ट्रातही सातारा जिल्ह्य़ात या काळय़ा गव्हाची लागवड करण्यात आली आहे. या प्रयोगाविषयी..

गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्य पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्य पिकांपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जगातील भाताचे उत्पादन गव्हापेक्षा जास्त होते. त्यानंतर गव्हाखालील क्षेत्र व उत्पादन वाढले. आज जगातील गव्हाखालील क्षेत्र आणि उत्पादन हे अन्नधान्यांमध्ये सर्वाधिक आहे. जगातील निम्म्या लोकांच्या पोषणात गव्हाला प्रमुख स्थान आहे.

भारतात गव्हाची लागवड दक्षिणेकडील काही राज्ये सोडल्यास अन्यत्र सर्वत्र आढळते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार ही भारतातील गव्हाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी ९४ टक्के क्षेत्र केवळ या आठ राज्यांत आहे. तर एकूण उत्पादनापैकी ९६ टक्के उत्पादन ही आठ राज्येत घेतात. दर हेक्टरी गव्हाचे अधिक उत्पादन पंजाब व हरियाणा राज्यांत आहे. महाराष्ट्रातही कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गव्हाची लागवड केली जाते. हा सर्व तपशील सांगण्याचे कारण गहू हे धान्य तसे आपल्या परिचयाचे आणि नित्य वापरातील आहे. पण हा जो गहू आपल्या ओळखीचा आहे, त्याहून रंगाने निराळा अशा काळय़ा गव्हाची महाबळेश्वरमध्ये नुकतीच प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे.

महाबळेश्वरचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे गहू लागवडीसाठी पोषक असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाच्या लागवडीचे विविध प्रयोग केले जातात. यातूनच येथे गव्हावर संशोधन करण्यासाठी ‘गहू गेरवा’ या संस्थेचीही स्थापना करण्यात आलेली आहे. नुकतीच जपान आणि भारतीय गव्हाचे संकर करून तयार केलेल्या ‘एनबीएमजी’ नावाच्या वाणाची या परिसरात लागवड करण्यात आली आहे. मोहाली येथील राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संशोधन केंद्रातील (नाभि) संशोधिका डॉ. मोनिका गर्ग यांनी गव्हाचे हे नवीन वाण शोधून काढले आहे. जपान येथील काळा गहू व भारतीय गव्हाचा संकर करत ही नवीन जात तयार केली आहे. या काळय़ा गव्हाची महाबळेश्वर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर पेरणी करण्यात आली आहे. एक गुंठय़ाला एक किलो याप्रमाणे दोनशे किलो बी पेरण्यात आले आहे. अजून दोनशे किलो बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. या गव्हाच्या बियाण्याचा दर एकशे वीस रुपये प्रति किलो असा असून वाहतूक खर्चासह त्यास किलोमागे दीडशे रुपये दर पडत आहे. महाबळेश्वरशिवाय सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, कोरेगाव तालुक्यात देखील प्रायोगिक तत्त्वावर या काळय़ा गव्हाची पेरणी केली आहे. कृषी विभागाने या काळय़ा गव्हाचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.

महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या पूर्वी पंजाब सोडून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे या काळय़ा गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे. हा गव्हाची टोचून आणि पेरून अशा दोन्हीही पद्धतीने लागवड करता येते.आपल्याकडची जमीन या गव्हाच्या लागवडी योग्य आहे. गुंठय़ाला एक किलो असे प्रमाण पेरणीसाठी आहे. या गव्हासाठी देखील सेंद्रिय अथवा नेहमीच्या पद्धतीने खत वापरणे, पेरणी, पाणी व्यवस्थापन सुचवण्यात आलेले आहे. या गव्हाचे उत्पादन आणि दर मात्र नेहमीच्या वाणाच्या तुलनेत अधिक राहतो.

या गव्हाची चपाती थोडी करडय़ा रंगाची असते. मात्र हा काळा गहू आरोग्यासाठी जास्त उपयुक्त मानला जातो. आपल्या नेहमीच्या गव्हाच्या तुलनेत यात मॅग्नेशियम, आयर्न, झिंक आदी घटकांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही अन्नघटकांमुळे लठ्ठपणा, ताणतणाव इत्यादी आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते असे आढळून आलेले आहे. इतर गव्हाच्या तुलनेत यामध्ये ‘ग्लुकोज’चे प्रमाण कमी असल्याने मधुमेह असणाऱ्या लोकांनाही हा उपयुक्त आहे.

मोहालीतील संशोधन केंद्राने आरोग्य आणि आहार संस्कृतीचा अभ्यास करत विकसित केलेली ही गव्हाची जात आहे. यामुळे चांगल्या गव्हाबरोबरच शेतकऱ्याच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. साताऱ्यातील या प्रयोगानंतर अन्यत्र या गव्हाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल.

– दीपक बोर्डे, कृषी सहायक, महाबळेश्वर.

Story img Loader