कोटी.. हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांची नवलाई आता राहिलेली नाही. एखाद्या ठेकेदाराने इमानदारीत दर्जेदार काम ते ही वेळेत केले तर निश्चित बातमी होईल, असा आजचा काळ.. २५ एप्रिल १८८९ या दिवशी अशाच एका दर्जेदार आणि दिमाखदार इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. मुंबई महापालिकेच्या भव्य वास्तूचे बांधकाम त्या दिवशी सुरू झाले. विख्यात वास्तुविशारद एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी या इमारतीचे संकल्पचित्र तयार के ले होते. गॉथिक शैलीतील ही इमारत वेळेत बांधणे हे एक आव्हान होते. तेव्हा अध्यक्ष होते थॉमस ब्लॅनी तर आयुक्त होते हॅरी अॅक्वर्थ. रावबहाद्दूर सीताराम खंडेराव हे बांधकाम खात्याचे निवासी अभियंता होते. महात्मा फुले यांचे निकटवर्तीय व्यंकू बाळाजी यांनी या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेतले होते. इमारतीचा अंदाजित खर्च होता ११,८८,०८२ प्रत्यक्षात खर्च आला ११,१९,९६९. अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्चात मुंबई महापालिकेची दिमाखदार इमारत उभी राहिली आणि ती ही नियोजित वेळेपूर्वी.. महापालिकेच्या इतिहासातील हा एक उच्च आदर्श..
महापालिका इमारतीवरील सुंदर शिल्पकाम..मुख्यालयातील सभागृहाची सुंदर वास्तू साऱ्यांनाच मोहविणारी आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिसनबाहेर उतरल्यानंतर दोन वास्तू लक्ष वेधून घेतात. त्यापैकी एक आहे पूर्वीची व्हिक्टोरिया टर्मिनस तर दुसरी आहे मुंबई महापालिकेची इमारत. या इमारतीमधून एक शतकाहून अधिक काळ मुंबईच्या नागरी जीवनाशी संबंधित विषयांचा कारभार हाकला जातो. या इमारतीच्या बांधकामाला ३१ जुलै १९९३ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी आयोजित एका समारंभात तत्कालीन आयुक्त शरद काळे यांनी केलेले भाषण प्रत्येक नगरसेवक व अधिकाऱ्याने कायम लक्षात ठेवावे असे होते. आयुक्त काळे म्हणाले, ‘या सभागृहात मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांची तैलचित्रे आहेत. जुन्या जाणत्या नगरसेवकांनी व समाजसेवकांनी ही मुंबई घडवली. आज आपण त्यांना मानवंदना देत आहोत. त्यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करतो. उद्या शंभर वर्षांनंतर आपल्याही कामगिरीचा पुढची पिढी आढावा घेणार आहे हे लक्षात ठेवून मुंबई महापालिकेच्या आणि मुंबईकरांच्या विकासासाठी काम करू या..’
आजचे चित्र भयावह आहे. मुंबई आणि मुंबई महापालिका ही राजकारणी-अधिकाऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनली आहे. बहुतेक सारेच तिला जमेल तसे ओरबाडण्याचे काम करत आहेत. मुंबई महापालिकेचे मूकरुदन कोणालच दिसत नाही. मुख्यालयासमोर असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या पुतळयाच्या चेहऱ्यावरील क्रोध पाहायला कोणाला वेळ नाही की, महापालिका सभागृहातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून महात्मा गांधींपर्यंत सारेच पुतळे आपल्या कारभाराकडे पाहात असल्याचे भान कोणाला राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी पालिका सभागृहाला लागलेल्या आगीमध्ये सभागृहातील बहुतेक सर्व मान्यवरांची तैलचित्रे जळाली. तेव्हा एका ज्येष्ठ नगरसेवकाने काढलेले उद्गार आजच्या पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणारे होते. तो ज्येष्ठ नगरसेवक म्हणाला, ‘बरे झाले चित्रे जळाली, किमान आता तरी यांना आमचा कारभार दिसणार नाही!’
सन १८६६ मध्ये महापालिकेचे कार्यालय गिरगावमधील एका साध्यासुध्या इमारतीमध्ये होते. १८७० मध्ये ते एस्प्लनेड येथील एका इमारतीमध्ये हलविण्यात आले. महापालिका सभागृहामधील महापौरांच्या आसनाचाही एक वेगळा इतिहास आहे. सर्वप्रथम हे आसन २१ मार्च १९१४ रोजी तत्कालीन व्हाईसराय व गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिज यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या मानपत्र समारभांच्यावेळी वापरण्यात आले होते. या आसनावर ब्रिटिश राजमुकुटाचे चिन्ह काढून त्यावर महापालिकेचे बोधचिन्ह बसविण्यात आले आहे. महापालिका व मुंबईच्या प्रथम नागरिकाची शान दर्शविणारे हे महापालिकेचे चिन्ह सर्वप्रथम १८७७ मध्ये वाणिज्य शिक्षणाची मुहूर्तमेढ पश्चिम भारतात रोवणारे पी. एन. वाडिया यांनी तयार केले होते. त्यावर सिंहाची तसेच चित्त्याची प्रतिकृती होती. मुंबई बंदराचे माहात्म्य सुचविणारी तीन जहाजे दाखविण्यात आली असून लॅटिन भाषेतील अक्षरे त्याखाली होती. ७८ वर्षांनंतर या बोधचिन्हामध्ये बदल करण्यात येऊन आसनाच्या शिरोभागी सिंह तर बोधचिन्हाखाली ‘यतो धर्मोस्ततो जय:’ उपनिषदातील वचन कोरण्यात आले आहे. अनेक मान्यवरांनी महापौरपद भूषविले असून यात मामा-भाचे, काका-पुतणे तसेच पिता-पुत्रांचाही समावेश आहे. फिरोजशहा मेहता यांनी चारवेळा मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून स्थान भूषविले होते. सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर, तर महापौरपदी निवड होऊनही आसन ग्रहण करण्याचे भाग्य न लाभलेले महापौर म्हणजे डॉक्टर एम.डी.डी. गिल्डर हे होते. युसूफ मेहरअल्ली हे वयाच्या ३६व्या वर्षी महापौर बनले तेव्हा ते सर्वात तरुण महापौर म्हणून ओळखले जात. परंतु पुढे सुधीर जोशी महापौर झाले तेव्हा ते अवघे ३२ वर्षांचे होते.
महापालिकेची इमारत, त्यातील शिल्प हे जसे मोहविणारे आहे तसेच महापालिकेच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या अनेक नगरसेवक-महापौरांचे कार्यही अजोड म्हणावे लागेल. १८४५ साली कायद्याद्वारे स्वतंत्र म्युनिसिपल फंड निर्माण करण्यात आला आणि सात सदस्यांच्या माध्यमातून नागरी सोयीसुविधांची पाहणी केली जाऊ लागली. १८५८ साली ही व्यवस्था बदलून तीन आयुक्त नेमून त्यांना शहराची व्यवस्था पाहण्याचे अधिकार देण्यात आले. पुढे १८७२ साली ही संस्था करदात्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे एक कॉर्पोरेशन अस्तित्वात आले, तर लोकशाही पद्धतीवर आधारित महानगरपालिकेची पहिल सभा ४ सप्टेंबर १८७३ रोजी भरली होती. १८८८ मध्ये महापालिका, स्थायी समिती आणि पालिका आयुक्त अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. गमतीचा भाग म्हणजे १९२२ पर्यंत केवळ करदात्यांनाच मतदानाचा अधिकार होता. त्यात बदल करून भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. १९३१ पर्यंत प्रथम नागरिकाला ‘अध्यक्ष’ हे नामाभिधान होते ते बदलून ‘महापौर’ असे करण्यात आले. काळाच्या ओघात महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीला जोडून आणखी एक इमारत जशी उभी राहिली तशी महापलिकेची जबाबदारीही वाढू लागली.
एकेकाळी मुंबईचे रस्ते पालिका धूत असे. दिवाबत्तीपासून प्रथमिक शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी पाहणाऱ्या महापालिकेच्या आजच्या जबाबदारीतही प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईच्या एक कोटी चाळीस लाख लोकसंख्येला पाणीपुरवठय़ापासून आरोग्यापर्यंत आणि आपत्कालीन व्यवस्थेपासून प्रवासी वाहतुकीची जबाबदारी ‘बेस्ट’च्या माध्यमातून पालिका पाहात आहे. कारभार वाढला, उत्पन्न वाढले, अर्थसंकल्प अनेक छोटय़ा राज्यांपेक्षा मोठा म्हणजे ३४ हजार कोटींपर्यंत पोहोचला, नगरसेवकांची संख्या वाढली, महापौरांच्या जोडीला उपमहापौर बसू लागले, जबाबदारीही प्रचंड वाढली परंतु जबाबदारीचे भान? म्हणूनच शाहीर पट्ठे बापूरावांच्या लावणीची सहजच आठवण होते.. ‘मुंबई नगरी बडी बाका! जशी रावणाची दुसरी लंक! वाजतो डंका, डंका चहू मुलकी-राह्य़ाला गुलाबाचे फुलकी पहिली मुंबई!’
चेहरा मुंबई महापालिकेचा
मुंबई आणि मुंबई महापालिका ही राजकारणी-अधिकाऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनली आहे.
Written by संदीप आचार्य
First published on: 23-01-2016 at 02:15 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: F w stevens maker of mumbai municipal corporation building