अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी सध्याच्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला होता. आग्रा विद्यापीठात राज्यशास्त्रातून त्यांनी एम.ए. केले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा समाज कार्यात सहभाग वाढू लागला होता. १९३९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. त्यानंतर बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेने १९४० ते १९४४ अशी पाच वर्षे पदाधिकारी प्रशिक्षण वर्गात ते दाखल झाले आणि १९४७मध्ये पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी संघाचे काम सुरू केले. फाळणीतील अशांत कालखंडात त्यांनी कायद्याचे शिक्षण सोडून दिले आणि संघ विस्तारक म्हणून उत्तर प्रदेशात त्यांनी कार्य सुरू केले. याचवेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या नियतकालिकांतही ते काम करू लागले. दैनिक स्वदेश, दैनिक वीर अर्जुन, साप्ताहिक पांचजन्य आणि मासिक राष्ट्रधर्ममध्ये त्यांच्यातील साहित्यिकालाही आकार मिळाला.

१९४८मध्ये संघावर बंदी आली. बंदी उठल्यानंतर १९५१मध्ये ‘भारतीय जनसंघ’ या संघविचारी राजकीय पक्षाची स्थापना झाली आणि त्याची जबाबदारी वाजपेयी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर सोपविण्यात आली. पक्ष सरचिटणीस म्हणून ते काम करू लागले. त्याचवेळी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी त्यांची नाळ जुळली. मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये १९५४ मध्ये उपोषण सुरू केले तेव्हाही वाजपेयी त्यांच्यासोबत होते. १९५७मध्ये श्रीनगरमधील तुरुंगात मुखर्जी यांचा अंत ओढवला.

१९५७मध्ये त्यांनी प्रथम लोकसभेची निवडणूक लढवली. मथुरा मतदारसंघात ते पराभूत झाले, मात्र बलरामपूरमध्ये विजयी झाले. त्यानंतर त्यांच्या वक्तृत्वाने आणि इतरांना जोडण्याच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांचा लौकिक वाढू लागला. दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर १९६८मध्ये जनसंघाचे ते सर्वात तरुण अध्यक्ष झाले. बलराज मधोक, नानाजी देशमुख आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासह त्यांनी राजकारणात या पक्षाचा प्रभाव वाढवीत नेला.

१९७५मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. तेव्हा अनेक राजकीय नेत्यांसह वाजपेयी यांनाही अटक झाली. १९७७मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेसविरोधी पक्षांचा ‘जनता पक्ष’ हा आघाडी पक्ष स्थापन झाला. त्यात वाजपेयी यांनी जनसंघ विलीन केला. १९७७मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्ष विजयी झाला. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी हे नियुक्त झाले. याच काळात त्यांच्यातील सर्वसमावेश नेतृत्व ठळकपणे जगासमोर आले. १९७९मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यावर जनता पक्षही फुटला. त्यावेळी १९८०मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारतीय जनता पक्षा’ची स्थापना केली. या पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा काँग्रेसविरोधी नेतृत्वाची धुरा वाजपेयी यांच्याचकडे आली. मात्र १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगोलग झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. भाजपचे अवघे दोन खासदार निवडून आले. त्याचवेळी भाजपमध्ये वाजपेयी यांचा मध्यममार्गी आणि सर्वसमावेश विचारप्रवाह आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर आंदोलनामुळे एकवटू लागलेला हिंदुत्ववादी विचारप्रवाह असे दोन भेद भाजपमध्ये सुप्तपणे निर्माण झाले. १९८६मध्ये अडवाणी पक्षाध्यक्ष झाले आणि त्यानंतर राममंदिर आंदोलनाने भाजपला पुन्हा राजकीय बळ दिले. १६ मे ते एक जून १९९६ असे १३ दिवसांचे सरकार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर टिकले. अवघ्या एका मताने विश्वासदर्शक ठराव ते हरले. त्यानंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ अशी सलग पाच वर्षे ते पंतप्रधानपदी आरूढ झाले. २००४ची निवडणूक हरल्यानंतर राजकारणातून ते हळुहळू अस्तंगतच झाले होते.

Story img Loader