दरवर्षीप्रमाणे यंदाचे साहित्य संमेलनही अनेक गोष्टींनी गाजले. त्यातील हे काही किस्से..

झुपकेदार मिश्यांमुळे झाला घोळ
घुमान साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिकहून खास रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. या गाडीत ‘स्टार’ कवी असलेल्या अशोक नायगावकर यांच्या सान्निध्यामुळे साहित्यप्रेमींचा प्रवास सुखकर झाला. त्यांच्याशी गप्पा, त्यांच्यासोबत फोटोसेशन यांना ऊत आला होता. गाडीत हौशे-नवशे-गवशांचा सुकाळ होता. नायगावकरांच्या गप्पा ऐन रंगात आलेल्या असताना या गवशांपैकी एकाने तावातावाने त्यांना विचारले, ‘एकीकडे तुम्ही साहित्य संमेलन हा रिकामटेकडय़ांचा उद्योग म्हणता, आणि वर स्वत:च संमेलनाला येता?’ नायगावकरांना क्षणभर धक्काच बसला. पण लगेचच स्वत:ला सावरून ते म्हणाले, ‘तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी कधीच संमेलनाला विरोध केलेला नाही. भालचंद्र नेमाडे तसे म्हणालेत. मी कवी अशोक नायगावकर.’ त्या खुलाशाने त्यांना जाब विचारणाऱ्याचा चेहरा साफ पडला. ‘सॉरी. मला वाटलं..’ म्हणत तो चालता झाला. नायगावकरांच्या झुपकेदार मिश्यांनी हा सगळा घोळ घातला होता.  
*****
पोलिसांची आत्मीयता
घुमानचं संमेलन पंजाब सरकारने जणू दत्तकच घेतलं होतं. संमेलनाला आलेल्या मंडळींच्या स्वागतासाठी बियास स्टेशनवर पोलीस अधिकाऱ्यांसह सरकारी लवाजमा हजर होता. साहित्यप्रेमींना त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणाऱ्या बसमध्ये त्यांची खातीरदारी करण्यासाठी एकेक पोलीस तैनात करण्यात आला होता. कुणाला काही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी ते तत्परतेनं पुढं सरसावत. परततानाही हीच काळजी घेतली गेली. एवढंच नव्हे तर संमेलनात साहित्यप्रेमींच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था झाली की नाही, याचीही पोलीस विचारपूस करत. कुणाला काही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी स्वत: राबत. आणि यात कुठं उपकाराची भावना नव्हती. उलट, त्यांची आत्मीयताच जास्त जाणवत असे.
*****
सगळं काही मनापासून
सरकारी यंत्रणेनं संमेलनाला आलेल्यांची काळजी घेणं एक वेळ समजू शकतं; पण घुमानमधल्या सर्वसामान्य लोकांनीही बाबा नामदेवांच्या भूमीतले लोक म्हणून संमेलनाला आलेल्यांचं मनापासून सगळं काही केलं. साहित्यरसिकांसाठी उसाच्या रसाचे स्टॉल्स, पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यापासून ते दोन- तीन कि. मी. अंतरावरील बाबा नामदेवांच्या गुरुद्वारात दर्शन घेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे त्यांना मोफत नेण्या-आणण्याची व्यवस्थाही गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे केली होती. तिथेही त्यांच्या चहापाण्याची चोख व्यवस्था होती.  दुसरीकडे स्वत:ला साहित्यरसिक म्हणविणाऱ्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी मात्र संमेलनाध्यक्षांचे भाषण सौजन्य म्हणून तरी संपूर्ण ऐकण्याची सहनशीलताही दाखविली नाही. त्यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी टाळ्या वाजवून आपल्या असंस्कृततेचं दर्शन घडवलं.  
*****
साहित्यप्रेमींची खंत
घुमानमधील मराठी साहित्य संमेलनाला मराठीजनांइतकीच पंजाबी शीख लोकांचीही गर्दी होती. संमेलनाचा अध्र्याहून अधिक सभामंडप शीख रसिकांनी व्यापला होता. संमेलनातील मराठी पुस्तकांच्या स्टॉल्सनाही ते आवर्जून भेट देताना दिसत होते. ‘तुमची उत्तम पुस्तकं पंजाबी किंवा हिंदीत भाषांतरित करून का आणली नाहीत? मग आम्हाला ती विकत घेता आली असती..’ अशी खंतही अनेकांनी बोलून दाखविली.
*****
इंग्रजी माध्यमांकडून दखल
घुमानमध्ये भरलेल्या या ‘मराठी’ साहित्य संमेलनाचं वृत्तांकन तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी तर केलंच; परंतु ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘संडे ट्रिब्युन’सारख्या इंग्रजी वृत्तपत्रांनीही अर्धा पान तसंच पानभर संमेलनाच्या बातम्या, वृत्तलेख प्रसिद्ध करून त्याची लक्षणीय दखल घेतली. आपल्या महाराष्ट्रात मात्र दरवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनं नित्य होत असली तरीही मराठी वृत्तपत्रांखेरीज अन्यभाषिक वृत्तपत्रं त्यांची ढुंकूनही दखल घेत नाही. इंग्रजी वर्तमानपत्रांच्या तर ते गावीही नसतं. या पाश्र्वभूमीवर ही ‘पंजाबी’ दखल निश्चितच सुखावणारी होती.  तसेच घुमानमधील मराठी साहित्य संमेलन ‘कव्हर’ करायला महाराष्ट्रात ‘राजकीय वृत्तांकन’ करणाऱ्यांची फौज उपस्थित होती. ते स्वयंस्फूर्तीने आले होते, की त्यांची कुणीतरी ‘व्यवस्था’ केली होती, कळायला मार्ग नाही. गंमत म्हणजे यात सर्वभाषिक पत्रकार होते.
*****
सुवर्णमंदिरातील ‘स्पेशल ट्रीटमेंट’
संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली. त्यांना दर्शनासाठी रांगेत मधूनच प्रवेश देण्यात आला तरी त्यांच्या सुरक्षेसाठी भाविकांची रांग मात्र अडवून ठेवण्यात आली नाही. त्यांच्यासमवेत भाविकांनाही दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील अन्य राज्यांतील ‘बडय़ा’ देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या ‘व्हीआयपी’ व्यक्तींना ‘स्पेशल ट्रीटमेंट’ दिली जात असताना सुवर्णमंदिरातील ही रीत निश्चितच अनुकरणीय!

Story img Loader