लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले.. बदलत्या मुंबईचे पडसाद बाजारावरही पडत असतात. एकीकडे काही वर्षांपूर्वीच सुरू झालेले मॉल्स ओस पडून टाळेबंद होत असताना दुसऱ्या बाजूला या पारंपरिक बाजारांमध्ये आजही धक्काबुक्की होताना दिसते.

गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्या गरजा भागवण्याचे ठिकाण म्हणजे ‘मुंबईतील बाजार’. या बाजारांनी प्रत्येक मुंबईकरांची हौस भागवली आहे, मुंबईत बदल होत गेले तशी मुंबईच्या बाजारांनीही कात टाकली. काही बाजार स्थलांतरित झाले तर मुंबईतील भिकार बाजार, नळ बाजार, गोदी बाजार असे अनेक बाजार काळाच्या ओघात नामशेष झाले. पण तरी या बाजारांनी मुंबईकरांना खूप काही दिले. सध्या मुंबईमध्ये ऐतिहासिक महत्त्व जपणाऱ्या बाजारांमध्ये क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, मंगलदास मार्केट, ससून डॉक येथील मासळी बाजार, चोर बाजार, भेंडी बाजार, कुलाबा कॉझवे, दादर भाजी बाजार, वांद्रे लिंकिग रोड यांचा समावेश करता येईल. यातील प्रत्येक बाजार आपआपल्या वेगळ्या वैशिष्टय़ांसह आजही टिकून आहे.
क्रॉफर्ड मार्केट
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून काही अंतरावर असलेल्या क्रॉफर्ड मार्केटचा समावेश (सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई) मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाजारांमध्ये होतो. १८६८ मध्ये ही वास्तू बांधण्यात आली. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव या बाजाराला देण्यात आले. १४७ वर्षांपूर्वी ही वास्तू जशी होती तशीच आजही आहे. इतक्या वर्षांत कुठल्याही भिंतीला साधा तडा गेला नसल्याचे बाजारातील जुने अनुभवी लोक सांगतात. सुरुवातीला पारसी आणि मराठी लोक या बाजारात व्यापार करत. भाज्या, फळे, सुगंधी द्रव्ये, सुकामेवा, खाद्यपदार्थ, प्रवासी बॅग, महिलांसाठी ड्रेसेस, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू कमी किमतीत येथे उपलब्ध होतात. मुंबापुरीत येणाऱ्यांसाठी या बाजारात फेरफटका मारणे आणि खरेदी करणे, हा एक सुखद अनुभव असतो. या बाजारात प्राणी व पक्ष्यांच्या विक्रीसाठी वेगळी गल्ली आहे. या मार्केटमध्ये सुमारे ११०० दुकाने आहेत. गेल्या १५ वर्षांपासून बाजाराच्या पुनर्विकासाबाबतची फक्त चर्चाच सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी क्रॉफर्ड बाजारात आग लागल्याने जवळपास ८० दुकाने जळून राख झाली होती. भविष्यातही हा बाजार असाच सर्वाना खुणावत राहील हे नक्की! मात्र अशा वातावरणात व्यापाऱ्यांची पुढची पिढी या व्यवसायात किती राहील, ही शंकाच आहे.
मंगलदास मार्केट
साधारण दीडशे वर्षांपासून ‘कपडय़ांचे होलसेल मार्केट’ अशी ओळख असलेल्या मंगलदास मार्केटची रचना ब्रिटिशकालीन आहे. कपडय़ांचे मार्केट ही मंगलदास मार्केटची ओळख आजही कायम असून इतर बाजारांप्रमाणे हा बाजारही सतत माणसांनी गजबजलेला असतो. कपडय़ांचा व्यवसाय करणारे हजारो लघु उद्योजक पुण्या-मुंबईहून कापड खरेदीसाठी येथे येतात. घाऊक व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात कॉटनची विक्री मोठय़ा प्रमाणात होती. मुंबईतील कापड कारखाने (मील) बंद झाल्यानंतर सिल्क, पॉलिस्टर अशा कापडांची विक्री वाढली, असे येथे व्यापार करणाऱ्या अजय त्रिवेदी यांचा अनुभव आहे. सुरुवातीला येथे फक्त तागाचे कापड विकले जात होते. मात्र कालांतराने कापडाबरोबरच तयार कपडय़ांची विक्रीदेखील या बाजारात सुरू झाली. सणासुदीला व सुट्टीच्या दिवशी हजारोंमध्ये लोक येथे खरेदी करतात.
कुलाबा कॉझवे
१९व्या शतकाच्या सुरुवातीला कुलाबा आणि लिटील कुलाबा यामधील जोडणाऱ्या या पट्टीला कुलाबा कॉझवे हे नाव देण्यात आले. सध्या या रस्त्याचे औपचारिक नाव शहीद भगतसिंग मार्ग असे आहे. त्या काळामध्ये सागरी किनाऱ्यावर होणाऱ्या व्यापारासाठी हा भाग ओळखला जात असे. मात्र रिगल सिनेमागृह, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि १९३४मध्ये बांधलेली पारसी कॉलनी यांमुळे या भागाला एक सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे. येथील कपडय़ांच्या आणि नवीन ट्रेंडी दागिन्यांच्या बाजारामुळे येथे नेहमीच तरुणांची गर्दी असते. सौंदर्यप्रसाधने, दागिने, नवीन फॅशनचे कपडे आणि चप्पल मिळण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे कुलाबा कॉझवे!
मनीष मार्केट
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मनीष मार्केटमध्ये कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. या बाजारात जुन्या सेकंड हॅण्ड मोबाईलपासून ते फस्ट हॅण्ड आय फोनपर्यंत सर्व इलेक्टॉनिक वस्तू विकल्या जातात. १९४०-५०च्या काळात येथे स्मगिलगचा माल विकला जायचा. आज या बाजारावर चायना मेड वस्तूंचा प्रभाव जास्त दिसतो. बाजारात आलेली नवीन वस्तू कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तरुण या बाजारात धाव घेतात. सेकंड हॅण्ड वस्तू व चायना मेड वस्तूंच्या कमी किमतीमुळे सध्या हा बाजार तेजीत आहे.
फॅशन स्ट्रीट
कपडय़ांच्या खरेदीसाठीचे दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी रोडच्या विरुद्ध दिशेला वसलेली ‘फॅशन स्ट्रीट’ ही मुंबईतील जुन्या बाजारांपकी एक आहे. मुंबईत सध्या कुठली फॅशन सुरू आहे, हे माहिती करून घेण्यासाठी फॅशन स्ट्रीट हे उत्तम ठिकाण! बडय़ा ब्रँड्सच्या दुय्यम आवृत्त्या खरेदी करण्यासाठी मुंबईकरांबरोबरच मुंबई दर्शन करावयास येणारी मंडळी हमखास येथे येतात. त्यातही मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांची गर्दी या स्ट्रीटवर नेहमीचीच! फॅशनेबल कपडय़ांपासून, शुज, ऑक्साइड व खोटे दागिने, सजावटीच्या वस्तू, समारंभासाठीचे भरजरी वस्त्रे कमी किमतीत येथे खरेदी केले जातात.
दादर भाजी मंडई
१८७०-८०च्या दशकापासूनच भायखळ्याजवळ भुलेश्वर येथे असलेला भाजी बाजार १९६४ साली दादर येथे स्थलांतरित झाला. दादर हे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण भाज्यांच्या व्यापारासाठी योग्य असल्याने या ठिकाणी भाजी मंडई सुरू झाली. या भागात भाजी मंडईमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून व राज्यातूनही भाज्यांची आयात होते व येथून छोटे छोटे भाजी व्यापारी मुंबईभर भाजी पुरवतात. काही वर्षांपूर्वी येथील अनेक परवानाधारक दुकानदारांना नव्या मुंबईत स्थलांतरित करण्यात आले. सध्या या मंडईत एकूण ५१ गाळे असून सुरुवातीला यापैकी बहुतांश गाळे मराठी भाषिकांच्या ताब्यात होते. मात्र कालांतराने हा व्यापार उत्तर भारतीयांच्या ताब्यात आला आहे. या मंडईला क्रांतिसिंह नाना पाटील मंडई नाव देण्यात आले आहे.
वांद्रे लिंकिग रोड
१९४०च्या दशकात मुंबई व जुहू या उपनगरांना जोडणाऱ्या वांद्रे पश्चिम येथील रस्त्याला लिंकिंग रोड असे नाव चिकटले, ते कायमचेच! या रस्त्याचे जुने नाव दादाभाई नौरोजी असून मुंबई उपनगरातून मोठय़ा संख्येने येथे खरेदी करण्यासाठी येतात. या भागात रस्त्यावरील खरेदीबरोबरच वेगवेगळ्या ब्रँड्सची दुकानेदेखील आहेत. चप्पल, ट्रेंडी कपडे, महिलांसाठी हातातील बॅग, जीन्स, पुरुषांचे कपडे असे सर्वच या बाजारात उपलब्ध आहे. मात्र या भागात रस्त्यावरील खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठय़ा दुकानात खरेदी करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.
ससून डॉक
सुमारे १८७५ साली सुरू झालेला ससून डॉक शहरातील सर्वात मोठा मासळी बाजार म्हणून ओळखला जातो. पहाटे येथे मोठय़ा प्रमाणात मासळींची विक्री केली जाते. येथे मुंबईबरोबरच ठाणे आणि इतर परिसरांतील मासळीचे छोटे छोटे व्यापारी मासळी विकत घेण्यासाठी येत असतात. हा बाजार बदलला नसल्याचे वाटत असले, तरी मच्छीमारांच्या समस्या बदलल्या आहेत. मासळींच्या किमती झपाटय़ाने वाढल्या असून सागरी प्रदूषणाचा विपरीत परिणाम मासळी व्यवसायावरही होत आहे.
भेंडी बाजार
भेंडी बाजारचा इतिहास साधारण १५० ते २०० वर्ष जुना असून क्रॉफर्ड मार्केटला लागून असलेल्या एका रस्त्याचा उल्लेख ब्रिटिश काळात ‘बिहाइण्ड द बाजार’ असा होत असे. या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला भेंडी बाजार नाव पडले असावे, असा अंदाज भेंडी बाजार भागात काम करणारे अभ्यासक मांडतात. काहींच्या मते, या भागात पूर्वीच्या काळी भेंडीची शेती असल्याने याला भेंडी बाजार हे नाव पडले असावे. सुरुवातीला या भागात खोजा व बोहरा समाजाच्या लोकांची वस्ती होती. त्यावेळी तांदूळ, गहू या धान्याचा घाऊक बाजार होता. धान्याच्या व्यापारानंतर मात्र या ठिकाणी कपडय़ांचाही व्यापार सुरू झाला आणि सध्या या भागात खाद्यपदार्थापासून कपडय़ांपर्यंत सर्व वस्तू विक्रीसाठी आहेत. मात्र सध्या या भागात पुनर्विकासाचे काम सुरू झाले असून क्लस्टर विकासाअंतर्गत १७ एकर भागातील ३०० इमारती पाडून त्याजागी हौसिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.
लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले.. बदलत्या मुंबईचे पडसाद बाजारावरही पडत असतात. मॉल संस्कृतीच्या कचाटय़ात सापडलेल्या मुंबईत या बाजारांचे महत्त्व आजही अबाधित आहे. एकीकडे काही वर्षांपूर्वीच सुरू झालेले मॉल्स ओस पडून टाळेबंद होत असताना दुसऱ्या बाजूला या पारंपरिक बाजारांमध्ये आजही धक्काबुक्की होताना दिसते. आजही या बाजारांतील दुकानदार हाळ्या देत ग्राहकांना बोलावत असतो आणि आजही इथे त्याच जोमाने घासाघीसही चालते.. मुंबई जिवंत असल्याचे हेदेखील एक लक्षण!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा