दिगंबर शिंदे
दुष्काळी भागात मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायास प्रोत्साहन आणि प्रक्रिया व्यवसायाची जोड देण्यासाठी रांजणी येथे सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी- शेळी महामंडळाने लोकरीपासून बारा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली आहे. शेतीपूरक व्यवसायास चालना देणाऱ्या या उपक्रमाविषयी…
दुष्काळी भागात माळरानावर गुजराण करणाऱ्या मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी रांजणी येथे सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी- शेळी महामंडळाने लोकरीपासून बारा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली आहे. यापासून स्थानिक पातळीवरील मेंढी पालन करणाऱ्यांनी प्रेरणा घेऊन हा उद्याोग समूह पद्धतीने केल्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळी. प्रतिकूल परिस्थितीत इथला शेतकरी कष्टाच्या जोरावर उभा राहिला. याच तालुक्यातील रांजणी गाव. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील प्रत्येक कुटुंबातील एकजण देश रक्षणासाठी सीमेवर उभा आहे. १९६२ च्या दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे मेंढी-शेळी प्रक्षेत्र होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे हे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर हे महामंडळाकडे वर्ग करण्यात आले. सांगली-जत राज्य मार्गालगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी-शेळी महामंडळाची स्थापना सन १९७८ मध्ये झाली. या प्रक्षेत्राचे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. या मेंढी-शेळी प्रक्षेत्राच्या माध्यमातून उस्मानाबादी व माडग्याळ जातीच्या शेळी व मेंढ्यांचे संगोपन व संवर्धन केले जाते. या प्रक्षेत्रात माडग्याळची मेंढी ५२२ तर उस्मानाबादी १०७५ अशी एकूण १५९९ इतकी संख्या सध्या आहे. शेतकऱ्यांना शेळी-मेंढी पालन, प्रथमोपचार व कृत्रिम रेतन यासह लोकर वस्तू विणकाम प्रशिक्षण दिले जाते. शेळीगटाच्या योजनांचीही अंमलबजावणी केली जाते. गांडूळ खत, चारा, याची विक्रीही केली जाते.
लोकरीपासून वस्तू निर्मिती
प्रक्षेत्राचे व्यवस्थापक डॉ. दडस सांगतात की, पैदास आणि संगोपन यावरच महामंडळ थांबले नाही. तर महामंडळ सुरू झाल्यापासून मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपासून वस्तू निर्मिती करण्यास सुरुवात झाली. या प्रक्षेत्रात चादर, सतरंजीसारख्या लोकरीपासून वस्तू तयार केल्या जातात. याठिकाणी लोकरीपासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे इथले गरजू लोक येवून प्रशिक्षण घेतात आणि याच ठिकाणी चादर, सतरंजी याचे विणकाम करतात. जेन, घडीचे जेन आणि उशी तयार करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते. त्यामुळे भिलवडी (ता. पलूस), ढालगाव (कवठेमहांकाळ), व्हसपेठ (जत), करगणी (आटपाडी) गावातील ५० कुशल कारागिरांकडून जेन, घडीचे जेन आणि उशी तयार करून घेतले जातात. त्यासाठी त्यांना प्रति नगाला ४०० रुपये तर घडीच्या जेनाला ६८५ रुपये, उशीला ६० रुपये अशी मजुरी दिली जाते. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होत आहे. पुण्यातीत गोखले नगर येथे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने मफलर, शाल निर्मिती होते.
लोकरीपासून वस्तू तयार करण्यासाठी लोकर आवश्यक असते. वर्षातून दोन वेळा लोकर काढली जाते. प्रक्षेत्रातील मेंढ्यापासून लोकर मिळते. परंतु ती पुरेशी नसते. त्यामुळे स्थानिक मेंढपाळ यांच्याकडून काळी लोकर ३५ रुपये तर मिश्र लोकर ३० रुपये या शासकीय दराने खरेदी केली जाते. वर्षाकाठी मेंढपाळ यांच्याकडून सुमारे ५ ते ६ हजार किलो खरेदी केली जाते.
चादर तयार करण्यासाठी ५० टक्के लोकरचे सूत आणि ५० टक्के कॉटनचे सूत लागते. कॉटनचे सूत हे सांगलीतून निविदाने खरेदी केले जाते. तर लोकरीचे सूत हे जयपूर, राजस्थान येथून तयार करुन घेतले जाते. त्याचीही निविदा पद्धतीने हे काम होते. प्रक्षेत्रातील लोकर राजस्थान, जयपूर येथे दिली जाते. तेथून विविध रंगाचे सूत तयार करून घेण्यात येते.
प्रशिक्षणातून होतेय रोजगार निर्मिती
प्रक्षेत्रावर एका महिन्याचे लोकरीपासून विणकामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू येतात. त्यांना विणकामाचे प्रात्यक्षिकातून विणकाम शिकवले जाते. महिला बचत गटातील महिलांनीही प्रशिक्षण घेतले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत या चारही जिल्ह्यांतील १०० हून अधिक लोकांनी गावात जेन, सह अन्य वस्तू तयार करण्यासाठी रोजगार निर्मितीही झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक प्रगती करण्यासाठी मदत मिळते.
सेंट्रल बोर्डाची मदत
मुळात, स्थानिक मेंढ्यांची लोकर जाडी भरडी असल्याने दर्जेदार लोकर फारशी मिळत नाही. त्यामुळे लोकर दर्जेदार आणि लोकरीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ जोधपूर (राजस्थान) १०० टक्के अनुदानावर लोकर सुधार हा सन २०१८ पासून कार्यक्रम प्रक्षेत्रावर राबवला जात होता. सांगली जिल्ह्यातील मेंढपाळांकडून ५० हजार मेंढ्या प्रक्षेत्राने दत्तक घेतल्या.
त्या मेंढ्यांची लोकर सुधारण्यासाठी संतुलित पशुखाद्या, खनिज मिश्रणे, लसीकरण-प्रथमोपचाराची औषधे तसेच प्रक्षेत्रावर तयार उत्पादित जातीवंत एक मेंढा नर हा मेंढापाळाला शंभर टक्के अनुदानावर दिला जातो. दर्जेदार लोकर उत्पादन तयार होण्यासाठी मदत होते.
लोकरीची तपासणी
मुळात लोकरीची तपासणी होणे महत्त्वाचे असते. त्याचे कारण म्हणजे जेन सोडून इतर वस्तू तयार करण्यासाठी लोकरीचा धागा लागतो. त्यामुळे प्रक्षेत्रातील उत्पादित व खरेदी केलेली लोकर ही केंद्रीय लोकर विकास मंडळ जोधपूर (राजस्थान) येथे लोकरीचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने केसांची जाडी, चकाकी, लांबी, रुंदी, म्येड्युलेश आणि कुरळी याचे प्रमाण किती आहे याची तपासणी होते. त्यानंतर ही लोकर धाग्यासाठी योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर धागा तयार करण्याचे नियोजन केले जाते. यामुळे दर्जेदार लोकरीचा वापर केल्याने वस्तूंचा दर्जा चांगला राहतो आणि टिकावू वस्तू तयार होतात.
प्रदर्शन आणि विक्री
सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई यासह खादीग्रामोद्याोग यासारख्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनामध्ये लोकरीच्या वस्तूंची विक्री होते. लोकरीपासून तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंना पुण्यश्लोक नावाचा ब्रँड निश्चित करण्यात आला आहे. या ठिकाणी लोकर वस्तू विणकामाचे एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. लोकरीपासून चादर, सतरंजी, घोंगडी, शाल, घडीचे जेन, मफलर, चेअर कार्पेट, आसन, उशी या प्रकारची उत्पादने केली जातात. उत्पादन ते विक्री अशी साखळी असल्याने यापासून महामंडळाला वर्षाला सुमारे २० ते २५ लाखांचे उत्पन्न मिळते.
माणदेशातील माळरानावर प्रामुख्याने मेंढी पालन मोठ्या प्रमाणात आहे. केवळ मांसासाठी मेंढी पालन न करता मेंढीच्या लोकरीपासून वस्तू उत्पादित करून त्याची विक्री व्यवस्था केली तर निश्चितच याचा फायदा व्यावसायिकांना होईल. – डॉ. सचिन दडस
Digambar.shinde@expressindia. com