प्र त्येक घटनेचा आयुष्यावर कमी-अधिक, बरा-वाईट परिणाम होत असतो. पण एखाद्या घटनेने आयुष्याची दिशा बदलते. अनेक दहशतवादी हल्ले, दंगली, अपघात यांचे आघात झेलणारम्ी मुंबईही प्रत्येक घटनेनंतर बदलते. कधी हे बदल थेट- दृश्य स्वरूपातील असतात तर कधी अप्रत्यक्षरित्या झालेले. २६ जुलैचा पूर ज्यांनी अनुभवला त्यांच्या आयुष्यातील ते तीन दिवस व त्याचे दूरगामी परिणाम विसरूच शकणार नाहीत. या निसर्गाच्या तांडवाचा मुंबईकरांवर जबरदस्त परिणाम झाला आणि तो हरेक क्षेत्रात दिसला. पुढील काळात मुंबईची अशी अवस्था होऊ नये यासाठी राज्यकर्त्यांनी काय उपाय योजले व त्याचे ‘नेमके’ काय झाले हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले आहेच. मात्र सरकारी यंत्रणांच्या पलिकडे मुंबईच्या व मुंबईकरांच्या आयुष्यात या घटनेनंतर अनेक बदल झाले. हे बदल वैयक्तिक, विज्ञान-पर्यावरण व तंत्रज्ञानाच्याही पातळीवर होत गेले.
‘पावसाची भाषा’ बदलली
या पूराने सर्वात पहिला बदल घडवला तो पावसाकडे पाहण्याच्या दृष्टीत. मुसळधार पाऊस मुंबईकरांना नवा नव्हता. दरवर्षी एकदा तरी लोकल बंद पडल्याशिवाय पाऊस पडल्यासारखे वाटत नाही, हा संवाद २६ जुलैपूर्वीही होता. मात्र महापुराने ही भाषाच बदलली. त्यानंतर जेव्हा जेव्हा मुंबईत मोठा पाऊस झाला तेव्हा त्याची तुलना २६ जुलैशी केली गेली. त्यानंतरचा प्रत्येक मोठा पाऊस मुंबईकरांच्या काळजात धडकी भरवणारा ठरला. पूर्वी ट्रेन बंद पडतच होत्या. घरी पोहोचायला एक तासाऐवजी चार-पाच तास लागत. मात्र २६ जुलैने ही वेळ दोन-तीन दिवसांवर नेली. गेल्या दहा वर्षांत पुन्हा असा पाऊस लागला नसला तरी मुसळधार पाऊस सुरू झाला की मुंबईकरांच्या हृदयाचा एक ठोका चुकतो. सकाळी पाऊस सुरू झाला की माणसे घराबाहेर पडताना बिचकतात. पाऊस हा आता भीती घेऊन येतो.
नद्या समजल्या!
मुंबईत नद्या? मिठी नदीच्या पुराने हाहाकार घडवल्याचे लक्षात आल्यावर मुंबईकरांना सर्वात आधी हा प्रश्न पडला होता. वांद्रे खाडीकडे येणारा नाला अनेकांना माहिती होता. मात्र ही मिठी नदी आहे आणि याच प्रकारे पोईसर, दहिसर, ओशिवरा अशा चार नद्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात याचा मुंबईकरांना शोध लागला. अर्थात शोध लागला आणि कोटय़वधी रुपये खर्च केले तरीही या नद्यांची अवस्था आजही नाल्यांपेक्षा बरी नाही, हे वास्तव उरतेच.
भरती-ओहोटीच्या संज्ञा
समुद्रकिनारा म्हणजे फिरायला जाण्याचे ठिकाण असे ठरवलेल्या मुंबईकरांना २६ जुलैने भरती-ओहोटीची भाषा समजावली. समुद्रातील भरती-ओहोटी हा फक्त विज्ञानातील एका वाक्यात उत्तरे देण्याचा विषय होता. मात्र तो थेट मुंबईकरांशी जोडला गेला. चंद्र, सूर्य, खाडीतील जीवसंस्था, मत्स्योत्पादन.. अशा सतराशे साठ गोष्टी भरती-ओहोटीशी संबंधित असल्या तरी मुंबईकरांना मात्र भरती म्हणजे पाणी साठण्याच्या वेळा वाटतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की भरतीच्या वेळा विचारून घराबाहेर पडण्याचा मुहूर्त ठरवला जातो.
अत्याधुनिक रडार आले..
वेधशाळेचे अंदाज खिल्ली उडवण्यापुरतेच असतात असे वाटत असले तरी २६ जुलैनंतर मुंबईची वेधशाळा आधुनिक करण्यासाठी त्वरेने पावले उचलण्यात आली. अत्याधुनिक, पाचशे किलोमीटर परिसरात लक्ष ठेवणाऱ्या डॉप्लर रडारची मागणी तेव्हाच सुरू झाली. प्रत्यक्षात चीनवरून डॉप्लर आणण्यात अनेक सुरक्षा मानके आड आली आणि अखेर देशी बनावटीचे एस बॅण्ड रडार लावण्यासाठी मात्र २०११ वर्ष उलटले.
पाऊस मोजण्याची यंत्रणा
२६ जुलै झाले तेव्हा मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या सांताRूझ येथील केंद्रात ९४४ मिमी पावसाची नोंद होती, तर कुलाबा येथे अवघा ७४ मिमी पाऊस पडला होता. त्याचवेळी विहार तलावाकडील पर्जन्य-जलमापकात तब्बल १०४९ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील तीन वेगवेगळ्या भागातील पावसाचे हे प्रमाण चक्रावणारे तर होतेच शिवाय व्यवस्थापन यंत्रणा वेगळ्या पद्धतीने राबवण्याची गरज अधोरेखित करणारे होते. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात एकाच वेळी लाखो लोक प्रवास करत असताना नेमक्या कुठल्या भागात किती पाऊस पडतो आहे व त्यावर उपाय योजण्यासाठी पालिकेकडून शहरासाठी पर्जन्यमापकांचे जाळे बसवण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय थेट २६ जुलैशी निगडित नसला तरी त्यावर याचा प्रभाव होता.
तळमजल्याच्या किमती घसरल्या
पूर्वी लिफ्ट नसतानाच्या काळात तळमजला किंवा पहिल्या मजल्यावरील घरांना विशेष मागणी होती. लिफ्टची सोय सुरू झाली तरीही घरात ज्येष्ठ, लहान मुले असलेली कुटुंब याच दोन मजल्यांना प्राधान्य देत. मात्र पुराच्या पाण्यात सखल भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले आणि या घरांचे भाव वेगाने उतरले. झोपडपट्टय़ांमध्ये १४ फूट उंची वाढवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने २००१ मध्येच घेतला होता. २६ जुलैनंतर एक मजला वाढवण्याची परवानगी द्यावी, असा हाकारा सुरू झाला. मात्र त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही.
ल्लप्राजक्ता कासले
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग तत्पर
’पालिकेने २००७ मध्ये आपला स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सुरू केला.
’पालिकेची २४ विभाग कार्यालये, अग्निशमन दल, पोलीस दल, नौदल यांसह विविध शासकीय यंत्रणांशी हॉटलाइनद्वारे हा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग जोडला गेला आहे.
’सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या विभागातून मुंबईतील अनेक ठिकाणांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे पावसाळ्यात सखल भाग जलमय होताच संबंधित यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला जातो. तसेच पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले जाते. जलमय भागातील वाहतूक अन्य मार्गे वळविण्याची सूचना संबंधित यंत्रणांनाही केली जाते.
ब्रिमस्टोव्ॉड अपूर्णच..
पूर्वी मुसळधार पावसात मुंबईतील ५५ सखलभाग जलमय होत. ‘२६ जुलै’चा धडा घेऊन पालिकेने सखल भागांवर लक्ष केंद्रित केले. ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पांतर्गत सखल भागातील पाण्याचा झटपट निचरा करण्यासाठी आठ ठिकाणी उदंचन केंद्रे उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. गेल्या दहा वर्षांमध्ये हाजीअली, ईर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड बंदर येथील उदंचन केंद्रे कार्यान्वित करण्यात पालिका यशस्वी ठरली. त्यामुळे आता ४० सखलभागच जलमय होतात. सर्व आठ उदंचन केंद्रे वेळीच सुरू झाली असती तर आजघडीला मुंबईतील परिस्थिती वेगळी असती.
साह्य़कर्ती मुंबई
मुंबईकर नेहमीच मदतीसाठी तत्पर
असतात. २६ जुलैच्या पुरात अडकलेल्या अनेकांना याचे पुन्हा प्रत्यंतर आले. रस्त्यात अडकलेल्या लाखो लोकांना त्या दिवसात अनोळखी माणसांनी खाद्यन्नाची पाकिटे वाटली. ओळख नसताना घरात आश्रय दिला.
एकमेकांच्या सोबतीने २६ जुलैची रात्र रस्त्यावर काढणाऱ्यांना आयुष्यभराचे मित्र सापडले. हातात हात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्या हजारो लोकांनी शासकीय यंत्रणांची वाट पाहिली नाही.
दहा वर्षांनंतर २६ जुलैच्या आठवणी निघतात, तेव्हा काळोख्या रात्रीमध्ये घुसमटलेला जीव आठवताना मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचे मैत्रही निष्टिद्धr(१५५)तच आठवते. २६ जुलैने मुंबईकरांना या आठवणीही दिल्या आहेत.