‘लोकशाहीर’ अण्णा भाऊ साठे यांची आज ११३ वी जयंती. त्यानिमित्त हा लेख, त्यांच्या साहित्यिक कार्याचे मूल्यमापन आजही का महत्त्वाचे ठरते याविषयीच्या चर्चेची सुरुवात करून देणारा..
‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.’
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या व आपल्या वरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणाऱ्या लोकशाहीर, साहित्यिक कॉ.अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्टला जयंती आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ हे कामगार-कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले. परंतु तथाकथित प्रस्थापित ब्राह्मणी साहित्य-संस्कृतीच्या ठेकेदारांनी व त्यांच्या समीक्षकांनी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा साहित्यिक म्हणून उचित गौरव व सन्मान केला नाही. त्यांच्या वाटय़ाला १९६० च्या दशकापर्यंत म्हणजे दलित-आंबेडकरी-प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना.गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. परंतु या तिघांचेही भव्य उचित स्मारक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ५० वर्षांनंतरही झालेले नाही. या कालखंडात अखिल भारतीय म्हणविणारी अनेक मराठी साहित्याची संमेलने झाली. परंतु त्यापकी एकाही साहित्य संमेलनाला अण्णा भाऊ साठे वा अमर शेखांना ना सन्मानाने निमंत्रित केले, ना त्यांच्या साहित्यावर चर्चा केली. वरील साहित्यिकांच्या वाटय़ाला जी उपेक्षा आली, त्याचे एक कारण ते कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित होते व दुसरे म्हणजे ते ज्या जातवर्गीय समाजातून आले होते व त्यांनी ज्या दलित-शोषित, कष्टकरी जातवर्गीयांची वेदना, दाहक जीवन वास्तव आपल्या साहित्यातून मांडले व प्रस्थापित समाजव्यवस्थेवर, संस्कृतीवर आपल्या लेखनातून, गाण्यातून जे आसूड ओढले ते सत्तेवरील प्रस्थापित राज्यकर्त्यांना व त्यांची पालखी वाहणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारांनाही रुचणारे नव्हते.
त्या संदर्भात अण्णा भाऊ आपल्या ‘वैजयंता’ कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षांवर अढळ विश्वास आहे.’ अण्णा भाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते.  त्याबाबत ते एका ठिकाणी म्हणतात, ‘जे मी स्वत: जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत. ’
अण्णा भाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामथ्र्य त्यांच्या लेखणीत आहे. सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’मध्ये त्यांनी वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले. ‘वाट्टेल ते’ आणि ‘हवे ते’ ही सदरे लिहिली. ‘मराठा’सारख्या दैनिकातही लेखन केले. पहिली कथा कम्युनिस्ट पक्षाच्या ‘मशाल’ साप्ताहिकात लिहिली.
कथांमधून काळाशी सुसंगती
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले. त्यांच्या ‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे. ‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे. ‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे. ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे. अण्णा भाऊंच्या ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात. ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात. अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वष्रे मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष अण्णा भाऊंच्या ‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत आढळतो. ‘मरीआईचा गाडा’ या कथेत  अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचेही चित्रण अण्णा भाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये आढळते. दलितांनी मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे, त्याचे मांस खाणे थांबवावे असा संदेश डॉ. बाबासाहेबांनी दिला होता. त्या संदेशामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, अनेक गावांत दलितांना बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते. अनेक दलितांना मृत मांस खाण्याच्या जुन्या सवयी सोडणेही जड जात होते. या द्वंद्वाचे चित्रणही अण्णा भाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’सारख्या कथांत आढळते. भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण ‘उपकाराची फेड’ या कथेत पाहायला मिळते.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही.
 त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाडय़ांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना बंगालचा दुष्काळ, तेलंगणा संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मना, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बíलनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव’ हे गाणे अशी अनेक गाणी, कवने, पोवाडय़ांतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
पुरोगामित्वाची परंपरा.. शिवरायवंदन!
अण्णा भाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही (form) आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. अण्णा भाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, िहदी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.
अण्णा भाऊ साठेंच्या या क्रांतिकारक विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा विकसित झाला. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते / कार्यकत्रे कॉ.आर. बी. मोरे, कॉ. के. एम. साळवी, कॉ. शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला. अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित कॉ. स. ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने, कॉ. वा. वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाटय़संग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते कॉ .ए. के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर कॉ.अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अण्णा भाऊंमधील लेखक-कलावंत जपण्याचे व फुलविण्याचे काम कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यां कॉ. जयवंताबाई या त्यांच्या द्वितीय पत्नीने अपार त्याग व काबाडकष्ट करून अखेपर्यंत केले. त्यांना त्यांच्या दोन मुली शांताबाई व शकुंतलाबाई यांचीही साथ लाभली.  त्याची नोंद मात्र संबंधितांनी घेतली नाही व उचित सन्मान केला नाही याची खंत आहे.
* लेखक सांस्कृतिक व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा