साठाव्या  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ५ वे पुष्प. आजच्या या सोहळ्याची सुरुवात एका स्वर सम्राटाने केली. या सम्राटाचे नाव सम्राट पंडित. आपल्या बहारदार गायनाची सुरुवात या युवा सम्राटाने राग यमनने केली. ‘सुमिरन तेरी’ ही बंदिश विलंबित एक तालामध्ये होती. सुरेख आलाप, दाणेदार ताना, लयकारी यामुळे हे गायन रंगले. ‘बिनती मानो पिया मेरी’ या मध्यलय एक तालामध्ये सादर केलेल्या बंदिशीने रंगत आणली. शेवटी स्व. उ. बडे गुलाम अली खाँ यांनी समस्त रसिकांच्या मनावर कायमचे राज्य केलेली ‘याद पिया की आये’ ही ठुमरी सादर केली. मूळ या ठुमरीच्या जागांचा पुन:प्रत्ययाचा आनंद देण्यास हा युवा सम्राट यशस्वी झालेला आहे. यांच्या गायनास साथ संगत अशी होती : स्वरसंवादिनी – अविनाश दिघे, तबला – प्रशांत पांडव, श्रुती – कांचन लघाटे, राजश्री महाजन.
सुप्रसिद्ध गायिका श्रीमती आरती अंकलीकर-टिकेकर यांचे स्वरमंचावर आगमन झाले. या विदुषी – किशोरी अमोणकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या महागायिकेच्या शिष्या. कार्यक्रम सुरेख रंगणारच याची श्रोत्यांना खात्री होती. त्यानुसार घडलेही तसेच. सर्वप्रथम त्यांनी भीमपलास रागामधील ‘अखिया मोरी लागी’ ही सुप्रसिद्ध बंदिश सादर केली. तर द्रुतमध्ये ‘जा जारे अपने मंदिरवा’ ही मध्य त्रितालातील बंदिश गायिली. या गायिकेचा स्वर अतिशय पक्का आहे. लयकारी, बेहेलावे या प्रकाराचा डोळस अभ्यास व रियाज श्रीमती आरतीजींचा दिसून येत होता. या भीमपलासी रागात ‘दानी तानू तन देरेना’ हा तराणा गमक खटक्या, मुरक्यासह पल्लेदार तानांसह पेश केला.
यानंतर पं. भीमसेन जोशी यांनी निर्माण केलेला ‘कलाश्री’ हा ‘कलावती आणि श्री’ यांचे मिश्रण असलेला राग त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सादर केला. ‘धन धन भाग सुहाग मेरो’ तीन तालामधील ही चीज अतिशय तन्मयतेने सादर केली. या खेरीज ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा अभंग अत्यंत भक्तिभावाने विक्रमी टाळ्या घेत सादर केला आणि आपले चैतन्याने भरलेले गाणे थांबविले. साथ संगत : स्वरसंवादिनी – सुयोग कुंडलकर, तबला – पं. रामदास पळसुले, पखवाज – धनंजय वसवे, श्रुतीवर – सायली पानसे, प्रिया साठे.
पं. स्वपन चौधरी, लखनौ घराण्याची परंपरा चालविणारे तबलानवाज यांचे व्यासपीठावर आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी सादरीकरणासाठी त्रिताल निवडला. खुल्या बाजासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे. नृत्य प्रकारासाठी हा खुला बाज खूपच उपयुक्त असतो. पंडित स्वपनजींना स्वरसंवादिनीवर लेहेरा साथ  तन्मय देवचक्के यांची होती. सोलो तबला वादन करतेवेळी लेहेरा साथ करणाऱ्या कलाकाराचे बाबतीत संगीतशास्त्राचा एक अत्यंत कडक नियम आहे. तो असा – त्याने फक्त लेहेरा लयीत कसा वाजेल, सुरात कसा वाजेल याकडेच लक्ष द्यायचे, तबला अजिबात ऐकायचा नाही. संत ज्ञानेश्वर माउलींचे शब्दात ‘आधी अवधान एकले दिजे। मग सर्व सुखाते पात्र होईजे।।’ या पद्धतीने लेहेऱ्याकडे ‘एकले’ अवधान देऊन वाजविले म्हणजे लय चुकत नाही. पर्यायाने तबलजीचा ताल चुकत नाही हे महत्त्वाचे. संगीताचे तालासुराचे सर्व सुख वादक आणि श्रोत्यांना मिळते. नाहीतर ‘ताल गया तो बाल गया। स्वर गया तो सिर गया।।’ इतकी भयंकर सौंदर्यहानी या लेहेरा वाजविणाऱ्या स्वरसंवादिनी कलाकाराच्या अवधान बिघडल्यामुळे होते.
हा कलाकार नावाप्रमाणेच अत्यंत तन्मयतेने, गोडव्याने लयीत लेहेरा वाजवीत होता आणि ‘सुखास पात्र’ होत होता. पंडितजींचे वादन सौंदर्य तर अवर्णनीय होते. तबल्यावरील बोटांचे चापल्याचे वर्णन बनारस विद्यापीठाचे आदरणीय गुरू पं. मदनमोहन मालविय यांच्याच शब्दात ‘‘क्या तिरख है!’’ असेच करावयास हवे. स्व. उस्ताद अहमदजान तिरखवाँ यांचे वादन ऐकून तिरखवाँ ही पदवी त्यांना मालवियजींनी दिली होती. त्या तिरखचे या निमित्ताने स्मरण झाले.
तबल्यावर अनेक कायदे, रेले, पडन, गत, तुकडे, चक्रधार त्यांनी सादर केले. वादनात कुठेही बोबडेपणा नव्हता. सुस्पष्ट विचार व अक्षरांचे असे हे समृद्ध तबलावादन होते.
यानंतर श्रोते ज्यांची अत्यंत उत्कंठतेने वाट पाहत होते ते स्व. पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि किराणा घराण्याचा समृद्ध वारसा अंगभूत सामथ्र्य व प्रचंड मेहेनत, जिद्दीने पुढे चालविणारे पं. श्रीनिवास जोशी यांचे स्वरमंचावर आगमन झाले. पंडित भीमसेन जोशींची ‘करिम नाम तेरो’ ही मियाँ की मल्हार ही बंदिश त्यांनी अतिशय ताकदीने सादर केली.
‘मेघांच्या गर्जनेने, सिंह खवळूनि वरती पाहे स्वभावे’ ही स्व. पं. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची ‘अन्योक्ती’ या काव्य प्रकारामधील काव्यपंक्ती या दमदार गायकाच्या गायनाने आठवली. अशीच सिंहगर्जना घसीट, सूंथ आणि बेहेलाव्याच्या विविध सप्तकात सादरीकरणाने खूपच गाजली. पंडितजींचे असेच ‘पौरुष’ त्यांच्या गायनामधून प्रतिबिंबित होत असे.  
द्रुत त्रितालामध्ये ‘बरसन लागी’ याच रागामधील बंदिशही अशीच छाप पाडून गेली. दोन-दोन, तीन-तीन आवर्तनाच्या ताना या रागाचे सौंदर्य वाढवीत होत्या. याच रागात ‘अत धूम धूम मचे बिजुरिया’ ही एक तालामधील चीजही वैविध्यपूर्ण तान प्रकारांनी सुरेख दाद देऊन गेली.
शेवटी मिश्र पिलू ठुमरी दीपचंदी तालात छान गायिली गेली. ठुमरीचे बोल होते ‘मोरे सैय्या उतरेंगे पार’. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने पंडित श्रीनिवासजींनी गायन भावपूर्ण अंत:करणाने संपविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशिकांत चिंचोरे
  वेणु विशारद

शशिकांत चिंचोरे
  वेणु विशारद