हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि उत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मनोजकुमार यांचे मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. देशभक्तिपर चित्रपटांवर जोर देत नायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फाळणीचे दाहक चटके सोसून भारतात आलेल्या आणि पुढे चित्रपटसृष्टीत रमलेल्या तत्कालीन अनेक कलाकारांपैकी मनोजकुमार हेही होते. फाळणीच्या आठवणींचा परिणाम म्हणून की काय, मनोज कुमार यांच्या कारकिर्दीवर देशभक्तिपर चित्रपटांचा वरचष्मा राहिला. तो इतका की त्यांचे चाहते त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखू लागले.
ब्रिटिशकाळात १९३७ साली तेव्हाच्या पाकिस्तानातील खैबर पख्तून्ख्वा प्रांतात मनोजकुमार यांचा जन्म झाला होता. फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंबीय दिल्लीत आले. त्यावेळी सुरुवातीला दिल्लीतील स्थलांतरितांच्या छावणीत लहानपण घालवलेल्या हरिकृष्ण या तरुणाला रुपेरी पडद्याची भुरळ पडली, तेव्हा त्याच्यासमोर गोष्टींची ही स्वप्नील दुनिया पडद्यावर रंगवणारे आवडते कलाकार होते, अशोक कुमार आणि दिलीप कुमार. चित्रपटात काम करायचे हा निर्धार लहानपणीच त्यांच्या मनात झाला होता. दिलीप कुमार या आवडत्या कलाकाराचे चित्रपट पाहता पाहता त्यांच्याच ‘शबनम’ चित्रपटातील व्यक्तिरेखेचे ‘मनोज’ हे नाव त्यांना आवडले आणि पुढे हरिकृष्ण गोस्वामी नावाचा हा तरुण ‘मनोज कुमार’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करता झाला.
सुरुवातीला चित्रपट स्टुडिओत ११ रुपये या दराने प्रत्येक दृश्य लिहून देणाऱ्या मनोजकुमार यांनी १९५७ साली ‘फॅशन ब्रँड’ नामक चित्रपटातून पदार्पण केले. १९६१ साली आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. १९६२ साली आलेला अभिनेत्री माला सिन्हा यांच्याबरोबरचा ‘हरियाली और रास्ता’ हा त्यांचा चित्रपटही गाजला. एकाच वेळी प्रेमपट, सामाजिक विषय मांडणारे ‘ग्रहस्थी’, ‘अपने हुए पराए’ सारखे चित्रपट, त्यानंतर १९६४ साली दिग्दर्शक राज खोसला यांच्याबरोबर केलेले ‘वोह कौन थी’, १९६५ चा ‘गुमनाम’सारखे रहस्यपट, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘पत्थर के सनम’ अशा भिन्न शैलीतील चित्रपटातून त्यांनी काम केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेले ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’ हे तीन चित्रपट कमालीचे यशस्वी ठरले.
देशासाठी लढलेल्या भगतसिंग यांची कथा सांगणारा ‘शहीद’ हा १९६५ साली प्रदर्शित झालेला मनोज कुमार यांचा चित्रपट लोकांना खूप आवडला. या चित्रपटाचा प्रभाव तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यावरही पडला. त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी भारत-पाक युध्दाच्या पार्श्वभूमीवर ‘जय जवान जय किसान’ या संकल्पनेवर चित्रपट करण्याविषयी मनोजकुमार यांना सांगितले. त्यातून १९६७ साली ‘उपकार’ हा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन आणि भूमिका मनोज कुमार यांनी केली होती. ‘उपकार’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. १९७० साली प्रदर्शित झालेला ‘पूरब और पश्चिम’, मग भारतीय क्रांतिकारकांची कथा सांगणारा ‘क्रांती’ या चित्रपटांमधून मनोज कुमार यांचे देशप्रेम ठळकपणे अधोरेखित झाले. आणि त्याच प्रभावातून लोकांनी त्यांना ‘भारत कुमार’ हे नाव बहाल केले. भारत कुमार हे नाव एकाच वेळी दडपण आणि जबाबदारी दोन्ही भावना मनात जागवणारे आहे, असे मनोज कुमार यांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले होते.
१९९९ साली प्रदर्शित झालेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ठरला. १९९२ साली त्यांना ‘पद्माश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट करण्यामागची त्यांची विचारधारा एकदम स्पष्ट होती. आपल्या काळात चित्रपट हा सर्जनशील, कल्पक कलाव्यवसाय होता, नंतर नंतर केवळ व्यवसाय म्हणून चित्रपटनिर्मिती होत गेली, याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटकर्मी हा समाजाशी बांधील असतो, तो ज्या समाजाचा भाग आहे त्या समाजाची नीतीमूल्ये, संस्कार, प्रेरणा या त्याच्या कलाकृतीतून उमटायलाच हव्यात, असा आग्रह धरणारा आणि आपल्या कलेतून तो जपणारा मनोज कुमार यांच्यासारखा अस्सल कलावंत पुन्हा होणे नाही.
गाजलेले चित्रपट
●हरियाली और रास्ता (१९६२)
●वो कौन थी? (१९६४)
●शहीद (१९६५)
●गुमनाम (१९६५)
●उपकार (१९६७)
●पत्थर के सनम (१९६७)
●‘पूरब और पश्चिम’ (१९७०)
●शोर (१९७२)
●रोटी कपडा और मकान (१९७४)
●क्रांती (१९८१)