मधू देवळेकर, माजी आमदार
भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या देहावसानाने भारतमातेचा सुपुत्र व संघपरिवारातील तेजस्वी हिरा अनंतात विलीन झाला. देशातील एक लोकप्रिय नेता, अप्रतिम वक्ता, मुत्सद्दी, अजातशत्रू, कविमनाचा रसिक आणि समर्पित देशभक्ताला देश मुकला. अटलजींनी दीनदयाळजींना वाहिलेल्या, श्रद्धांजलीची आठवण झाली.
नंदा-दीप बुझ गया,
हमें अपना जीवन-दीप जलाकर अंधकार से लडम्ना होगा।
सूरज छिप गया,
हमें तारों की छाया में अपना मार्ग ढूंढना होगा।
हमारा मित्र, सखा, नेता और मार्ग-दर्शक चला गया,
ध्येय-पथ पर आगे बढम्ना होगा।
हेच भाव आमच्या मनामध्येसुद्धा आहेत.
अटलजींचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील गोडवा चटकन लक्षात येई. त्यांचे हास्य लोभसवाणे होते. त्यांच्या बोलण्यात एक आकर्षक गोडवा होता. देशाचे महान नेते असूनदेखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटायचे, जवळचे वाटायचे.
अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला व शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यांचे वडील शिक्षक होते. तेथील मराठी वातावरणाचा त्यांच्यावर बराच प्रभाव होता. उत्तम मराठी बोलायचे. तेथील कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढचे शिक्षण कानपूर येथे घेतले. डी.ए.व्ही. कॉलेज, कानपूर येथून एम.ए. झाले. ग्वाल्हेरमध्ये असतानाच १९४० पासून अटलजी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक झाले. तेथील प्रचारक नारायणराव तरटे यांनी त्यांना संघात आणले. देशाच्या फाळणीनंतर १९४७ पासून संघाचे प्रचारक, पूर्णवेळ कार्यकत्रे झाले.
अटलजी म्हणतात, बहुधा १९३९ मध्ये श्रीगुरुजींचे दर्शन ग्वाल्हेर स्टेशनवर घेतले होते. नंतर एका स्वयंसेवकाच्या नात्याने संपर्क वाढत गेला, कधी कधी त्यांचे तेज, प्रखरता बघून आम्ही भयभीत होत असू. मात्र जवळ आल्यावर आत्मीयता व स्नेहाचे जे वातावरण मिळत असे. त्याच स्नेहपूर्ण वातावरणानेच एवढे मोठे संघटन उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली; हे कोणी नाकारू शकणार नाही. श्री गोळवलकर गुरुजी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा अटलजींना घडविण्यामध्ये मोठा वाटा होता.
ऑक्टोबर १९५१ मध्ये भारतीय जनसंघाची दिल्लीत स्थापना झाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नेतृत्व जनसंघाला लाभले. पं. दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, जगन्नाथराव जोशी, यज्ञदत्त शर्मा, सुंदरसिंह भंडारी इत्यादी संघप्रचारकांना संघव्यवस्थेतून जनसंघाचे काम करण्यास सांगितले गेले. अटलजी डॉ. मुखर्जी यांचे व्यक्तिगत कार्यवाह म्हणून काम पाहू लागले. बाळासाहेब देवरस, वसंतराव ओक यांना जनसंघाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
जानेवारी १९५३ मध्ये दिल्लीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीनी संघ अधिकारी व जनसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची सभा निमंत्रित केली. बाळासाहेब देवरस, माधवराव मुळ्ये, वसंतराव ओक, केदारनाथ साहनी, सुंदरसिंह भंडारी यांच्यासह जनसंघाचे प्रेमनाथ डोग्रा, बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख इत्यादी नेते होते. त्यामध्ये सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीरमध्ये सत्याग्रहासाठी गेले. तेथे त्यांना अटक करण्यात आली. पुढे २३ जून १९५३ रोजी त्यांचे गूढरीतीने श्रीनगर येथील कारागृहात निधन झाले.
अटलजी १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत बलरामपूर, उत्तर प्रदेश येथून संसदेमध्ये निवडले गेले. अटलजींचा स्वभाव व्यवहारात कटुता टाळण्याचा असे. संघर्ष टाळून समन्वयाचा आणि सन्माननीय तडजोडीचा असे. त्यामुळे विरोधकांनासुद्धा त्यांच्या व्यवहारात शालीनता दिसून येत असे. गुंतागुंतीचा विषय सर्वसामान्यांना सोपा करून सांगण्याचे त्यांचे कसब होते.
सुरुवातीपासूनच अटलजींचे स्थान, त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे जनसंघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होते व लोकसभेमध्ये ते पक्षाचे नेते होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी अटलजी प्रेमाने वागत-बोलत असले तरी त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारची अलिप्तता दिसून येई. समकालीन सहकारी अडवाणीजी, जगन्नाथराव जोशी, भंडारीजी, कृष्ण लाल शर्मा, नानाजी देशमुख यांसारख्या प्रचारक कार्यकर्त्यांच्या बरोबर स्नेहाची परंतु अलिप्ततेची वागणूक असे. आपसात एकत्र बसून थट्टामस्करी, गप्पागोष्टी करीत किंवा खाण्यापिण्यात वेळ घालविण्याची त्यांना सवय नव्हती.
जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमधील बलराजजी मधोक गंभीर स्वभावाचे आणि अटलजींपेक्षा भिन्न प्रकृतीचे होते. त्यांनी अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व्यक्त केलेले मत पुढीलप्रमाणे, ‘अटलजी लवचीक स्वभावाचे आहेत. मधुरभाषी व सभ्यतेने वागणारे आहेत. त्यांना जीवनातील चांगल्या गोष्टींचे आकर्षण आहे. परंतु जनसंघाच्या तत्त्वांशी ते कधीच १०० टक्के सहमत होऊ शकले नाहीत. १९७३ मध्ये त्यांनी मला हे सांगितले की, ते योगायोगाने जनसंघामध्ये आले आहेत. अन्यथा ते कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले असते. त्यांची जीवनशैली कम्युनिस्टांसारखी आहे. नेतृत्व, नाव आणि प्रसिद्धी हे संघाने आणि जनसंघाने त्यांना बहाल केले. अशा पद्धतीने दोन्हीकडील चांगल्या गोष्टींचा ते उपभोग घेत आहेत.’
अटलजींनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. त्यात, ‘कच्छ करार रद्द करा’ ही मागणी घेऊन जनसंघाने त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी तसेच मोठय़ा संख्येने महिला कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये मालती नरवणे, जयवंतीबेन यादेखील सहभागी होत्या.
गुदगुल्या करणाऱ्या विनोदाद्वारे आपल्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणे ही अटलजींच्या व्यक्तित्वाची विशेषता होती. सामाजिक विषमतेची चर्चा करताना ते म्हणाले होते, डोक्याची पूजा होत नाही, पावलांची पूजा होते. येणारी-जाणारी व्यक्ती जर आदर व्यक्त करण्यासाठी डोक्याला स्पर्श करू लागेल तर कठीण अवस्था ओढवेल. अटलजी हजरजबाबी होते, त्यामुळे लोकसभेमध्ये होणाऱ्या चर्चामध्ये, अटलजींचा मिश्कीलपणा दिसून येत असे. ते कधी कधी उत्स्फूर्तपणे विरोधकांना कोपरखळी मारीत असत. त्यामुळे सर्व सभागृह हास्यामध्ये बुडून जात असे.
अटलजी आपल्या भाषणात शब्दप्रहार करीत असत, मात्र मर्यादा सोडून नाही. कदाचित म्हणूनच त्यांच्या शब्दरूपी बाणांनी घायाळ झालेले लोक फार काळ त्यांच्याशी शत्रुत्व ठेवू शकत नव्हते.
३० डिसेंबर १९८० रोजीच्या भाजपच्या मुंबई येथील महाअधिवेशनात अटलजींची पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली. अटलजींनी आपल्या भाषणामध्ये संदेश दिला, ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’. या महाअधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना माजी न्यायमूर्ती आणि केंद्रीय मंत्री मोहम्मद करीम छागला यांनी त्यांच्या भाषणामध्ये देशाचे भावी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होतील, अशी भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले, मी आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगू शकतो की, वाजपेयी भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांपैकी एक आहेत. वाजपेयींनी जगाच्या नजरेत भारताची प्रतिमा उंचावली.’
अटलजींच्या निधनाने भारतमातेचा सुपुत्र आणि संघपरिवारातील तेजस्वी हिरा अनंतात विलीन झाला. त्यांना विनम्र आदरांजली!
–