संगीत ही नित्य विकास पावणारी कला आहे. ही कला कोणी आत्मसात करून तर कोणी श्रवण करून परमानंद मिळवीत असतो. या उत्तुंग कलेचा सर्वागीण विकास व्हावा, गायन-वादन-नृत्य या शास्त्रीय संगीताच्या तिन्ही उपांगांचा समाजात सांगीतिक प्रबोधनासह सुयोग्य प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी ‘गानवर्धन’ संस्थेची स्थापना केली..

रतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात मंदावलेले दीप विझू पाहत असताना, त्यामध्ये थेंबभर तेल ओतून हा दीप तेवत ठेवण्याचे काम अतिशय अवघड. त्यात ना पैसा, ना प्रसिद्धी. हौसेला मोल नसते, या म्हणीचा फक्त प्रत्यय. पुण्यातील ‘गानवर्धन’ ही अशी एक संस्था. संगीतात बडय़ा कलावंतांना सगळीकडेच मागणी असते. परंतु या क्षेत्रात नव्याने काही करू पाहणाऱ्यांना मात्र जवळिकीने आणि आपुलकीने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे काम गेली ३८ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. मोठय़ा कलाकारांच्या मैफली आयोजित करणे हा सध्याच्या जमान्यातील पैसा मिळवून देणारा ‘इव्हेंट’ असतो. पण अगदी पहिल्यांदाच मंचावर बसून आपली कला सादर करणाऱ्याला समोर श्रोते असतील, याची खात्री देणाऱ्या या संस्थेने केलेले हे काम फारच मोलाचे म्हटले पाहिजे. संगीताला प्रोत्साहन देताना, ते टिकण्यासाठी अनेकविध उपक्रम करणाऱ्या या संस्थेला फार मोठी झेप घ्यायची आहे. गरज आहे, ती निधीची. नव्या कलावंताच्या कार्यक्रमास तिकिट काढून येणारे रसिक फारच तुरळक. परंतु या संस्थेने रसिकांना वर्षभर विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवत त्यांची शाबासकी मिळवून देण्यात यश मिळवले आहे.

संगीताची आवड असलेल्या कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी १९७८ मध्ये या संस्थेचे रोपटे लावले आणि तीन तपांमध्ये संस्थेने संगीताच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आहे. अनेक युवा कलाकारांना आपल्या कलाविष्कारासाठी पदार्पणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना संगीताच्या प्रांतामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये गानवर्धन संस्थेचा मोलाचा वाटा आहे. गानवर्धन म्हणजे धर्माधिकारीकाका हे एक अनोखे समीकरणच जुळून गेले आहे. ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ हा संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम गेली ३५ वर्षे विनाखंड केवळ सुरू आहे असे नाही तर, शास्त्रीय संगीताविषयीचा मूलभूत विचार आणि कलाकाराची जडणघडण उलगडणाऱ्या या मुक्त संगीत चर्चासत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली आहे. ‘मुक्त संगीत संवाद’ हा मराठी, हिंदूी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ हा या मुक्त संगीत चर्चासत्राच्या विचारमंथनातूनच सिद्ध झाला आहे. बदलत्या काळानुसार संगीताशी संबंधित विविध उपक्रम राबविण्याबरोबरच संस्थेची छोटेखानी वास्तू आणि संगीतविषयक संग्रहालय साकारण्यासाठी ‘गानवर्धन’ला समाजातील दानशूरांकडून अर्थसाह्य़ाची अपेक्षा आहे.

संगीत हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मानवी भावभावना या कुठल्या ना कुठल्या तरी संगीत प्रकाराशी निगडित असतात. संगीत ही नित्य विकास पावणारी कला आहे. ही कला कोणी आत्मसात करून तर कोणी श्रवण करून परमानंद मिळवीत असतो. संगीताचा विकास जसा बुजुर्ग कलाकारांकडून होत असतो. तसाच तो युवा पिढीतील कलाकारांच्या माध्यमातूनही होत असतो. प्रगतिपथावरील युवा कलाकारांना संधी मिळणे आवश्यक असते. या उत्तुंग कलेचा सर्वागीण विकास व्हावा, गायन-वादन-नृत्य या शास्त्रीय संगीताच्या तिन्ही उपांगांचा समाजात सांगीतिक प्रबोधनासह सुयोग्य प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी ‘गानवर्धन’ संस्थेची स्थापना केली. गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून संगीताच्या तिन्ही शाखांचे विविध उपक्रम योजून सेवाभावी वृत्तीने त्यांनी संगीत प्रचाराचे कार्य सुरू ठेवले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तेवढाच टिकून आहे आणि नव्या नव्या कल्पनांनी भारलेले धर्माधिकारीकाका त्या कल्पना सत्यामध्ये उतरविण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत निव्वळ प्रयत्नशील असतात असे नाही तर, त्यामध्ये यशस्वी होतात. त्यामुळेच पूर्ण वर्षांत होणाऱ्या कार्यक्रमांची एकत्रित पत्रिका संस्थेचे सभासद आणि रसिकांना आधीच देण्याचा त्यांचा परिपाठ असतो. एकनिष्ठतेने, प्रामाणिकपणाने आणि जीव ओतून कोणतेही अवघड काम करण्याची धर्माधिकारी यांची हातोटी त्यांना ‘गानवर्धन’ संस्थेच्या कामातही उपयोगी पडली. बालपणी आर्थिक परिस्थितीमुळे धर्माधिकारी यांना संगीताचे शिक्षण घेता आले नाही. ही कसर त्यांनी संगीताच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘गानवर्धन’ या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली. या कार्यात काम करणाऱ्या अनेक संगीतप्रेमींची फौजच त्यांनी निर्माण केली आणि त्यामुळे ही संस्था ताज्या दमाने काम करीत आहे.

संस्था स्थापन करण्यापूर्वी विजया दशमीच्या मुहूर्तावर ११ ऑक्टोबर १९७८ रोजी केवळ एक रुपया ऐच्छिक वर्गणी आकारून पहिली संगीत सभा घेण्यात आली. त्याला ३०० रसिक उपस्थित असले, तरी प्रत्यक्षात १४ रुपयेच जमले. तरीही धर्माधिकारी यांनी नेटाने आणि न डगमगता ‘संस्था सुरूच ठेवायची’ असा निर्णय घेतला आणि ८ नोव्हेंबर १९७८ रोजी ‘गानवर्धन’ संस्थेची स्थापना झाली. उपस्थिती कशीही असो, श्रोत्यांची संख्या कमी असली, तरी खचून न जाता नव्या कलाकारांना व्यासपीठावर आणण्याचे धोरण धर्माधिकारी यांनी तितक्याच आत्मीयतेने आणि नेटाने सुरू ठेवले. येणाऱ्या प्रत्येक भल्या-बुऱ्या अनुभवात त्यांच्याबरोबर ‘मम्’ म्हणणाऱ्या पत्नी कुमुद धर्माधिकारी यांची साथही मोलाची आहे. युवा गायक संजीव अभ्यंकर यांचे वयाच्या १३ व्या वर्षी पहिले गायन ‘गानवर्धन’च्या स्वरमंचावर झाले आहे. याच क्रमातून मंजिरी आलेगावकर, स्वाती नित्सुरे, मीनल रत्नपारखी, अजय पराड, उल्हास कुलकर्णी, सावनी शेंडे, राहुल देशपांडे, पुष्कर लेले, आसावरी रहाळकर असे या स्वरमंचावरून पदार्पण केलेले कलाकार आता लोकप्रिय झाले आहेत. ‘गानवर्धन’ संस्था साकारण्यापासून ते संगीतासाठी नेमकं काही तरी करायचं म्हणजे काय या जाणिवेतून १९८२ मध्ये जन्माला आलेल्या ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ या संकल्पनेची प्रत्यक्ष कार्यवाही या साऱ्या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ संगीत समीक्षक डॉ. श्रीरंग संगोराम हे धर्माधिकारी यांच्यासमवेत होते. नवोदित कलाकारांना, कला परिपूर्णतेच्या सीमेवर असलेल्या अशा उदयोन्मुख कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘गानवर्धन’ संस्थेने आतापर्यंत बाराशेहून अधिक कलाकारांना जाणकार रसिकांसमोर आपली कला आजमावण्याची संधी दिली आहे. संगीत सभांमध्ये कला सादरीकरणाबरोबरच संगीत साधकांमध्ये वैचारिक प्रगल्भता यावी या उद्देशाने संगीत शिबिरे, शास्त्रीय संगीतातील विशिष्ट विषयांची प्रयोजने, अखिल भारतीय गायन-वादन-नृत्य स्पर्धा, नामवंत गायकांची स्वानुभवी सप्रयोग व्याख्याने असे अभिनव आणि शैक्षणिक उपक्रमही संस्थेने आयोजित केले आहेत. संस्थेच्या व्यासपीठावरून स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार, अप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादन पुरस्कार, पं. त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार, नृत्यांगना रोहिणी भाटे पुरस्कार, डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार, पं. शरद सुतवणे स्मृती पुरस्कार, उषाताई मुजुमदार स्मृती पुरस्कार, पं. गजाननबुवा जोशी स्मृती पुरस्कार, रामराव कोरटकर स्मृती पुरस्कार, इंदुमती काळे स्मृती वाद्यवादन पुरस्कार, प्रतिभा परांजपे स्मृती पुरस्कार, डॉ. विजया भालेराव स्मृती कथकनृत्य पुरस्कार अशा नामवंत कलाकारांच्या नावे नवोदित संगीत साधकांना पुरस्कार दिले जातात. संस्थेचे नियोजित सर्व कार्यक्रम हे विनामूल्य स्वरूपात असतात. विविध प्रायोजक आणि संगीतप्रेमींच्या देणगीतून या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचे स्वरूप असेच राहावे असे ‘गानवर्धन’च्या कार्यकारिणीचा मानस आहे.

दिग्गजांची उपस्थिती

१९८२ पासून ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ या सप्रयोग व्याख्यानमालेचा प्रारंभ ‘गानवर्धन’ने केला. या चर्चासत्रांत स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, संगीतमरतड पं. जसराज, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे, पं. सी. आर. व्यास, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, यांच्यासह सुगम संगीत आणि नाटय़संगीतातील मान्यवर कलाकारांनी या व्यासपीठावर हजेरी लावली आहे.

गानवर्धन, पुणे

कलाकाराचा मानसन्मान आणि त्याच्याविषयी योग्य आदरभाव व्यक्त करीत कार्यक्रमाचे सुस्पष्ट असे काटेकोर नियोजन हे ‘गानवर्धन’ संस्थेचे वैशिष्टय़ असते. वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले कृ. गो. धर्माधिकारी संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याच उमेदीने कार्यरत असतात.

कलाकार आणि रसिक यांच्यात दुवा साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये ‘गानवर्धन’सारख्या दर्जेदार संस्थांचा अग्रक्रमाने समावेश आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि कलाप्रेमी शहरातच हे घडू शकते. संस्थेचे कार्य खूपच छान आहे.

पं. शिवकुमार शर्मा

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

सिंहगड रस्त्याने माणिकबाग चौकात आल्यानंतर ब्रह्मा गार्डन हॉटेलसमोरच्या रस्त्याला उजवीकडे वळावे. वीर तानाजी मंडळ ही जवळची खूण असून तेथेच आदिनाथ अपार्टमेंटच्या इमारत क्रमांक २ मध्ये पहिल्या मजल्यावरच गानवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे यांचे निवासस्थान आहे.

धनादेश या नावाने पाठवा..

गानवर्धन

(Gaanwardhan)

(कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्ता प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०५३६

  • महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

  • ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३८५१३२

  • पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

  • नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

  • नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

  • औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

  • नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

  • दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

Story img Loader