नाममात्र दरात सरकारी भूखंड मिळवून क्रीडा सुविधा देण्याच्या नावाखाली थेट क्लबसंस्कृतीलाच मोकळी वाट देण्यात आली आहे. एकप्रकारे खासगी कंत्राटदाराला हे क्लब आंदण दिले आहेत. सदस्यत्व असल्याशिवाय प्रवेश नसल्यामुळे हे क्लब मूठभर धनिकांचीच मक्तेदारी झाले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस यापासून दूर फेकला गेला आहे.ठाणे, नवीमुंबई आणि औरंगाबाद येथील काही क्लबचा हा खेळ..
नव्याने विकसित होणाऱ्या शहरात खेळाचे महत्त्व अबाधित राहावे, त्याचे संवर्धन आणि संगोपन व्हावे यासाठी सिडकोने गेल्या चाळीस वर्षांत ऐरोली, वाशी, नेरुळ, पनवेल, उलवा या भागांत आठ विविध स्पोर्ट्स क्लब व अॅकॅडमींना विस्तीर्ण अशा जमिनी कवडीमोल दामाने दिलेल्या आहेत, पण या स्पोर्ट्स क्लबमध्ये निष्णात खेळाडू निर्माण होण्याऐवजी राजकीय पटलावरील प्यादे तयार करण्याचे काम होत असून हे स्पोर्ट्स क्लब म्हणजे स्थानिक राजकीय नेत्यांच्या नव्या जहागीरदाऱ्या म्हणून उदयास येत आहेत.
शहरांचे शिल्पकार म्हणून बिरुदावली लावून शहर वसविण्याचा वसा घेतलेल्या सिडकोने प्रारंभीच्या काळात सामाजिक सेवेसाठी असलेले भूखंड अक्षरश: खैरातीत वाटलेले आहेत. त्यात खेळाच्या नावाखाली जमिनी लाटणाऱ्या संस्थांचीही मोठी संख्या आहे. या साखळीत पहिला क्रमांक लागला वाशी सेक्टर एक येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ हजार ३९५ चौरस मीटर भूखंडाचा. ऑक्टोबर १९८२ रोजी केवळ २६ लाख ३८ हजार रुपये किमतीत मिळालेल्या स्पोर्ट्स क्लबचा आजचा विस्तार हा सुमारे तेरा एकर जमिनीवर आहे. त्यात चार एकर जमिनीवरील क्लब हाऊसमध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग पूल, व्यायामशाळा या खेळ प्रकारांचा समावेश आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा सुविधा या क्लबमध्ये अलीकडे दिसू लागल्या असून नवी मुंबईतील सर्व स्पोर्ट्स क्लबमध्ये या क्लबचा मान काही औरच आहे. माजी क्रीडामंत्री शेषराव वानखेडे यांच्या प्रेरणेने बांधण्यात आलेल्या या स्पोर्ट्स क्लबची धुरा सध्या नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे आहे. ही धुरा नाईक यांच्याकडे नावाला असली तरी उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे या क्लबचा कारभार गेली अनेक वर्षे हाकत आहेत. क्लबची मागणी पाहता कुत्रा आणि सदस्यत्व नसलेल्यांना प्रवेश नाही असा फलक लावणे या क्लबबाहेर शिल्लक आहे. मसाज सेंटरपासून ते कार्ड रूमपर्यंत सर्व सुविधा या क्लबमध्ये आढळून येत असून सदस्यत्व काही लाखांच्या घरात गेले आहे. त्यामुळे या क्लबवर ताबा मिळविण्यासाठी होणारी पंचवार्षिक निवडणूकही तेवढीच रंगतदार ठरत असल्याचे दिसून येते. यानंतर वाशी सेक्टर १४ मधील नवी मुंबई र्मचट जिमखाना या स्पोर्ट्स क्लबला सुगीचे दिवस आले असून संध्याकाळच्या वेळेस एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांचा किलकिलाट या क्लबमध्ये दिसून येतो. फॅमचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या क्लबमध्ये व्यापाऱ्यांचाच बोलबाला जास्त असून त्यांची मक्तेदारी या क्लबवर तयार झाली आहे. केवळ २६५५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या हा क्लबमध्ये व्यापाऱ्यांच्या लग्नसराई मोठय़ा प्रमाणात असल्याने हा क्लब आता खेळ कमी आणि कार्यक्रमांसाठी जास्त प्रसिद्ध झाला आहे. क्लबमध्ये येणाऱ्या सदस्यांच्या वाहनांची काळजी क्लब उभारताना न घेतल्याने सकाळ-संध्याकाळ या क्लबच्या समोर वाहनांची वर्दळ दिसून येते. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. नवीन पनवेल येथे माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीसाठी जानेवारी २०१० रोजी सुमारे ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड घेतला असून या ठिकाणी २१ गाळे बांधून विकण्यात आलेले आहेत. या ठिकाणी दोन जलतरण तलाव, शूटिंग कोर्ट, बॅडिमटन, जिम्नॅस्टिक हॉल, सीझन क्रिकेटचे प्रशिक्षण केंद्र आणि आधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. या क्लबचे विस्तीर्ण मैदान लग्नकार्यासाठी भाडय़ाने दिले जात असून ते वीस हजारांपासून ते एक लाखापर्यंत भाडे आकारले जाते. पाटील यांनी स्वत:चा क्लब उभारल्यावर मागे राहतील ते त्यांचे प्रतिस्पर्धी रामशेठ ठाकूर कसे? त्यांनीही काँग्रेस राजवटीत उलवा येथे सिडकोकडून सुमारे वीस एकर जमीन स्पोर्ट्स क्लबसाठी घेतली असून रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नावाने हा राजकीय आखाडा सुरू केला आहे. या ठिकाणच्या सदस्यत्वासाठी एका लाखापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे क्रीडाप्रेमी चिरंजीव विजय पाटील यांनी मुंबईतील वानखेडेच्या तोडीचे अद्ययावत असे स्टेडियम तर नवी मुंबईत उभारले आहे. तेथे क्रिकेटचे सामने होऊ नयेत यासाठी पॉवरलॉबी जंगजंग पछाडत असून हे स्टेडियम आता पांढरा हत्ती झाला आहे. त्यासाठी एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अॅकॅडमीने सिडकोकडून घेतला आहे. राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या या रांगेत सिडकोचे माजी संचालक व पालिकेचे विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आहेत. सिडकोत संचालक असताना दुसऱ्या सदस्यांच्या नावाने संस्था स्थापन करून सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनसाठी ऐरोली सेक्टर १९ येथे ११ हजार ४३८ चौरस मीटरचा भूखंड काढून अवघा एक कोटी ४४ लाख रुपयांना खिशात घातला आहे. त्यामुळे त्यांचा हा क्लब भविष्यातील राजकीय आखाडा म्हणून उदयाला येणार आहे. याच ऐरोलीत काही डॉक्टरांनी एकत्र येऊन ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली असून या संस्थेला सेक्टर आठ अ येथे २४९९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मिळालेला आहे. क्लब बांधण्यासाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि राजकीय शक्तीचा अभाव यामुळे या डॉक्टरांनी हा भूखंड काही शर्ती-अटींवर बी. जी. शिर्के या बांधकाम कंपनीला देऊन टाकला आहे. ही कंपनी यानंतर येणाऱ्या सदस्यत्व शुल्कमधून होणारा खर्च वसूल करणार असून काही टक्के वाणिज्यिक वापर स्वत:कडे ठेवणार आहे. नेरुळमध्येही वझिराणी नॅशनल स्पोर्ट्स अॅकॅडमीला ४१२३ चौरस मीटर भूखंड देण्यात आला आहे. या ठिकाणी खेळ कमी आणि मौजमजेसाठी क्लबचा जास्त वापर होत असल्याने क्लबमधील रंगसजावट एखाद्या नाइट क्लबसारखी आहे.