अनेक घराण्यांचं मिळून एक ‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत’ आहे, याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पं. विष्णु दिगंबर पलुस्करांनी संगीतशिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे, असा शास्त्रीय विचार केला आणि तडीस नेला. आज संगीताचं विद्यापीठ झालेल्या त्या गांधर्व महाविद्यालयाच्या स्थापनेला येत्या रविवारी ११२ र्वष पूर्ण होत आहेत..
एक काळ असा होता की एकूणच शिक्षणाच्या बाबतीत आजच्या इतक्या सोयी, सुविधा-सवलती मुळीच म्हणजे मुळीच नव्हत्या. संगीताच्या बाबतीत तर यापेक्षाही फार वाईट परिस्थिती होती. त्या काळात कलाकार मोठे; पण समजा एखाद्याला विचारलं की, ‘आपके गानेमें वो सरगम क्या होता है?’ तर साधी
संगीत ही शिकण्याचीच बाब आहे, याचं भान पलुसकरांना होतं. त्यामुळे ज्याला ज्याला गाणं शिकायची इच्छा आहे, त्याच्यासाठी संगीताचं ज्ञान खुलं करून देण्याची त्यांची कल्पना होती. लपवून ठेवलेलं सगळं असं मुक्तपणे उघड करण्याची ही कल्पना तेव्हाच्या संगीतकारांना मानवली नाही, तरी आज शंभर वर्षांनंतर या संस्थेचा पसारा बघितला म्हणजे पलुसकरांनी भारतीय संगीतावर किती महान उपकार करून ठेवले आहेत, हे लक्षात येतं. संगीत शिकायचं, तर त्यासाठी लिखित स्वरूपात काही असायला हवं, म्हणून परीक्षा घ्याव्यात, असं विष्णु दिगंबरांना वाटलं. त्यांनी त्यासाठीची पाठय़पुस्तके तयार करून घेतली. अभ्यासक्रम निश्चित केले आणि अध्यापकांची एक फौजच तयार केली. लाहोर, कराचीपासून दिल्ली, मुंबई पुण्यापर्यंत सर्वत्र या संगीत महाविद्यालयांचा शाखाविस्तार झाला आणि संगीत ही अप्राप्य गोष्ट राहिली नाही.
कालानुरूप अभ्यासक्रम बदलणे आणि नव्या सांगीतिक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मात्र या संस्थेला बराच काळ लागला. तरीही गेल्या दोन-तीन वर्षांत अभ्यासक्रम बदलून त्यासाठीची सामग्री तयार करण्याच्या कामाला वेग आल्याने आता या संगीत महाविद्यालयाने कात टाकली आहे, असं म्हणावं लागेल. नव्या कार्यकारिणीतील
बहुधा सर्व सदस्य स्वत: कलाकार असल्याने आणि लहानांपासून मोठय़ांपर्यंत शिकवणारे असल्याने त्यांना पं. पलुसकरांची संगीताची शैक्षणिक दृष्टी आणि सृष्टी, मंडळाच्या संस्थापकांनी प्रसंगी पदरमोड करून, प्रतिष्ठा नसतानाही वाढवलेला संस्थेचा वृक्ष यांचीही चांगली जाण असल्याचे जाणवते. याबरोबरच आधुनिक काळ; त्यातले वेगाने घडत जाणारे सामाजिक-आर्थिक बदल. नवे शैक्षणिक संस्कार, नव्या सुखसोयी आणि नव्या जाणिवा हे लक्षात घेऊन वाटचाल करण्याचा नव्या कार्यकारिणीचा प्रयत्न स्तुत्य म्हटला पाहिजे. परीक्षा पद्धत विश्वासार्ह असायला हवी आणि त्यासाठी केंद्रीय तपासणीसारखी नवी पद्धत अमलात आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. संगणकाच्या आधारे हा सारा व्यवहार अधिक पारदर्शक करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य म्हटला पाहिजे.
वर्षांकाठी देशातील हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या परीक्षा घेणं आणि त्यांना योग्य संगीत शिक्षण देणं, हे काम अतिशय महत्त्वाचं आणि जोखमीचंही आहे. केवळ लिखित स्वरूपात संगीत शिकण्यापेक्षाही प्रत्यक्ष संगीत शिकण्याला संगीत शिक्षणात फार महत्त्व असतं. त्यामुळे रियाज करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान देण्यासाठी कलाशिक्षणातील बुजुर्ग, अनुभवी कलावंत-विद्वानांचे प्रात्यक्षिक शैक्षणिक विचार, शिक्षक-विद्यार्थ्यांना मिळणारा वेळ, त्यात शक्य असणारे शिक्षण-रियाज आणि त्यातून संगीताचा आनंद मिळवून देणं, हे काम या संस्थेनं मोठय़ा प्रमाणावर केलं आहे, यात शंका नाही.
‘कलावंत हे समाजात जबाबदारीने वागतील तरच मग, आधी कलावंताला आणि नंतर त्याच्या कलेला समाजात सन्मान मिळेल.’ ही गांधर्व महाविद्यालयाच्या संस्थापकाची दूरदृष्टी होती. त्या बरोबरच संगीताची सामाजिक संस्कार क्षमता ही त्यांनी महत्त्वाची मानली आणि त्यासाठीच संगीताची पूर्वी कधी नव्हती अशी संघटित संस्थात्मक शिक्षणपद्धती निर्माण केली; तेच कार्य त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनीही चालवले. संस्था चालवण्यासाठी निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. कोणतेही हितसंबंध निर्माण होऊ न देता विष्णु दिगंबर पलुसकरांच्या शिकवणीचा पुनरुच्चार करत संगीत शिक्षणाचे हे काम अधिक जोमाने सुरू झाले आहे, ही त्यातल्या त्यात अधिक आनंदाची बाब म्हणायला हवी.
मंडळात आतापर्यंत संगीत प्रवीण किंवा संगीताचार्य (पीएच.डी) झालेल्या कलावंतांचे सम्मेलन ही एक ऐतिहासिक घटना मानावी लागेल. तसेच मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवावे आणि ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त होऊन पुन्हा चांगली उपयोगात यावीत. या बरोबरच ‘संगीत विद्यालय व्यवस्थापन कोर्स’ हा वाशी इथल्या गांधर्व निकेतन या मंडळाच्या मुख्यालयात सुरू करावा अशीही एक नवी योजना आहे. आणखी एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे वाशी येथे म्युझिक रीसर्च सेन्टर या उपक्रमाची स्थापना. संगीताच्या शिक्षण पद्धतीचे आणि एकूणच संगीतातील प्रात्यक्षिक विषयांचे संशोधन ही या मागील मुख्य दृष्टी असून त्यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे यांची सुरुवातही झाली आहे. त्याबरोबरच या उपक्रमाद्वारे शिक्षकांना उपयोगी दृक् -श्राव्य साहित्य संशोधित व संग्रहित करण्याचे कार्य सध्या सुरू आहे. शिक्षकांच्या रियाजासाठी मार्गदर्शन हा एक नव्या काळाबरोबर पुढे आलेला नवा विषय आहे. पं. पलुसकरांनी स्थापन केलेल्या या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेची जपणूक करत आधुनिक काळाबरोबर पावले टाकण्याची उपक्रमशीलता या सगळ्यातून जाणवते.
गाणं शिकणारा प्रत्येकजण कलावंतच होईल, असं नाही. गाणं आवडणं ही संगीत शिक्षणाची पहिली पायरी असते. एकदा का गाणं आवडायला लागलं, की आपोआप त्यातल्या सुंदर गोष्टी समजून घेण्याची तयारी होते. त्यातूनच संगीत शिकण्याची इच्छा होते. एवढय़ा मोठय़ा संख्येने जे विद्यार्थी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसतात, तेच भारतीय संगीताचे भवितव्य आहेत. संगीताच्या मैफलींना जी गर्दी होते, ती या कानसेनांमुळे, हे लक्षात आलं म्हणजे विष्णु दिगंबर पलुस्करांकडे किती मोठी दूरदृष्टी होती, याचा साक्षात्कार होतो!
संगीताचा ‘गांधर्व’संस्कार
अनेक घराण्यांचं मिळून एक ‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत’ आहे, याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पं. विष्णु दिगंबर पलुस्करांनी संगीतशिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे, असा शास्त्रीय विचार केला आणि तडीस नेला. आज संगीताचं विद्यापीठ झालेल्या त्या गांधर्व महाविद्यालयाच्या स्थापनेला येत्या रविवारी ११२ र्वष पूर्ण होत आहेत..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-05-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandharva mahavidyalaya of indian classical music in lahore completing his 112 year