गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधासाठी जो मोर्चा बेंगळूरुमध्ये निघाला, त्याला प्रतिसाद मिळाला कसा, याचा शोध घेणारा हा रिपोर्ताजवजा लेख.. आजच्या काळात इतक्या प्रचंड संख्येची सामूहिक कृती कशी होऊ शकली याचे उत्तर शोधणारा आणि गाठ कोणाशी आहे हे लोकांना कळते, हेही स्पष्ट करणारा..

‘दक्षिणायन’च्या डॉ. गणेश देवींनी हाक दिली आणि आम्ही काही लोक महाराष्ट्रातून बेंगळूरुला जाऊन थडकलो. काही संघटना, संस्था एकत्र येऊन बेंगळूरुस्थित पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार होत्या. दिनांक १२ सप्टेंबर २०१७. किती लोक येतील याचा नीटसा अंदाज नव्हता. अलीकडे पुरोगामी डाव्या लोकांच्या (या शब्दांना या देशात काही लोकांनी मलिन करून टाकले आहे. तुम्ही स्वत:ला दुसरे काहीही म्हणवून घ्या तरी हे लोक तुमची खिल्ली उडवणार म्हणजे उडवणारच.) कार्यक्रमाला येणारे लोक अगदी कमीच असतात असा माझा समज होता. आजकाल सर्वत्र तसाच अनुभव गाठीशी होता. त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास बेंगळूरु रेल्वे स्थानकासमोर हळूहळू लोक जमू लागले. तो सर्व परिसर बॅनर्स आणि पोस्टर्सनी भरून जाऊ  लागला. प्रचंड गर्दी जमत होती.

कर्नाटकातील ‘जनसहकार सौहार्द’, ‘दक्षिणायन’ आणि एकूण छोटय़ा-मोठय़ा एकशेसाठ संघटना या मोर्चात ‘गौरी हत्या विरोधी वेदिके मंच’ या नावाने सहभागी होणार होत्या. विविध राजकीय पक्षांचे, संघटनांचे कार्यकर्ते (अर्थात भाजप, आरेसेस आणि काँग्रेस सोडून), खेडय़ापाडय़ातून आलेले गरीब लोक, त्यात महिलांची संख्या खूप होती. डोक्यावर गाठुडी, पिशव्या, हातात छोटय़ा मुलांचे हात घेऊन त्या चालत होत्या. यात कर्नाटकातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकाही होत्या. या शिवाय विद्यापीठ आणि कॉलेजांमधली तरुण मुले आणि मुली, कामगार संघटना, पत्रकार, लेखक, साहित्यिक, चित्रकार आणि बेंगळूरुमधले सामान्य रहिवासी (आणि ‘आयटी’तले तरुणसुद्धा) असे अनेक लोक इथे येऊन पोहोचले होते. सुरुवातीला दहा हजारच्या आसपास असणारी संख्या वाढत पस्तीस ते चाळीस हजारांपर्यंत पोहोचली. घोषणा साऱ्या कन्नड भाषेत होत्या. एखादी इंग्रजी, किंवा हिंदी.

मॅजेस्टिक नावाच्या भागातून निघालेला हा प्रचंड समूह भली मोठी बॅनर्स घेऊन, घोषणा देत, गाणी म्हणत, दणदणीत ढोल-ताशा वाजवत खूप वेळाने फ्रीडम पार्क येथे पोचला. तिथे आणखी काही हजार माणसे येऊन थांबली होती. अतिशय जोशपूर्ण वातावरणात तिथे सभा सुरू झाली. मैदानात एक भले मोठे मांडणीशिल्प उभारले होते. नारायण स्वामी आणि त्यांच्या कलाकार चमूने हे शिल्प साकारले होते. असंख्य काळ्या छत्र्यांची ही भव्य रचना सर्वाची नजर खेचून घेत होती.

सभेत अनेक भाषणे झाली. गाणी झाली. अनेक क्षेत्रांमधील विचारवंत मंडळी सभेत बोलली.  आजच्या काळात इतकी प्रचंड संख्येची सामूहिक कृती कशी काय घडू शकली हे मला जाणून घ्यायचे होते. के नीला, राजेंद्र चैनी आणि इतर स्थानिक आयोजक कार्यकर्त्यांशी बोललो. पाच सप्टेंबरच्या दिवशी हत्येची बातमी पसरली. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अनेक कार्यकर्त्यांनी बेंगळूरु, शिमोगा, धारवाड, गुलबर्गा, गदग, बिदर इत्यादी ठिकाणी मीटिंग्ज घेतल्या. अनेक महिला संघटनांशी संवाद साधला. दलित संघटनांशी संपर्क केला. एलजीबीटी संघटनादेखील यात सहभागी झाल्या होत्या. बेंगळूरुमध्ये गौरीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी निर्धार केला गेला होता की, बरोबर सात दिवसांनी निषेधमोर्चा काढायचा. चार दिवसांत सुमारे ७० लेखक, कलावंत, कवी, फोटोग्राफर्स आणि चित्रकारांनी त्यांचीदेखील पूर्वतयारी केली.

एक गोष्ट आवर्जून सांगितली गेली की, कर्नाटकात लेखक, कवी, कलावंतांना सामान्य जनता खूप मानते. त्यांच्यावर झालेला अन्याय लोक सहसा सहन करत नाहीत. ही येथील परंपरा आहे.

मी या मोर्चाची दृश्ये, माहिती माझ्या फोनमधून काही गटांवर टाकत होतो. काहींनी खूप आश्चर्य व्यक्त केले. काहींना हे सारे ऐकून हुरूप आला. काहींनी मरगळ झटकली. मात्र काहींनी शंका, संशय, कुशंका, आरोपांचे मेसेजेस टाकून माझ्या फोनमध्ये प्रचंड थैमान घातले. बाहेर मानवी सागर उसळत होता. माझ्या फोनमध्ये विषारी गरळ उसळत होती.

या चारेक किलोमीटरच्या पायी प्रवासात मला अनेक लोकांशी खूप बोलायचे होते. भाषेची अडचण होती. एक तरुण विद्यार्थिनी घोषणा देत होती. तिच्याशी ओळख झाली. तिचे नाव वासवी गायत्री. ती माझी गाईड झाली.

एका महिलेला विचारले तुम्ही इथे कशा आलात, का आलात? तिने उत्तर दिले की, गौरीला कोणी तरी कुतीया म्हटले आणि ते खूप लोकांना पटले म्हणून राग आला म्हणून आले. आमच्या घरातले जनावर मेले तरी आम्हाला खूप वाईट वाटते. इथे आमच्या गौरीला मारून टाकले. बाईला मारले. तिने तुमचे काय बिघडवले होते?

तिला विचारले, आक्का, गौरी काय लिहीत होती ते तुम्ही वाचायचा का? ती म्हणाली, हो तर, मी वाचत होते. मी अंगणवाडी ताई आहे!

दिल्लीच्या एका सभेत अपूर्वानंद झा यांनी जे सांगितले होते त्याची आठवण झाली. ते म्हणाले होते की, हे बघा, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी यात एक साम्य आहे. हे लोक स्थानिक भाषेत, साध्या, सोप्या भाषेत लोकांशी लिहून बोलत होते. ती भाषा तर्काची होती. विद्रोहाची होती. बंडाची होती. लोक ते वाचत होते. ही गोष्ट सत्ताधारी वर्गाला फार धोकादायक वाटते.. इंग्रजीत लिहिणाऱ्या लोकांची फार भीती वाटत नाही.

तर एकूण हा सारा सामान्य वाचकांचा मेळावा होता!

एका तरुण मुलाला विचारले की, ही हत्या तर नक्षलवाद्यांनी केली असे आरएसएसचे लोक म्हणतात. तो म्हणाला हत्या कोणी केली हे कोर्ट ठरवेल. पण हत्या झालीय ना? तिचा निषेध आहे. तो सर्वानी करायला पाहिजे. आणि जर ही नक्षलवाद्यांनी केली असेल तर आरएसएसचे इथे कोणीच कसे नाही? त्यांनी किमान त्यांचे शत्रू नंबर एक नक्षलवाद्यांचा निषेध करू नये का? या मोर्चात यायला भीती वाटली तर त्यांनी स्वतंत्र मोर्चा का नाही काढला, लाखा-लाखांचा?

माझ्या मोबाइलमध्ये आणखी एक गरळ टाकली गेली होती. त्यात असे लिहिले होते की, कोण कुठली छपरी फालतू पत्रकार, जिचे नाव कोणालाच माहिती नाही, तिचा खून झालाय. आता प्रत्येक सामान्य खुनावर देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी बोलायला पाहिजे का? या वाक्यांचा आधार घेत मी एका मुलीला विचारले की, तुला असे वाटते का?

तिने जे उत्तर दिले त्याने मी चक्रावून गेलो. ती म्हणाली की, ते बोलतील! काही दिवसांनी नक्की बोलतील. म्हणतील की, पत्रकारांना मारू नये. कोणीही कायदा हातात घेऊ  नये. जिला मारले तिच्या वृद्ध आईला काय वाटले असेल याचा विचार करावा, ती माझी धाकटी बहीण होती वगैरे. पण तेवढा वेळ त्यांच्या भक्तांना मिळतो. तेवढय़ात सर्वदूर विष पसरवण्याचे काम ते सावकाश करू शकतात. त्यांना भरपूर स्पेस मिळते. आणि विषारी वातावरण नंतरही दीर्घ काळ राहते. हा फायदा असतो. मौन मोडायला म्हणून इतका वेळ घ्यायलाच लागतो. आपल्याला या विषावर उतारा शोधायचा आहे..

भ्रष्टाचारविरोध, अत्याचारांचा तपास, अमुकतमुक हटाव अशासारख्या- लोकांना चटकन भिडणाऱ्या- कुठल्या मागणीसाठी हा जमाव जमला नव्हता. एका हत्येचा निषेध, एवढाच त्याचा उद्देश. ती हत्या कुणाची, केव्हा, कशा प्रकारे याला महत्त्व. या निषेधाच्या पलीकडे काय?

लोक पुन्हा एकदा विचार करू लागले आहेत. एकत्रही येऊ लागले आहेत. उन्मादींना धोका आहे तो अशा स्वेच्छेने एकत्र येणाऱ्यांचा.

लेखक वैद्यकीय ज्ञानाचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी करतात. ईमेल :  mohandeshpande.aabha@gmail.com

Story img Loader