डॉ. गुरूनाथ थोंटे
कृषी संशोधनाची दिशा कृषी रसायनशास्त्र आधारित न ठेवता भुसूक्ष्मजीवशास्त्र आधारित असेल तर मानव जातीचे कल्याण होईल. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. कृषी रसायनाच्या अन्नसाखळीच्या माध्यमातून सजीवाच्या शरीरात जाणाऱ्या विषाच्या अंशात घट होईल. परिणामी गेल्या काही वर्षांत शेतीच्या, माणसाच्या आणि पर्यावरणाच्याही आरोग्यात झालेला बिघाड दूर करणे काही प्रमाणात शक्य होईल.
संतुलितपोषण ही निरोगीपणाची गुरुकिल्ली आहे. ९० टक्के आजार हे संतुलित पोषणाच्या साह्याने सोडवता येतात. पिकाच्या बाबतीतही ते लागू पडते. पिकाचे पोषण व्यवस्थित झाले असेल तर कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. हा शेतकऱ्याचा नेहमीचा अनुभव आहे. संतुलित पोषणामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ही रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच पिकाला निसर्गाने दिलेली स्वसंरक्षणाची शक्ती. सगळय़ांत पहिला उपाय म्हणजे जीवनशक्तीवर ताण न येण्याची व्यवस्था तो करतो. उदाहरणार्थ उन्हाळय़ात झाडाचे निरीक्षण केले, की लक्षात येईल की उन्हाळय़ात बहुतेक झाडाची पाने गळतात. का तर वनस्पतीच्या शरीरातील पाणी पानाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या स्टोमॅटोमुळे हवेत निघून जाऊ नये म्हणून. पान गळले, की उत्सर्जन थांबते व झाड अत्यंत कमी जास्त तापमानात टिकून राहते. अशा प्रकारच्या ताण येऊ न देण्याकडे संशोधनात्मक लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.
पीकवाढीसाठी जमिनीतील हवेचे व्यवस्थापनही महत्त्वाचे असते. आजपर्यंतचे संशोधन नांगरणी, कुळवणी, औतपाळीद्वारे जमिनीतील हवेचे व्यवस्थापन यावरच झाले. यातूनच ऊस शेतीत सबसॉयलरचा जन्म झाला. अशी अवजार करणारे व ट्रॅक्टर उत्पादक करोडपती झाले. शेतकरी मात्र कर्जबाजारी झाला. सेंद्रीय पदार्थाद्वारे हवेचे व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित राहिला. आपणास श्वासोच्छ्वासास जशी हवा लागते तशी जमिनीत ऑक्सिजनयुक्त हवा लागते. दुर्दैवाने आज कोणताही कृषी विस्तारक याबाबत शेतकऱ्याचे योग्य प्रबोधन करत नाही. अन्नद्रव्याची देवाण-घेवाण तिच्या मातीच्या कणापासून पिकाच्या मुळापर्यंत यामुळेच होत असते.
हेही वाचा >>>लम्पीचे पुन्हा सावट!
सर्वात चांगले हवेचे व्यवस्थापन सेंद्रीय पदार्थाच्या आच्छादनामुळे होते. जमिनीचे तापमानही यामुळे नियंत्रित होते. जमिनीतल्या मित्र जिवाणूंनाही हवा लागते. हवा नसेल, तर शत्रू जिवाणूची कार्यक्षमता वाढते. हवेअभावी अन्नद्रव्य शोषण होत नसल्यामुळे पिके कीड रोगास बळी पडतात. ज्या जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण पाच टक्के असते. तिथे हवेचे व्यवस्थापन आपोआप होते. दुर्दैवाने याबाबत संशोधनात्मक काम अतिशय नगण्य आहे. ज्याच्याकडे आजपर्यंत शत्रू म्हणून पाहत आलो ते तणसुद्धा एक सेंद्रीय पदार्थ आहे. आजपर्यंत कृषी संशोधकांनी त्याकडे शत्रू म्हणूनच पाहिले. मित्र म्हणून संशोधनच झाले नाही. वास्तविक फुकटात मिळणारा सेंद्रीय पदार्थ. अशा सेंद्रीय पदार्थाच्या उपयुक्ततेवर संशोधनात्मक भर असता, तर अन्नद्रव्य व जमीन व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माणच झाले नसते. यामुळे शेतकऱ्यांकडून होणारा हजारो कोटींचा खर्च वाचला असता.
पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे ओलावा. पिकास जेवढे पाणी दिले जाते. त्यांपैकी फक्त एक टक्का उपयोग पीक उत्पादनासाठी होतो. बाकीचे पाणी बाष्पीभवन, निचऱ्याद्वारे निघून जाते. याचा अर्थ फक्त मुळाभोवती वाफारा कायमस्वरूपी असणे गरजेचे असते. वनस्पतीतील कबरेदके निर्माण करण्यासाठी पाणी आवश्यक घटक आहे. जमिनीत सेंद्रीय पदार्थ असताना प्रति घनमीटर पाण्यामुळे पाण्याचे शेतमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले याबाबत संशोधनात्मक निष्कर्ष उपलब्ध नाहीत. पीक उत्पादनात अन्नद्रव्य उपलब्धतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अन्नद्रव्याचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त चारशे पीपीएम असावे लागते. त्यापेक्षा हे प्रमाण कमी असेल, तर त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. प्रमाण जास्त झाल्यास जिवाणूंना गुदमरायला लागते.
हेही वाचा >>>‘आदित्य एल-१’चा प्रवास कसा असेल?
जमिनीत गरजेपेक्षा जास्त ओलावा असेल, तर हवेची जागा ओलावा घेते. यामुळे पीक उत्पादन कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अशा वेळेस तापमान वाढल्यास पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यातील क्षारांचा थर जमिनीवर साचतो. यामुळे अन्नद्रव्य शोषणात अडथळे निर्माण होतात. शत्रू बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. यासाठी जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण वाढवावे लागते. यामुळे निचरा प्रणालीत सुधारणा होते. हवेचे व्यवस्थापन सुधारते. मित्र बुरशीचे प्रमाण वाढते.
पाण्याचे पानांमधून होणारे बाष्पीभवन थांबून पाण्याचा ताण जाणवू न देण्याचे काम सिलिका करते. मागे असलेला स्टोमॅटो आणि क्युटिकल तर यामधून पीक हवेमध्ये पाणी सोडून देत असते. पण पिकाने सिलिका शोषून घेतले, की सिलिकामुळे पानाच्या पिशवीवर जणू आणखी एक बाह्य आवरण घातले जाते. या सिलिकाच्या बाह्यावरणामुळे पानातील पाणीही उडून जात नाही व प्रकाश संश्लेषण सुरू राहते. त्यामुळे भातासारख्या जास्त बाष्पाची गरज असलेल्या पिकात अचानक कोरडे हवामान निर्माण झाले, तर त्या वेळी सिलिका महत्त्वाची भूमिका बजावते. अशा प्रकारच्या पीकनिहाय संशोधनात्मक शिफारशी असत्या, तर शेतकऱ्याच्या नगदी नफ्यात वाढ झाली असती.
भविष्यात कृषी संशोधनाची दिशा कृषी रसायनशास्त्र आधारित न ठेवता भुसूक्ष्मजीवशास्त्र आधारित असावी. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. कृषी रसायनाच्या अन्नसाखळीच्या माध्यमातून सजीवाच्या शरीरात जाणाऱ्या अंशात घट होईल. परिणामी आरोग्यावरील खर्चात खूप मोठी बचत होईल. आरोग्य सुधारणेमुळे कार्यक्षमतेत वाढ होऊन बलशाली भारत निर्माण होईल. कृषी रसायनाच्या वापरामुळे पर्यावरण संतुलनात झालेला बिघाड यापुढे भविष्यात होणार नाही.
भारतात विविध प्रकारचे हवामान व जमीन उपलब्ध आहे. अशा विविध प्रकारच्या जमीन व हवामानात येणाऱ्या विविध पिकांचे उत्पादन जर सेंद्रीय स्वरूपात घेतले, तर त्याचा उपयोग निर्यातीसाठी होऊन भारताची गंगाजळी वाढण्यास मोठी मदत होईल. भारत विकसनशील राष्ट्राऐवजी विकसित राष्ट्रांमध्ये गणला जाईल. यामुळे प्रत्येक भारतीयाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही.