काही गुन्ह्य़ांना क्षमा नसते, युद्ध गुन्हे हा त्यातलाच एक प्रकार म्हणता येईल. कारण ती एक प्रकारे वंशहत्याच असते. नाझींनी ज्यूंवर केलेले अत्याचार व त्यांचे शिरकाण हे त्याचे मोठे उदाहरण. भारतीय उपखंडातही बांगलादेश युद्धाच्यावेळी असाच हिंसाचार झाला होता; तो युद्ध गुन्ह्य़ांचा भाग होता. आज या युद्धगुन्ह्य़ांचे भूत बांगलादेशमध्ये थैमान घालत आहे. सध्याच्या अवामी लीग प्रणीत सरकारने या युद्धगुन्ह्य़ांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी २०१० मध्ये एका लवादाची (इंटरनॅशनल क्राइम ट्रायब्युनल) स्थापन केली. या लवादाने आतापर्यंत काही गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली, त्यात इस्लामी राजकीय नेता अली अहसान महंमद मुजाहिद याचा समावेश आहे. आतापर्यंत या लवादाने दिलेल्या निकालांची प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशात अनेक शहरात हिंसाचारात अनेक लोक ठार झाले आहेत..
शाहबाग आंदोलन
युद्धगुन्हेगारांना शिक्षा घडवण्यासाठी बांगलादेशी जनतेच्या एका मोठय़ा गटाचा पाठिंबा आहे, हे फेब्रुवारीत ढाका येथे झालेल्या शांततामय आंदोलनाने स्पष्ट झाले होते. युद्धगुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी होती. शाहबाग हे ठिकाण त्या वेळी आंदोलनांमुळे तहरीर चौकासारखेच प्रकाशझोतात आले होते.
आताच का?
बांगलादेशाच्या निर्मितीवेळी युद्धगुन्हे घडून गेले, पण मग तो प्रश्न आताच असा ऐरणीवर आणण्यामागे राजकारणही दडलेले आहे. बांगलादेशात येत्या सहा महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत व अवामी लीगप्रणीत सरकारने युद्ध गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या वचनाचे पालन करून विरोधी पक्षांचा खातमा करण्याचा विडाच उचलला आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने युद्धगुन्ह्य़ांची सुनावणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी हा ‘कायदेशीर’ मार्ग अनुसरला आहे.
ऑपरेशन सर्चलाइट
मार्च, १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तानी लष्कराने विभाजनवादी बंगाली नॅशनॅलिस्ट मुव्हमेंटला संपवण्यासाठी जी मोहिम राबवली होती तिचे नाव ‘ऑपरेशन सर्चलाइट’ असे होते. जनरल फरमान यांनी एका निळ्या रंगाच्या कागदावर पेन्सिलने ही योजना लिहिली होती, त्यात पूर्व बंगालच्या सैन्याला नि:शस्त्र करण्यात यावे असे म्हटले होते. त्या वेळी अवामी लीगच्या अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली. बांगलादेश युद्धाच्यावेळी ढाका विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांना पकडून ठार मारण्यात आले. पत्रकार, डॉक्टर, कलाकार, लेखक यांना रझाकार व पाकिस्तानी सैन्याने पकडून मिरपूर, महंमदपूर, नखालपुरा, राजाबाग येथे छळ छावण्यात टाकले. तिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. बांगलादेशचे युद्ध नऊ महिने चालले होते, त्या काळात ९९१ शिक्षक, १३३ पत्रकार, ४९ डॉक्टर, ४२ वकील, १६ लेखक-कलाकार यांना ठार करण्यात आले. या युद्धकाळात दोन लाख महिलांवर बलात्कार झाले. प्रत्यक्षात १९७३ मध्येच युद्ध गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी लवाद स्थापन करण्याचा वटहुकूम काढला होता. पण १९७५ मध्ये वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्यानंतर गुन्हेगारांवर खटले चालले नाहीत. रहमान यांच्या कन्या शेख हसीना वाजेद या सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. त्यांनी आता युद्धगुन्हेगारांना शिक्षा करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.
कोण आहे अली अहसान?
मृत्युदंडाची शिक्षा झालेला अहमसान महंमद मुजाहिद हा जमात ए इस्लामीचा नेता असून त्याच्यावर, अनेक लोकांचा छळ व हत्याकांड असे एकूण सात आरोप होते त्यातील पाच शाबित झाले आहेत. १९७१ मध्ये मुजाहिद हा एक विद्यार्थी नेता होता व तो अखंड पाकिस्तानचा पुरस्कर्ता होता. इतर अनेक जमात नेत्यांप्रमाणे तो बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर अज्ञातवासात गेला, पण नंतर १९७७ मध्ये झालेल्या बंडानंतर जनरल झिया उर रहमान सत्तेवर आले तेव्हा तो पुन्हा कार्यरत झाला. एवढेच नव्हे, तर २००१-२००६ या काळात तो बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री होता. त्याचे वक्तृत्व चांगले आहे, संघटन कौशल्य चांगले आहे पण तो अल बद्र गटाचा सदस्य मानला जातो. याच गटाने पाकिस्तानी लष्कराला बंगाली कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात मदत केली होती.
बांगलादेश युद्ध
भारताची फाळणी होऊन पाकिस्तान वेगळा झाला, पण त्यांना त्यांचा देश अखंड ठेवण्याचे आव्हान पेलणे शक्यच नव्हते. त्यातून १९७१ च्या युद्धात बांगला देश वेगळा झाला, त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या व त्यांनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी या युद्धात भाग घेऊन रणरागिणीची भूमिका पार पाडली होती. युद्धकाळात पाकिस्तानी लष्कराने रझाकार, अल-बद्र व अल श्ॉम या स्थानिक बंडखोरांच्या मदतीने वांशिक अत्याचार केले. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक महिलांवर बलात्कार झाले, अनेकांचे शिरकाण झाले. एकूण या सगळ्या घटनेत ३० लाख लोकांना ठार मारण्यात आले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा