गेल्या काही दिवसांत आरोग्य जागृतीमुळे आल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे गेल्या काही वर्षांपर्यंत राज्याच्या ठरावीक भागात होणारी आल्याची शेती आता अन्यत्रही होऊ लागली आहे. सांगली जिल्हा यामध्ये सर्वात आघाडीवर आहे.
आयुर्वेदामध्ये रूची वाढविणारे, जठराग्नी उद्दिपीत करणारे, तिखट चवीचे आले हा पदार्थ स्वयंपाक घरात कायमचा ठाण मांडून बसलेला आढळतो. या आले पिकाची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ शकतो. सातारी आले प्रसिध्द आहे. या आल्याची लागवड टेंभू योजनेच्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस भागात वाढली असून दरही चांगला मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे आता वळू लागला आहे.
आले लागवडीसाठी गाळयुक्त जमीन उपयुक्त ठरते. आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाणी साचून राहणारी, तालीची जमीन नुकसानकारक ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ टन मिसळावे.
लागवड कशी व केव्हा करावी
लागवड एप्रिल – मे महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इ. जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे असावे, डोळे फुगलेले असावेत. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी २२० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ईसी) १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्लू.पी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी दोन टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. लागवड करताना ९० सें.मी. रुंदीचे आणि २५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून २२.५ बाय २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे. यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद ७५ किलो आणि पालाश ७५ किलो द्यावे. आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे. आल्यावर कंदमाशी, पाने खाणारी अळी, तसेच करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी वेळीच कीड व रोग नियंत्रण करावे. लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यांत आले पीक काढणीला येते. हेक्टरी १५ ते २० टन आल्याचे उत्पादन मिळते.
हेही वाचा >>> Silk Worm Farming : आदिवासी शेतकऱ्यांचा रेशीम शेतीचा प्रयोग
गेल्या हंगामात निगडी (ता. कराड) येथील शरद घोलप यांनी १७ गुंठ्यात विक्रमी १५ टन (३० गाडी) आल्याचे उत्पादन घेतले. कराड तालुक्यातील मसूर पूर्व हा भाग साधारणत: कमी पाण्याचा आहे. या ठिकाणी मुख्यत्वे ऊस शेती केली जाते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता भासत असल्याने ऊस उत्पादनावर त्यांचा परिणाम होताना दिसतो. ऊस शेतीला पर्याय म्हणून शरद घोलप यांनी आले शेती करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन चार वर्षांपासून ते उत्तम प्रकारे आले शेती करीत आहेत. या वर्षी शेती पध्दतीत काही बदल करीत श्री. घोलप यांनी आल्याचे पीक घेतले व त्यामध्ये विक्रमी उत्पादन मिळविले आहे.
नेचर केअर फर्टिलायझर्स विटा व शेतकरी कृषी सेवा केंद्र पुसेसावळी यांच्या मार्गदर्शनाखाली शरद घोलप यांनी आले शेतीचे नियोजन केले. त्यामध्ये प्रामुख्याने एकरी बियाणाचा जास्त वापर, दरवर्षी पेक्षा जास्त भरी, सेंद्रिय व जैविक खतांचा अधिकाधिक वापर, रासायनिक खतांचा गरजेपुरता वापर, या प्रमाणे नियोजन केले. २० मे २०२३ रोजी या प्लॉटची लागण करून बेसल डोस मध्ये त्यांनी नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एकरी १० बॅग, सारथी ३ बॅग तसेच रासायनिक खतांमध्ये डीएपी ३ बॅग, पॉली सल्फेट २ बॅग याप्रमाणे वापर केला. तसेच या प्लॉटसाठी सात भरी घोलप यांनी केल्या. प्रत्येक भर करताना ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एकरी ३ ते ५ बॅग वापर केला. जास्त भरी केल्याने आल्याची वाढ चांगली झाली व फुटवे जास्त निघत गेले. उत्पादन वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
थेंबाने पाणी ग्रॅमने खत, या तत्वाचा वापर करित त्यांनी वाढीच्या अवस्थेत ड्रीप मधून सुपर ओरा व पृथ्वीरिच १०:३४:०० तसेच कंद फुगवणीच्या काळात सुपर ओरा व पृथ्वीरिच १०:२४:२४ या पॉली फॉस्फेट गटातील खताचा वापर केला. त्याचे खूपच चांगले परिणाम मिळाल्याचे श्री. घोलप यांनी नमूद केले.
आले पिकात कंदकूज हा मुख्य रोग आढळून येतो व त्यामुळे उत्पादन घटण्याचा मोठा धोका असतो. ग्रीन हर्वेस्ट स्पेशलच्या वापरामुळे तसेच कृषी डब्ल्यूएमएफ पीबी-६५ सारख्या जीवाणूजन्य खतांच्या वापरामुळे कंदकूजीस संपूर्णपणे आळा बसला व उत्पादन भरघोस मिळाले. या सर्व यशात त्यांना संपूर्ण मार्गदर्शन विजय मुळीक यांनी केले. कोणत्या वेळी कोणत्या खतांचा व किती प्रमाणात वापर करावा यांचा संपूर्ण आराखडा श्री. मुळीक यांनी दिला. शेणखताऐवजी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे सेंद्रिय खत तसेच इतर जैविक खते वापरण्यास प्रवृत्त केल्याने या उत्पन्नाच्या टप्यापर्यंत श्री. घोलप यांनी मजल मारली आहे. या आले पिकास ६८ ते ७० रु. प्रति किलो भाव मिळाल्याने एकरी २ ते २.५ लाख रु. खर्च करून १७ ते १८ लाख रु. (खर्च वजा जाता) या पिकातून मिळवले आहेत.
ऊस शेतीला पर्याय म्हणून आले पीक लाभदायी ठरत आहे. तसेच अतिरिक्त रसायन खताचा वापरही होत नसल्याने जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नेचर केअरचे प्रतिनिधी सुहास येसुगडे यांनी वेळोवेळी प्लॉटवर येऊन केलेले मार्गदर्शनही मोलाचे ठरले. – शरद घोलप, निगडी.
Digambar.shinde@expressindia. com
© The Indian Express (P) Ltd