‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं माझी प्रतिमा ‘वाद उकरून काढणारा’ अशी झाली होती, त्याला ही स्पर्धाच जबाबदार’, अशी स्पष्टोक्ती करणाऱ्या गिरीश कर्नाडांनी ‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होण्यापूर्वी काही तास झालेल्या या गप्पांचा रोख आत्मचरित्राकडे होताच, पण तुमच्या नाटकांना मिथकांचा आधार का असतो, चित्रपटांकडे का वळलात, या वयातही नवं कसं काय लिहिता, अशा प्रश्नांना कर्नाड उत्तरं देत होते. त्यांच्या काळाची गोष्टच सांगत होते..
कर्नाडांशी झालेल्या दीर्घ गप्पांचा हा पहिला भाग. पुढील भाग रविवार, २ जूनच्या अंकात..
चांगल्या सिनेमाला ‘मल्टिप्लेक्स’मुळे बरे दिवस..
मधल्या काळात व्यावसायिक कारणास्तव सिनेमा पूर्णपणे धंदेवाईक झाला होता. केवळ मनोरंजन आवडणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक असल्याने तेच चित्रपटाच्या यशापयशाचे भवितव्य ठरवायचे. दर्जेदार विषय, मांडणी,वेगळे प्रयोग हवे असलेले प्रेक्षक होते, पण त्यांची संख्या कमी होती. त्यामुळे मनोरंजन आवडणाऱ्यांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी त्यांना आवडेल अशी नाचगाणी, मारहाण असा मसाला त्यात टाकला जायचा. बऱ्याचदा वितरकच चित्रपटाचे स्वरूप ठरवायचे. पंजाबी वितरकाला मारहाण हवी असायची तर तामीळ वितरकाला नाच-गाणी. त्यातून वेगळे विषय-प्रयोग करणे लेखक-दिग्दर्शकांना कठीण झाले. सिनेमासाठी प्रचंड पैसा लागत असल्याने पदरचे पैसे टाकून आपल्याला हवे ते करू, हे शक्य होत नाही. पण काही काळापूर्वी ‘मल्टिप्लेक्स’चे आगमन झाले. त्याने मोठी कलाटणी दिली. मल्टिप्लेक्सच्या आगमनामुळे सिनेमाची आर्थिक समीकरणे बदलली. भिन्न आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी छोटय़ा-मोठय़ा आकाराची चित्रपटगृहे तयार झाली. त्यामुळे वेगळय़ा अभिरूचीच्या प्रेक्षकांसाठी चौकटीबाहेरचे विषय, मांडणी असणारे चित्रपट तयार करणे शक्य झाले. तशात कॉपरेरेट कंपन्याही पुढे सरसावल्याने वेगळय़ा सिनेमांची निर्मिती आर्थिकदृष्टय़ा परवडणारी ठरली. गेल्या काही काळात त्यातून अनेक चांगले चित्रपट आले. गिरीश कुलकर्णीचा ‘विहीर’, ‘विकी डोनर’सारख्या रूढ चौकटीबाहेरचा विषय अत्यंत सुलभपणे व सुंदररीत्या मांडणारा सिनेमा, ‘शांघाय’ ही काही नावे उदाहरणासाठी सांगता येतील. मल्टिप्लेक्सचे आगमन हे चांगल्या सिनेमाला वाव देणारे ठरले आहे.