मी जेव्हा नाटक लिहायला सुरुवात केली. त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि तो सांस्कृतिकदृष्टय़ा खूप सशक्त असा काळ होता. चित्रपटांमध्ये सत्यजित रे, बिमल रॉय, गुरुदत्त यासारखे लोक होते. त्याच काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना झाली होती. सत्यदेव दुबेंनी मुंबईमध्ये हिंदी नाटकांसाठी चळवळ सुरू केली होती.
त्या काळात म्हणजे १९६० ते साधारण १९८२ पर्यंत नाटकांशिवाय मनोरंजनाचे दुसरे साधनच नव्हते. मुख्य म्हणजे त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे नाटकाला चांगला प्रेक्षक होता. आम्ही सगळे एका अर्थानं नशीबवान आहोत, की आम्ही सगळे एकाच काळात काम करत होतो.
दुबे आणि अरविंद देशपांडे यांना विनोद दोशी यांनी वालचंद टेरेसमध्ये दिलेल्या जागेमुळे आमच्यासाठी हक्काची जागा मिळाली होती. त्यावेळी नाटकासाठी पैसा उपलब्ध होत होता, सकारात्मक वातावरण होते आणि आमच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती, या सगळ्याचा खूप फायदा झाला. एकदा दुबेंना भेटायला वालचंद टेरेसला गेलो होतो, तिथे तेंडुलकरही होते. आम्ही दोघे तिथेच झोपलो. सकाळी उठलो तेव्हा तेंडुलकर गेले होते आणि शेजारी बादल सरकार झोपले होते.
असा सगळा माहोल होता. एकमेकाच्या साथीशिवाय आम्हाला तरणोपाय नाही याची सगळ्यांनाच जाणीव होती. त्यावेळी आम्ही एकमेकांची नाटके आपापल्या भाषेत भाषांतरित केली. एका नाटकाच्या शुभारंभाच्या वेळी मोहन राकेश हसत हसत म्हणाले की, ‘‘भारतीय नाटकाचे भविष्य आमच्या हातात आहे.’’ तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश यांच्यापेक्षा मी दहा वर्षांनी लहान होतो, त्याचाही मला फायदा झाला. त्यांना जे जे मिळालं ते पुढे जाऊन माझ्यापर्यंत आलं. म्हणजे पुरस्कार वगैरे.
आम्ही सगळे चांगले मित्र होतो. खरं तर माझ्या आधी तेंडुलकरांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं. त्यांना ते का मिळाले नाही, ते निश्चितपणे सांगता येणार नाही. मी असतो तर त्यांनाच पहिल्यांदा ज्ञानपीठ दिलं असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा