माझ्या मिथक नाटकांची मुळं माझ्या शिरसीतील बालपणातल्या काळात शोधावी लागतील. सुरुवातीची काही वर्षे आमचं वास्तव्य पुण्यात होतं. माझे वडील सरकारी नोकरीत होते. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची कर्नाटकातील शिरसीला बदली झाली. त्यामुळे माझी वाढ द्वैभाषिक अशीच झाली. पुण्यात आम्ही खूप मराठी, पारशी वगैरे नाटकं पाहात असू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी प्रथम वाचले ते ना. सी. फडके. त्यांच्याशिवाय अन्यही मराठी लेखकांची पुस्तके मी वाचत होतो. शिरसीत वडिलांची बदली झाल्यावर माझी आई खूपच वैतागली. कुठल्या रानात येऊन पडलोत, असं ती म्हणत असे. उत्तर कर्नाटकातील हे गाव. घनदाट जंगलानं वेढलेलं. त्याकाळी शिरसीत वीजही आली नव्हती. त्यामुळे मिट्ट काळोख पडल्यावर कंदिलाच्या प्रकाशातच वावरावं लागे. रात्री घरी वडीलधाऱ्यांकडून पौराणिक कथा, रामायण, महाभारतातल्या कथा, लोककथा सांगितल्या जात. रात्रीचं ते गहन-गूढ वातावरण, या कथांमधील अद्भुतरम्यता यांनी आम्ही मुलं भारावून जात असू. तेव्हा तिथं दुसरी काही मनोरंजनाची साधनं नसल्यानं शाळेतही मुलांना फावल्या वेळात गोष्टीच सांगायला सांगितलं जाई. शिरसीत एक-दोन मोडकी थिएटर्स होती. तिथं कर्नाटकातील छोटय़ा नाटक कंपन्या मराठी संगीत नाटकं नाव बदलून आपल्या परीनं सादर करीत. उदाहरणार्थ ‘संगीत सम्राट’ (सं. संशयकल्लोळ) वगैरे. याशिवाय हरिकथा, कीर्तनं, यक्षगान वगैरेही सतत तिथं पाहायला मिळत. यक्षगान सादर करणारे कलावंत त्यातल्या आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका इतक्या समरसून करत, की लिखित संहिता नसूनही त्या अत्यंत प्रभावी होत. वेशभूषेशिवायच्या या सादरीकरणांचाही माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला. इरावती कव्र्याची ‘युगान्त’ही याच दरम्यान माझ्या वाचनात आल्यानं महाभारतातील व्यक्तिरेखांचं त्यातलं विश्लेषणही माझ्यावर परिणाम करून गेलं होतं. या सर्वाच्या प्रभावाबरोबरच तिथले कैलाशम् आणि आद्य रंगाचार्य ही मंडळीही, मो. ग. रांगणेकर- आचार्य अत्र्यांच्या पद्धतीचीच सामाजिक नाटकं तिथं सादर करीत होती. ‘स्थळ : दिवाणखाना’ याभोवतीच ही नाटकं गुंफलेली असल्यानं मला त्यांचा उबग येत असे. आपण अशी नाटकं करायची नाहीत असं मी तेव्हाच मनात पक्कं ठरवलं होतं.
याच दरम्यान मी अल्काझींचं ‘अ‍ॅण्टिगनी’ मुंबईत पाहिलं. ते युरोपियन नाटकं करायचे. दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ असल्याने सेन्सॉरशिपचा कांच होता. त्यामुळे मिथस्चा वापर करून ते आपल्याला जे मांडायचं आहे ते आपल्या नाटकांतून मांडत असत. एकीकडे आपली नाटकं भक्तिरसपूर्ण असल्याने त्यात खरीखुरी शोकांतिका सादर करणं शक्यच नव्हतं. कारण संकटात सापडलेल्याच्या मदतीला देव धावून येणार हे ठरलेलंच असायचं. त्यामुळे या फॉर्ममध्ये शोकांतिकेची शक्यताच मला दिसत नव्हती. म्हणून मग मी ‘ययाति’मध्ये मिथककथेचा आधार घेतला. पुढे ‘अग्निवर्षां’मध्येही हा मिथस्चा वापर केला आहे. पुढे मी ऑक्सफर्डला गेल्यावर मिथ्सचा वापर करून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिल्या गेलेल्या फ्रेंच ट्रॅजिडिज पाहिल्या.  त्यातून मला मिथ्सचा वापर करून आधुनिक आशय नाटकातून मांडता येईल हे लक्षात आलं. त्यातून माझ्या मिथक-नाटकांची निर्मिती झाली.

काळाचं दस्तावेजीकरण
आत्मचरित्रात पूर्णपणे सत्य लिहिलं जात नाही असं म्हटलं जातं, पण ते कुठल्या अर्थाने हेही पाहिलं पाहिजे. स्त्रियांविषयी लिहिताना बरेच लेखक लपवाछपवी करतात. आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी सांगत नाहीत. तुम्हाला मैत्रिणी असतील, तुमच्या काही प्रेयसीही असतील, तर त्याविषयी न लपवता सांगितलं पाहिजे. सेक्स रिलेशनशिपबाबत मला काही म्हणायचं नाही, त्या तुटू शकतात. पण एखादं नातं तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारं असेल, तर त्याविषयी लिहिलं पाहिजे, असं मला वाटतं.
दुसरं म्हणजे माझा काळ हा महत्त्वाचा काळ आहे. १९३८ ला माझा जन्म झाला, ४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत-पाक फाळणी झाली. ६० चे दशक हे भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ होता. याच काळात विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार हे नाटककार लिहीत होते. त्यामुळे माझं आयुष्य हे एकापरीने या काळाचं दस्तावेजीकरण आहे, ‘रेकॉर्ड ऑफ एज’ आहे. ते सर्व नोंदवलं गेलं पाहिजे म्हणून मी आत्मचरित्र लिहिलं.
मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या या आत्मचरित्राला मी ‘आडाडता आयुष्य’ असं नाव दिलं आहे. हे शीर्षक मी प्रसिद्ध कन्नड-मराठी कवी द. रा. बेंद्रे यांच्या एका कवितेवरून घेतलं आहे. ‘नोड नोडता दिनमान, आडाडता आयुष्य’ अशी ती कवितेची ओळ आहे. म्हणजे खेळता खेळता आयुष्य निसटून गेलं. यात थोडी विषादाची छटा आहे. खेळता खेळता जिंकलो पण काहीतरी राहून गेलं, असं माझ्या मनात हे शीर्षक ठेवताना होतं. त्यासाठीच मी ते घेतलं. पण मराठीत तो भाव येतो की नाही, याबाबत जरा मी साशंक होतो, पण नंतर मी असा विचार केला, की बेंद्रे हे मराठीतही लिहिणारे लेखक होते, त्यामुळे त्यांना त्यानिमित्ताने सलाम करता येईल असं वाटलं. म्हणून ते नाव न बदलता मी आहे तसंच ठेवलं.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

मोठय़ा भावाविषयी..
मी आत्मचरित्रातल्या पहिल्याच प्रकरणात माझ्या आई आणि मोठय़ा भावाविषयी सविस्तर लिहिलं आहे. माझी आई विधवा होती. तिला आधीच्या पतीपासून एक मुलगा झाला होता. आई नर्स होती आणि वडील डॉक्टर. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण आईला खात्री वाटत नव्हती, की हा माणूस आपल्यासारख्या विधवेशी लग्न करेल किंवा नाही? आई आसरा शोधत होती. पण वडिलांना समाज काय म्हणेल ही भीती होतीच. शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या आधी ते दोघं पाच वर्षे एकत्र राहत होते. त्या काळी असा निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं काम होतं. शेवटी त्यांनी लग्न केलं. तेव्हा तो विषय खूप चर्चेचा झाला होता. समाजात आई-बाबांविषयी काहीबाही बोललं जात होतं. तेव्हा माझा हा मोठा भाऊ आठ-नऊ वर्षांचा होता. त्याच्या ते सगळं कानावर येत होतं. ते ऐकून त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा मी विचार केला. त्याविषयी लिहिलं.
 ही गोष्ट आई-बाबांनी आमच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तो आमचा सख्खा भाऊ आहे असेच आम्ही अनेक वर्षे समजत होतो. आईने वयाच्या ८२ वर्षी आपली कहाणी लिहिली, तेव्हा आम्हाला त्याविषयी समजले. ती वाचल्यावर मला या गोष्टीचा उलगडा झाला. खरा प्रश्न निर्माण झाला तो वडिलांचं निधन झाल्यावर. लोक म्हणाले, की तुझ्या मोठा भावाला अग्नी देण्याचा अधिकार नाही. कारण तो त्यांचा मुलगा नाही. तो तुला देता येईल किंवा तुझ्या मधल्या भावाला देता येईल. मला त्याचं कारण कळलं नाही. कारण तोही जन्मभर कर्नाड हेच नाव लावत होता. त्यामुळे त्याला तो अधिकार मिळावा यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला.

कादंबरी उत्तम, चित्रपटावर बंदी!
सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून मी प्रभावित झालो, सिनेमाकडे वळलो. चित्रपट करून पाहणं, हेच माझं ध्येय होतं. यू. आर. अनंतमूर्ती यांची ‘संस्कार’ ही कादंबरी एक महान कलाकृती आहे. यावर चित्रपट झाला पाहिजे, असं मी आणि माझ्या वीसेक मित्रांनी ठरवलं.  स्वतचे पैसे घालून तो चित्रपट ९५ हजार रुपयांत पूर्ण केला..  आताचे फार तर २० लाख रुपये. मी तेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये संपादक होतो.. आता सांगायला हरकत नाही, तेव्हा ऑक्सफर्डनं मला दिलेली गाडीच आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रॉडक्शनसाठी वापरायचो. ‘मद्रास ग्रूप’ हे आमच्या चित्रपटसंस्थेचं अनौपचारिक नाव. चित्रपट पूर्ण झाला खरा, पण तो ब्राह्मणविरोधी असल्याची ओरड झाली.
खरं तर त्या कादंबरीत ब्राह्मणविरोधी असं काहीच नव्हतं. ग्रामीण जीवनाचं अगदी खरंखुरं चित्रण करणारी ती कादंबरी. एका व्यसनी आणि समाजाच्या मते अनैतिक वर्तन करणाऱ्या इसमाच्या मृत्यूनंतर, तो ब्राह्मण होता म्हणून त्याच्यावर ब्राह्मणांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत की नाही, या प्रश्नावरून अख्खं गावच  दुभंगलं जातं, असं ते कथानक. वास्तव अगदी अचूकपणे दाखवणारी. त्यामुळे सरकारनं या चित्रपटावर बंदी घातल्यावर, यात बंदी घालण्यासारखं काय आहे, असा प्रश्न आम्हां सर्वाना पडला. मग आम्हीही प्रतिवाद करू लागलो- या कादंबरीचे लेखक ब्राह्मण, चित्रपटाचा निर्माता ब्राह्मण, मी दिग्दर्शक होतो तोही ब्राह्मणच आणि या चित्रपटाशी संबंधित असलेले एकंदर १२ जण ब्राह्मण. मग आम्ही कशाला ब्राह्मणविरोधी प्रचार करू, असंही म्हणून पाहिलं. पण बंदी कायम राहिली आणि आम्हीही हंगामा करत राहिलो. परिणाम एवढाच झाला, की या चित्रपटाची प्रसिद्धी जोरदार झाली आणि बंदी जेव्हा उठली, तेव्हा तो भरपूर चालला! याच चित्रपटातला माझा अभिनय श्याम बेनेगल यांनी पाहिला आणि मला ‘निशांत’ मध्ये भूमिका दिली. माझं हिंदी चित्रपटांतलं अभिनयाचं करिअर सुरू झालं.