माझ्या मिथक नाटकांची मुळं माझ्या शिरसीतील बालपणातल्या काळात शोधावी लागतील. सुरुवातीची काही वर्षे आमचं वास्तव्य पुण्यात होतं. माझे वडील सरकारी नोकरीत होते. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची कर्नाटकातील शिरसीला बदली झाली. त्यामुळे माझी वाढ द्वैभाषिक अशीच झाली. पुण्यात आम्ही खूप मराठी, पारशी वगैरे नाटकं पाहात असू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी प्रथम वाचले ते ना. सी. फडके. त्यांच्याशिवाय अन्यही मराठी लेखकांची पुस्तके मी वाचत होतो. शिरसीत वडिलांची बदली झाल्यावर माझी आई खूपच वैतागली. कुठल्या रानात येऊन पडलोत, असं ती म्हणत असे. उत्तर कर्नाटकातील हे गाव. घनदाट जंगलानं वेढलेलं. त्याकाळी शिरसीत वीजही आली नव्हती. त्यामुळे मिट्ट काळोख पडल्यावर कंदिलाच्या प्रकाशातच वावरावं लागे. रात्री घरी वडीलधाऱ्यांकडून पौराणिक कथा, रामायण, महाभारतातल्या कथा, लोककथा सांगितल्या जात. रात्रीचं ते गहन-गूढ वातावरण, या कथांमधील अद्भुतरम्यता यांनी आम्ही मुलं भारावून जात असू. तेव्हा तिथं दुसरी काही मनोरंजनाची साधनं नसल्यानं शाळेतही मुलांना फावल्या वेळात गोष्टीच सांगायला सांगितलं जाई. शिरसीत एक-दोन मोडकी थिएटर्स होती. तिथं कर्नाटकातील छोटय़ा नाटक कंपन्या मराठी संगीत नाटकं नाव बदलून आपल्या परीनं सादर करीत. उदाहरणार्थ ‘संगीत सम्राट’ (सं. संशयकल्लोळ) वगैरे. याशिवाय हरिकथा, कीर्तनं, यक्षगान वगैरेही सतत तिथं पाहायला मिळत. यक्षगान सादर करणारे कलावंत त्यातल्या आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका इतक्या समरसून करत, की लिखित संहिता नसूनही त्या अत्यंत प्रभावी होत. वेशभूषेशिवायच्या या सादरीकरणांचाही माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला. इरावती कव्र्याची ‘युगान्त’ही याच दरम्यान माझ्या वाचनात आल्यानं महाभारतातील व्यक्तिरेखांचं त्यातलं विश्लेषणही माझ्यावर परिणाम करून गेलं होतं. या सर्वाच्या प्रभावाबरोबरच तिथले कैलाशम् आणि आद्य रंगाचार्य ही मंडळीही, मो. ग. रांगणेकर- आचार्य अत्र्यांच्या पद्धतीचीच सामाजिक नाटकं तिथं सादर करीत होती. ‘स्थळ : दिवाणखाना’ याभोवतीच ही नाटकं गुंफलेली असल्यानं मला त्यांचा उबग येत असे. आपण अशी नाटकं करायची नाहीत असं मी तेव्हाच मनात पक्कं ठरवलं होतं.
याच दरम्यान मी अल्काझींचं ‘अॅण्टिगनी’ मुंबईत पाहिलं. ते युरोपियन नाटकं करायचे. दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ असल्याने सेन्सॉरशिपचा कांच होता. त्यामुळे मिथस्चा वापर करून ते आपल्याला जे मांडायचं आहे ते आपल्या नाटकांतून मांडत असत. एकीकडे आपली नाटकं भक्तिरसपूर्ण असल्याने त्यात खरीखुरी शोकांतिका सादर करणं शक्यच नव्हतं. कारण संकटात सापडलेल्याच्या मदतीला देव धावून येणार हे ठरलेलंच असायचं. त्यामुळे या फॉर्ममध्ये शोकांतिकेची शक्यताच मला दिसत नव्हती. म्हणून मग मी ‘ययाति’मध्ये मिथककथेचा आधार घेतला. पुढे ‘अग्निवर्षां’मध्येही हा मिथस्चा वापर केला आहे. पुढे मी ऑक्सफर्डला गेल्यावर मिथ्सचा वापर करून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिल्या गेलेल्या फ्रेंच ट्रॅजिडिज पाहिल्या. त्यातून मला मिथ्सचा वापर करून आधुनिक आशय नाटकातून मांडता येईल हे लक्षात आलं. त्यातून माझ्या मिथक-नाटकांची निर्मिती झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा