आधुनिक तंत्रज्ञान हे ‘वरदान की शाप’ हे सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे . पूर्वी जे अशक्य होते ते करून दाखवण्यात आधुनिक तंत्रज्ञान यशस्वी झाले असले, तरी त्याच्या अनावश्यक व अति उपयोगामुळे, तेच तंत्रज्ञान अनेकांना शाप ठरत आहे. रोग राहू  द्या बाजूला, खर्चानेच मरण ओढवते आहे.
मला रोगापासून वाचव म्हणण्याऐवजी डॉक्टरपासून वाचव म्हणण्याची पाळी लोकांवर आली आहे.. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे! ..याचा या ना त्या प्रकारे अनुभव अनेकांना असेलच, तरीही विषय स्पष्ट होण्यासाठी काही उदाहरणे पाहू..
प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे व लघवीचा त्रास होतो म्हणून एक वृद्ध गृहस्थ येतो, शस्त्रक्रियेआधी ‘धोका टाळण्यासाठी’ तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये ईसीजीमध्ये काही फरक दिसला म्हणून अधिक तपास केले असता हृदयातला व्हॉल्व्ह खराब झाल्याचे निदान झाले. मूळ रोग राहिला बाजूला, आता झडपेची शस्त्रक्रिया करण्यात आली. चार लाख खर्च झाला. पण त्यानंतर रक्त पातळ ठेवण्याकरिता औषधे द्यावीच लागतात. आता प्रोस्टेटची शस्त्रक्रिया कशी करणार? मग ही औषधे काही दिवस थांबवून शस्त्रक्रिया करण्यात आली. पण औषधांचा परिणाम संपला नव्हता; अति रक्तस्रावाने वृद्ध आयुष्य गमावून बसला. प्राणाबरोबर सात-आठ लाख रुपयेही गेले. थोडेसे छातीत दुखते म्हणून ४५ वर्षांचा मध्यमवर्गीय घाबरला व तज्ज्ञाकडे गेला. अँजिओग्राफी झाली. एक रक्तवाहिनी निमुळती झाली आहे त्यात नळी घालावीच लागेल; इतर दोनमध्ये दोष असला तरी थोडासाच आहे म्हणून एका प्लास्टीचे दोन लाख रुपये होतील म्हटल्यावर तो तयार झाला. पण मद्रासहून आलेल्या ‘विशेष तज्ज्ञाने’ तीनही रक्तवाहिन्यांची प्लास्टी केली. ‘अतिदक्षता’ म्हणून दक्षता विभागात एक दिवसाऐवजी चांगले पाच दिवस ठेवले व तब्बल दहा दिवसांनंतर घरी पाठवले. खर्च दोन लाखांवरून सहा-सात लाख रुपयांवर गेला. काही का होईना जीव तर वाचला! पोटात दुखते, पोट फुगले आहे, संडासही होत नाही म्हणून तरुण जेजे रुग्णालयात दाखल झाला. आतडय़ांना पीळ पडून ती कुजली असावीत असे रोगनिदान झाले, पण ‘खात्री करण्यासाठी’ सी.टी.स्कॅन करायला त्याला पाठवण्यात आले. एकूण सात-आठ तास गेले – मशीनवरच दोन तास गेले व तो तिथेच मरण पावला. पूर्वी क्षणात त्याची शस्त्रक्रिया झाली असती व तो वाचू शकला असता. एक ना दोन, अशी अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर असतील. आधुनिक तंत्रज्ञान हा वर की शाप हे कळेनासे झाले आहे सामान्य जनतेला. पूर्वी जे अशक्य होते ते करून दाखवण्यात आधुनिक तंत्रज्ञान यशस्वी झाले असले, तरी त्याच्या अनावश्यक व अति उपयोगामुळे, तेच तंत्रज्ञान अनेकांना शाप ठरत आहे. रोग राहू द्या बाजूला, खर्चानेच मरण ओढवते आहे. काय कारणे आहेत व काय करावे?
वैद्यकीय तंत्र- अतिरेकाचा इतिहास!  
वैद्यकीय इतिहासात तंत्रज्ञानाचा अतिरेक पहिल्यांदाच होत नाहीय. शस्त्रक्रियेच्या सुरुवातीच्या दिवसांतही असेच झाले होते. एका दंतवैद्याने बधिरीकरणाचा शोध लावला, तर कॉकने जंतूंमुळे रोग होतात हे सिद्ध केले. त्यामुळे जंतूंचा नाश करून व रुग्णाला बधिर करून शस्त्रक्रिया करणे सोपे झाले. १८७५ ते १९२० पर्यंत शस्त्रक्रियांचा अतिरेक झाला. चुकीच्या निर्णयामुळे शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्ण मरण पावले. ‘शस्त्रक्रिया यशस्वी, पण रुग्ण दगावला’ ही म्हण रूढ झाली. मग लक्षात आले की करता येते म्हणून केलेच पाहिजे असे नाही. शस्त्रक्रिया तंत्र स्थिर झाले. आत्ताही अशीच स्थिती आहे, पण अधिक अवघड आहे. आधुनिक तंत्रज्ञान इतके दिपवणारे आहे की ते नाकारणे फारच अवघड बनले आहे. शिवाय त्याचा प्रचार करणाऱ्या कंपन्यांनी रोगाच्या भीषणतेविषयी अधिकच प्रचार केलाय व या नवीन तंत्रज्ञानाशिवाय जीव वाचवणे अशक्य आहे अशी जनभावना निर्माण केली आहे. अर्थात त्यामध्ये डॉक्टरांचा मोठा सहभाग आहेच.  ‘मेडिकलायझेशन ऑफ हेल्थ सव्‍‌र्हिसेस’ हा वाक्प्रचार सुज्ञ विचारवंतांमध्ये मूळ धरू लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्याकरिता काही करता येईल का? खर्च तर वाचेलच पण जीवही वाचेल.
प्रयत्नांती परमेश्वर. स्वत: प्रयत्न केल्याशिवाय काहीच साध्य होणार नाही. प्रथम म्हणजे रोगांविषयीची भीती कमी केली पाहिजे. म्हणजे विचार करायला वेळ मिळतो. अगदी कर्करोग वा हृदयरोग असला तरी. आरोग्य ही सेवा उरली नसून व्यवसाय/धंदा बनला आहे हे मान्य केल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर चोखंदळ बनलेच पाहिजे. ‘का?’, ‘ किती खर्च?’, ‘न केल्यास काय होईल?’ हे प्रश्न विचारण्याचा तुम्हाला हक्कच आहे. डॉक्टर चिडतील का? नीट उत्तरे देतील का? अर्थात तुम्ही प्रश्न कसा विचारता यावर बरेच अवलंबून असते. खुलासा मागा. शंका म्हणून विचारा. संशय घेऊ नका, उद्धटपणे  विचारू नका. ज्या डॉक्टरवर विश्वास नाही त्याच्याकडे जाण्यात अर्थ नाही. पण विश्वास आजकाल अंध नसावा म्हणून प्रश्न. अशा वेळी तुमचे डॉक्टर चिडत असतील, नीट उत्तरे देत नसतील तर ते चांगले डॉक्टर नाहीत. बदला त्यांना. तसेच जे डॉक्टर नेहमीच घाबरवतात व मोठी बिले करतात त्यांच्यापासून दूर राहा. त्यानंतर रुग्णालयाकडे लक्ष द्या.
 सर्व सेवांचे दर जाहीरपणे रुग्णालयात दाखवावेत असा नियम मेडिकल कौन्सिलने घालून दिला आहे. तसेच आता रुग्णालयाचे दर्जा परीक्षण होते व तसे अधिकृत प्रमाणपत्र रुग्णालयाला मिळते. अनेक रुग्णालये त्याची खटपट करीतच नाहीत. कारण? -तुम्ही. जनतेनेही स्पष्ट मागणी केलीच पाहिजे. दर्जा निदान ‘समाधानकारक’ (ऑप्टिमम) नसेल तर मनात शंका यायला पाहिजे. याबाबतीत ग्राहक संघटना बरीच उपयुक्त कामगिरी करू शकतील. आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्या आजाराविषयी अधिक माहिती मिळवणे. डॉ. मालपाणी यांनी ‘रुग्ण मदतनीस’ (पेशंट्स अ‍ॅडव्होकेट) ही संकल्पना सुचवली आहे. हे ‘माहीतगार मदतनीस’ जनतेला बरीच मदत करू शकतील. माझ्या मते या ‘मदतनीस’ संस्थांनी चक्क ‘सेकंड ओपीनिअन’ अशी दुकाने थाटावीत व काही दर लावून अशी माहिती मागणाऱ्या रुग्णांना पुरवावीत. पुन्हा एकदा ग्राहक संघटना यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. पण दुर्दैवाने डॉक्टरविरोधी भूमिका घेऊन व त्यांच्या फीविषयीच अधिक आरडाओरडा करून, आज या संघटना रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये अधिकच दुरावा निर्माण करताहेत. पण चांगल्या डॉक्टरांच्या सहकार्याशिवाय हा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग थांबवणे शक्य नाही.
ज्यांच्यापासून वाचवा असा धावा करतो आहोत त्यांचेच सहकार्य? होय. अजून अनेक चांगले डॉक्टर आहेत आणि आणखी अनेकांना यातून बाहेर पडावे असे मनापासून वाटते. पंचतारांकित डॉक्टर व अत्यंत कमी दर्जाचे डॉक्टर (यात ‘आयुष’वालेही आले) यांच्यामध्ये हा भ्रष्टाचार अति आहे. मधले डॉक्टर जनतेला सहकार्य करतीलच असा मला विश्वास आहे. वर दर्शवलेले रुग्ण मदतनीस व ग्राहक संघटना यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतील. एखाद्या रुग्णालयातील ग्राहक रुग्णांच्या कमिटीने डॉक्टरांशी सातत्याने संपर्क साधून, मासिक बठका ठेवून, विनाकारण होणाऱ्या तपासण्या, उपचार यांना मोठय़ा प्रमाणात आवर घालणे शक्य आहे. रोज सी.टी. स्कॅन का? अतिदक्षता विभागात रुग्ण कुठपर्यंत ठेवायचा, दररोज त्याच त्याच रक्त तपासण्या करण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न या बठकातून मार्गी लावता येतील. याला ‘मेडिकल ऑडिट’ असे म्हणता येईल. यातून, अनावश्यक बाबी टाळून खर्च तर कमी होईलच पण रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालय यांच्यात सुसंवाद होऊन, सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. आज याची नितांत गरज आहे. अर्थात या बठका कशा प्रकारे घेतल्या जातात यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहील, पण काही ठिकाणी तरी त्या यशस्वी होतील व जनतेपुढे उदाहरण ठेवतील असे मला खास वाटते.
चळवळ सध्या अपयशी, पण..
आरोग्यसेवेतील अनावश्यक तपासण्या व उपचार टाळणे व खर्च वाजवी पातळीवर आणणे ही तात्पुरती चळवळ नाही. ती सातत्याने चालूच राहावी लागणार आहे. त्याकरिता मी संकल्प (Social Need for Cost Effective Clinical Practice) या चळवळीचा गेली तीन वष्रे आग्रह करतो आहे. त्याची पंचसूत्री अशी. १) पुन्हा एकदा जुन्या तपासणीच्या पद्धतीकडे वळणे २) तीच पण स्वस्त औषधे वापरणे ३) आधुनिक तंत्रज्ञानाचा कुठे अजिबात उपयोग नाही त्याचा प्रचार करणे ४) आधुनिक उपकरणांच्या स्वस्त पण परिणामकारक आवृत्त्या असतात किंवा त्या शोधून काढता येतात. अशांना प्रसिद्धी देणे व त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करणे व ५) वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थांनी नवीनच पण स्वस्त उपचार पद्धती शोधून काढणे. अशा तऱ्हेचा डॉक्टर गट निर्माण करण्यात मी अयशस्वी ठरलो, तरी त्याची गरज गेल्या आठवडय़ात दोन-तीन वेळा वृत्तपत्रांत व्यक्त झाली आहे. त्याला तरुणांनी साथ द्यावी व जनतेने प्रोत्साहन द्यावे यातच समाजाचे भले आहे. नाही तर हा भस्मासुर आपल्या सर्वानाच जाळून टाकील. पण त्याकरिता ‘डॉक्टर लुटतात’ हा टाहो बंद करावाच लागेल. डॉक्टरांना भरपूर फी द्या, पण खर्च कमी करायला सांगा.

satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Story img Loader