व्यासंगी संपादक व ग्रंथकार गोविंद तळवलकर यांनी ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ दुरून स्वीकारला, परंतु या सत्काराला उत्तर देण्यासाठी भाषणाची चित्रफीत पाठविली. आत्मनिवेदनाचा सूर आजच्या काळातील संस्थात्मक पडझडीशी ताडून पाहणाऱ्या त्या भाषणाचा संकलित अंश..
काही व्यक्तींचे जीवनप्रवाह कल्पना नसताना आपल्या जीवनप्रवाहाच्या जवळून वाहत असलेले दिसतात. पुढील काळात ज्याची जाणीव होते. मागे वळून पाहिल्यानंतर मलाही यशवंतरावांच्या बाबतीत हा अनुभव येत आहे. महात्मा गांधींनी १९३० साली सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. राजकीय जागृतीचा तो काळ होता आणि कराड शहरातील व तालुक्यातील घडामोडींचे वृत्तांत यशवंतराव तेव्हाच्या ‘ज्ञानप्रकाश’ या दैनिकासाठी एक बातमीदार या नावाखाली पाठवीत असत. ‘ज्ञानप्रकाश’मध्ये त्यांच्या ओळखीचे कोणीही नव्हते आणि ते त्या पत्राचे अधिकृतपणे नेमलेले बातमीदारही नव्हते. परंतु ते ही वार्तापत्रे धाडत, ती छापली जात होती. पुण्यात मोघे हे माझे मामा ‘ज्ञानप्रकाश’च्या मुद्रण विभागात काम करीत. एक-दोन वेळा त्यांनी मला ‘ज्ञानप्रकाश’च्या मुद्रणालयात सायकलवरून नेल्याचे आठवते. तो काळ यशवंतरावांच्या ‘ज्ञानप्रकाश’मधील बातमीदारीचा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाचा होता. नंतरच्या काळात यशवंतरावांचा राजकीय पुढारी, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री या नात्याने पत्रकारांशी बराच संबंध आला आणि ‘विशाल सहय़ाद्री’चेही ते प्रवर्तक होते. गांधींच्या आंदोलनात भाग घेतल्यावर इतर अनेक सत्याग्रहींप्रमाणे यशवंतरावांना येरवडा कारावासात बंदी म्हणून पाठविण्यात आले होते. तो काळ शिक्षणाचा असल्याचे यशवंतरावांनी लिहिले आहे. एस. एम. जोशी, ह. रा. महाजनी, आचार्य भागवत, वि. म. भुस्कुटे इत्यादींची राजकीय विषयावरील अभ्यासपूर्ण भाषणे त्यांनी या वेळी ऐकली. नंतरच्या काळात बहुधा दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे वास्तव्य पुण्यात होत असे आणि बराचसा काळ माझे चुलते गोपीनाथ (नाना) तळवलकर यांच्याकडे मुक्काम होई. त्या वेळी एस. एम. जोशी जवळच राहत होते. एकदा त्यांना पोलिसांनी राजकीय कैदी म्हणून पकडल्यावर मोठी गर्दी झाली, त्यात मीही सामील होतो. नानांच्या घरच्या दुसऱ्या बाजूस नानासाहेब गोरे राहत. एस. एम. गोरे व नाना हे तिघेही न्यू इंग्लिशमध्ये एकाच वर्गात शिकून पुढे आहे. हे वर्गमित्र अनेकदा नानांच्या घरात गप्पागोष्टी करताना मी पाहिले आहे. एसएम, गोरे व नाना यांच्या पुढाकाराने पुण्यात शिवाजी मंदिरात युवक सभा भरविण्यात आली. तेव्हा सुभाषबाबू अध्यक्ष म्हणून आले होते. नाना मला बरोबर घेऊन गेल्यामुळे आयुष्यात पहिल्या राजकीय नेत्याचे जे दर्शन झाले ते सुभाषबाबूंचे. नानासाहेब गोरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्राचे भाषांतर केले होते. त्यातील इंग्रजी कवितांचे मराठी भाषांतर नानांनी केले. नेहरूंच्या या इंग्रजी आत्मचरित्राचे वाचन करण्यापूर्वी मी या मराठी अनुवादित चरित्राचे वाचन केले. नेहरूंच्या आत्मचरित्राच्या वाचनाने आपण किती भारावून गेलो याविषयी यशवंतरावांनी लिहिले आहे. महात्मा गांधींनी हरिजनांना खास मतदारसंघ न देण्याचा आग्रह धरून २१ दिवसांचे उपोषण केले. त्यासंबंधी लिहिताना नेहरूंनी नाराजी व्यक्त केली. राजकीय प्रश्नांच्या बाबतीत उपोषणाचा अवलंब करणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी लिहिले की, हे जे चालले होते, त्यामुळे माझी अवस्था विचित्र झाली. एक जग नष्ट झाले आणि दुसरे जन्माला आणण्याचे सामथ्र्य नाही. अशा या दोन जगांत येरझाऱ्या चाललेल्या आहेत.
wandering between two worlds…
one dead, the other powerless
to be born with nowhere to rest his head.
एक नष्ट होय जगत, दुजे जनना समर्थ,
चालती दोहोमधी येरझारा..
यशवंतरावांनी येरवडा व नंतर विसापूर या दोन कारावासांतील जीवनाची माहिती देताना ह. रा. महाजनी यांचा उल्लेख केला आहे. महाजनी संस्कृततज्ज्ञ होते. तसेच ते सातारा जिल्हा काँग्रेसचे चिटणीस होते. त्यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता आणि यशवंतरावांना रॉय यांच्या विचारांची ओळख झाली ती महाजनी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यामुळे. त्याआधी मार्क्सवादाशी परिचय झाला तो हे दोघे आणि वि. म. भुस्कुटे यांच्यामुळे.
महाजनींचा एकमेव नियमित विद्यार्थी
महाजनींशी माझी ओळख झाली ती मी मॅट्रिकला असताना. ते ठाणे येथील एका महाविद्यालयात शिक्षक होते आणि ते काही वेळेला डोंबिवलीला येत असत. कारण आमच्या शेजारी एक गृहस्थ होते. ते होते रॉय पंथाचे. त्यांची व महाजनींची मैत्री होती. महाजनींचे कुटुंब पुण्यात असल्यामुळे ते शनिवार-रविवार काही वेळेला आमच्या शेजाऱ्यांकडे येऊन राहत. त्यामुळे माझा परिचय झाला. मग राजकीय विषयावर काही तरुणांना पाठ देण्याचे महाजनींनी ठरविले. मी त्यातील एक होतो. काही महिन्यांतच महाजनींचा मी एकमेव नियमित विद्यार्थी राहिलो. दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि रॉयवादी मंडळींनी डोंबिवलीत फॅसिस्टविरुद्ध आठवडा साजरा करण्याचे ठरविले. माझे शेजारी रॉयवादी सरकारी नोकर होते. त्यामुळे ते मागे राहून व्यवस्थेत भाग घेत आणि माझ्याकडून काम करून घेत. यातून मग तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धन पारिख, तारकुंडे, वामनराव कुळकर्णी, तय्यब शेख इत्यादींशी ओळख झाली व वाढत गेली.
स्वातंत्र्य जवळ आले आणि त्या सुमारास मी पदवीधर झालो. वृत्तपत्रात काम करण्याचे मनात होते. पण नानांनी कळविले की, शंकरराव देव हे एक मासिक काढत आहेत व त्यांना शिकाऊ उमेदवार पाहिजेत, तेव्हा पुण्याला ये. त्याप्रमाणे ‘नवभारत’ या मासिकात शिकाऊ म्हणून मी कामाला लागलो. दत्तोपंत पोतदार, शंकरराव मोरे, लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींकडे जाऊन लेख आणत असे. शंकरराव देव यांचे ते मासिक खरे. पण काँग्रेसचे सरचिटणीस, कार्यकारिणीचे सभासद इत्यादी पदांमुळे ते दिल्लीत असत. क्वचित पुण्यात येत. या मासिकाची आर्थिक स्थिती मुळातच यथातथा होती. ती बिघडत चालली. मग काही वेळेला महिन्याच्या महिन्याला अंक निघत नसे. महाराष्ट्र काँग्रेसची इमारत जिथे आहे तिच्या जवळच्या भागात शंकरराव देव राहत. ते दिल्ली इत्यादी ठिकाणाहून आले की म्हणजे आचार्य जावडेकर, आचार्य भागवत हेही येत आणि इतर काही काँग्रेसजन. ‘नवभारत’चे कार्यालय त्याच जागेत होते. एक दिवस जावडेकरांच्या भोवती सात-आठ जण जमले होते आणि विषय निघाला होता देशाच्या फाळणीचा. महात्मा गांधी आणि काँग्रेसचे नेते यांच्यावर जावडेकरांच्या भोवती जमलेल्या लोकांनी कडक टीका सुरू केली. जावडेकरांनी त्यांचे शांतपणे ऐकून घेतले आणि अर्धा-पाऊण तास विवरण केले. ते मला अविस्मरणीय वाटले. तो एक अविस्मरणीय अनुभव होता आणि युक्तिवाद प्रभावी वाटला. पुण्याच्या मुक्कामात बापूसाहेब माटे, क्षीरसागर, आचार्य अत्रे, इतिहासकार शेजवळकर, विठ्ठलराव घाटे इत्यादींच्या सहवासाचा लाभ मिळत गेला. त्यात माटे आणि क्षीरसागर यांचा वारंवार. अत्रे तर १५-२० दिवसांनी चांगला दोन-तीन तास मुक्काम करीत आणि सतत धबधबा चालत होता.
मला आज सांस्कृतिक कारणास्तव पारितोषिक दिले जात आहे, त्या सांस्कृतिक क्षेत्रात मी जे काही केले त्याचा पाया या रीतीने रचला गेला. त्यात आणखी एक भर पडली. ती म्हणजे माझे दुसरे काका शरद तळवलकर यांची. नाटक व चित्रपट क्षेत्रात ते नावाजले होते. या आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील श्रीमंतीत आर्थिक चणचण असह्य वाटली नाही.
यशवंतरावांची मुलाखत
नवभारत मासिकाची आर्थिक स्थिती बिघडत असताना मुंबईत गोएंका यांच्या एक्स्प्रेस गटातर्फे ‘लोकसत्ता’ हे दैनिक निघाले. ह. रा. महाजनी यांना सहसंपादक नेमले होते. त्यांनी मला उपसंपादक म्हणून घेतले. पण दुर्दैवाने अंतर्गत भांडणाने सर्व कठीण होऊन बसले. तेव्हा महाजनी यांनी माझी जबाबदारी घेतली व मुंबई सरकारच्या प्रसिद्धी खात्यात व्यवस्था लावली. मला त्या कामाची आवड नव्हती. त्यातच चार-पाच महिने विषमज्वराने मला बेजार केले व नंतर बरा झालो तेव्हा महाजनी यांना संपादक नेमले होते. त्यांनी मला लगेच बोलावून घेतले आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात माझा प्रवेश झाला. महाजनींच्या हाताखाली १२ वर्षे मी काढली. महाराष्ट्राच्या प्रश्नाने नंतर उग्र रूप धारण केले. तेव्हा एक दिवस मी नेहमीप्रमाणे डोंबिवलीहून सकाळी ९ ला आगगाडीने मुंबईला यायला निघालो, त्यापूर्वी सकाळचे वर्तमानपत्र वाचले होते. त्या वेळी भलताच धक्का बसला. ‘लोकसत्ता’मध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते शंकरराव देव यांचे नेतृत्व यासंबंधी यशवंतरावांच्या भाषणाचा वृत्तांत वाचला. मला ते भाषण पसंत पडले. महाजनी यांनी फलटणला खास वार्ताहर पाठविला होता आणि मी व विद्याधर गोखले त्यांच्या नेतृत्वाखाली अग्रलेखाच्या पानांची जबाबदारी सांभाळत असलो तरी आम्हा दोघांना या भाषणाची कल्पना दिली नव्हती. ते बरोबर होते. मी संपादक असतो तरी हेच केले असते. कार्यालयात आलो, महाजनी नंतर आले आणि मग सकाळच्या आमच्या नित्याच्या बैठकीत मी म्हणालो, भाषण वाचले. यात नेतृत्वाचे गुण आहेत. काँग्रेस संघटनेचे भवितव्य अनिश्चित असलेले, काँग्रेसची जागा घेणारा पक्ष नाही, सर्व बाजू सांभाळून धरील असा तोडगा निघत नाही, या स्थितीत निश्चित तोडगा काढून त्याचा पाठपुरावा करणारा नेता हवा, तो आता मिळाला आहे. महाजनी नंतर याच विषयावर बोलत होते. एका तासात त्यांनी मला परत बोलावले. यशवंतरावांशी आपली बोलणी झाली आहेत आणि ते मुलाखत देण्यास तयार आहेत. तेव्हा काही प्रश्न तयार करू. त्यात अर्धा-एक तास गेला. मुलाखत घेण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले. मी लिहून आणलेले प्रश्न विचारून, आयत्या वेळी सुचलेल्या एखाद-दुसऱ्याची भर घातली. सर्व प्रश्नांची यशवंतरावांनी दिलेल्या उत्तराप्रमाणे मुलाखत लिहून काढून ती त्यांना दाखविली. त्यांनी मुलाखत वाचली. कसलाही बदल केला नाही आणि धन्यवाद दिले. या रीतीने नकळतही यशवंतरावांशी धागे जुळले.
हे कोठे नेणार?
माझे हे थोडे आत्मनिवेदन आहे, आत्मचरित्र नव्हे. आजच्या या समारंभाच्या वेळी तुमचा निरोप घेताना एक सांगावेसे वाटते. मी अगोदर सांगितलेले युग संपलेले आहे आणि गेल्या काही वर्षांपासून मी जे पाहत आहे, त्याच्याशी भावनिक नाते जुळत नाही. नेहरूंच्या आत्मचरित्रातील ज्या कवितेचा उल्लेख केला आहे, तशीच माझी अवस्था आहे. एक युग संपले आणि नवे निर्माण करण्याचे सामथ्र्य नाही. अशा जुन्या व नव्या जगामध्ये येरझाऱ्या चालू आहेत. आपल्याच देशात नव्हे तर जगभर जे घडत आहे ते कोठे नेणार हे समजत नाही. आजवर देशात व जगात बदल होत आले, अगदी दूरगामीही बदल झाले. पण त्यामागे काही ना काही सूत्र होते.
व्यक्ती येतात व जातात, पण संस्था आणि परंपरा टिकून राहत, सांभाळल्या जातात. नाही तरी समाज हा संस्थांवर टिकतो, व्यक्तींवर नाही आणि बळकटपण होतो. पण दीर्घकाळ चाललेल्या संस्थांचा पायच गेल्या १५ वर्षांमध्ये उखडला गेला आहे. हे एखाद-दुसऱ्या क्षेत्रात झालेले नाही. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही क्षेत्रांत उलथापालथ होऊन त्याची जागा विश्वासार्ह संस्थांनी घेतलेली नाही. मोठमोठय़ा बँका दिवाळखोर बनल्या, मोठमोठे कारखाने बंद पडले. व्यावसायिक संस्थांमध्ये दीर्घकाळ अधिकारावर राहणाऱ्यांची एक माळ होती. आजकाल कोण, केव्हा, कोठे बदलून जाईल याचा काही पत्ता राहिलेला नाही. ज्या पत्रसृष्टीत मी अनेक वर्षे काढली ती यास अपवाद नाही. दूरचित्रवाणी हे एक प्रभावी साधन होते. आज ते वेगळ्या अर्थाने प्रभावी होऊन बसले आहे आणि दिवसाचा बराच वेळ ते दूर ठेवणे मला पसंत असते. हे साधन कमी पडेल की काय म्हणून फेसबुक आणि इतर साधनांची रेलचेल झाली आणि डोकेदुखी मात्र वाढली आहे. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पूर्वी टपाल व नंतर टेलिफोन ही साधने आली. नंतर इंटरनेटने अधिक सोय केली असली तरी आजकाल रोजची कटकट वाढली आहे. कोणीही काय वाट्टेल ते लिहितो आणि आपले वाचल्याशिवाय जगाचा तरणोपाय नाही, अशा समजुतीमुळे जमेल तितक्यांना पाठवून उपद्रव देण्यात मात्र आनंद मानतो. आजच्या समारंभाच्या निमित्ताने या कोलाहलापासून दूर होऊन अस्तंगत झालेल्या युगात थोडा फेरफटका मारता आला याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा