भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर आणि चीन करीत असलेल्या भारतविरोधी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर भारतात चीनविरोधी भावना निर्माण झाली असून, त्यातून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची टूम सुरू झाली आहे. यंदा दिवाळीदरम्यान चिनी उत्पादने खरेदीच न करण्याचे आवाहन व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरवरून केले जात आहे. असे असले तरी त्याचा कितपत परिणाम होतो याबद्दल साशंकताच आहे. चिनी उत्पादनांची बाजारपेठ डबघाईला येण्याची सध्या तर सुतराम शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील मनीष मार्केट, अब्दुल रहमान स्ट्रीट, क्रॉफर्ड मार्केट तसेच उल्हासनगर येथील बाजारपेठा चिनी व अन्य विदेशी वस्तूंनी भरून वाहत आहेत. चिनी वस्तूंमधील वैविध्य आणि आकर्षकपणा याला भुलून समाजमाध्यमांवर देशप्रेम मिरवणारे देशभक्तया बाजारपेठांमध्ये मात्र चिनीरंगात न्हाऊन निघताना दिसत आहेत.

चिनी उल्हास..

बाजारपेठेतील कोणत्याही वस्तूची हुबेहूब प्रतिकृती तयार करून विकणाऱ्या उल्हासनगरमधील बाजारपेठेत दरवर्षी कोटय़वधींची उलाढाल होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे त्या वस्तू ‘देशी’ बनावटीच्या असतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून दिवाळी व अन्य सणांच्या काळात या ‘उल्हासनगरनिर्मित देशी’ मालापेक्षाही येथे चिनी उत्पादनांचे महत्त्व वाढले आहे. यंदा बाजारपेठेत चिनी वस्तूंची संख्या सर्वाधिक दिसत असून, ग्राहकांचीही पहिली पसंती चिनी वस्तूंना असल्याचे दिसत आहे. दीपमाळा, कंदील, प्लास्टिकच्या शोभेच्या वस्तू, पणत्या आदी दिवाळीत लागणाऱ्या साऱ्याच वस्तू येथे उपलब्ध असून प्रत्येक वस्तूमध्ये अनेक प्रकारचे वैविध्य आहे. स्वस्त दर, आकर्षकता आणि वैविध्य यामुळे या वस्तूंकडे ग्राहक खेचला जातो. या वस्तूंमागचे अर्थकारण हे येथील विक्रेत्यांसाठी हितकारक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत ‘फेडरेशन ऑफ सिंधुनगर व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष नरेश दुर्गानी म्हणाले की, उल्हासनगरमध्ये वर्षभरात २५ टक्के माल चीनमधून येतो, मात्र गेल्या तीन-चार वर्षांत दिवाळीदरम्यान चीनमधून येणारा एकूण माल ४० टक्क्यांच्या घरात पोहचला आहे. कंदील, विजेच्या दीपमाळा, शोभिवंत प्लास्टिकच्या वस्तू, तोरणे, आकर्षक पणत्या आदी चिनी मालाची मागणी वाढल्याचे दिसते आहे.

गेल्या वर्षी शहरात अनेक बांधकामे पालिकेने पाडली. त्यातील बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतली होती. स्थानिक बनावटीच्या मालाची काही दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंच्या विक्रीकडे आपला मोर्चा वळवला. उल्हासनगर निर्मित माल विशेष आकर्षक नसल्याने, त्यात वैविध्य नसल्याने तसेच यात विक्रेत्यांना नफाही मिळत नसल्याने त्यांची जागा चिनी वस्तूंनी घेतली. चिनी मालात नफा अधिक असून ग्राहकही त्याला पसंती देत आहेत. यंदा ही उलाढाल कोटय़वधींमध्ये होण्याची शक्यता आहे.

मुंबईत चिनी दीपमाळा

दक्षिण मुंबईतील मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट आणि अब्दुल रहमानिया रस्ता येथील बाजारपेठाही दिवाळीनिमित्त सजल्या असून या बाजारपेठांनीही स्थानिक मालाच्या विक्रीला तिलांजली दिली आहे. या बाजारपेठांमधील सगळीच उत्पादने विदेशी असल्याचे दिसते. क्रॉफर्ड मार्केट येथे दिवाळीनिमित्त दीपमाळा व आकाशकंदील यांची विक्री यंदा होत नसून केवळ चॉकलेट आणि सुका मेव्याची आकर्षक वेष्टनातील पाकिटे विक्रीस आहेत. यातील एकही उत्पादन भारतीय बनावटीचे नसून सगळ्याच प्रकारची चॉकलेट व बिस्किटे तुर्कस्तान व मलेशिया येथील आहेत, तर काही चॉकलेट अमेरिकी बनावटीची आहेत.

मनीष मार्केट येथील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत १०० टक्के चिनी वस्तू विक्रीला आहेत. येथील विक्रेता मन्सूर खान याने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे २० रुपयांपासून दीपमाळ असून सगळ्यात महाग दीपमाळ ४५० रुपयांपर्यंत आहे. या दीपमाळांचे १५-२० प्रकार विक्रीस उपलब्ध आहेत. या सगळ्याच चिनी वस्तू असून ग्राहक याचीच मागणी करतात. त्यामुळे प्रत्येकाकडे हाच माल आहे.  क्रॉफर्ड मार्केटसमोरील अब्दुल रहमान रस्त्यावर कंदील, मोत्यांच्या पणत्या, काचांचे आकर्षक दिवे यांची विक्री होत असून या वस्तूही चिनी बनावटीच्या असल्याचे विक्रेते सांगतात. ८० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत मोठय़ात मोठा आकर्षक कंदील येथे मिळतो, तर काचांचे मोठे दिवेदेखील १०० रुपयांत येत असल्याने नागरिकांच्या त्यावर उडय़ा पडताना दिसत आहेत. येथेही व्यापारी आणि ग्राहकांनी चिनी वस्तूंची खरेदी टाळा या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे स्पष्ट होत आहे.

चीनला गरज भारताची

चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अधिक निर्भर आहे. या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६० टक्के  हिस्सा हा निर्यातीचा आहे. त्यातही भारताचा वाटा एकूण आशियाई देशांमध्ये अधिक आहे. चीनमध्ये तयार केलेल्या मोबाइल, लॅपटॉप,खते, दूरसंचार क्षेत्रातील विविध साहित्य अशा छोटय़ा वस्तूंची येथील बाजारपेठ मोठी आहे. भारत हा चीनला कापड, तेल पदार्थ, मशीन आदी मोठय़ा वस्तू निर्यात करत असला तरी चलनात हे प्रमाण कमी पडते. व्यापाराच्या दृष्टीने भारत-चीन हे जगातील एक मोठे भागीदार देश आहेत. खनिकर्म, स्टील वगैरेसाठी दक्षिण आफ्रिका आणि खनिज तेल वगैरेसाठी चीनला संयुक्त अरब अमिरातपर्यंत पोहोचण्यासाठी पाकभूमीचा वापर करणे सक्तीचे ठरते. हाँगकाँग, शांघाय अशी व्यापारउदिमात आयकॉन असलेली शहरे सागरी किनाऱ्यालगतची आहेत. परिणामी या देशाचा सागरी व्यापारही अधिक आहे. पर्यटन, सी फूड्स याद्वारे या देशाचे स्वत:चे पोट तर भरतेच शिवाय निर्यातीसारखा मोठा आणि तेही विदेशी चलनातील उत्पन्न स्रोत या देशाला लाभला आहे.

आयात-निर्यात

चीन-भारत दरम्यान कापड, रत्ने, दागिने, मौल्यवान धातू, मीठ, सिमेंट, प्लास्टिक विद्युत उपकरणे, रासायनिक उत्पादने, स्टील, चामडे, मशीन, पंप यांचे मोठे व्यवहार होतात. त्यातही दूरसंचार, संगणक उत्पादने, खते, रासायनिक पदार्थ यांची भारत चीनमधून अधिक आयात करतो. तर कापड, प्लास्टिक, स्टील, चामडे हे भारताकडून चीनमध्ये निर्यात केले जाते.

व्यापारातील वरचष्मा

५२ अब्ज डॉलर : चीनबरोबरची भारताची २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील व्यापार तूट.  याचा अर्थ भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत चीनमधून भारतात होणारी वस्तूंची आयात वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत चीनमधून आयातीचे प्रमाण तब्बल २० टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत भारताची चीनसाठीची निर्यात २०१५-१६ मध्ये घसरून अवघ्या ९ अब्ज डॉलरवर आली आहे. काही वर्षांपूर्वी हा वेग दुहेरी आकडय़ात होता.

संदेशातील विसंवाद

चिनी मालावर बहिष्कार टाका असे संदेश सध्या फिरत आहेत. ते ज्या मोबाइलवरून येतात त्यातील अनेक मोबाइल हे चिनी बनावटीचे आहेत..

  • चिनी मोबाइल : लेनोवो, आसुस, कूलपॅड, जिओनी, हुवाई, वावो
  • भारतीय मोबाइल : मायक्रोमॅक्स, आयबॉल, एचसीएल, इंटेक्स, कार्बन लावा, व्हर्जिन, झोलो चिनी माध्यमांतील चर्चा
  • चिनी मालावर बहिष्काराचा आवाज भारतातील समाजमाध्यमांतून उठू लागला. याची दखल चिनी माध्यमांनीही घेतली. ग्लोबल टाइम्स या चीनमधील सरकारी मालकीच्या माध्यमाने तर या मोहिमेवरून भारतावर दुगाण्याच झाडल्या.

*********

भारत आणि चीनमधील व्यापारात मोठी दरी आहे. ती वाढते आहे. परंतु त्यावर केवळ ‘भुंकण्या’पलीकडे भारत काहीही करू शकत नाही, असे या दैनिकातील संपादकीय पानासमोरील पानामधील (ऑप-एड) लेखात म्हटले आहे.

*********

नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा आवडता उपक्रम अव्यवहार्य असून, भारतामधील मोठय़ा प्रमाणावरील भ्रष्टाचार आणि तेथील बिनकष्टाळू कामगारवर्ग यांमुळे तेथे गुंतवणूक करणे हे आत्मघातकी ठरेल असा सल्लाही या लेखामधून चिनी कंपन्यांना देण्यात आला आहे.

*********

चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन हा केवळ भावना भडकाविण्याचा प्रकार आहे. भारतातील उत्पादक चिनी मालाशी स्पर्धाच करू शकत नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.

 

संकलन : वीरेंद्र तळेगावकर

veerendratalegaonkar@expressindia.com

संकेत सबनीस

Story img Loader