रंगांच्या उत्सवात न्हाऊन धुळवड साजरी केली जात असताना, महाराष्ट्राच्या निम्म्याहून अधिक भागात धूळधाण उडाली आहे. गारपिटीच्या भीषण तडाख्यात असंख्य कुटुंबे, गावे, शेतीवाडी, जनावरे आणि जंगलेही उद्ध्वस्त झाली..डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झालेले पाहताना असंख्य मने पुरती कोलमडून गेली आहेत. सरकारी पंचनाम्याचे सोपस्कार नियमांच्या आणि आचारसंहितेच्या चौकटीत राहून पूर्ण होतील, तोवर या उद्ध्वस्त मनांना माणुसकीच्या आधाराची गरज आहे. या भीषण तांडवात हजारो मुकी जनावरे प्राणास मुकली. निसर्गाच्या कुशीतील असंख्य वन्यपशू आणि पक्षी एकाच तडाख्यात कायमचे गारद झाले.. उभी पिके, फळबागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. मागे राहिलेल्या या उद्ध्वस्ततेतून नव्या समस्याही निर्माण होणार आहेत.. निसर्गाच्या प्रकोपाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या, हृदयाची कालवाकालव करणाऱ्या या जिवंत कहाण्या..
जळगाव/संदीप केदार
पिचर्डे हे जिजाबाईंचे गाव. भडगाव तालुक्यातील पिंपरखेड, आमळदे, पिचर्डे, भडगाव आदी गावांमध्ये २४ फेब्रुवारी आणि १० मार्च रोजी गारपीट झाली. पशुधन, घरे, पिकांचे मोठे नुकसान झाले. जिजाबाईंकडे ना शेती ना गुरेढोरे. जिजाबाई माहेरीच राहतात. घरच्यांवर ओझे नको म्हणून त्या शेतमजुरी करतात. १० मार्चला शेतात मजुरी करत असताना अचानक आभाळ भरून आलं.. सोसाटय़ाचा वारा सुटला आणि आकाशातून जणू दगडफेक सुरू झाली.. एकच पळापळ झाली. मजुरांनी घरचा रस्ता धरला. लिंबाएवढय़ा गारांचा मारा अंगावर होत होता. जिजाबाईंनी बाजूच्या निलगिरीच्या झाडाचा आडोसा केला, तरीही गारांचा मार बसत होता. काही मिनिटांतच सर्व अंग सुजून गेले. बधिरपणा जाणवू लागला. त्यातच झाडाची फांदी अंगावर पडली आणि जिजाबाईंच्या मानेला जखम झाली. सहकाऱ्यांच्या मदतीने घरी आल्यावर लगेचच भडगावच्या रुग्णालयात दाखल झाल्या. मानेभोवती आठ-नऊ टाके पडले. गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली.
अजूनही जिजाबाई रुग्णालयातच आहेत. असं संकट कोणावरही कोसळू नये, अशी विनवणी करत त्या आकाशाकडे पाहात हात जोडतात आणि त्यांचे डोळे पाझरू लागतात. उपचाराचा खर्च वाढतोय, म्हणून लवकर घरी सोडा, अशी विनवणी त्या डॉक्टरांकडे करतात, पण जखम अजून भरलेली नाही.. कदाचित, त्या जखमा भरतीलही, पण मनावरल्या जखमांची खपली निघाली, तर त्या पुन्हा चिघळतील.. त्या वेदना सहन करायची शक्ती त्यांना मिळायला हवी, असं डॉक्टरही म्हणतात.
जखमा.. शरीरावर आणि मनावरही!
आधी दुष्काळ, नंतर अतिवृष्टी आणि आता गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आणि ज्यांची शेतीवाडी नाही त्यांना पाऊस आणि गारपिटीने झोडपले. जळगावच्या भडगाव तालुक्यातील जिजाबाई मधुकर भिल्ल (२७) सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. शेतमजूर कुटुंबातील जिजाबाईला शारीरिक वेदनांसह आता उपचाराची बिले कशी भागवायची, ही नवी चिंता सतावते आहे. अजूनही त्या दिवसाच्या आठवणीने त्या अचानक गप्प होतात, डोळे पाझरू लागतात आणि काहीच न बोलता त्या मान फिरवतात..
स्वप्नांवर गारा पडल्या!
नगर/महेंद्र कुलकर्णी
स्वप्नांवर पाणी फेरले ही म्हण आता मागे पडली.. शेतकऱ्यांच्या ‘स्वप्नांवर गारा पडल्या’ आहेत. नगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा, मात्र चौदाही तालुके जबरदस्त गारपिटीच्या तडाख्यात सापडले आहेत. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या समोर मुला-बाळांचे शिक्षण, लग्नकार्ये असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. शेतात काही राहिलेच नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणेच सोडून दिले आहे.
ज्या पिकांच्या भरवशावर स्वप्नं पाहिली, ती पिके तर गेलीच. आता त्यातून सावरण्यास पाच-दहा वर्षे लागतील.. गेली दोन वर्षे दुष्काळात शेतीची परवड झाली. शेतकऱ्यांनी कशाबशा बागा जगवल्या. यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला, आणि आता सगळे संपले! नगर जिल्हय़ातील कोपरगाव, कर्जत, पारनेर, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदे या तालुक्यांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या. कोपरगाव, कर्जत, शेवगाव तालुक्यात आठवडाभरात दोन-तीनदा गारांनी झोडपले. अकोले हा एकमेव तालुका बचावला होता, नंतरच्या टप्प्यात येथेही तुफानी गारपीट झाली. विशेष म्हणजे जिल्हय़ात डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यातील नेमक्या आढळा खोऱ्यालाच हा तडाखा बसला. टार्गेट ठेवून झोडपून काढावे तसंच.. द्राक्षबागा लावल्या, की दोन-तीन वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते. ही दोन-तीन वर्षे उत्पन्न नाहीच, उलट बागा सांभाळण्यासाठीच काही लाखात खर्च होतो. कर्ज काढून उभ्या केलेल्या अशा नव्या बागा, डोक्यावर कर्ज ठेवून कोलमडून गेल्या. आता जगण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागेल. द्राक्षप्रमाणेच डाळिंबाची स्थिती आहे. चिकू, पेरूच्या बागाही तुफानी गारपिटीने पुरत्या कोलमडल्या आहेत. त्या पुन्हा करणे दूर, आधीचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न तर आहेच, शिवाय त्याचे उत्पन्न गृहीत धरून केलेले संकल्प उद्ध्वस्त झाले आहेत.
गारांमुळे जमिनीतील तापमान बराच वेळ खालावल्याने फळझाडे व अन्य पिकांच्या मुळय़ांमध्ये सूक्ष्म जिवाणूंचा प्रादुर्भाव झाला असून त्याचा अधिक फटका फळबागांना होणार आहे. बहुसंख्य फळबागा काढूनच टाकाव्या लागतील, असे केविलवाण्या सुरात सांगणारे शेतकरी जागोजागीच भेटतात..
कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसराला जिल्हय़ात सर्वाधिक तडाखा बसला. या परिसरातील दहा-बारा गावांना आठवडय़ात तीनदा गारपिटीचा सामना करावा लागला. येथील शेतकरी राजेंद्र खिलारी यांचे तब्बल ४० एकरांवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गावात राहून आता शेतीवर जाण्याची इच्छा राहिली नाही.. छोटय़ा शेतकऱ्यासमोर जगण्याचाच प्रश्न उभा राहिला आहे, तर मोठय़ा शेतकऱ्यांवर फाशी घेण्याची वेळ आली आहे असे त्यांनी व्यथितपणे सांगितले.
बारामती परिसरात अलीकडेच झालेल्या जोरदार गारपिटीने रस्त्यारस्त्यांवर गारांचे असे ढीग जमले होते. गेल्या ६० वर्षांत अशी गारपीट अनुभवली नसल्याचे येथील वृद्ध नागरिक सांगतात. शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे नुकसानभरपाईची.. ती कधी मिळणार हे मात्र कोणीच सांगत नाही..
‘आत्महत्येची परवानगी द्या..!’
औरंगाबाद/सुहास सरदेशमुख
आणेवारीच्या निकषात खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव बसत नव्हते. म्हणून तेथे दुष्काळ जाहीर झाला नाही. मदत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा सांडू पुंजाजी जाधव यांनी तहसीलदारांना पत्र लिहिले.. ‘मोठय़ा कष्टाने मोसंबीची बाग वाढविली. आठ विहिरी आहेत, पण पाणी एकातही नाही. टँकरने पाणी आणतो. त्यावरही लाखभर रुपये खर्च झाले. आता जगणे असह्य़ झाले. सरकार मदतही देत नाही. तेव्हा मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या’!
मजकुरातील तीव्रता तेव्हा सरकारदरबारी जाणवली नाही. एका राजकीय पक्षाने थोडी मदत केली, म्हणून टँकरने पाणी आणून बाग वाचवली. सांडू जाधवांना वाटले, आता बरे दिवस येतील. वडिलांनी शेती कसायला सांगितली तेव्हा काय मिळेल, किती मिळेल, असा विचार केला नाही. काळ्या आईची सेवा करत गेलो. ती भरभरून देत गेली. प्रपंच चांगला चालला होता, पण या वेळी मोठा घात झाला. गारपिटीत होत्याचे नव्हते झाले. देवाने दिलेच नसते तर काही वाटले नसते. पण सोन्यासारखे पीक डोळ्यांदेखत वाया गेले. त्या दिवशी सोंगलेला गहू काढून ठेवला होता. २०-२२ पेंढय़ांचेच खळे झाले. बाकी सगळा गहू मातीत मिसळला. सांडू जाधवांना दोन मुले. दोघेही शेतीत राबतात. तसा बैलबारदानाही भरपूर. दुष्काळ पडला होता, तेव्हादेखील एकही जनावर विकले नाही. आजही दूध किती काढायचे आणि वासराला किती पाजायचे, हे जाधव आवर्जून सांगतात. गावरान गायीचे दूध आम्ही काढत नाही. ते वासराचं असतं, असं सांगणाऱ्या जाधवांच्या शेतातील गहू, मोसंबी उद्ध्वस्त झाली. ही उद्ध्वस्तता सांगताना जाधवांच्या डोळ्यांत पाणी येत होते. ते म्हणाले, पिकासाठी किती पैसे गेले, खत-बियाणांवर खर्च कसा झाला, हा प्रश्न नाही. पण हातातोंडाशी आल्यावर सगळेच उद्ध्वस्त झाले. एवढे दिवस धीर धरला होता, पण गहू वाया गेला. मोसंबीला पान राहिलं नाही. फळं पडली, सडून गेली. तेव्हा धाकटा पोरगा समजावून सांगू लागला, ‘दादा, हात-पाय गाळून कसे चालेल? आपल्याकडे ट्रॅक्टर आहे. कोठेही कामाला जाऊ, पण चित्राब जगवू.’ गणेशचे ते वाक्य उच्चारताना सांडू जाधव यांचा गळा भरून येत होता. डोळ्यांतून आसवं कधी खाली आली, हे त्यांना कळलं नाही. जवळच्याच रुमालाने ती पुसली. म्हणाले, ‘देवाची करणी. त्यानंच दिलं, त्यानंच नेलं..’
जगण्याचे सगळेच दोर कापले गेले!
परभणी/आसाराम लोमटे
ठरवून िखडीत गाठावे, तसे झाले. जगण्याचे सगळेच दोर कापून टाकले आहेत.. सेलू तालुक्यातील दिग्रस गावचे शेतकरी उद्धवराव ज्ञानोबा पौळ यांच्या शेतातील १५ एकरावरला वेचणीला आलेला कापूस गारपिटीने नष्ट झाला. दोन एकरांतला काढणीला आलेला गहू अक्षरश: मोडून पडला. तीन एकरांत हरभऱ्याचे पीक होते. त्यातील मजुरांना काढणीसाठी दिला जाणारा वाटासुद्धा निघणार नाही, अशी गत झाली. दीड एकरातील भाजीपाला साफ झाला आणि सहा एकर ज्वारीचे पीकही मातीमोल झाले. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘आम्ही ५-६ वष्रे मागे गेलो.’ या तडाख्यातून सावरायचे कसे? सगळी घडी विस्कटून गेली. येणारे वर्ष संकटासारखे भासू लागले आहे. शेतात राबणाऱ्या गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न उन्हाळ्यात भेडसावू लागेल. गारपिटीने ज्वारीचे पीकच नष्ट झाले. त्यामुळे कडबाही नष्ट झाला. आपण काय खायचे, गुरांना चारा कुठून आणायचा आणि वर्ष धकवायचे कसे. मनातून खचलो तरीही ते दाखवायचे नाही, अशी तयारी त्यांना करावी लागत आहे.
पाथरी तालुक्यातील उमरा गावचे धोंडिबा बिजुले यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही. दुसऱ्याच्या जमिनीत ते टरबुजाचे पीक घेतात. बिजुले यांनी लागवड केलेले चार एकरांतले टरबुजाचे पीक आकाराला येऊ लागले होते आणि अचानक गारपीट झाली. लहान लहान फळांचे अक्षरश: तुकडे झाले.. आता नुकसानभरपाई मिळालीच तर ती ज्याचे शेत आहे, ज्यांच्या सात-बारावर पीक आहे, त्यांना मिळेल. बिजुले यांना मिळणार नाही. पिकासाठी घातलेले ५० हजार वसूल कसे करायचे, असा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे.
संसाराचा गाडा हाकायचा कसा?
बीड/वसंत मुंडे
दोन वर्षांपूर्वी कर्ज घेऊन साडेसहा एकरवर द्राक्षाची लागवड केली. पुढच्या महिन्यात फळ हातात येणार होते, व्यापारीही मागे होते. जवळपास २५ लाखांचे उत्पन्न मिळणार होते. देणे फेडून घर बांधण्याचे, मुलांचे शिक्षण करण्याचे नियोजन होते.. पण गारपीट झाली आणि सारे स्वप्न मातीत मिसळले.. शहरात राहणाऱ्या तीन मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा? नुकसान भरून कसं येणार? या विचाराने डोकं सुन्न झालंय. अधिकारी, पुढारी नुसत्याच भेटी देत आहेत. नुकसानभरपाई तरी किती मिळणार? हजार-दोन हजारांच्या मदतीने काय होणार आहे, असे अनेक प्रश्न सतावत आहेत. याच विचारानं कापरं भरतं, अशी व्यथा व्यंकट कराड सांगत होते.
मागच्या ६० वर्षांत झाली नसेल अशी गारपीट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ाही उद्ध्वस्त करून गेली. परळी तालुक्यातील कवडगाव साबळा हे शंभर उंबऱ्यांचं गाव. व्यंकटरावांचा पाच जणांच्या कुटुंबाचा संसार ३५ एकरांच्या शेतीवरच चालतो.. मुले शिक्षणासाठी शहरात, खर्च वाढला म्हणून दोन वर्षांपूर्वी नेहमीचे पीक सोडून साडेसहा एकरांत द्राक्षाची लागवड केली. उसनवारी, काही कर्ज काढून मेहनतीने बाग वाढवली. एप्रिल महिन्यात फळे हातात येणार होती. एका झाडाला १५ ते २० किलोंचा माल लगडला होता. मुलांचे शिक्षण, देणे देऊन घर बांधण्याचे स्वप्न होते. गारपीट सुरू झाली. घराकडे धावलो, गारांचा मारा सुरू झाला. उजाडल्यानंतर शेताकडे पाहिले तर द्राक्षांचा चिखल झाला होता. डोकेसुन्न झाले.. अधिकारी, पुढारी येत आहेत, भेटी देत आहेत. नुकसानभरपाई मिळणार किती? मुलांचे शिक्षण करायचे कसे? प्रश्न सतावत आहेत..
निसर्गानंच आत्महत्या करायला लावली..
नाशिक/अनिकेत साठे
दोन वर्षांचा मनोज आणि चवथीत शिकणारी त्याची बहीण दामिनी, तीन दिवसांपासून वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. तीन दिवसांपूर्वी ते जगातून कायमचे निघून गेले. चिमुरडय़ांची आई कविता आणि आठवीतली मोठी बहीण नेहा, दोघांनाच आता या भयाण वास्तवाची जाणीव झाली आहे. ते आता कधीच परत येणार नाहीत, हे त्यांनी स्वीकारले आहे, पण लहानग्यांची समजूत कशी काढावी ते समजेनासं झालंय. गारपिटीत उद्ध्वस्त झालेलं उभं शेत पाहून नैराश्याने ग्रासलेल्या सतीश पाटील नावाच्या तरण्या शेतकऱ्यानं आत्महत्या करून मरणाला कवटाळलं आणि एक हसतंखेळतं घर उजाड उजाड झालं..
धुळे जिल्ह्य़ातील कापडणे गावात चार बिघा जमिनीच्या आधारे कसंबसं जगणारं हे कुटुंब गारपिटीने पार उद्ध्वस्त झालंय. घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे दोन मुली व एका मुलाचा सांभाळ तरी कसा करणार, या चिंतेने ती आई पुरती हबकून गेली आहे. शासनाकडून तरी काय अपेक्षा करणार, हा निराश प्रश्न त्यांनी केला आणि त्यांच्या डोळ्यांसमोर दाटलेला अंधार सभोवार पसरला. सहाशे रुपये भाडय़ाच्या मातीच्या घराचं छप्पर आता कसं टिकवायचं, मुलाबाळांचं संगोपन कसं करायचं, अशी चिंता त्यांच्या उदासवाण्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
बहिणीच्या लग्नासाठी गावातील राहते घर विकून हे कुटुंब भाडय़ाच्या घरात राहतंय. शेतमालास भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर काही केल्या कमी झाला नाही. त्यामुळे ६० गुंठे जमीनही विकली. तरीही परिस्थितीत बदल झाला नाही. बँक, सहकारी सोसायटी यांचे थकीत कर्ज आणि वीज देयक या सर्वाची जवळपास सव्वा ते दीड लाख रुपयांची देणी आता सतीश पाटील यांच्या पत्नीच्या शिरावर आहेत.
दोन मुली शाळेत शिकतायत, पण आता रोजचा खर्च व घरभाडे याचीच भ्रांत असल्याने मुलींचे पुढील शिक्षण होईल याची कोणती शाश्वती नाही. मनोजला तर आई आणि नातेवाईक सारखे का रडतात हेदेखील कळत नाहीये.. नेहाचं वडिलांशी खूपच जिव्हाळ्याचं नातं होतं. शेतीतील अडचणींविषयी त्यांनी घरात कधीच काही सांगितलं नाही. आता तर काहीही न सांगताच आम्हाला एकटे सोडून ते निघून गेले, असं म्हणत तिनं टाहो फोडला आणि ते घरही अश्रूंनी भिजून गेलं..
घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे दोन मुली व एका मुलाचा सांभाळ तरी कसा करणार, या चिंतेने ती आई पुरती हबकून गेली आहे. शासनाकडून तरी काय अपेक्षा करणार, हा निराश प्रश्न त्यांनी केला आणि त्यांच्या डोळ्यांसमोर दाटलेला अंधार सभोवार पसरला.
१ हजारो पोपट दगावले..
विदर्भात वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड परिसरात झालेल्या गारपिटीचा जोरदार तडाखा जंगलांतील झाडांवर मुक्तपणे बागडणाऱ्या हजारो पोपटांना बसला.. गारांचा मारा बसल्याने जवळपास एक हजार पोपटांचा एक थवाच मृतावस्थेत सापडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वर्धा शहरातील एमगिरीमध्येही शेकडो पोपट जखमी झाले, तर काहींचा अंत झाला. रिसोड भागातील अनेक जनावरेही गारपिटीच्या तडाख्याने मृत्युमुखी पडली. उघडय़ावर बांधलेल्या जनावरांच्या अंगावर गारांच्या तडाख्याने चट्टे उठले असून, गारठून बसलेल्या जनावरांना आता उठून चालणेही अवघड झाल्याचे सांगण्यात येते..
२ ’नागपूर विभागात ३४ तालुक्यांतील २ हजार ४४८ गावांतील २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी १ लाख २५ हजार ६९७ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले.
*सर्वाधिक नुकसान नागपूर जिल्ह्य़ात १ लाख ३८ हजार ७४३ हेक्टर झाले असून यातील १ लाख ६ हजार ५४ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले.*वर्धा जिल्ह्य़ात २२ हजार १२८ हेक्टर, गोंदिया ७ हजार १३० हेक्टर, भंडारा जिल्हा ४ हजार ६८२ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात
१११३ हेक्टरवर पीकहानी झाली.
*जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल केंद्र शासनाला पाठविला आहे. केंद्रीय पथकाने नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील निवडक गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली. या पथकाने अहवाल दिल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर व्हायला किमान दोन महिने लागणार आहेत.