‘अब्दुल्ला पिता-पुत्र आणि काश्मीर’ हा प्रतिभा रानडे यांचा लेख ९ एप्रिलच्या रविवार विशेषमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातील काही मुद्दय़ांचा प्रतिवाद करणारा ‘काश्मीर सात टक्क्यांवर आला कसा?’ हा प्रकाश बाळ यांचा लेख १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला होता. बाळ यांनी त्या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना दिलेले हे उत्तर..
‘लोकसत्ता’च्या ९ एप्रिलच्या अंकात ‘अब्दुल्ला पिता-पुत्र आणि काश्मीर’ हा फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावरची प्रतिक्रिया म्हणून माझा छोटा लेख प्रसिद्ध झला होता. माझ्या लेखातील काही मुद्दय़ांचा प्रतिवाद करणरा प्रकाश बाळ यांचा दीर्घ लेख १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला; परंतु मी दिलेल्या अब्दुल्लांच्या वक्तव्यांचा प्रतिवाद न करता त्यांनी स्वत:चाच वाद मांडला आहे. लेखनात, ‘एकीकडे पराकोटीचा भाबडेपणा आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून किती एकांगी विचार आणि प्रचारही केला जात आहे, त्याचं स्पष्ट प्रतिबिंब यांच्या लेखात पडलं आहे,’ असं म्हटलं आहे. त्यानंतर सरदार पटेल यांनी नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेल्यानंतर ‘अब जवाहर रोएगा’ असं म्हटलं होतं, असा उल्लेख मी केला होता. त्याला बाळ यांनी, सरदार पटेल इतकं पोरकट स्वरूपाचं विधान करतील ही गोष्ट अशक्यप्राय आहे असंही म्हटलं आहे.
पुस्तक लिहिताना कोणत्या मजकुराचे संदर्भ कोणत्या पुस्तकांमधून घेतले आहेत हे सांगण्यासाठी त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव वगैरे पूर्ण माहिती दिली जाते. ‘फाळणी ते फाळणी’, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’ या माझ्या पुस्तकांत हे पथ्य मी काटेकोरपणे पाळलं आहे; परंतु वृत्तपत्रात लिहिताना ही माहिती देण्याची पद्धत नाही. आता मात्र बाळ यांच्या माहितीसाठी ती येथे देत आहे.
ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये लष्करी घुसखोरी केली, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये शेख अब्दुल्लांनी म्हटलं होतं, ‘पाकिस्तान काश्मीरमध्येच आपली कबर खोदणार आहे’. ही मुलाखत ५ नोव्हेंबर १९४७ रोजी ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रात आली होती. १९४९ मध्ये काश्मीरप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारताचे तत्कालीन आयसीएस अधिकारी गुंडेदी यांनी शेख यांना एक उपाय सुचविला होता, त्यावर शेख अब्दुल्ला म्हणाले होते, ‘काश्मीर फार छोटं, गरीब आहे. पाकिस्तान आम्हाला गिळूनच टाकेल. आताच पाकिस्तानने आम्हाला चांगलाच धडा शिकवलाय. आत्ताचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला असला तरी पाकिस्तान असे प्रयत्न पुन्हा पुन्हा करेलच.’ हा संदर्भ एम. जे. अकबर यांच्या, ‘दि सीज विदिन : चॅलेंजेस टू ए नेशन्स युनिटी’ या पुस्तकातून मिळाला आहे. शेख अब्दुल्ला यांनी जनरल अयुबखान यांचे अत्यंत विश्वासू, त्यांच्या सरकारातील माहिती प्रसारण खात्याचे सेक्रेटरी, अल्ताफ हुसेन यांना भेटून, ‘तुम्ही काश्मीरवर हल्ला करा, माझी काश्मीरबाहेर राहण्याची सोय करा, मी बाहेरून काश्मिरींना उचकावेन,’ असं सांगितलं होतं. तसेच, शेख अब्दुल्ला यांनी चीनचे तत्कालीन पंतप्रधान चौ एन लाय यांना भेटून बोलणी केली होती, तीदेखील भारत सरकारने त्याबाबतीत इशारा दिला होता, वगैरे माहिती एम. जे. अकबर यांच्या पुस्तकातून मिळाली. अल्ताफ हुसेन यांच्या पुस्तकातूनच, अकबर यांना शेख अब्दुल्लांनी पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला करावा वगैरे संदर्भ मिळाले होते.
सरदार पटेल यांचं ‘अब जवाहर रोएगा’ हे प्रकाश बाळ यांना पोरकट वाटलेलं विधान सरदारांनीच केलं होतं. ही माहिती, सरदारांची कन्या मणीबेन पटेल यांच्या ‘इनसाइड स्टोरी ऑफ सरदार पटेल : दि डायरी ऑफ मणीबेन पटेल’ या पुस्तकातून मिळते. गांधीजींचा खून झाला त्याआधी काही वेळ सरदार पटेल गांधीजींशी बोलत बसले होते, तेव्हा सरदार गांधीजींना काय काय म्हणाले होते हे वाचून तर कोणालाही धक्काच बसेल. मणीबेन या सतत सावलीसारख्या सरदार पटेलांबरोबर असत. त्यांनी अगदी सविस्तरपणे लिहिलं आहे. मणीबेन या अत्यंत जबाबदार, प्रामाणिक व्यक्ती होत्या, असं व्हर्गिस कुरिअन यांनी त्यांच्या ‘आय टू हॅड ए ड्रीम’ या पुस्तकात म्हटलं आहे. अमूल दुधाचे पितामह व्हर्गिस कुरिअनसारखी व्यक्ती जेव्हा असं म्हणते तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. त्यावरून मणीबेन यांच्या लेखनावर विश्वास ठेवायलाही हरकत नसावी.
काश्मिरींना पाकिस्तानातच सामील व्हायचं होतं असं बाळ म्हणतात, तर मग पाकिस्तानने ऑक्टोबर १९४७ मध्ये काश्मिरात घुसखोरी केली होती तेव्हा काश्मिरींनी त्यांचं स्वागत का नाही केलं? त्यांना विरोधच का केला? हा प्रश्न पाकिस्तानातील सरहद्द प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर कनिंगहॅम यांनी त्यांच्या डायरीत विचारलेला आहे. हा संदर्भ एच. एन. पंडित यांच्या फ्रॅॅगमेंट्स ऑफ हिस्ट्री : इंडियाज फ्रीडम मूव्हमेंट अॅण्ड आफ्टर’ या पुस्तकात मिळतो. एवढंच नव्हे, तर काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांनी भारतात विलीनीकरणाबाबत सह्य़ा केल्यावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला मागे रेटत नेल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, रफी अहमद किडवाई, अच्युतराव पटवर्धन हे श्रीनगरला गेले, तेव्हा फार मोठय़ा संख्येने तेथील लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं; ते का मग?
२००३ साली ‘पाकिस्तान-इंडिया फ्रेंडशिप, फोरम फॉर पीस अॅण्ड डेमोक्रसी’ या संघटनेची कॉन्फरन्स कराचीला झाली होती. त्या वेळी माझ्या मित्रमंडळींसोबत कराचीला जाण्याची संधी मला मिळाली होती. लाहोरहून १२ डिसेंबरला रेल्वेने कराचीला जाताना दोन्ही बाजूंच्या काश्मिरींशी बोलण्याची संधी मी घेतलीच. श्रीनगरचे शाह मीर हे जम्मू-काश्मीर स्टेट वेल्फेअर इन्स्टिटय़ूटचे कार्यकर्ता, आश्रयदाते, दुसरे हुंजूर हे अॅडव्होकेट. दोघांनीही स्पष्टपणाने सांगितलं की, पिढय़ान्पिढय़ा ते हिंदूंबरोबर राहत आहेत. दोन्ही समाजांत मैत्रीपूर्णच वातावरण होतं. त्यांना भारतामध्येच राहायचं आहे, परंतु केंद्र सरकार आमच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करतं, त्यामुळेच वातावरण बिघडतं. हुंजूर यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की, ‘फारुख अब्दुल्ला केंद्रातील काँग्रेस सरकारच्या आशीर्वादानेच सत्तेवर आले, तेच आम्हाला नको होते. तेव्हापासून काश्मीरमधली परिस्थिती बिघडत चालली. त्याचा फायदा पाकिस्तानने घेऊन दहशतवाद्यांच्या कारवाया चालू केल्या. आमच्या लोकांना ‘इस्लाम’, ‘जिहाद’च्या नावाने भडकवायला सुरुवात केली. फारुख मुख्यमंत्री असतानाच एकदा मध्यरात्रीपासून रस्त्यावरून, चौकाचौकातून, मशिदींवरून लाऊडस्पीकर्सवरून पंडितांना धमक्या द्यायला सुरुवात केली की, मुसलमान व्हा नाही तर हिंदुस्थानात निघून जा. जाताना आपल्या बायका-मुलींना इथेच ठेवून जा. नाही तर इथेच राहिलात तर तुम्हाला मारून टाकू. काही तासांतच पंडितांच्या घरांची लुटालूट, जाळपोळदेखील सुरू झाली. यापाठोपाठच सात लाख काश्मिरी पंडितांना आपली घरं, व्यवसाय सोडून, बायका-मुलांसह काश्मीर सोडून जावं लागलं. श्रीनगरमधील हिंदू डॉक्टर, न्यायाधीश, वकील, सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे खून होऊ लागले. हा हिंसाचार थांबवण्याचे ठोस प्रयत्न फारुख याने केलेच नाहीत. फक्त अतिरेक्यांनी आपल्या कारवाया थांबवाव्यात असे तोंडी आवाहन करीत राहिले. आपल्या मैत्रिणींसोबत मोटारसायकलवरून श्रीनगरच्या रस्त्यावरून फेऱ्या मारीत होता. आम्ही काश्मिरी त्याला ‘वझीर ए डिस्को’ म्हणायचो, त्याचंही त्याला कौतुकच वाटायचं! नंतर मग केंद्र सरकार आणि फारुखचं बिनसलं, त्याला मुख्यमंत्रिपदावरून दूर केल्यावर, फारुख इंग्लंडला निघून गेला. काश्मीरची फिकीरच नव्हती त्याला. वाजपेयी यांच्या राजवटीत भारतीय जनता पार्टीशी समझोता करून फारुख परत आला. त्याचा मुलगा ओमर याला वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून जागा मिळाली,’ शाह मीर आणि हुंजूर अत्यंत तळमळीनं बोलत होते.
पलीकडच्याच जागेवर ‘आझाद काश्मीर’चे मुनीर चौधरी होते. त्यांनी मग आमच्या चर्चेत भाग घेतला. मुनीर हेदेखील श्रीनगरजवळच्या राजौरी गावातले. बांगलादेश झाल्यानंतर ते आझाद काश्मीरमध्ये गेले. लहान वयापासूनच ते झुल्फीकार अली भुट्टोचे चाहते. आझाद काश्मीरमध्ये गेल्यावर मीरपूर येथून तेथील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष म्हणून काम करू लागले. भुट्टोंच्या विश्वासातला माणूस बनले. हे सगळं त्यांनीच सांगितले. त्यांचं म्हणणं की, ‘आम्ही खऱ्या अर्थाने आझाद आहोत. आमचे स्वत:चे सुप्रीम कोर्ट आहे. आमचा स्वत:चाच गव्हर्नर आहे. तुमचा गव्हर्नर मात्र विदेशी असतो.’ हे त्यांनी शाह मीर, हुंजूर यांना उद्देशून म्हटलं होतं. कारण जम्मू-काश्मीरचा गव्हर्नर केंद्र सरकार नेमतं. त्यावर मात्र मध्येच मी मुनीर यांना सांगितलं, की आमच्या महाराष्ट्राचे गव्हर्नरदेखील फॉरिनरच. उत्तर प्रदेशचे एक मुसलमान राजकीय नेते! त्यावर हुंजूर यांनीच मुनीरना विचारलं, ‘‘तुम्हाला पाकिस्तानच्या पार्लमेंटसाठीच्या निवडणुकीत उभे राहता येते का? तुमच्यापैकी कुणाला पाकिस्तान सरकारात मंत्रिपद वगैरे मिळते का? आम्हाला ते मिळते.’’ मुनीर गप्पच बसले. नंतर पडेल आवाजात ते म्हणाले, ‘‘१९८६ साली लंडनमध्ये काश्मीर कॉन्फरन्स भरली होती तेव्हा जम्मू-काश्मीरचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. तिथे पाकिस्तानने काही हिंदूंना भरपूर पैसे-धमक्या देऊन पाठवलं होतं. ते पाकिस्तानचीच बाजू मांडत होते. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं होतं, पण त्यांच्याशी बोलू देत नव्हते. १९७१ मध्ये आझाद काश्मिरात आलो, तर आता आम्हाला इंडियातील लोकांशी बोलायची परवानगी देत नाहीत, मनाईच आहे.’’ अखेरीस आझाद काश्मीरमधल्या मुनीर यांचं दु:ख बाहेर आलंच. कराचीहून लाहोरला येताना रेल्वेमध्येच निवृत्त मेजर अस्लम यांची गाठ पडली. भरपूर गप्पा झाल्या. मी त्यांना खूप प्रश्न विचारीत होते. माझ्या शेजारीच बसलेल्या माझ्या पत्रकार मैत्रिणी मला सुचवीत होत्या की, मी ‘असं’ बोलूच नये. परंतु निवृत्त असला तरी पाकिस्तानी मेजरशी गप्पा मारण्याची संधी पुन्हा कधी मिळणार, म्हणून मी चर्चा चालूच ठेवली होती. बोलता बोलता मेजर अस्लम म्हणाले की, आता तुमचे अडवाणी कराचीला येताहेत. ते मूळचे कराचीचेच, तर आमचे जनरल मुशर्रफ दिल्लीचे. ते दोघे भेटले की आपल्यात समझोता होईलच. त्यावर मी त्यांना विचारलं, ‘‘मागे आमचे वाजपेयी इथे आले होते, तुमच्या नवाझ शरीफशी समझोता झालाच होता. अमृतसर-लाहोर रेल्वे चालूही झाली. पण पाठोपाठच तुमच्या याच मुशर्रफ यांनी आमच्यावर कारगिल युद्ध लादलं होतं. या वेळीदेखील मुशर्रफ पुन्हा एकदा कारगिल युद्ध करणार नाहीत याची खात्री देता का तुम्ही?’’ यावर मेजर अस्लम, कसंबसं हसून म्हणाले, ‘‘आप बहोत डिफिकल्ट क्वेशन्स पूछती है!’’
हे सगळं सविस्तर देण्याचं कारण काश्मीर समस्येच्या मुळाशी आहे भारत-पाकिस्तानचे संबंध. काश्मीरमधल्या पकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना सुरुवात केली ती जनरल अयुबखान यांनीच. अल्ताफ गौहर यांनी त्यांच्या ‘‘अयुबखान : पाकिस्तान फर्स्ट मिलिटरी रुलर’ या पुस्तकात म्हटलं आहे, की नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचं, काश्मीरचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत, शिवाय शेख अब्दुल्ला आमच्या बाजूचे आहेतच. म्हणून अयुबखान यांनी ‘काश्मीर सेल’ची स्थापना केली आणि जम्मू-काश्मिरात दहशतवादी पाठवण्याची तयारी म्हणून आझाद काश्मीरमध्येच कॅम्प्स तयार केले. तिथे पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवादी तयार करण्याचं कामदेखील सुरू झालंच. १९६५ साली आयुबखाननेच लादलेल्या युद्धात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताच्या कचखाऊपणामुळे ताश्कंद करारावर शास्त्रीजींना सही करावी लागली होती. याच कचखाऊपणामुळे इंदिरा गांधींनी भुट्टोंशी सिमला करार केला होता. त्यानुसार दोन्ही बाजूंच्या काश्मीरमधली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला मान्यता दिली जाईल. त्यामुळे काश्मीर समस्याच सुटेल. याला पाकिस्तान, भारताने होकार देणं ही गोष्ट दोन्ही देशांवर बंधनकारक होणार होती. त्याला भारताने संमती दिली; परंतु भुट्टोंना भीती होती की, त्यामुळे पाकिस्तानात त्यांना प्रचंड विरोध पत्करावा लागला असता, म्हणून करारामधील हे कलम गुप्त ठेवावं या भुट्टोंच्या आग्रहाला इंदिरा गांधींनी संमती दिली. काश्मीर समस्या सुटलीच नाही. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांत बोलणी होतात तेव्हा ‘आम्ही सिमला करार मानतच नाही’ हे उत्तर भारताला ऐकावं लागतं.
काश्मीर समस्येच्या मुळाशी आहे ती पाकिस्तानातील लष्करशाही आणि कट्टरवादी जिहादी संघटना. मानवतावादी, शांतताप्रिय, सेक्युलर ही आपली जगभराची प्रतिमा जपण्याच्या भरात, पाकिस्तानबद्दलचं ठाम धोरण ठरविण्यात कचखाऊ भारत गोंधळलेलाच.
पहिले पंतप्रधान नेहरूंपासून आजपर्यंत तेच दिसतं आहे. सामाजिक, वैयक्तिक जीवनातील वैचारिक, भावनिक गोंधळलेपणा, असंगतपणा यांचं प्रतिबिंब जेव्हा साहित्यात पडतं तेव्हा ते साहित्य समृद्ध होत असतं; परंतु त्याचं प्रतिबिंब जेव्हा राजकारणात, परराष्ट्र धोरणात पडतं तेव्हा ते देशाला फार मोठं नुकसानकारक ठरतं. इथे मला डॉ. आंबेडकरांची आठवण येते. त्यांची अत्यंत महत्त्वाची अशी दहा विधानं आहेत, त्यांपैकी एकदा ते म्हणतात, ‘२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारत एक स्वतंत्र देश बनेल. परंतु भारताच्या स्वातंत्र्याचे काय?’ अखेरीस आंबेडकर म्हणतात, ‘‘जात-पात-पंथ हे भारताचे जुने शत्रू तर सोबतीला आहेतच, त्यात नवी भर पडणार आहे ती व्यामिश्र राजकीय पक्षांची आणि त्यांच्या परस्परविरोधी विचारधारांची. भारतीयांना या विचारधारांना देशहितासमोर गौण ठरवणं जमेल? मला नाही ते सांगता येत. परंतु एक गोष्ट मला स्पष्ट दिसते, की राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमिका देशहितापेक्षा मोठय़ा मानल्या, तर आमचं स्वातंत्र्य नक्की धोक्यात येईल..’’ डॉ. आंबेडकरांची ही दहा विधानं गुगलवरपाहायला मिळतात.
– प्रतिभा रानडे