|| प्रदीप आपटे

पुरातत्त्व विभागाचा प्रमुख होण्याआधीच जेम्स बर्गेसने प्राच्यविद्येच्या प्रांतातील काम सुरू केले होते. विविध ‘एशियाटिक सोसायट्यां’तील ज्ञानाचे आदानप्रदान आणि पाश्चात्त्यांसह पौर्वात्य विद्वानांच्याही लिखाणाला वाव देणारे ‘दि इंडियन अँटिक्वेरी’ हे नियतकालिक या बर्गेसचेच…

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन

अलेक्झांडर कनिंगहॅम निवृत्त झाला. त्याची धुरा जेम्स बर्गेसकडे आली. जेम्स बर्गेस हा कनिंगहॅमचा सहकारी होता. त्याच्याकडे पश्चिम आणि दक्षिण भारताची जबाबदारी होती. पण पुरातत्त्व संशोधनाखेरीज थोडी अधिक ओळख करून घ्यावी असे हे आगळे व्यक्तिमत्त्व आहे. जेम्स बर्गेस मूळ स्कॉटिश. स्कॉटलंडच्या नावाजलेल्या ग्लासगो विद्यापीठाचा पदवीधर. १८५६ साली कोलकात्यामध्ये सुरू झालेल्या डोवटन महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. पाच वर्षांनी (१८६१) जमशेटजी जिजिभॉय पारसी बेनिव्होलन्ट इन्स्टिट्यूशनच्या शाळेच्या प्राचार्यपदी मुंबईत दाखल झाला. त्याला भारतीय भाषांची गोडी लागली होती. त्यातले वाङ्मय तो आवडीने आणि चौकसपणे वाचत असे. मुंबईतल्या वास्तव्यात घारापुरी आणि कान्हेरी लेणी पाहून तो भारावला. आसपासची सगळी लेणी देवळे असणारी स्थळे तो धुंडाळून भेटी देऊ लागला. त्यावर मोहिनी पडलेले असे आणखी एक स्थळ शत्रुंजय मंदिर. शत्रुंजयतीर्थ हा भावनगर जिल्ह्याामधल्या पालिताना येथे दोन टेकड्यांवर वसलेल्या मंदिरांचा समूह आहे. पर्वतांची उंची २२२१ मीटर आहे. दोन शिखरे नालाच्या आकारात जुळलेली आहेत. त्यावर नऊ मंदिरपुंज आहेत. नेमिनाथ वगळून २४ पैकी २३ तीर्थंकरांनी या संगमरवरी मंदिरतीर्थाला भेट देऊन पावन केले अशी त्यांची ख्याती आहे. शत्रुंजय माहात्म्यानुसार पहिली तीर्थंकर रिषभ यांनी आपले पहिले प्रवचन या पर्वतावर दिले! या मंदिरांच्या वास्तुकलेने बर्गेसला अतोनात भारून टाकले. त्याने त्यावर स्वतंत्र विस्तृत निबंध लिहिला (१८६९). तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. त्यानंतर १८७१ साली त्याने घारापुरी लेण्यांवर असेच पुस्तक प्रकाशित केले. दोन्हीही पुस्तकांमध्ये त्यातील वास्तुशैली अणि रचनेची वैशिष्ट्ये यावर विशेष झोत होता.

बर्गेसचा समकालीन असलेला दुसरा एक जोडीदार म्हणजे जेम्स फग्र्युसन. त्याच्या भावाबरोबर त्याची एक व्यापारी कंपनी होती. त्या व्यापाराच्या उलाढालीकरिता तो भारतात येऊ लागला. नीळ बनविण्याचा त्याचा कारखाना होता. त्याने स्वत:च लिहून ठेवले आहे की या व्यवसायात त्यास चांगली बरकत लाभली. इतकी की, दहा वर्षांनी त्याने आपला व्यवसाय बंद केला आणि परतून लंडनला स्थायिक झाला. त्याला वास्तुरचनेच्या शैली, ठेवण यांमध्ये अपार रस होता. प्राचीन स्थळांचे जतन आणि संधारण यांतही त्याला रुची आणि गती होती. ग्रीक, रोमन, मिस्रा यांसह जगभरच्या वेगवेगळ्या प्रमुख परंपरा आणि शैलींचे तो तुलनात्मक अध्ययन करत असे. त्याचे ‘ट्री अ‍ॅण्ड सर्पंट वर्शिप- ऑर- इलस्ट्रेशन्स ऑफ मायथॉलॉजी अ‍ॅण्ड आर्ट इन इंडिया’ हे पुस्तक १८६८ साली प्रकाशित झाले. हा फग्र्युसन आणि बर्गेस या जोडीने ‘दि केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे. पुरावास्तूंमधली रचना, कोरण्यातील शैली, संकेत, अलंकरण, पाषाण प्रकारांनुसार उद्भवणारे भेदाभेद अशा पैलूंकडे अधिक बारकाईने सौंदर्यदृष्टीने न्याहळण्याचा भर या दोहोंच्या लिखाणामुळे उजळला.

१८६८ ते १८७३ या काळात बर्गेस बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटीचा सचिव होता! बर्गेसच्या पुरातत्त्वी कामगिरीआधी (आणि जोडीनेही) त्याने आणखी एक उपक्रम बव्हंशी स्वखर्चाने आरंभला होता. त्याची थोडी ओळख असायलाच पाहिजे.  ज्याला आज ‘भारतविद्या’ नावाने ओळखले जाते त्याची बहुदर्शी मुहूर्तमेढ त्यामध्ये आढळते. बर्गेसने १८७२ सालापासून एक नियतकालिक सुरू केले. त्याचे मुख्य नाव ‘दि इंडियन अँटिक्वेरी’! भारताच्या प्रागैतिहासाला वाहिलेले हे नियतकालिक. यात कोणत्या प्रकारच्या विषयांवर लेखन आणि चर्चा असणार? जुन्या प्रथेप्रमाणे याही नियतकालिकाचे एक लवलवक उपशीर्षक होते. ‘अ जर्नल ऑफ ओरिएंटल रिसर्च इन आर्किऑलॉजी, हिस्टरी, लिटरेचर, लँग्वेजेस, फोकलोअर, एटसेट्रा’! थोडक्यात प्राच्य संस्कृतीसंबंधी सर्वकाही!

नियतकालिकाचा उद्देश काय हे सांगताना त्याने जे म्हटले होते त्याचा सारांश असा : ‘प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल, पुराकालीन संस्कृतीबद्दल अनेक संशोधक आपापल्या परीने वेगवेगळ्या पैलूंवर अन्वेषण करत आहेत. त्यांच्यामधे परस्परसंवाद तर घडला पाहिजे. परंतु हे संशोधक निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या ठिकाणी विखुरले आहेत. हे नियतकालिक त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणणारे व्यासपीठ असेल. परस्परांचे संशोधन लेख किंवा त्यांचे सारांश यात उपलब्ध होतील. युरोपातील काही संशोधक आपापल्या भाषेत लिहितात. त्यांची इंग्रजीत भाषांतरे आणि सारांश या नियतकालिकातून प्रसिद्ध करण्यात येतील. नियतकालिकाचा आकार अशा संशोधनासाठी लागणाऱ्या सचित्र वर्णनाला साजेसा व पुरेसा असेल.’

पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत या नियतकालिकातील विषयांचा आवाका रेखाटताना बर्गेसने असेही म्हटले आहे की लिखाणांचा आणि विषयांचा व्याप पुरेसा विस्तृत असेल. जेणेकरून साधारण वाचकाला प्राच्य समाजांतल्या चालीरीती, रूढी, कला, मिथ्यकथा, उत्सव, उत्सवी मेजवान्या, पूजाअर्चांचे सोपस्कार यांची जाण मिळावी. ‘पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संशोधकांमध्ये कल्पनांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी’, ही त्याची कळकळ होती. निरनिराळ्या एशियाटिक सोसायटी होत्याच. त्यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या माहितीचा आपसांतही प्रसार व्हावा, हा या नियतकालिकाचा उद्देश!

नियतकालिकाच्या पहिल्याच खंडात अवतरलेले विषयांची नुसती यादी त्याच्या ठेवणीचा ‘लक्षणी नमुना’ आहेत. दगडी स्मारके, उत्तर ओडिशामधील जंगलातील किल्ले, बालासोरमधील सनदी ताम्रपट, ओडिशातील लोककथा, प्रारंभी काळातील बंगाली कवींची कीर्तन आणि प्रार्थनागीते, मगध साम्राज्यामधील चि फा हानने भेट दिलेल्या स्थळांची शाबिती, पुरातन दक्षिण भारतीय मूळाक्षरे, नव्याने गवसलेली प्राचीन नाणी, चित्रे. इ.इ. … या नियतकालिकातील संशोधक लेखकांची वानगीदाखल नावे पाहा (मूळ उपाधी/ वर्णनासह): जे जी ब्युहलर, व्हिस डेव्हिड्स, जेम्स फग्र्युसन, रामकृष्ण गोपाळ भांडारकर (संस्कृत प्राध्यापक एलफिन्स्टन महावियालय), रेव्ह. के. एम. बानर्जी, शंकर पांडुरंग पंडित (डेक्कन कॉलेज पुणे), एच. ब्लोखमन, जॉन बीम्स. अशा दिग्गज संशोधकांच्या लिखाणामुळे हे नियतकालिक चांगलेच दुमदुमले. ते सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनीच प्राच्यविद्या संशोधकांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. परिषदेचा अध्यक्ष होता ‘मॅक्सम्युल्लर’ ऊर्फ ‘मोक्षमुल्लर’. त्याने या नियतकालिकाचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हटले : ‘‘बर्गेसने चालविलेल्या या नियतकालिकामुळे अनेक स्थानिक प्राच्य जाणकारांचे, विद्वानांचे योगदान आपल्याला वाचण्यास मिळते. उदा. सर काशिनाथ त्र्यंबक तेलंग, त्रावणकोर संस्थानचे राजे, बेहरामपूरचे जमीनदार रामदाससेन शेषागिरीशास्त्री… अशांचे लिखाण युरोपीय संशोधक विद्वांनाना या नियतकालिकामुळे सहज लाभते!’’

पुरातत्त्व विभागाची धुरा बोर्गेसने अधिकृतपणे घेण्याआधीच, ‘प्राचीन वास्तू आणि स्थळांची हेळसांड, भेट देणाऱ्या प्रेक्षकांकडून आणि तथाकथित प्रवासी वाटाड्यांकडून होणारी नासधूस, रेल्वेसाठी मोठे खड्डे खोदणारे, वाटा साफ करणारे कंत्राटदार, गुप्तधन आणि नाण्यांच्या शोधात उकराउकरी करणारे भुरटे या सगळ्यांना आळा बसेल अशा बेताने कायदेशीर तरतूद करावी,’ अशा आशयाचा अर्ज रिकेट कार्नाक नावाच्या एका अभियंत्याने केला होता. त्याची वाच्यता बर्गेसने आपल्या नियतकालिकात सविस्तरपणे केली.

हे सर्व संशोधन संपादन करीत असतानाच त्याची अन्य विषयातील रुची जागृत होतीच! मूळ गणिताचा प्राध्यापक! त्या काळी भौतिकशास्त्र अणि गणित अशी फारकत बेताचीच होती. समुद्रसपाटीपासून डोंगर उंची अधिक अचूक मापण्याबदल त्याने प्रयोग केले. त्यावर एक निबंध लिहिला. त्याच्या ‘एरर फंक्शन ऑक डेफिनाइट इंटिग्रल’ या निबंधासाठी रॉयल सोसायटी ऑफ एडिम्बराचे प्रतिष्ठित ‘कीथ पारितोषिक’ मिळाले! त्याने १८९३ सालात रॉयल एशिआटिक सोसायटीच्या नियतकालिकात ‘नोट्स ऑन हिन्दू अ‍ॅस्ट्रोनोमी अ‍ॅण्ड हिस्टरी ऑफ अवर नॉलेज ऑफ इट’ हा निबंध लिहिला होता. दुर्दैवाने या विषयाकडे त्याला लक्ष द्यायला फुरसत मिळाली नसावी.

बर्गेसचे निधन झाल्यावर १९१७ साली त्याला आदरांजली वाहणारा लेख जे. एफ. फ्लीटने लिहिला. ‘इंडियन अँटिक्वेरी’च्या त्याच खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘कास्ट्स इन् इंडिया : देअर मेकॅनिझम्स, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट’ हा न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्र परिसंवादात वाचलेला निबंध प्रकाशित झालेला आढळेल!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

 

Story img Loader