नगर जिल्ह्य़ातील दक्षिण टोकाला असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा गावाला मराठय़ांनी हैदराबादच्या निजामाविरुद्धची लढाई जिंकून इतिहासात मानबिंदू मिळवून दिला त्याच गावात धनदांडग्यांनी नितीन आगे या तरुणाचा प्रेम प्रकरणातून अमानुष खून केला आणि अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली. ही घटना होत असताना शाळेतील कोणी शिक्षक, मुख्याध्यापक किंवा गावकरी मध्ये पडला नाही, हे नितीनचे दुर्दैव. याआधीही मारहाणीची अन्य प्रकरणे या शाळेतच झाल्याचे गावकरी आता दबक्या आवाजात बोलतात. अशाच कारणांवरून काही युवकांना याआधीही बेदम बदडण्यात आले आहे. सोनईजवळ अशाच प्रेम प्रकरणातून तीन सफाई कामगारांना जीवे मारण्यात आले, ही सरंजामी वृत्ती कुठे तरी थांबली पाहिजे.
नगर जिल्हय़ातील ‘खडर्य़ाची लढाई’ हे मराठय़ांच्या इतिहासातील देदीप्यमान पान मानले जाते. खडर्य़ाची लढाई म्हणूनच मराठय़ांचा हा विजय ओळखला जातो. खर्डा म्हटले, की अनेकांना या विजयी लढाईची, मराठय़ांच्या पराक्रमाची आठवण होते. याच खर्डा गावाची आता महाराष्ट्राला वेगळी ओळख झाली आहे, मात्र त्याने महाराष्ट्र भयभीत झाला आहे. तत्कालीन तमाम मराठेशाहींनी एकत्र येऊन त्या वेळी येथेच झालेल्या घनघोर लढाईत हैदराबादच्या निजामाचा खात्मा केला, मराठय़ांचा अशा प्रकारचा हा शेवटचा विजय मानला जातो, म्हणूनच खडर्य़ाच्या लढाईला मराठेशाहीच्या इतिहासात मानाचे पान प्राप्त झाले. मात्र आठ दिवसांपूर्वी या परंपरेला काळिमा फासत गावातील धनदांडग्यांनी कथित प्रेम प्रकरणाच्या संशयावरून दलित युवकाची निर्घृण हत्या केली. ही केवळ हत्याही नाही, क्रौर्याची परिसीमा होती.  
बारावीत शिकणाऱ्या नितीन आगे या दलित समाजातील युवकाच्या निर्घृण हत्येने उभा महाराष्ट्र हादरला आणि द्रवलासुद्धा. राज्यकर्त्यांना उशिरा जाग आली, मात्र आता या प्रकरणातून अनेक प्रश्न पुढे आले आहेत. नितीनची निर्घृण हत्या झाली म्हणून हे प्रकरण उजेडात आले, मात्र या छोटय़ाशा गावात अशाच कारणावरून अनेक जण धनदांडग्यांच्या हल्ल्यांचे बळी ठरले आहेत. विशेष म्हणजे येथील शाळेतच या सरंजामी वृत्तीचे धडे दिले जातात की काय अशी शंका यावी अशीच स्थिती आहे. मागच्या काही महिन्यांतच येथे वेगवेगळय़ा प्रकरणांत सहा ते सात युवकांना बेदम मारहाण झाल्याची माहिती नितीनच्या हत्येच्या निमित्ताने पुढे आली असून त्यातील बरीचशी प्रकरणे शाळेत घडल्याचे सांगितले जाते. शाळेसह अन्य धनदांडग्यांनी एकत्र येऊन ही प्रकरणे पोलीस ठाण्याबाहेरच दडपली. त्यामुळेच त्याची वाच्यता झाली नाही. नितीनची थेट हत्याच झाल्याने हे प्रकरण चव्हाटय़ावर आले आणि ‘लोकसत्ता’ने त्याचा प्रभावी पाठपुरावा केला. नितीनच्या हत्येसंदर्भात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र तेवढय़ावर हा तपास पूर्ण होणार नाही.
भौगोलिकदृष्टय़ा राज्यात सर्वात मोठय़ा असलेल्या नगर जिल्हय़ाच्या दक्षिणेला शेवटचे टोक म्हणूनच खर्डा हे गाव ओळखले जाते. जामखेड तालुक्यात साधारणपणे १५ ते २० हजार लोकसंख्येचे हे गाव. तालुक्याच्या ठिकाणानंतरची मोठी बाजारपेठ म्हणूनही गावाला राजकीयदृष्टय़ा महत्त्व आहे. नगर जिल्हय़ातील हे शेवटचे गाव, त्याला जोडून सोलापूर आणि मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्हय़ांची हद्द. तीन जिल्हय़ांची सरहद्द हीच या गावाची गुन्हेगारीच्या दृष्टीने जमेची बाजू. आसपासच्या टापूत भलेबुरे प्रकार करून हाकेच्या अंतरावर असलेली दुसऱ्या जिल्हय़ाची हद्द गाठली, की गुन्हेगार निश्िंचत होतात. याच कारणामुळे अलीकडच्या काही वर्षांत हा परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणूनही ओळखला जातो. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा गेल्या आठवडय़ात कडेलोट झाला. मराठय़ांच्या त्या अभिमानास्पद पराक्रमाची साक्ष देणारी हीच का ती भूमी असा संशय निर्माण व्हावा असेच काळेकुट्ट पान या गावाने आता लिहिले आहे.
मरणयातना
खर्डा येथील नितीन राजू आगे (वय १७) या दलित समाजातील युवकाची प्रेमसंबंधातून सोमवारी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला आधी गरम सळईने चटके देण्यात आले, गरम सळई गुदद्वारात खुपसण्यात आली, दुसरीकडे बेदम मारहाण सुरूच होती. त्याचे हात-पायही फ्रॅक्चर करण्यात आले. नंतर गळा आवळून त्याचा मृतदेह आडरानात झाडाला टांगून आत्महत्येचा देखावा उभा करण्यात आला अशी तक्रार या युवकाचे आई-वडील व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. खून झाला ही गोष्ट खरी असली तरी नितीनला हत्येआधी मरणयातना देण्यात आल्या हे पोलीस मान्य करत नाहीत. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात गरम सळईचे चटके व अन्य गोष्टींचा उल्लेख नाही असे सांगितले जाते. शिवाय हा ऑनर किलिंगचाही प्रकार नाही. तात्कालिक रागातून घडलेली घटना आहे असा निर्वाळाही त्यांनी देऊन टाकला आहे.
नितीन ज्या शाळेत शिकत होता, त्या खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून शिक्षक, अन्य विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसमोर नितीनला मारहाण करीत या लोकांनी उचलून नेले. आधी शाळेतच मारहाण करण्यात आली. शाळेतील घंटा वाजवण्याच्या लाकडी दांडक्याने त्याला या आवारातच बदडण्यात आले. तेथून धिंड काढल्यासारखेच अन्यत्र मारत नेण्यात आले. हा सगळा प्रकार सुरू असताना शाळेतील कोणी शिक्षक, मुख्याध्यापक किंवा गावकरी मध्ये पडला नाही, हे नितीनचे दुर्दैव. शाळेतील लोकांनी त्याला सोडवले तर नाहीच, मात्र एखाद्या विद्यार्थ्यांला टोळक्याने उचलून नेले हे पोलिसांना कळवण्याची तसदीही त्यांना घ्यावीशी वाटली नाही. तसे झाले असते तर कदाचित नितीनचे प्राण वाचलेही असते.  तेच या शिक्षकांनाही नको होते की काय, हे समजायला मार्ग नाही. एक तर तसेच असणार किंवा त्यांच्यावरही या धनदांडग्यांची दहशत असणार हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र शाळेतील कोणीही ही गोष्ट पोलीस किंवा नितीनच्या कुटुंबीयांना कळवण्याची तसदी घेतलेली नाही. आधीच उल्लेख केलेली मारहाणीची अन्य प्रकरणेही या शाळेतच झाल्याचे गावकरी आता दबक्या आवाजात बोलतात. अशाच कारणांवरून काही युवकांना याआधीही बेदम बदडण्यात आले आहे. नितीनच्या हत्येच्या तपासात त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
प्रेम प्रकरणातून तीन सफाई कामगारांची हत्या
प्रेम प्रकरणातून वरच्या जातीकडून होणारे असे प्रकार नगर जिल्हय़ाला नवीन नाहीत. दीड वर्षांपूर्वी अशाच कारणातून सोनईजवळील गणेशवाडी शिवारात (तालुका नेवासे) तीन सफाई कामगारांना जीव गमवावा लागला. त्यांना मरणही एवढे भयानक आले, की शरीराच्या खांडोळ्या करून शौचालयाच्या सोकपीटमध्ये टाकण्यात आल्या. त्याही आधी दहा वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यात दरोडय़ाच्या उद्देशाने आलेल्या चोरटय़ांनी कोठेवाडी येथे महिलांवर अत्याचार केले, त्यात वयस्कर महिलाही सोडल्या नाहीत. एकीकडे साधुसंतांची भूमी, सहकाराची पंढरी अशी शेखी मिरवताना अशा घटनांनी या परंपरेला काळिमा फासला जातो. याचे राजकीय धुरीणांना किती वैषम्य वाटते हाही संशोधनाचाच भाग ठरावा. याआधीच्या व ताज्या नितीनच्याही हत्येत हाच अनुभव सारे घेत आहेत. अशा घटनांवर आवाज उठवणे दूर राहिले, यातील काही घटनांमध्ये या धनदांडग्या मारेकऱ्यांना पाठीशी घालण्याचाही प्रयत्नही झाला आहे.
अशा घटनांमध्ये जलदगती कोर्ट बसेल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, मात्र या घटनांचे मूळ कशात आहे हे शोधणे गरजेचे आहे. मागासलेपण कसे मोजणार हाच मुख्य प्रश्न आहे. अशा घटनांशी थेट संबंध नाही, मात्र राजकीय क्षेत्रातही हा अनुभव नगरकरांनी अलीकडेच घेतला. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांना तो रुचला नाही, ते स्वाभाविकही असू शकते. मात्र जिल्हय़ातील हे काही पहिले पक्षांतर नाही. विखे पाटील, आमदार कर्डिले, मुरकुटे अशा मातब्बरांनी याआधी हा प्रयोग केला, मात्र अंडी झेलण्याची वेळ केवळ वाकचौरेंवर आली हे लक्षात घेतले पाहिजे.
 दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध नाही, मात्र यातील मानसिकता एकच आहे. दुर्बलतेला लक्ष्य केले जाते. दुर्बल माणसाला उद्ध्वस्त करताना परिणामांची फिकीर केली जात नाही. जातीची बीजे रुजवताना आर्थिक आणि एकूणच सामाजिक विषमता पाहून मुजोरी केली जाते, ही यातील साधी गोष्ट आहे. नितीन त्याचाच बळी ठरला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा