राजकारणापासून स्वतस अलिप्त ठेवणाऱ्या साहित्यिकांची मांदियाळीच सर्वत्र दिसत असतानाच्या काळात कोणत्याही दडपणाखाली न येता आपले राजकीय-सामाजिक विचार व्यक्त करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून यू. आर. अनंतमूर्ती यांचे नाव घ्यावे लागेल. नातेसंबंधांवर होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या परिणामांचा आपल्या साहित्यातून वेध घेणारा, दुखाकडेही लहान मुलाच्या निरागसतेने पाहणारा हा कसदार ‘भारतीय’ लेखक कर्नाटकातील नवोदय साहित्य चळवळीचा ‘सेनापती’ होता.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील मेलिगे गावचा त्यांचा जन्म. जन्मतारीख २१ डिसेंबर १९३२. प्राथमिक शिक्षण दुर्वासपुरातल्या संस्कृत शाळेत. अगदी पारंपरिक पद्धतीने. पुढे ते तीर्थहळ्ळी, म्हैसूर येथे शिकले. म्हैसूर विद्यापीठातून एमएची पदवी संपादन केली. तेथून राष्ट्रकुल शिष्यवृत्ती घेऊन ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. पण खेडय़ातले बालपण आणि संस्कृत शाळेतून झालेले शिक्षण यामुळे अस्सल देशी पंरपरेशी झालेली ‘अंतर्बाह्य़’ ओळख कधीच पुसली गेली नाही. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिगहॅम विद्यापीठातून राजकारण आणि साहित्य या विषयावर डॉक्टरेट मिळविली. यातून घडलेली त्यांची विचारमूर्ती त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहिली. वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांची होणारी मानसिक स्थिती, कर्नाटकातील ब्राह्मण कुटुंबांपुढील आव्हाने, कुटुंब व्यवस्थेतील ताणेबाणे, कुटुंबातील नातेसंबंधांवर झालेले बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे परिणाम, नोकरशहा व राजकारण यांचे संबंध असे अनेक विषय त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी राहिले. सूर्याणा कुदुरे (द ग्रासहॉपर), मोवनी (सायलेंट मॅन), संस्कार, भाव, भारती, पुरा, अवस्थे, बारा (दुष्काळ) या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. विविध भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले.
साहित्य क्षेत्राबरोबरच ते शिक्षण क्षेत्रातही रमले. ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठातील इंग्रजी विभागात रूजू झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, एबरहार्ड कार्ल्स विद्यापीठ, आयोवा विद्यापीठ, टफ्ट्स विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ येथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष (१९९२), साहित्य अकादमीचे अध्यक्ष (१९९३ ) अशी पदेही त्यांनी भूषविली.
साहित्यिक चळवळींप्रमाणेच राजकीय चळवळींमध्येही ते रमले. केवळ वैचारिक पातळीवरच नव्हे, तर प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणात उतरून त्यांनी राजकीय व्यवस्थेचा अनुभव घेतला. लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक त्यांनी लढविली होती. विचाराने ते ‘देशी’ डावे. तरीही कर्नाटकातील दहा शहरांची नावे बदलावीत. परंपरेने आलेली नावे कायम करावीत अशी सूचना करण्यास ते कचरले नाहीत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देशांतर करू अशी घोषणा करून वाद अंगावर घेण्यासही ते बिचकले नाहीत. महाभारतातील उल्लेखांनुसार ब्राह्मण गोमांसभक्षण करीत असत, या त्यांच्या विधानाने असाच मोठा वाद झाला होता. ख्यातनाम साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या ‘आवरण’ या कादंबरीवर त्यांनी सडकून टीका केली. त्यावरून त्यांना स्वतलाही टिकेचे धनी व्हावे लागले. त्या कटू अनुभवामुळे पुढे त्यांनी साहित्यिक कार्यक्रमांत भाग घेणेच बंद करण्याचा निर्णय घेतला. हीच बंडखोर वृत्ती त्यांच्या खासगी जीवनातही दिसली. १९५६ मध्ये त्यांनी विवाह केला तो जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन इश्टर या ख्रिस्ती तरूणीशी. आपल्या पत्नीसह गेली अनेक वर्षे ते बंगळुरूमध्ये राहात होते. पण त्यांचे प्रेम होते म्हैसूरवर. तेथे गेल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक म्हणून माझी सर्व रूपे आठवतात, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. दहा वर्षे बंगळुरूत राहिल्यानंतर तेथे परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती पण ती अपूर्णच राहिली..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा