देशात ऐतिहासिक संदर्भ असलेल्या बहुतेक वास्तुखुणांची वाताहत झालेली असली तरी काही परंपरांचे मात्र शतकानुशतके पालन होताना दिसते. उत्तर महाराष्ट्राचे टोक असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ातील सारंगखेडा येथील वार्षिक जत्रेत भरणारा घोडेबाजार त्यापैकीच एक. पाच शतकांहून अधिक काळ भारतीय उपखंडातील उत्तम प्रतीच्या घोडय़ांची खरेदीविक्री होणारे प्रमुख केंद्र अशी या जत्रेची ओळख आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यंदा फेस्टिव्हलची झालर लावून या पारंपरिक जत्रेची आधुनिक जगाला ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच २७ डिसेंबपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून येथे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यानिमित्ताने या वैशिष्टय़पूर्ण जत्रेचा हा धांडोळा..

एकीकडे शहरीकरणाच्या रेटय़ात ग्रामसंस्कृती आपला चेहरा हरवत असल्याचे दिसून येत असले तरी त्या व्यवस्थेचे ठळक लक्षण असणाऱ्या गावोगावीच्या जत्रा मात्र अजूनही नेहमीच्याच उत्साहाने भरत आहेत. कोणतीही विशेष ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ नसताना वर्षांनुवर्षे ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करणारे बाजार जत्रेच्या निमित्ताने भरत असलेले पाहायला मिळतात. साधारण दिवाळीनंतर सुरू होणारा जत्रांचा हा सिलसिला थेट हनुमान जयंतीपर्यंत सुरू राहतो. आता आधुनिक युगात सगळीकडे सर्व काही मिळण्याची सोय असली तरीही हे पारंपरिक बाजार कालबाह्य़ झालेले नाहीत, हे विशेष. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ातील सारंगखेडा या पूर्वाश्रमीच्या संस्थानी गावात अशीच एक वैशिष्टय़पूर्ण जत्रा दरवर्षी भरते. गावात एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. त्यामुळे दरवर्षी दत्त जयंतीपासून साधारण पुढील १५-२० दिवस तापी नदीकिनारी ही जत्रा भरते. मसाल्याचे पदार्थ, सुकामेवा आणि इतर कोणत्याही जत्रेत आढळणाऱ्या किरकोळ वस्तू येथील जत्रेत मिळतातच, मात्र सारंगखेडय़ाच्या जत्रेचे प्रमुख वैशिष्टय़ ठरतो तो येथील घोडेबाजार. आता हा शब्द निवडणुकीच्या राजकारणाने अगदीच बदनाम केला आहे; पण सारंगखेडय़ाचा हा खऱ्याखुऱ्या अश्वांचा खराखुरा बाजार मात्र आपला आब राखून आहे. घोडे केवळ शर्यतीसाठी वा टांग्यासाठीच असतात असे नाही. ऐट, ऐश्वर्य, सामथ्र्य आणि राजेशाहीचे प्रतीक म्हणून देशात अजूनही घोडे पाळले जातात आणि त्यामुळेच या बाजारालाही वेगळेच ऐश्वर्य लाभले आहे.

म्हणजे अगदी गेल्या वर्षी अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होता. चाऱ्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांनी जनावरे सोडून दिली होती, पण सारंगखेडय़ाच्या जत्रेतील उलाढाल.. तिच्यावर याचा फारसा परिणाम झाला नव्हता. याबाबत कृषी उत्पन्न समितीच्या कार्यालयातून मिळालेली आकडेवारी मोठी बोलकी आहे. गेल्या वर्षी १९४६ घोडे विक्रीसाठी आणण्यात आले होते. त्यापैकी ८७५ घोडय़ांची विक्री झाली. दोन कोटी ७३ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा व्यवहार झाला. यंदा पाऊसपाणी चांगले झाले आहे; पण सध्या सर्वत्र वेगळाच दुष्काळ आहे- चलनाचा. रोकड रकमेची चणचण सर्वाना जाणवत आहे. तरीही घोडेबाजारातील व्यवहार मात्र व्यवस्थित सुरू आहेत. यंदा जत्रेत एकूण दोन हजार घोडे विक्रीसाठी आले आहेत. त्यापैकी २१ डिसेंबपर्यंत ६७७ घोडे विकले गेले. त्यातून १ कोटी ९३ लाख ९७ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली. तेथील शासकीय अधिकारी सांगतात की, जत्रेला अद्याप चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे घोडेबाजारातील उलाढाल सहजपणे अडीच कोटींच्या घरात जाईल. बरे हे झाले घोडय़ांचे ‘शासकीय भाव’. बांधकाम व्यवसायातील व्यवहारांप्रमाणे घोडय़ांचे प्रत्यक्षातले भाव यापेक्षा किती तरी अधिक असतात. उदा. यंदा तीन लाख ११ हजार इतक्या सर्वाधिक किमतीच्या घोडय़ाची विक्री झाल्याचे अधिकृतपणे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रातील एका पूर्वाश्रमीच्या संस्थानिकाने ११ लाख रुपयांना घोडा विकत घेतल्याचे जत्रेत सांगितले गेले. घोडय़ांच्या या बाजारात मोठय़ा प्रमाणात उधारीही चालते. अनेक वर्षांच्या संपर्कामुळे खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांना ओळखत असल्याने या व्यवहारात केवळ शब्दांच्या हवाल्यावर व्यवहार होतात.

प्रमाणीकरणाचा अभाव

घोडय़ांच्या किमतीत मात्र कमालीचा फरक जाणवतो. दहा ते पंधरा हजारांपासून काही लाखांपर्यंत किंमत असलेले घोडे बाजारात असतात. दीड कोटी रुपये किमतीची पद्मा नामक घोडी यंदाच्या जत्रेचे खास आकर्षण आहे. पांढऱ्याशुभ्र रंगाच्या या घोडीची एखाद्या महाराणीप्रमाणे बडदास्त ठेवली जाते. इंदूरमधील दतोदा गावचे बाळकृष्ण चंडेल यांना त्यांच्या पद्मा घोडीसह जत्रेतील ‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये खास आमंत्रित करण्यात आले आहे. राजस्थानमधील पुष्करच्या बाजारात या घोडीसाठी दीड कोटी रुपये मोजण्याची तयारी एका व्यापाऱ्याने दाखवली होती. मात्र नोग्रा काठेवाड जातीची ही घोडी आपण कोणत्याही किमतीला विकणार नाही, असे चंडेल सांगतात. उज्जनजवळील कोठडी गावातील हाकिमसिंग आंजना यांनीही त्यांच्या संग्रही असलेले चेतक, चेतन आणि बादल हे तीन अतिशय रुबाबदार घोडे बाजारात फक्त स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी आणले आहेत. या तिन्ही घोडय़ांनी बाजारात त्यांच्या त्यांच्या गटात रोख पारितोषिके पटकावली आहेत. रंग, अंगावरील केस, पायांची ठेवण, गळ्यातला कंठमणी आदी खुणांद्वारे घोडय़ांची प्रत आणि त्यावरून त्यांची किंमत ठरते.

देखभाल खर्चीक

एका पूर्ण वाढ झालेल्या घोडय़ाला दिवसाकाठी सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी पाच लिटर दूध, सहा किलो देशी चणे, शंभर-दोनशे ग्रॅम मेथी, पाच किलो गहू असा आहार लागतो. त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र माणसे नेमावी लागतात. साधारणपणे प्रत्येक घोडय़ाच्या निगराणीकरिता दिवसाकाठी ८०० ते हजार रुपये खर्च येतो. ‘पद्मा’सारख्या सेलेब्रेटी अश्वांचा खर्च त्यापेक्षा अधिक असतो. त्यांची ने-आण करण्यासाठी खास वातानुकूलित व्हॅन असते. अर्थात गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक विक्रेता घोडय़ांची विशेष काळजी घेताना दिसतो. एक वेळ स्वत: वडापाव, भजी खाऊन दिवस काढतील, पण घोडय़ांना काही कमी पडू देत नाहीत. थोडक्यात घोडे बाळगणे पांढरा हत्ती पाळण्याइतकेच खर्चीक काम आहे. केवळ मालवाहतुकीसाठी वापरले जाणारे लहानखुरे खेचरही जत्रेत मोठय़ा प्रमाणात विकले जातात. साधारण तीन ते चार हजार रुपयांना हे खेचर मिळतात. डोंगराळ भागात तसेच उंचावर मालवाहतूक करण्यासाठी खेचरांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.

खानदानी शौक

भारतात कायद्याने राजेशाही संपुष्टात आली असली तरी संस्थानी मुलकात पूर्वाश्रमीचे राजे अद्याप तो रुबाब कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. अश्वपालन हे राजेशाहीचे प्रमुख लक्षण असल्याने घोडेबाजारात देशभरातील राजघराण्याशी संबंधित मंडळी घोडय़ांची खरेदी करण्यासाठी येतात. सारंगखेडा हे गावही पूर्वाश्रमीचे संस्थानच आहे. या घराण्याचे विद्यमान वंशज जयपालसिंग रावल यांनी २००५ मध्ये या पारंपरिक घोडेबाजारात चेतक फेस्टिव्हल सुरू केला. शेजारीच असलेल्या धुळे तालुक्यातील दोंडाईचा संस्थानचे जयकुमार रावल सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या ऐतिहासिक घोडेबाजाराला फेस्टिव्हलच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. देशात पुष्कर, कच्छचे रण आदी ठिकाणीही घोडेबाजार भरतात. मात्र त्या ठिकाणी स्थानिक जातीचेच घोडे मिळतात. सारंगखेडाचे वैशिष्टय़ हे की, येथील जत्रेत गुजराती, काठेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा सर्व प्रांतांतील विविध जातींचे घोडे विक्रीसाठी असतात. तापी नदीकाठच्या या घोडेबाजाराला पाच शतकांहून अधिक काळाची परंपरा आहे. त्यामुळे येथे देशातील पहिले भव्य अश्व म्युझियम उभारण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्र्यांनी जत्रेत जाहीर कार्यक्रमात केली.

तरच ग्लोबल ग्लॅमर सार्थकी लागेल

सारंगखेडा फेस्टिव्हलनिमित्त सातपुडा डोंगररांगांमधील आदिवासी नृत्यकला सादर करण्यासाठी आले होते. त्यांनी बोचऱ्या थंडीत उघडय़ा देहाने त्यांचे सुप्रसिद्ध होळी नृत्य सादर केले. या दुर्गम प्रदेशातील अनेक गावपाडय़ांपर्यंत जाण्यासाठी अद्याप साधे रस्ते होऊ शकले नाहीत. विजेअभावी येथील पाडे सदैव अंधारात आहेत. जगण्यासाठी प्राथमिकरीत्या आवश्यक असणाऱ्या सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या आशावादाप्रमाणे पर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्या अंगणात विकासाची गंगा आणि प्रगतीचा प्रकाश येणार असेल तरच घोडेबाजाराला देण्यात येत असलेले हे ‘ग्लोबल ग्लॅमर’ सार्थकी ठरले असे म्हणता येईल..

prashant.more@expressindia.com

Story img Loader