श्रुती तांबे
माणसं भितात, भीतीमुळे एकत्र येतात, सत्ता भीतीमुळे टिकतात.. असं का होतं? याचा वेध घेणारं पुस्तक..
मुलं पळवणारी टोळी आली, अशी अफवा अचानक समाजमाध्यमांतून वणव्यासारखी पसरते. आणि आश्चर्य म्हणजे या भीतीच्या विळख्यात नि:शंकपणे अडकलेली माणसं कोणाही परक्या माणसाला बघताक्षणी हाच तो मुलं पळवणारा म्हणून अमानुषपणे काही तासांत सामूहिक उन्मादातून मारून टाकतात. भारतात २७ जणांना याच कारणामुळे खरोखर प्राण गमावावे लागले आहेत. तीच गोष्ट गाय मारल्याच्या अफवेवरून केवळ संशयितांनाच नव्हे तर पोलिसांनादेखील मारून टाकणाऱ्या अनियंत्रित झुंडींची. सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात असहाय वाटणं, विचार किंवा विश्लेषण करणं टाळणं/ सोडून देणं हे हळूहळू होऊ लागतं. याचा पुढचा भाग मात्र आपणही नव्या झुंडींचा भाग होणं हा असतो असं फ्युरेदी हे समाजशास्त्रज्ञ नोंदवतात.
प्रश्न असा आहे, की भीती म्हणजे नेमकं काय आणि ती येते तरी कोठून? परंतु, हा प्रश्नदेखील फारसा पडू नये असा हा काळ आहे. आज भीतीचं साम्राज्य जगभर पसरलंय. त्यामुळे विविध प्रकारच्या गोष्टी किती भीतीदायक आहेत, हे सतत वाचायला, पाहायला मिळतं. एक विलक्षण विरोधाभासाची स्थिती अलीकडे सतत अनुभवाला येते. एकीकडे भीतीवरच्या अगणित उपायांवरची चर्चा सारखी ऐकू येते आणि दुसरीकडे भीतीचं साम्राज्य तर निरंतर वाढताना दिसतं. थोडक्यात, जणू काही भीती आणि सुरक्षितता या दोन टोकांच्या मधोमध मानवी आयुष्य आज हेलकावे घेत आहे, असा आभास सातत्याने निर्माण केला जात आहे. यालाच अनेक समाजशास्त्रज्ञांनी यापूर्वीही ‘भीतीचं सामान्यीकरण’- नॉर्मलायझेशन- असं संबोधलं आहे.
भीतीमुळे माणूस परतंत्र होतो आणि स्थितिशीलही. फ्रँक फ्युरेदी हे आपल्या अभ्यासातून भय या मानवी वृत्तीचा गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळ पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं नावच ‘कल्चर ऑफ फिअर’ (१९९७) असं होतं. दुर्दैवानं फ्युरेदींनी भयाविषयी केलेली अनुमानं खरी ठरताहेत. अलीकडच्या काळात भय हीच समाजाचं नैतिक नियंत्रण करणारी सर्वोच्च शक्ती कशी होत गेली आहे आणि भीतीचा आजचा अनुभव आणि भूतकाळात आपल्याला ज्या प्रकारे भीती वाटत असे याच्यात काय अंतर पडले आहे या दोन सूत्रांभोवती हा संपूर्ण ग्रंथ गुंफलेला आहे.
ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ बाऊमन यांनी भीतीविषयी लिहिताना म्हटलंय, भय सर्वात जास्त भीतीदायक ठरतं जेव्हा ते अतिशय विखुरलेलं-सर्वदूर पसरलेलं असतं, धूसर किंवा अस्पष्ट असतं, सुटं-स्वैर, अधांतरी तरंगत राहिलेलं असतं, त्याचा रोख किंवा कारण अनिश्चित असतं तेव्हा. ते भयाचं सर्वात भयानक रूप असतं. आपण त्याच्या संकटानं भयभीत व्हावं अशा दृश्य रूपात ते असतं. आपल्याला वाटणाऱ्या सर्व प्रकारच्या अनिश्चिततेला दिलेलं नाव म्हणजे ‘भय’. मग या धोक्याविषयीच्या आणि त्याचं नक्की काय करावं याविषयीच्या आपल्या अज्ञानाला भय हे आपण दिलेलं नाव असतं. भीती जणू अशा एका अनियंत्रित, अनाम अमानवी अमूर्त आत्म्यासारख्या तत्त्वाचं रूप घेते, की ती पछाडण्यासाठी कोणीतरी शोधतच असतं. हे सावट एका अनामिक काजळीसारखं पसरत असतं. त्याला काही खरेखुरे आधार असतातही.
वाढती गरिबी, दैन्य, बेकारी; बेजबाबदार, आत्ममग्न सत्ताधीश; नियमावली तुडवणारे अधिकारी, बथ्थड जाणिवांची जनता यामुळे भीतीची व्याप्ती वाढते. परंतु या यंत्रणेच्या बेजबाबदार अंमलबजावणीतल्या त्रुटी आहेत. आणि आधुनिक, लोकशाही यंत्रणा त्यामुळे टाकून देता येणार नाहीत असा समतोल विचार करणं भीतीच्या सर्वव्यापी प्रभावामुळे अशक्य होऊन बसतं. भीतीचं वास्तविक मूल्यमापन थिल्लर, उथळ, कंठाळी स्वरूपाच्या सामाजिक, राजकीय परिवेशात होऊ शकत नाही, हा आपला नेहमीचा अनुभव आहे. परंतु फ्युरेदी यांच्या मते ही भीती आपल्या सामाजिक वास्तवात लस टोचून कृत्रिमपणे पसरवावी तशी पसरवलेली आहे. ही नव्याने उत्पादित केलेली (मॅन्युफॅक्चर्ड) बाब आहे. यालाच विविध अभ्यासकांनी ‘ऑटोमायझेशन ऑफ फिअर’ वा ‘ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ फिअर’ असं संबोधलं आहे. याचा परिणाम काय? तर असहाय आणि म्हणूनच एकीकडे अराजकीय, बेफिकीर असे जमाव वाढत जाणं आणि त्याच वेळी विचारी, परंतु अतिशय सावध-जवळजवळ घाबरट, केवळ तात्पुरता विचार करणाऱ्या अशा व्यक्तीच आदरणीय ठरणं. थोडक्यात मानवी आयुष्याचा दीर्घकालीन, समग्र वाटचालीच्या संदर्भात विचार करणं, मूल्यांकन करणं, दिशादर्शन करणं याऐवजी तुकडय़ातुकडय़ात तात्कालिक राजकीय, आर्थिक फायदे, हितसंबंधांवर आधारित मतप्रदर्शन करणारेच जेव्हा समाजधुरीण ठरतात, तेव्हा मानवी अस्तित्वाचे मूलभूत प्रश्नही तात्कालिक काळज्या, (उदा. रस्ते अपघाततल्या बळींची वाढती संख्या) आणि मलमपट्टय़ांच्या तकलादू तागडीत तोलले जाऊ लागतात. आणि ही मानवजातीच्या भविष्यासंदर्भात तात्त्विकदृष्टय़ा एक मोठी गंभीर बाब आहे.
भीती-संस्कृतीचे घाऊक वितरक
फ्युरेदी यांच्या मते भीतीचा विचार अशा व्यापक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काळाच्या दीर्घ पटावर केल्याखेरीज तिची मुळं आणि परिणामांचा विचार करता येणार नाही. भीतीमुळे व्यक्तींची विचारक्षमता जेव्हा दुबळी होते, तेव्हा कोणत्याही अनिश्चिततेचा, संकटांचा सामना करायला त्या सक्षम राहात नाहीत. कारण कशाची भीती वाटून घ्यायची, भीती कधी आणि कुठे निर्माण होणार, हेदेखील समाजच ठरवतो. भीतीचेही अनेक प्रकार आहेत- काळजी, सतत चिंता, अतार्किक भीती- फोबिया, इत्यादी. परंतु या सर्वामागे असणारं सूत्र आहे, ते अनिश्चितता आणि असुरक्षिततेचं. या पुस्तकातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ‘द क्रिएशन ऑफ द फिअरफुल सब्जेक्ट’ हे प्रकरण. फूकोंप्रमाणेच फ्युरेदीही सत्तेमुळे हिंसेशिवायही विचारक्षमता गोठते, हे नोंदवतात. मात्र फूको यांच्या विश्लेषणात ज्ञानविज्ञानक्षेत्र ते शाळा, तुरुंग सगळीकडे निष्क्रिय व्यक्तींची निर्मिती आणि विचारक्षमता गोठवणे ही आधुनिक समाजाची महत्त्वाची लक्षणं कशी होऊन बसली आहेत, ते दाखवलं आहे. सत्तेचे एक रूप म्हणजे हिंसा आणि तिच्या अप्रत्यक्ष रूपांकडे फूको विशेषत्वाने लक्ष वेधतात. फ्युरेदींचा ताजा अभ्यास हा एका अर्थाने फूको यांच्या विचारसूत्राचा मागोवा घेतो.
वस्तुत भीती हे सत्तेचं रूप आहे आणि फलितही. भीती पसरवणं हे सत्ता टिकवण्यासाठीचं एक अतिशय महत्त्वाचं साधन असतं. शांतपणे, तर्कसंगत पद्धतीनं विचार केल्यास भीतीचं नियंत्रण करता येतं. परंतु सामान्य लोकांनी तर्कशुद्ध विचार करणं हे अनेकांसाठी अडचणीचं आहे. जगभरच्या सत्ताधाऱ्यांसाठी, कारखानदारांसाठी, मतांवर प्रभाव टाकणाऱ्या जाहिरातदार-विपणनतज्ज्ञ यांच्यासारख्यांसाठी प्रभावित अनुयायांचे जमाव फार अत्यावश्यक घटक असल्यामुळे सतत भीती पसरवणं हे आज जगभर फार आवश्यक काम होऊन बसलं आहे. फ्युरेदी या मुद्दय़ांचा वेध माध्यमांची भूमिका या प्रकरणात घेतात. भीतीची एक नवी संस्कृती विकसित करून तिचं जागतिक पातळीवर घाऊक प्रमाणात वितरण होत आहे, असं फ्युरेदींचं प्रतिपादन आहे.
भूक, मृत्यू यांच्याऐवजी..
हजारो वर्षांपूर्वी माणूस अशाश्वतीच्या कच्च्या दोरीवर लटकत जगभर फिरत असे. तेव्हापासून भूक आणि मृत्यू या दोन गोष्टींनी मानवी मन आणि भीती नियंत्रित केली आहे. पुढे देवाची भीतीही त्यात येऊन मिसळली. जीवनमान वाढलं आहे. मृत्यूवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळालं आहे. अशाश्वती कमी झाली आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळं, महापुरासारख्या नैसर्गिक संकटांपासून ते प्रगत तंत्रज्ञानातूनच निर्माण झालेल्या नवनव्या जोखमी, आणि आजच्या आर्थिक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या भयावह शोषणामुळे लाखो लोकांसाठीचं अशाश्वत भविष्य हेही समाजशास्त्रज्ञ सतत दाखवून देत आहेत. जणू अशाश्वतीचं एक वर्तुळ माणसानं आता पूर्ण केलंय. मात्र फ्युरेदी म्हणतात की वास्तविक पाहता आज भूक आणि मृत्यू यावर पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मानवानं नियंत्रण मिळवलेलं असलं तरीही भीती वाढतेच आहे. देवाच्या भीतीची जागा आज भीतीच्या डोलाऱ्याने घेतली आहे. कारण भीतीलाच एक नवं नैतिक अधिष्ठान लाभलं आहे. एवढंच नाही, तर भीतीवरच्या उपायांचा एक मोठा जागतिक उद्योग उभा राहिला आहे. गूगल-विकिपीडियापासून ते वैज्ञानिक नियतकालिकांपर्यंत येणाऱ्या लिखाणाच्या केलेल्या सुव्यवस्थित आशय विश्लेषणावर हा ग्रंथ साधार उभा आहे.
भीतीदायक भविष्याची चर्चा नेहमीच टाइम बॉम्बची प्रतिमा वापरून केली जाते. भविष्य म्हणजे खरंतर आशा. नव्या शक्यतांचा मोठा खुला अवकाश. परंतु आजच्या काळात मात्र भविष्य हाच एक टाइम बॉम्ब आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते. अगदी प्लेग हा रोग पुन्हा जगभर पसरण्याची शक्यता ते लहान मुलांचे किडलेले दात ते बाळाला सांभाळणाऱ्या बाईंपर्यंत ही अतिरंजित टाइम बॉम्ब कहाणी पसरलेली आहे. खरं तर आज जीवनाच्या अनेक पलूंविषयीचं ज्ञान बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे आणि ते वाढीव ज्ञानच भीतीदायक भविष्याचा स्रोत बनलं आहे असं फ्युरेदी म्हणतात. कमी काळात अतिवेगानं झालेल्या प्रचंड बदलांना उद्देशून ऑल्विन टॉफलर त्यांच्या ग्रंथात ‘फ्यूचर शॉक’ हा शब्दप्रयोग करतात. परंतु, फ्युरेदी सार्थपणे असं सिद्धच करतात की, मुळात त्याकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोन नसण्यामुळे हे बदल भीतीदायक वाटावेत इतके प्रचंड वाटतात. सामाजिक समीकरणं समजून घेण्याचा समग्र दृष्टिकोन निर्माण झाला, तर भीती कमी होऊन अर्थ लावण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. असे अर्थ लावू शकणारा समाज त्या बदलांना स्वीकारूही शकतो. अन्यथा नैतिक अनिश्चिततांवर भीतीच्या माध्यमातून तात्पुरते उत्तर मिळवले जाते.
अस्तित्ववादी म्हणतात, त्याप्रमाणे मानवी अस्तित्वात अनिश्चितता राहणारच आहे. अशाश्वती हेच मानवी प्रजातीच्या आयुष्याचं सगळ्यात चिरंतन असं तत्त्व आहे. असं असतानाही अस्तित्ववादी भीती ही अनाम सर्वव्यापी काळजीच्या रूपात दाखवली जात आहे. त्यामुळे भीतीचं एक स्वतंत्र, नवं नीतीशास्त्र जन्माला येत आहे. यावर फ्युरेदींच्या मते उपाय म्हणजे जोवर समाजाला अनिश्चिततेकडे बघण्याचा अधिक सकारात्मक पवित्रा सापडत नाही, तोवर भीतीचे अधिकाधिक राजकीयीकरण केले जाईल. भीतीची तथाकथित नैतिक ताकदच भीतीच्या रहस्याची किल्ली आहे. भीतीचं कारण पुढे करून ‘काय करणार’, ‘चलता है’ असं म्हणणारे भयग्रस्तांच्या अनाम फौजांचं उत्पादन करणारे कारखाने चालवले जात आहेत.
‘आज अगणित आणि अकल्पनीय असे धोके आणि जोखमी आहेत’, या संदेशाचा समाजावर अविरत मारा केला जातो. या संदेशाचा जोर जितका वाढतो, तितकीच त्याला समांतर, तितक्याच प्रमाणात निष्क्रियता आणि असहायता निर्माण होते. त्यामुळे लोकांमध्ये शबलित आणि सत्ताहीन असल्याची भावना आणि काळजीची भावना तीव्र होत जाते. याचा एकत्रित परिणाम आपण सतत शारीरिक आणि मानवी अस्तित्वाच्या सुरक्षिततेचे नवनवे प्रकार शोधत राहतो. भीती जन्माला घालणारे मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक स्रोत कोणते, त्यांना बढावा देण्यातली माध्यमांची भूमिका आणि भीतीच्या या कारखान्यांमुळे कोणाला प्रत्यक्ष फायदा होतो? अशा काही मुद्दय़ांचाही फ्युरेदी परामर्श घेतात. हे सर्व असलं तरी मुळात भीतीचे कारखाने कोण निर्माण करतंय, कोण ते वाढवतंय याविषयी फ्युरेदी निर्णायक असं काहीच आपल्या हाती लागू देत नाहीत. भीतीचं अर्थकारण, भीतीचं राजकारण, दहशतीतून सत्ता वाढवणाऱ्या व्यक्ती आणि घटक याविषयी दुर्दैवानं फ्युरेदी सामन्यज्ञानापलीकडचं काही सांगत नाहीत.
फ्युरेदींनी भीतीचं प्रकरण मुळापासून तपशीलवार एकूण सहा प्रकरणं, प्रस्तावना, शेवटी निष्कर्ष यातून उलगडून दाखवलं आहे आणि इतकं संशोधनावर आधारित गंभीर पुस्तक वाचनीयही केलं आहे. संदर्भ बरेचसे तत्कालीन ब्रिटिश असले, तरी भीतीबाबतही आपण प्रगतिपथावर असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी परिचित वाटतील.
हाउ फिअर वर्क्स- कल्चर ऑफ फिअर इन द ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरी
लेखक : फ्रँक फ्युरेदी
प्रकाशक : ब्लूम्स्बरी काँटिनम
पृष्ठे : ३०६, किंमत : ६९९ रुपये