सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) आदित्य एल-१’ हे अंतराळयान आकाशात झेपावले. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजे सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी यातून हाती आलेल्या माहितीचा उपयोग होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरमोहिमांचा इतिहास काय?

मार्च १९६० मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली मोहीम ‘नासा’ आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतली. त्यानंतर १९६५ ते ६९ अशी सलग सहा वर्षे ‘नासा’ने सूर्याकडे अंतराळयाने पाठविली. ६९ वगळता अन्य सर्व मोहिमा यशस्वी ठरल्या. १९७४ साली युरोपने सूर्याच्या अभ्यासात प्रथमच उडी घेतली. त्या वर्षी जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था आणि ‘नासा’ने संयुक्तपणे मोहीम यशस्वी केली. त्यानंतर किमान १५ मोहिमा राबविल्या गेल्या असून त्यातील काही यानांचे काम अद्याप सुरू आहे. यातील बहुतांश मोहिमा या नासाने किंवा नासा आणि युरोपातील अंतराळ संशोधन संस्थांनी संयुक्तरीत्या पार पाडल्या आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये ‘ईएसए’ने स्वबळावर सूर्यमोहीम राबविली. ‘आदित्य’ मोहिमेमुळे भारत हा सूर्याच्या अभ्यासासाठी याने पाठविणाऱ्या मोजक्या देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. एकटय़ाच्या जिवावर संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान घेऊन सूर्यावर स्वारी करणाराही भारत हा अमेरिकेनंतरचा पहिला देश ठरला आहे.

ही मोहीम कशी असेल?

  • पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर आता काही दिवस अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करेल.
  • मंगळयान किंवा चंद्रयानाप्रमाणेच त्याची कक्षा वाढविली जाईल आणि त्यानंतर गोफणीप्रमाणे यान सूर्याच्या दिशेने भिरकावले जाईल.
  • त्यानंतर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने यान सूर्याकडे प्रवास करेल. सुमारे १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यान ‘एल-१’ बिंदूपाशी पोहोचेल. या संपूर्ण प्रक्रियेला १२५ दिवसांचा कालावधी लागेल.
  • एकदा एल-१ जवळ पोहोचल्यानंतर यान या बिंदूभोवती परिभ्रमण करेल. या ठिकाणी गुरुत्वाकर्षणांचा समतोल असल्यामुळे इंधनाचा कमीत कमी वापर होईल.
  • यानावर असलेल्या उपकरणांच्या मदतीने सूर्यावरील वातावरणाची माहिती त्याच क्षणी (रियल टाइम) पृथ्वीवरील नियंत्रणकक्षात पाठविली जाईल. लगोलग त्या माहितीचा अभ्यास करून सौरवादळे, त्यांची तीव्रता, त्याचा पृथ्वीवर होत असलेला परिणाम इत्यादी अभ्यासले जाईल.

काय अभ्यास करणार?

विविध ऊर्जाकण आणि चुंबकीय क्षेत्रांसह जवळजवळ सर्व तरंगलांबींमध्ये सूर्य रेडिएशन उत्सर्जित करतो. पृथ्वीचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र हे एक संरक्षक कवच आहे. ते सूर्याच्या घातक तरंगलांबी विकिरणांना रोखण्याचे काम करते. सूर्याच्या किरणोत्सर्गाचा शोध घेण्यासाठी अवकाशातून सौर अभ्यास केला जातो. या मोहिमेत सूर्याच्या प्रभा मंडळाचे तापमान (कोरोनल हीटिंग), सौर वाऱ्यांचा प्रवेग, सौर वातावरणाची गतिशीलता, तापमानाचा विविधांगी तपशील, सौरप्रभेतील वस्तुमान (कोरोनल मास इजेक्शन) आदींचा अभ्यास समाविष्ट आहे.

निगार शाजी यांच्या पथकाचे यश

  • ‘आदित्य एल १’ मोहिमेच्या संचालिका आहेत निगार शाजी मूळच्या तमिळनाडूतील तेनकासीच्या रहिवासी असलेल्या शाजी यांच्या नेतृत्वाखालील अनेक जणांच्या पथकाच्या कठोर परिश्रमानेच या मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे.
  • ‘इस्रो’मध्ये गेल्या ३५ वर्षांपासून सेवारत असलेल्या शाजी यांनी भारतीय दूर संवेदक (रिमोट सेन्सिंग), संपर्क (कम्युनिकेशन) आणि आंतरग्रहीय उपग्रह मोहिमांमध्ये विविध जबाबदाऱ्या प्रभावीरीत्या पार पाडल्या आहेत. शाजी या १९८७ मध्ये ‘इस्रो’च्या उपग्रह केंद्रात रुजू झाल्या.
  • राष्ट्रीय संसाधन निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी भारतीय दूर संवेदक (रिमोट सेन्सिंग) उपग्रह- ‘रिसोर्स सॅट-२ ए’च्या सहयोगी प्रकल्प संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
  • ‘इमेज कॉम्प्रेशन’, ‘सिस्टम इंजिनईिरग’ आणि अन्य विषयांवर त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी मदुराईच्या कामराज विद्यापीठातून ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन’मध्ये अभियंता पदवी आणि रांचीच्या ‘बीआयटी’मधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्या बंगळूरु येथील ‘इस्रो’च्या ‘सॅटेलाइट टेलिमेट्री सेंटर’च्या प्रमुखही होत्या.
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will the journey of aditya l1 indian space research organization isro aditya l 1 spacecraft ysh