‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि मूल्योदासीन असतो’ जागोजागी उचलूनच धरला आहे, याबद्दल त्यांचे आभार. मानव ‘त्याचे आकलन व सहेतुकता’ यांच्याबाहेर जाऊच शकत नाही, ही मानवाची मर्यादा आहे, मी केलेली शिफारस नव्हे.
मानव ‘निर्दोष’ आहे, असेही माझे अजिबात म्हणणे नाही. त्याने चालवलेले अन्याय व आत्मघात रोखले पाहिजेत हे मी सुरुवातीलाच म्हटले आहे. अशा दुराचाराचे चव्हाण यांनी दिलेले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीत पाण्याचा अपव्ययकारी व घातक वापर, हे उदाहरण मला अगदी मान्य आहे. त्यावर ‘लोंढा-सिंचनावर बंदी आणि ठिबकलाच संधी’ हा लेखही याच मालेत लिहिला आहे.
जीववैविध्य नष्ट करण्याचा, मानवाला अमर्याद अधिकार असायला हवा, असे मी कोठेही म्हटलेले नाही. मात्र वैविध्य हेस्वतोमूल्य नाही. कोणते वैविध्य जपण्याजोगे व का? याचे उत्तर, मानवी उद्दिष्टांचा संदर्भ घेऊनच देता येते. उद्दिष्ट ‘बेलगाम विकास’ हेच असेल असे नाही. त्यात विकासवंचितांचा समावेश, निसर्गसौंदर्य, भूतदया, यज्ञ करून स्वर्गप्राप्ती, वैराग्यातून मोक्षप्राप्ती असे काहीही असू शकते व ते काय असावे हा प्रश्न मूल्यविषयक आहे, वैज्ञानिक नव्हे. जीव हे एकमेकाविरुद्ध लढूनच तगतात हे वैज्ञानिक निरीक्षण आहे. त्यांच्या संघर्षांचे संतुलन स्थिरावते, याचा अर्थ त्यांच्यात पूरकता व सौहार्द नांदत असते, असा होत नाही. सर्व जिवांचे ‘हित’ आपल्याला कल्पितासुद्धा येत नाही.
पोलिओ व देवीच्या जीवाणूंचा र्निवश करणे गर आहे काय? आता आपण मलेरियावर माणसाच्या शरीरात असे औषध देऊन ठेवणार आहोत की एकदा माणसाला चावला की डास स्वतच ‘व्हॅक्सिनेट’ होईल व प्रसारक हे त्याचे कार्य बंद पडेल. संशोधनाची अशी जिगर, केवळ भोगलालसेतून येत नसते.
‘उपयोग हवा पण उपभोग नको’ असे सुटसुटीत सूत्र चव्हाण सुचवतात. मुळात सध्याची ‘ओरबडणारी’ वृत्ती शारीरसुखभोगापायी उद्भवत नसून, अहंकारपोषण, राजकीय महत्त्वाकांक्षा तसेच वर्कोहोलिझमपायी उद्भवते आहे. माणसात पर्यावरणदृष्टय़ा सर्वाधिक हानिकारक असे जे दोन दुर्गुण आहेत, त्यांचा उल्लेख पर्यावरणवादी करीत नाहीत. अण्वस्त्र-युद्धखोरी आणि अमर्याद लोकसंख्यावाढ, हेच ते इतर प्राण्यात नसणारे, दुर्गुण होत.
जिथे ऊर्जा बनवतात तिथले अणुइंधन अतिशय डायल्यूट असते. पण जिथे आपण बॉम्ब बनवतो तिथे त्याची घनता जास्तीत जास्त वाढविली जाते. तिथल्या कामगारांना, नागरिकांना झेलावा लागणारा किरणोत्सर्ग किती जास्त असेल, याचा विचार आपल्या मनाला स्पर्शूनही जात नाही. कारण मुळात हे काम कुठे आणि किती चालते हे गुपित असते. अपघात तिथेही होऊ शकतो. तो झालाच तर चेर्नोबिल किंवा फुकुशिमा नव्हे, तर ‘हिरोशिमा’ होईल. तरीही आपण निवडकपणे ऊर्जेलाच विरोध करतो!
अमर्याद लोकसंख्यावाढ करू शकणारा मानव हा एकच प्राणी आहे. गरजांची गुणात्मक वाढ रोखण्यापेक्षा ‘गरजूंची संख्यात्मक वाढ रोखणे’ हे पर्यावरणदृष्टय़ाही निकडीचे आहे. पिण्याचे पाणी ही तर चंगळ नव्हे, पण लोकसंख्यावाढीमुळे पर्यावरणावरील पहिला कडेलोटी ताण (क्रायसिस) येणार आहे, तो पिण्याच्या पाण्याबाबत.
पातळ प्लॅस्टिक जनावरांच्या आतडय़ात अडकते. प्लॅस्टिक कुठेही टाकणे ही बेशिस्त आहेच. पण जनावरांना कुठेही व फुकटात चरायला सोडण्यात जे अतिक्रमण आहे, त्याचा उल्लेख कोणी पर्यावरणवादी चुकूनही करत नाहीत. जागतिक तापमानवाढीचा दंभस्फोट करणाऱ्या ‘नायगेल लॉसन’ यांच्या पुस्तकाचे खंडन न करता अनुल्लेखच चालू आहे. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यापकी संशोधनपद्धतीचा चोखपणा कोणात आहे, हे तपासायला कोणी तयार नाही.
जबाबदार पर्यावरणवाद उभा करणे हाच बेजबाबदार पर्यावरणवादावर खरा उपाय आहे.
या वादावर येथे पडदा पाडण्यात येत आहे – संपादक
मानवकेंद्री म्हणजे मदोन्मत्त नव्हे
‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि मूल्योदासीन असतो’ जागोजागी उचलूनच धरला आहे,
First published on: 31-10-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human center means not intoxicated