मनोज बोरगावकर
चित्रकार आणि कवी इंद्रजित सिंग तथा इमरोज हे शुक्रवारी निवर्तले. इमरोज आणि लेखिका अमृता प्रीतम हे एक अजरामर प्रेमगीत आहे. ‘वह यही हैं, घर पर ही हैं, कहीं नहीं गयी..’ अमृता प्रीतम यांच्या निधनानंतरची इमरोज यांची ही भावना. इमरोज यांना वाहिलेली ही शब्दांजली.
इमरोज यांच्यासारखी माणसं जेव्हा या जगातून जातात ना तेव्हा प्रेम या शब्दातूनच फार मोठं काही तरी वजा झालेलं असतं कधीही भरून न निघणारं असंच.
फार थोडयांच्या नशिबी जिवंतपणी आख्यायिका बनून राहण्याचं भाग्य येतं. इमरोज-अमृता-साहीर ही अशीच जितीजागती आख्यायिका आहे. ही एक अशी आख्यायिका आहे की ऐकमेकांसोबत जोडले गेल्यामुळे त्या प्रत्येकाचा रुतबाही वाढत जातो..रूढ अर्थानं पाहिलं तर किती अजीबोगरीब आहे ना हे सगळं.
इमरोजजी चित्रकार म्हणून काळाच्या किती तरी आधी जन्माला आले होते. त्यांच्यातल्या चित्रकाराविषयी एक चकार शब्द काढण्याचा माझा वकुब नाही. कारण एका रेषेचं स्त्रीचं चित्र काढण्यासाठी मला वीस वर्षे लागल्याचं ते म्हणाले होते..पण इमरोजजींची आपल्या कलेविषयी आस्था काय होती हे फक्त आणि फक्त अनुभवण्यासारखं आहे. कलावंतांनं आपलं इमान जपलंच पाहिजे तर आणि तरच येणारी कलाकृती देखील तेवढीच उत्तुंग निर्माण होते. मासल्यादाखल इमरोजजींचा हा किस्सा सांगण्याचा मोह होतो. किमान पोटापाण्याची तरी बेगमी व्हावी म्हणून इमरोजजी एका स्टुडिओमध्ये काम करीत. त्या स्टुडिओचा मालक तिथं नवनव्या बायकांना घेऊन येत असे.. इमरोजजींनी त्या मालकाला एकदोनदा सांगूनही पाहिलं की ही ती जागा नाही इथे कलेची आराधना होते. ही जागा पाक साफ असलीच पाहिजे. मालकांनी त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला.. तर इमरोजनी सरळ नोकरी सोडून पोटापाण्यावरच लाथ मारली.
हेही वाचा: प्रश्न विचारण्याचं धाडस
सज्जाद अमृताचा पाकिस्तानातला मित्र.. तो एकदा अमृताला भेटायला आलेला.. ऑटोवाला त्याला फसवून जास्तीचे पैसे घेऊन जातो. अमृताची चिडचिड होते तेव्हा सज्जाद म्हणतो..‘‘अमृता असू दे तकसीमच्या वेळेस आमच्याकडून भारतीयांवर जे अन्याय अत्याचार झालेत.. त्याचे मी देणं लागतो’’ किती खोल उतरणारे आहे ना हे! हाच सज्जाद जेव्हा पहिल्यांदा इमरोजना भेटतो, भारावून जातो आणि अमृताला लिहितो, ‘‘आज इमीच्या नजरेत मी तुला पाहिलं..आणि काय सांगू जगाच्या इतिहासात कधी घडलं नाही ते आज घडतंय एक रकीब दुसऱ्या रकीबला सलाम पाठवतोय! इमरोजच्या दिसण्यामागचे असणे असे अधोरेखित होत जाते.
म्हणूनच इमरोजसारख्या प्रेम या शब्दाला आपली ओळख नव्याने मिळून देणाऱ्याला जाणून घ्यायचे तर सज्जाद, साहीर आणि अमृताच्या शब्दातूनच ते उलगडत जातील.. कारण दंव बिंदूची ऐपत ते ज्या गवतावर पडते ना त्या गवतालाच उमजत असते अन्यथा बाकी ओल म्हणजेच दंव बिंदू या समजात आपण मश्गूल राहतो.’’ अमृता म्हणते, ‘‘या जन्मी इमरोज मला भेटला तो १९५६ साली आणि या पहिल्याच भेटीत एक वेगळीच तडप आणि सुकून असेच काहीसे माझ्या डोक्यात उतरलेलं. इमरोजच्या भेटीनं माझ्या अचेतन मनाच्या दरवाजावर एक दस्तक दिली. आणि मनातून कागदावर ओळी अवतरल्या,
‘‘हयाती अपना द्वार बन्द न करो,
देखो जरा एक बार देखो.माथे
पर किरनें बांधकर ,सूरज फिरसे आया है..’’
आणि हा सूर्य अमृताच्या जगण्यात, लिखाणात ताउम्र प्रकाशत राहिला .
हेही वाचा: मैं तुम्हें फिर (फिर) मिलूँगी..
साहीर यांना हार्ट अटॅक आलेला.. त्यांची अवस्था केविलवाणी झालेली, चालताना जाणारा तोल सांभाळत साहीर अमृताला म्हणतात, ‘‘काही झालेलं नाही. फक्त दिल, फुप्फुस आणि किडनी तेवढी खराब झाली आहे.. बाकी सगळं शाबित आहे!’’
अमृता म्हणते, ‘‘सगळं खर्च करून जे काही बाकी उरतं तोच आयुष्याचा अर्थ असतो.. आयुष्य नाही तर नाही शेवटी अर्थ तरी शिल्लक राहतो ना!’’ असं वाटत राहतं अमृतानं आख्खा इमरोज खर्च करून साहीरविषयीची आपली तपिश बरकरार ठेवली. यातलं विशेष हे की या खर्ची होण्यातही इमरोज यांनी सार्थकच मानलं.
अमृता म्हणते ‘‘माझ्या आणि इमरोजच्या वीस वर्षांच्या मैत्रीत शिवीगाळ तर सोडाच, पण कधी आम्ही एखादा हलका शब्ददेखील एकमेकांसाठी वापरला नाही.. आणि १९७६च्या ‘आरसी’मध्ये छापण्यासाठी बलवंत गार्गी यांचा लेख आला होता..त्यात आमच्या दोघांविषयी अनाप-शनाप लिहिलेलं …मी तो लेख छापायला रोखलं नाही ..पण मी इमरोजला एक लेख लिहून दिलेला ‘कथा इक दोस्ती दे रूख दी’ आणि त्याला सांगितलं कधी गरज पडली तर माझ्या मृत्यूनंतर तू हा छापशील!
हेही वाचा: स्त्रीदु:खाची उत्कट, सर्जक अभिव्यक्ती
तो लेख माझ्या वाचण्यात नाही आला. तो छापून आलाय की नाही हे पण माहीत नाही.. पण अमृता- इमरोज या तमाम कायनातच्या ललाटावर तुमच्या नात्याची उमटलेली पाकिज अक्षरं कोणालाही पुसता येणार नाहीत. तुमच्या नात्याची महिन खुशबू दरवळतच राहील.. कारण वाचकाच्या दृष्टीनं ना इमरोज गेलेत, ना साहीर गेलेत, ना अमृता.. फक्त या काळाच्या पुस्तकातलं एक पान तेवढं पलटलं गेलंय एवढंच.
इमरोज यांनी सांगितलेला एक किस्सा.. अमृताच्या मुलाच्या लग्नात मुलाच्या सासरकडच्यांनी जतवून जतवून सांगितलेलं. की लग्नात इमरोज असणार नाहीत कारण तुमचं नातं समाजमान्य नाही.. अमृता कावरीबावरी झालेली.. पण इमरोजनं तिची समजूत घातली आणि म्हणाले, की तुम्ही लग्न लावून या मी बहूसाठी घर सजवून ठेवेन. आणि ते खरोखरंच त्या दिवशी घर सजवत बसले. केवढे उद्दात देखणं आहे ना हे! आज असं वाटत राहतं वर जिथेही कुठे असतील.. साहीर आणि अमृता इमरोजच्या स्वागतासाठी घर सजवत असतील..
हेही वाचा: वाचायलाच हवीत : मनस्वी जगण्यातून उमटलेला आत्मस्वर!
इमारोजजींना जवळच्या लोकांना वेगवेगळी नावं द्यायला आवडायचं. अमृताजींना ते ‘माजा’ म्हणायचे. रोज पहाटे ते अमृताला चहा करून द्यायचे. त्यांच्या हातचा चहा तिला खूप आवडायचा..आणि चहा देऊन विचारायचे चहा गच्चीवर जाऊन पिशील का आकाशात..? अमृताही हसायची आणि आकाशही. किती स्वच्छ, साफसुथरं नातं ना हे!
इमरोज यांच्या माझ्या प्रचंड आवडत्या ओळी
‘‘गंगा जिस्म धोती है. सोच नहीं
पाप सोच करती है जिस्म नही.’’
जगातलं सगळं सौंदर्य पिऊनही कोणी प्रेमाचा जन्मदिवस साजरा करत असेल.. पण मी मात्र एक कप चहा तिच्या सोबत पिऊन प्रेमाचा जन्मदिवस खूप चांगला साजरा करतो. प्रेम म्हणजे इतरांना इजा करणे नव्हे.. प्रसंगी स्वत:ला इजा करून घेणं, असं मानणारा हा कलावंत काळाच्या पल्याड गेला असेल, पण लोकांच्या काळजाच्या पल्याड मात्र कधीही जाणार नाही. इमरोज, अमृता आणि साहीर यांना वेगळं करणं म्हणजे पाण्यावर अक्षरं उमटण्याइतकं अवघड आहे. म्हणून अमृताचंच वाक्य तिच्याकडून शीर्षकासाठी उधार घेतलं!