|| हरिहर कुंभोजकर
अण्वस्त्रसज्ज सोव्हिएत युनियनबरोबरचे युद्ध ‘शांतते’च्या मार्गाने अमेरिकेने जिंकले. लोकशाही भारत जसजसा अधिकाधिक आधुनिक, सशक्त आणि औद्योगिक व वैज्ञानिकदृष्टय़ा प्रगत होत जाईल तसे हे युद्ध, बळाचा वापर न करताही जिंकू शकेल; पण तोपर्यंत, तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला लढावेच लागेल- सर्व आघाडय़ांवर! फक्त कोणत्या आघाडीवर आणि केव्हा लढायचे हे थंड डोक्याने सेनेला आणि राज्यकर्त्यांना ठरवू द्या.
पुलवामासारखी दहशतवादी घटना घडली की पहिली प्रतिक्रिया बदला घेण्याची असते. ती नसíगक प्रतिक्रिया आहे, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून ती आवश्यक आहे आणि जरब बसवण्यासाठी ती जरुरीचीही आहे. पण तिची उपयुक्तता तात्पुरती आणि मर्यादित आहे. आणखीही दोन टोकांच्या प्रतिक्रिया दिसतात. एक असते पाकिस्तानशी युद्ध करा आणि प्रश्न कायमचा सोडवून टाका. दुसरी प्रतिक्रिया असते- किती काळ रक्तपात करणार. देऊन टाका काश्मीरला हवे ते. निदान उरलेले भारतीय तरी सुखात राहू. ज्या वेळी पक्षीय राजकारणापासून दूर असलेल्या आणि या देशावर निष्ठा असलेल्या सर्वसामान्य नागरिकांमधूनही अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा त्याचा परामर्श घेणे आवश्यक असते. कारण या प्रतिक्रिया भावनात्मक असतात आणि भावनात्मक विचार देशहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात बाधा निर्माण करतात. १९६२ साली नेहरूंनी घेतलेला चीनविषयक निर्णय आणि वाजपेयींच्या काळात घेतलेला कंधहार विमान-अपहरणविषयक निर्णय ही जनक्षोभाच्या दडपणाखाली पुरेशी तयारी न करता, घाईघाईने घेतल्या गेलेल्या, चुकीच्या निर्णयाची ज्वलंत उदाहरणे आहेत. जनक्षोभाचा रेटा नसता तर भारताने पुऱ्या तयारीनिशी योग्य प्रत्युत्तर दिले असते.
सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, कोणत्याही दहशतवादी कृत्याने प्रदेश जिंकता येत नाही. देशाचे नुकसान करता येते. त्याचे मनोबल कमी करता येते. गोंधळाची परिस्थिती निर्माण करता येते, पण देशावर कब्जा करता येत नाही. देश जिंकण्यासाठी सन्यच वापरावे लागते.
दुसरी गोष्ट अशी की, आज जी फुटीरतावादी चळवळ काश्मिरात सुरू आहे ती काश्मीरच्या चार जिल्ह्य़ांपुरती मर्यादित आहे. ही चळवळ अजूनपर्यंत भारत मोडून काढू शकलेला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण भारत एक सुसंस्कृत देश आहे हेच आहे. काश्मीरमधील दहशतवादाचे दुसरे कारण सीमेपलीकडून होणारी मदत आहे.
आज जम्मू-काश्मीरला स्वतंत्र घटना आहे. मग काश्मिरी जनतेला आज़ादी कुणापासून हवी? आणि काय मिळविण्यासाठी? स्वतंत्र काश्मीरचे समर्थक ‘काश्मिरीयत’ जपण्यासाठी आम्हाला स्वतंत्र काश्मीर हवे आहे, असे बऱ्याचदा म्हणतात. काश्मिरींना काश्मिरीयत जपावीशी वाटणे हे स्वाभाविक आहे आणि तो त्यांचा हक्क आहे. प्रश्न आहेत भारतात राहून काश्मिरीयत जपता येणार नाही काय आणि अलग झाल्याने काश्मिरीयत जपता येणार काय? काश्मिरीयत जपण्यासाठी भारतापासून विभक्त होण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण आजपर्यंत देता आलेले नाही. काश्मिरीयत हे स्वातंत्र्याच्या मागणीचे खरे कारण असते तर हजारो वष्रे सर्व दृष्टींनी काश्मिरी असलेल्या आपल्या पाच लाख बांधवांना त्यांनी निर्वासित केले नसते. आज काश्मीरची अधिकृत राज्यभाषा काश्मिरी नाही; उर्दू आहे. तेव्हा काश्मिरीयत हे स्वतंत्र होण्याचे कारण आहे असे काश्मिरी म्हणत असतील तर ते अप्रामाणिक आहेत आणि शेष भारतीय त्यावर विश्वास ठेवत असतील तर ते भाबडे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अन्यत्रच शोधावे लागते.
नव्वदच्या दशकापासून काश्मीरमधील परिस्थितीने वेगळे आणि धोकादायक वळण घेतले आहे. जम्मूला आणि लडाखला भारतात राहायचे आहे. केवळ काश्मीरला वेगळे व्हायचे आहे. ही सरळसरळ धार्मिक फाळणी आहे. आज काश्मीरची ‘आज़ादी’ मागणाऱ्यांची निष्ठा लोकशाहीवर नाही. या लोकांनी निवडून आलेल्या सरपंचांचे खून केले आहेत, स्त्रियांना जबदस्तीने घरात बसवून शिक्षणापासून दूर ठेवले आहे, त्यांच्यावर बुरख्याची सक्ती केली आहे, मुलांना आधुनिक शिक्षण मिळू न देण्याचे प्रयत्न केले आहेत, शाळांना आगी लावल्या आहेत, निवडणुकांवर सतत बहिष्कार टाकला आहे. त्यांची आधुनिक मानवी मूल्यांवरची निष्ठा त्यांनी आपल्या शेजारी हजारो पिढय़ा राहिलेल्या, आपलीच भाषा बोलणाऱ्या, आपल्याच रक्ताच्या लोकांना, ते वेगळा धर्म मानतात म्हणून, जबरदस्तीने हाकलून देऊन सिद्ध केली आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये अतिरेक्यांना यश मिळाल्यास जम्मू आणि लडाख हे त्याचे पुढील लक्ष्य असेल आणि त्यापुढचे लक्ष्य सारा भारत. फुटीरतावाद्यांशी चर्चा करणाऱ्या समितीचे एक सदस्य दिलीप पाडगावकर, जे आज हयात नाहीत, यांनी एका जाहीर मुलाखतीत मान्य केले होते की, काश्मीर भारतापासून अलग झाले तर संरक्षणाच्या दृष्टीने विध्य पर्वतापर्यंतचा भारत उघडा पडतो. फुटीरतावाद्यांना येथेच पायबंद घातला नाही तर सर्व भारतभर यादवीसदृश वातावरण निर्माण होऊ शकते. कोणत्याही पक्षाचे सरकार ही परिस्थिती मान्य करणार नाही. अमेरिकेच्या यादवी युद्धात सहा लाख पन्नास हजार लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात अमेरिकेची लोकसंख्या तीन कोटी होती हे लक्षात घेतले तर गुलामगिरीच्या उच्चाटनासाठी आणि देशाच्या ऐक्यासाठी अमेरिकेने केवढी मोठी किंमत दिली आहे हे लक्षात येईल. भारताला आत्मरक्षणासाठी तितकी मोठी किंमत द्यावी लागू नये अशी आपण अशा करू या. पण याची हमी अशी किंमत देण्याची मानसिक तयारी असण्यानेच मिळणार आहे.
आता प्रश्न पाकिस्तानचा. ‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे’ ही घोषणा करत जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली. जिना हे धर्मवेडे नव्हते; परंतु ते धर्मवेडय़ा लोकांचे प्रतिनिधित्व करत होते. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर वस्तुत: हे धर्मवेड कमी होणे त्यांना अपेक्षित होते; पण वाघावर स्वार झालेले खाली उतरू शकत नसतात. इंग्लंडमध्ये कायदा शिकलेल्या बॅरिस्टरपेक्षा अमेरिकेमध्ये हडेलहप्पी शिकलेल्या जनरलला हे चांगले ठाऊक होते. भारतद्वेष ही पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्ट आहे, असे पाकिस्तानचे सत्ताधीश मानतात. दुसऱ्या भाषेत काश्मीरचा प्रश्न हे वैराचे कारण नसून लक्षण आहे. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीही भारताबरोबरची त्याची दुश्मनी थांबणार नाही. ज्या दिवशी भारताबरोबरचे वैर संपेल त्या दिवशी पाकिस्तानच संपेल. कारण भाषा, संगीत, संस्कृती, खाणे-पिणे, विचार-पद्धती सर्व बाबतींत आम्ही एक आहोत. आज पाकिस्तानात आहेत त्यापेक्षा जास्त मुसलमान या देशात आहेत आणि ते येथे अधिक सुरक्षित आहेत. पाकिस्तान झाले नसते तर ते आजच्यापेक्षाही अधिक सुखात राहिले असते.
पाकिस्तानला नमविण्याची भाषा भारतातील कोणत्याही राज्यकर्त्यांने केली नाही. आजपर्यंत झालेल्या चारी-पाची युद्धांत कुरापत पाकिस्ताननेच काढली होती. ठरावीक काळानंतर युद्धसदृश परिस्थिती निर्माण करणे आणि प्रसंगी मर्यादित युद्ध करणे ही पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्ट आहे. प्रश्न उरला अण्वस्त्रांचा. पाकिस्तानने आत्महत्या करायचे ठरवले असेल तर मग अणुयुद्ध कोणीच रोखू शकत नाही; पण पाकिस्तानी राज्यकत्रे शहाणे नसले तरी सर्वनाश करून घेण्याइतके मूर्ख नसावेत. अतिरेक्यांच्या हातात अण्वस्त्रे पडली तर काय होईल हा वेगळा विषय आहे; पण अण्वस्त्रसज्ज सोव्हिएत युनियनबरोबरचे युद्ध ‘शांतते’च्या मार्गाने अमेरिकेने जिंकले. लोकशाही भारत जसजसा अधिकाधिक आधुनिक, सशक्त आणि औद्योगिक व वैज्ञानिकदृष्टय़ा प्रगत होत जाईल तसे हे युद्ध, बळाचा वापर न करताही जिंकू शकेल; पण तोपर्यंत, तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला लढावेच लागेल- सर्व आघाडय़ांवर!
फक्त कोणत्या आघाडीवर आणि केव्हा लढायचे हे थंड डोक्याने सेनेला आणि राज्यकर्त्यांना ठरवू द्या.
hvk_maths@yahoo.co.in