|| शेखर कृष्णन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील ‘इंडिया युनायटेड मिल्स क्र. २-३’च्या जागेत आता मुंबई, महाराष्ट्र व भारतातील वस्त्रोद्योगाचा इतिहास आणि भविष्य उलगडून दाखवणारं संग्रहालय उभं राहणार आहे.  जवळपास दीडशे वर्षांपूर्वी शहरातील सुरुवातीच्या काही गिरण्या या जागेत उभ्या राहिल्या होत्या. या संग्रहालयात हातमागापासून ते गिरण्यांपर्यंत आणि आधुनिक यंत्रमागापर्यंत वस्त्रोद्योगाचा समग्र प्रवास जतन केला जाणार आहे. संग्रहालयाच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेला औद्योगिक वारसा पुनरुज्जीवित करायची संधीही मिळणार आहे. त्या निमित्ताने..

मुंबईतील ६० सुती कापड गिरण्यांपकी बहुतांश गिरण्या गेल्या २० वर्षांमध्ये बंद पडल्या अथवा त्यांच्या जागेचा पुनर्वकिास करण्यात आला. जनतेसाठी कायमच अदृश्य राहिलेला हा प्रचंड वारसा आता शहरातून जवळपास लुप्त झालेला आहे. या गिरण्यांची आवारं अवाढव्य भिंतींनी बंदिस्त केलेली असल्यामुळे आतील भाग नजरेपल्याडच राहायचा, पण २००० च्या दशकात उड्डाणपूल व उंच इमारती उभ्या राहू लागल्यावर नजरेचा टप्पाही पलटला. जागतिक औद्योगिक क्रांतीच्या काळात निर्माण झालेल्या अगदी पहिल्या काही कारखान्यांमध्ये मुंबईतील कापड गिरण्यांचा समावेश होतो.

यातील बहुतांश आवारांची जागा आता नवीन जागतिक अर्थव्यवस्थेतील कार्यालयं, मॉल, बँका व गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे. काही मोजक्या गिरण्यांच्या जागेचं व्यवस्थापन अजूनही राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे आहे. यांपकी काळाचौकी परिसरातील ‘इंडिया युनायटेड मिल क्रमांक २-३’ या आवारांचं रूपांतर शहरातील नव्या व सर्वात मोठय़ा संग्रहालयात होणार असून त्यासाठीची योजना मुंबई महानगरपालिकेकडून अमलात येते आहे.

वस्त्रोद्योगाच्या इतिहासाला वाहिलेलं या गिरणीचं जीर्णोद्धारित आवार पुढच्या वर्षी टप्प्याटप्प्यानं खुलं केलं जाईल. शहरातील सर्वात जुन्या कापड गिरण्यांपकी एक असलेल्या ‘इंदू मिल’आणि तिथल्या संपन्न औद्योगिक वारशाचं अंतरंग पाहायची संधी मुंबईतील बहुतांश नागरिकांना यानिमित्तानं पहिल्यांदाच मिळेल.

लँकशायर ते भायखळा

या नियोजित संग्रहालयाची जागा दीडशे वर्ष जुनी आहे. आधी ‘चिंचपोकळी तेल गिरणी’ या नावानं परिचित असलेलं हे आवार भाज्यांचं तेल पिळून काढण्यासाठीचा कारखाना म्हणून वापरात होतं. मालक व नावं बदलल्यानंतरही जवळपास एक शतकभर गिरणी कामगार आणि स्थानिक लोकही या ठिकाणाला ‘तेलाची गिरण’ असंच संबोधत असत.

आपले वडील आणि मँचेस्टरमध्ये ओळख झालेले बोहरा मुस्लीम व्यापारी शेख आदम या दोघांच्या मदतीनं जमशेदजी टाटांनी हे आवार विकत घेतलं, त्याचा विस्तार केला आणि आयात केलेली यंत्रसामग्री तिथे आणून ठेवली. या ठिकाणी त्यांनी १८६९ साली पहिली सूतगिरणी सुरू केली. ब्रिटिश राजे सातवे एडवर्ड यांच्या पत्नीच्या (वेल्शची नवी युवराज्ञी) नावावरून त्यांनी गिरणीचं नामकरण केलं- ‘अलेक्झांड्रा स्पिनिंग अँड विव्हिंग मिल.’

तीन वर्षांच्या आत जमशेदजी टाटांनी ही जागा, तिथल्या इमारती व यंत्रसामग्री हे सगळं भाटिया जैन समुदायातील केशवजी नाईक यांना विकलं आणि बराच नफा कमावला. बांधकाम व्यावसायिक व सट्टेबाज असलेले केशवजी नाईक त्या वेळी शेजारच्याच काळाचौकीमध्ये एक कारखाना उभारण्यात व्यग्र होते. या कारखान्याला त्यांनी ‘कैसर-ए-हिंद मिल्स’ असं नाव दिलं. धाडसी उपक्रम हाती घेऊन त्यांना राजघराण्यावरून नावं द्यायची, या टाटांच्या सवयीची नक्कल केशवजी नाईकांनी केली, पण गिरणी उद्योगात त्यांना फार काळ तग धरता आली नाही. १८७५ साली त्यांचं दिवाळं वाजलं. प्रकल्पातील आपल्या सहप्रवर्तकांची लेखापालनामध्ये फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि १८७८ साली फसवणुकीच्या गुन्ह्य़ाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं.

व्यापारी आणि उद्योगपती

‘अलेक्झांड्रा मिल्स’ या दिवाळखोरीत निघालेल्या मालमत्तेच्या १८७९ साली झालेल्या न्यायालयीन लिलावामध्ये एलिआस डेव्हिड ससून (१८२०-१८८०) यांनी लावलेली बोली विजयी ठरली. एलिआस हे ज्यू बँकर व व्यापारी डेव्हिड ससून यांचे पुत्र होते.

अतिशय संपन्न ससून कुटुंबानं १८५च्या दशकात बगदादमधून पळ काढला आणि ब्रिटिशांकडून नव्यानं सुरू होत असलेल्या जहाज वाहतूक, तार यंत्रणा व रेल्वे जाळ्यांच्या व्यवसायांचा शोध घेत ही मंडळी भारत व चीनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या विविध उदयोन्मुख बंदरांमध्ये जाऊन वसली. वडिलांकडून वारशात मिळालेलं व्यावसायिक साम्राज्य एलिआस डेव्हिड ससून यांनी आणखी विस्तारलं. औद्योगिकीकरणानंतर अफू, चहा व सूत यांच्या व्यापाराला ग्रहण लागलं तेव्हा मुंबईत येऊन स्थायिक झालेले उद्योजक व व्यापारी नसरवानजी टाटा यांचाही प्रवास काहीसा असाच होता.

टाटांनी जमशेदजींना शिकण्यासाठी परदेशात पाठवलं, त्याचप्रमाणे एलिआस ससून यांनी त्यांच्या दोन मुलांना- सर जेकब ससून व सर एडवर्ड एलिआस ससून यांना-अनुक्रमे चीन व इंग्लंड येथे कौटुंबिक व्यवसाय समजून घेण्यासाठी पाठवलं. एलिआस ससून यांचं १८८० साली कोलम्बोमध्ये निधन झालं, तत्पूर्वी काही महिने त्यांच्या मुलांनी टाटांच्या गिरणीचं नूतनीकरण आणि विस्तारीकरण करून ‘अलेक्झांड्रा अँड ई.डी. ससून स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स’ या नावानं ती पुन्हा सुरू केली. त्यानंतरच्या दशकांमध्ये भारतभरात वस्त्रोद्योग प्रचंड वेगानं वाढला.

या वेळेपर्यंत तरुण जमशेदजी पुन्हा एकदा इंग्लंडची वारी करून आले होते. बेरार प्रांतातील (आताचा वऱ्हाड) ग्रामीण भागात त्यांनी ‘सेंट्रल इंडिया स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ सुरू केली. नंतर १८७७ साली व्हिक्टोरिया राणीला ‘क्वीन-इम्प्रेस’ हा सन्मान मिळाल्यावर जमशेदजींनी या गिरणीचं नामकरण ‘एम्प्रेस मिल्स’ असं केलं. पण या क्षेत्रातील अद्वितीय केंद्राचा मान मुंबई शहरालाच मिळाला. मुंबईत शंभराहून अधिक सूतगिरण्या उभ्या राहिल्या होत्या आणि या गिरण्यांची एकत्रित क्षमता व एकूण उत्पादन ब्रिटिशशासित भारतातील इतर सर्व गिरण्यांहून जास्त होतं.

शतकाच्या उंबरठय़ावर असताना मुंबई शहर आशियातील ‘कॉटनपोलीस’ ठरलं आणि एलिआस डेव्हिड ससून यांचे पुत्र या क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक बनले. प्रगत तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रिया यांसाठी प्रख्यात असलेला ई.डी. ससून समूह भारतातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग समूह होता. दरम्यान, सर जेकब ससून यांनी १८९० साली दादरच्या किनाऱ्यावर ‘टर्की रेड डाय वर्क्‍स’ हा प्रगत रासायनिक व खनिज कारखाना उभारला (इंडिया युनायटेड क्र. ६), त्यापाठोपाठ १८९३ साली त्यांनीच लालबागमध्ये नामांकित जेकब मिल्सची (क्र. १) उभारणी केली. त्यांच्या पत्नीच्या नावानं १८९५ साली ‘राशेल मिल्स’ (क्र. ४) ही गिरणी सुरू झाली. जेकब यांनी १९०० च्या दशकात लोअर परेल भागातील जागा विकत घेऊन आपल्या चुलत भावंडांच्या नावानं ‘एडवर्ड अँड मेयर ससून मिल्स’ सुरू केली.

भारतातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग समूह

सर एलीस व्हिक्टर ससून हे सर एडवर्ड यांचे पुत्र होते. इंग्लंडमध्ये जडणघडण झालेल्या सर व्हिक्टर यांना त्यांची मित्रमंडळी ‘एव्ही’ या नावानं संबोधत. विमानचालनात प्रचंड रस असलेले सर व्हिक्टर पहिल्या महायुद्धात वैमानिक म्हणून काम करताना जखमी झाले होते. तर, व्हिक्टर यांनी भारतात येऊन ‘ई.डी. ससून्स अँड सन्स’ची सूत्रं हाती घ्यावीत, अशी विनवणी मृत्युशय्येवरील त्यांचे काका सर जेकब यांनी केली. महत्त्वाकांक्षी वृत्तीच्या सर व्हिक्टर यांनी १९२०च्या मध्यापर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाचं सुसूत्रीकरण केलं. प्रकल्प व यंत्रसामग्री यांमध्ये आधुनिकता आणून त्यांचा विस्तार केला. वाफेवर चालणाऱ्या गिरण्यांना त्यांनीच वीजकर्षणाच्या मार्गावर आणलं.

सर व्हिक्टर यांच्या नवीन मुख्यालयाची- म्हणजे पोर्ट ट्रस्टच्या नवीन बॅलार्ड इस्टेटमधील ‘ई.डी. ससून बिल्डिंग’ची (आताचं ‘एनटीसी हाऊस’)- रचना विख्यात ब्रिटिश वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांनी केली होती. राजघराण्यातील प्रस्थापितांची व परकीयांची नावं देण्याची पद्धत दोन महायुद्धांमधल्या काळात चलनातून बाद होत गेली. त्याच दरम्यान सर व्हिक्टर यांनी त्यांचे काका, आत्या व चुलत भाऊ यांची नावं असलेल्या सहा गिरण्यांचं एकत्रीकरण करून त्यांना ‘युनायटेड मिल्स’ असं नाव दिलं.

जगभरात १९२९-३० या वर्षांमध्ये महामंदीची लाट पसरली. या लाटेमध्ये बाजारपेठेतील मोठमोठय़ा स्पर्धकांचं दिवाळं वाजलं, पण सर व्हिक्टर यांच्या नेतृत्वाखालील ‘ई.डी. ससून अँड कंपनी’नं मुंबईमधील दहा गिरण्या विकत घेतल्या. एल्फिन्स्टन, डेव्हिड, अपोलो मिल्स, मँचेस्टर (इंडिया युनायटेड क्र. ५) आणि इंडिया वूलन मिल्स आदी गिरण्यांचा यात समावेश होता. यातून मिळालेला नफा सर व्हिक्टर यांनी शांघायमध्ये हॉटेलांच्या आणि स्थावर मालमत्तेच्या व्यवसायात गुंतवला. तिथल्या नदीकिनाऱ्याजवळच्या परिसराला मुंबईच्या अपोलो बंदरावरून ‘बंड’ असं नाव मिळालं.

युरोपात दुसऱ्या महायुद्धाची धामधूम सुरू होती तेव्हा ‘ई.डी. ससून’ ही कंपनी मुंबई शहरातील सर्वात मोठा खासगी रोजगारदाता ठरली. या कंपनीच्या वस्त्रोद्योगात, लोकर गिरण्यांमध्ये, रंग कारखान्यांमध्ये, कार्यालयांमध्ये व दुकानांमध्ये मिळून ३० हजार कामगार, व्यवस्थापक व इतर कर्मचारीवर्ग कार्यरत होता. मध्यपूर्व, दक्षिण व पूर्व आशिया इथल्या भारतीय व दोस्त राष्ट्रांच्या सन्यांकडून केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या कंपनीच्या १५ गिरण्या उत्साहानं कामाला लागल्या होत्या. मुंबईतून झालेला फायदा सर व्हिक्टर यांनी शांघायमधील नुकसान भरून काढण्यासाठी वापरला. चीनवर जपानी सन्यानं आक्रमण केल्यानंतर शांघायमधील त्यांचा हॉटेलांचा व स्थावर मालमत्तेचा व्यवसाय जवळपास कोसळून पडला. पुढं कम्युनिस्ट रेड आर्मीनं तर त्यांना बाहेरच हाकलून लावलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीला त्यांनी मुंबईतील आपला सर्व कौटुंबिक उद्योग ‘मेसर्स अगरवाल अँड कंपनी’ या मारवाडी व्यापाऱ्यांच्या संस्थेला विकून टाकला. अगरवालांनी या कंपनीचं नामकरण ‘इंदू फॅब्रिक्स’ असं केलं. मुंबईतील बॅरोनेट किताबधारी ससून कुटुंबीयांमधील शेवटचे मानकरी सर व्हिक्टर ससून यांनी आयुष्याचा अखेरचा काळ बहामा बेटांवर व्यतीत केला. ‘‘भारतावरचा माझा विश्वास संपुष्टात आला आणि माझ्यावरचा चीनचा विश्वास संपुष्टात आला,’’ असं ते बहामामधील वास्तव्यादरम्यान म्हणाल्याचं सांगितलं जातं.

गिरणी ते संग्रहालय

ही गिरणी १९६० च्या दशकापर्यंत नफा मिळवत होती आणि स्वातंत्र्योत्तर काळात ‘इंदू’ या ब्राण्डचं नाव सर्वत्र पसरलं. त्यानंतर १९७४ मध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळानं (नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन – एनटीसी) काही गिरण्यांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि २०००च्या दशकात त्यांचा गाशा गुंडाळला.

गिरणीच्या जागेसंबंधीचा पहिला प्रस्ताव २००९ साली मांडण्यात आला. या योजनेनुसार, एनटीसीनं ‘इंडिया युनायटेड मिल्स क्र. २-३’चं आवार आरक्षित सार्वजनिक जागा म्हणून शहर प्रशासनाकडे सुपूर्द केलं. आता महापालिकेच्या निर्णयानुसार २०१९ साली हे १५ एकरांचं आवार लोकांच्या वावरासाठी खुलं केलं जाणार आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी शहरातील सुरुवातीच्या काही गिरण्या या जागेत उभ्या राहिल्या; तिथे आता मुंबईतील, महाराष्ट्रातील व भारतातील वस्त्रोद्योगाचा इतिहास आणि भविष्य उलगडून दाखवणारं संग्रहालय उभं करण्याची योजना आहे. या संग्रहालयात हातमागापासून ते गिरण्यांपर्यंत आणि आधुनिक यंत्रमागापर्यंत वस्त्रोद्योगाचा समग्र प्रवास जतन केला जाणार आहे.

दुर्दैवानं, जागेचं दुर्भिक्ष असलेल्या मुंबई शहरातील इतर १२ गिरण्यांच्या आवारांबाबत (यामध्ये ससून-इंदू मिल्सची तीन आवारंही आहेत) स्पष्ट योजना एनटीसीनं अजूनही तयार केलेली नाही. ससून समूहातील प्रमुख गिरणी- म्हणजे जेकब ससून मिल किंवा इंडिया युनायटेड मिल क्र. १ (सोबत दिलेल्या १९४० सालच्या जाहिरातीत तिचं छायाचित्र आहे)- ही एकेकाळी शहरातील सर्वात मोठी मिल होती.

आजघडीला लालबाग उड्डाणपुलावरून जाताना या गिरणीच्या आवाराचा अक्षरश: चुराडा होताना दिसतो. मुंबई शहराला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्याचं मूक स्मारक बनलेली ही जागा आज खंगल्या अवस्थेत आहे. याच जागेवरून टाटा व ससून कुटुंबीयांनी भारताच्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली होती. या पार्श्वभूमीवर  त्यांच्या पहिल्या गिरणीमध्ये उभ्या राहणाऱ्या  संग्रहालयाच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेला औद्योगिक वारसा पुनरुज्जीवित करायची संधी मिळणार आहे. या वारशाला नजरेआड करून मुंबईतील उद्योजकता व विश्वबंधुत्व या विख्यात मूल्यांची कल्पना करणं अवघड आहे.

shekhark@alum.mit.edu

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indu mill museum of textile industry