जागेचा, निवाऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे. पण मुलांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्यांची समस्या कायम आहे. सध्या पत्र्याच्या निवाऱ्यात मुले शिकतात. वर्गखोल्यांसाठी मदत झाली तर बरे होईल, अशी संस्थेची अपेक्षा आहे. एचआयव्हीबाधित मोठय़ा मुला-मुलींचे लग्न जमवून त्यांना समाजात सामान्यपणे जीवन जगता यावे, त्यांचा स्वीकार व्हावा, यासाठी प्रयत्न करणे, असे उदात्त ध्येय घेऊन संस्थेचे काम सुरू आहे. ज्या मुलांची काहीच चूक नसते, त्यांना जन्मत:च मृत्यूच्या सावलीखाली राहावे लागते. ज्यांच्या नशिबी निराधारपणे जगणे आले आहे, अशा निरागस बालकांना समाजाने आधार द्यावा, यासाठी बारगजे दाम्पत्य प्रामाणिक लढा देत आहेत.
भोवताल मृत्यूच्या भीतीचा. पण डोळ्यांत चमक मात्र जगण्याची! आयुष्याची आस, ओढ आणि सोबतीला एक वास्तव – एचआयव्हीचे. बीड शहराजवळील बिंदुसरा धरणाजवळ पाली गावाजवळील डोंगरावर दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे या दाम्पत्याचे कुटुंब आहे तब्बल ५१ जणांचे! त्यातील ४१ मुलांना एचआयव्हीची बाधा. हे सगळे सुरू झाले, त्याला सहा वर्षे झाली. शेतकरी कुटुंबातले दत्ता यांनी वैद्यकीय पदविका शिक्षण पूर्ण केले आणि ते गडचिरोली जिल्हय़ात भामरागडमध्ये ग्रामीण आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झाले. तेव्हा त्या भागात सामाजिक काम करणाऱ्या बाबा आमटे आणि दत्ता बारगजे यांचा संपर्क आला. सामाजिक कामाची व्याप्ती तेव्हा मनात रुजली. पुढे वेगळे काम करायचे, ही इच्छा होतीच. एके दिवशी एक महिला आली, म्हणाली, ‘माझा आणि या मुलाचा काय दोष? हा आजार नशिबी आला. आता जगणं मुश्कील झालं आहे. या मुलाला शिकवू कोठे आणि कसे?’ आनंदवनातील कुष्ठरोग्यांचा कळवळा बाळगणाऱ्या दत्ता बारगजे यांनी एक मूल स्वत:च्या घरात आणले. काही महिन्यांनंतर दुसरे मूल आले. पुढे संख्या वाढत गेली आणि घरच भरून गेले. हा संसार कसा सांभाळायचा, असा प्रश्न आला आणि ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. आता स्थिती अशी आहे, की ही संस्था बाबा आमटे यांच्या आनंदवनाचा जणू नवा चेहराच!
बीड शहरापासून ११ किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे. तेथून दोन किलोमीटर डोंगरावर चढले, की ‘इन्फंट इंडिया’ ही संस्था दिसते. दत्ता बारगजे यांना सरकारी नोकरी होती. त्यांच्या पत्नी संध्या या देखील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून तासिका तत्त्वावर काम करायच्या. संसारसुख जे सामान्यपणे म्हटले जाते, ते सारे काही दत्ता बारगजेंकडे होते. पण बाबा आमटेंच्या सान्निध्याने जीवनाला कलाटणी मिळाली. हेमलकसा येथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर सामाजिक कामाची गरज आणि विचारांची परिपक्वता आली होती. उपेक्षितांसाठी काम करण्याची ऊर्मी आणि ‘बाबां’ना दिलेला शब्द पाळायचा, हे बारगजे यांनी ठरविले. भामरागडहून बीड जिल्हा रुग्णालयात बदली झाली. नव्याने काम उभे करायचे, हा विचार पक्का करूनच नोकरीच्या गावाहून त्यांनी बाडबिस्तरा हलविला. एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी काम करण्याचे ठरले. संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणाला सदस्य करावे, याची शोधमोहीम हाती घ्यावी लागली. कारण नातेवाइकांनी सदस्य होण्यास नकार दिला. बऱ्याच जणांनी बजावले, असले विचित्र काम करू नका. पत्नी, आई आणि दोन मित्रांच्या मदतीने ‘इन्फंट इंडिया’ची उभारणी झाली. सरकारी रुग्णालयात एड्समुळे मृत्यू झालेल्या एका दाम्पत्याचा मुलगा बाधित असल्याचे कळले. जन्मत:च मृत्यूची सोबत आणि अनाथपण घेऊन आलेल्या या मुलाला बारगजे यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी आणले. त्याच्यावर अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात चांगले उपचार होतील म्हणून ते प्रयत्न करायचे. घरात आलेला हा नवीन पाहुणा स्वत:च्या मुलांबरोबर वाढविणे तसे अवघड काम. या मुलाबरोबरच सात-आठ वर्षांची वेगवेगळ्या शहरातील मुले बारगजे यांनी घरी आणली. काही संस्थाही अशी मुले त्यांच्याकडे पाठवू लागले. मुलांची संख्या दहावर गेली आणि सरकारी निवासस्थानाची जागा कमी पडू लागली. आजूबाजूचे लोकही नाक मुरडू लागले. बारगजे यांनी नव्या जागेचा शोध सुरू केला. दरम्यान, दररोजचा खर्च भागविणे अवघड काम. या संस्थेत आता ४१ मुले आहेत. प्रत्येकाच्या आजाराची तीव्रता वेगवेगळी. औषध-गोळ्या, खाणे-पिणे ही रोजची कामे तर कष्टाचीच. पण ४० मुला-मुलींचे वाढणारे केस कोणी कापायचे? एके दिवशी दत्ता बारगजेंनी न्हाव्याच्या दुकानात लागणारे सर्व साहित्य आणले. जसे जमेल तसे केस कापले. हळूहळू त्यांचा हात साफ झाला. आता ते मुलांचे केस कापतात आणि संध्याताई मुलींचे. या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती वाढविणे हे संध्या आणि दत्ता बारगजे यांचे उद्दिष्ट. त्यामुळे पौष्टिक, चांगले खाऊ घालणे ही जबाबदारीच. सकाळी ८ वाजता गेलात की संस्थेत सरळ जेवायला मिळते. ज्वारीची भाकरी आणि ताजी भाजी असा आहार सकाळी मिळतो. दुपारी काहीतरी पौष्टिक मिळतेच. पण याला लागणारा किराणा कोठून आणला जातो? पहिल्या काही वर्षांत स्वत:कडचा पैसा संपला. दररोजचा खर्च भागविण्यासाठी मदत तर आवश्यक होती. किराणा दुकानदार बंडू कदम पूर्वी ५०० रुपयांचा किराणा द्यायचे. आता पाच हजार रुपयांचा किराणा देतात. तो पुरत नाही. पुन्हा नव्याने दाता शोधण्यात आला. डॉ. सुधीर हिरवे उर्वरित किराणा देतात. दर महिन्याला ११ हजार रुपये किराणावर खर्च होतात. या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कोरफड आणि आवळ्याचा रसही दिला जातो. काही जण एवढे संवेदनशील आहेत, की आयुष्यभरासाठी अशा वस्तू आता दुसऱ्याकडे मागू नका, आम्ही देत राहू, असे आवर्जून सांगू लागले. कोणी औषधे देतो, तर कोणी आणखी काही. पण अशा संस्थांमध्ये गरजच मोठी असते. गेल्या काही वर्षांत संस्थेच्या कामाविषयी लोकांना माहिती मिळू लागली. काम पाहायला येणाऱ्यांची संख्याही वाढली. नेते आणि पुढाऱ्यांची तर रीघ असते. मध्यंतरी बऱ्याच जणांनी मदतीच्या घोषणा केल्या. काहींचे आकडे लाखांचे होते. पण प्रत्यक्ष मदत मिळालीच नाही. भोवताली लोकांना वाटले, यांना तर बरीच मदत मिळते. नव्याने कशाला द्यायची? झालेल्या घोषणा आणि मिळालेली प्रत्यक्ष मदत ही काही दात्यांसमोर नव्याने ठेवावी लागली आणि पुन्हा कारभार सुरळीत झाला.
संस्थात्मक पातळीवरची हा लढा सुरू असतानाच कौटुंबिक पातळीवरही काही संघर्ष उभे राहिले. बारगजे दाम्पत्यांचे नातेवाईक दुरावले. स्वत:च्या मुलांबरोबर एचआयव्हीबाधित मुले सांभाळायची, यासाठीची मानसिक तयारी करताना अनेक अडचणी आल्या. अपमान सहन करावे लागले. पण अनाथांच्या सेवेपासून दूर जाण्याचा विचारही मनाला शिवला नाही, असे बारगजे दाम्पत्य आवर्जून सांगते. प्रसंग तसा कोणाच्याही डोळ्यांत पाणी आणेल असाच. दिवाळी होती, सर्वत्र रोषणाई होती. एक मूल देवाघरी गेले. त्याचे अंत्यसंस्कार कोठे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा बऱ्याच जणांनी अन्त्यसंस्कार स्मशानभूमीत करण्यास विरोध केला. शेवटी संस्थेच्याच जागेत दफनविधी झाला. त्याचा मुलांच्या मनावर मात्र मोठा परिणाम झाला. हळूहळू आता विरोधाचे वातावरण निवळत आहे. पण तो प्रसंग मोठा बाका होता. वाडय़ातून डोंगरावर पत्र्याच्या निवारात ही संस्था अनेक दिवस होती. एके दिवशी मोठे वादळ आले आणि पत्रे उडून गेले. ही बातमी मुंबईत प्रकाशित झाली आणि टी. एन. व्ही. अय्यर नावाच्या व्यक्तीने बीड गाठले. संस्थेला मदत केली. तसे संगोपनाचे काम कमालीचे अवघड. या मुलांना नुसते सांभाळून कसे चालणार? त्यांना शिकवायचे कोणी, हा प्रश्न उभा राहिला. जिल्हा परिषदेच्या शाळेत या मुलांना बसू देण्यावरून विरोध झाला. शेवटी जिल्हा परिषदेने या मुलांना शिकविण्यासाठी आश्रमातच दोन शिक्षकांची नियुक्ती केली. पाच वर्षांच्या या खडतर प्रवासानंतर पाली गावातील लोकही आता मदतीसाठी हात पुढे करू लागले आहे. या सगळ्या ‘सामाजिक’ कामात या शब्दाचा अर्थही न कळणारी दत्ता बारगजे यांची आई गयाबाई आणि संध्याचे वडील दोघे सहभागी झाले आहेत. पृथ्वीराज, मातृभूमी आणि राजमुद्रा या नातवंडांबरोबर गयाबाई ४१ जणांच्या आजी झाल्या. दिवसभर त्या मुलांना सांभाळतात, गोष्टी सांगतात, हट्ट पुरवतात. संध्या सकाळी मुलांना अंघोळ घालतात. कपडय़ांची स्वच्छता पाहतात. स्वत: मुलांसाठी स्वयंपाक करतात. या सगळ्या संगोपनात सगळ्यात अवघड काम असते, ते मुलांना औषधे देणे. वेगवेगळ्या वयोगटातली मुले औषधे घ्यायला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात. गोळी हातातच ठेवायची आणि घेतली म्हणून सांगायची. प्रत्येकाला समोर बसून गोळी खाऊ घालणे, औषध पाजणे, हे कष्टाचे काम. पण आता काही जबाबदारी वयाने मोठय़ा असणाऱ्या मुलांनी उचलली आहे, काही त्यांच्या नातेवाइकांनी. प्रत्येक मुलाच्या जगण्याची इच्छाशक्ती वाढविणे, त्याची जगण्याची आस कायम ठेवणे, हे अवघड काम करताना तशी दिनचर्या ठेवणेही आवश्यक असते. प्राणायाम, नियमित योग, व्यायाम यामुळे मुलांची प्रकृती उत्तम राहते. आरोग्य तपासणीसाठी आलेले डॉक्टरही कधी-कधी चकित होतात. सुरुवातीला दाखल झालेली मुले आता मोठी झाली आहेत. ती मदत करतात. या संस्थेत चांगले काम सुरू आहे, तर त्याचा बालकाश्रम म्हणून विचार करावा, यासाठी काही जणांनी प्रस्ताव तयार केला. मात्र, महिला आणि बालकल्याण विभागाचे तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव यांनी अशा संस्था बोगस असतात, असे सांगून बारगजे दाम्पत्याला हाकलून दिले. त्यानंतर सरकारच्या दारात जायचे नाही, हा निश्चय करून या दाम्पत्याने ही संस्था चालवली.
‘इन्फंट इंडिया’चे काम लोकांना कळू लागले आणि मदतीचा ओघही काही अंशांनी सुरू झाला. वाढदिवस, पुण्यतिथीनिमित्त काही जण नियमितपणे धान्य पुरवू लागले. बागवान संघटनेने फळ, ताज्या भाज्या पाठविण्यासाठी दिवस वाटून घेतले. तर जिल्हा मराठी पत्रकार संघाने मुलांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका दिली. या सगळ्या कामात संध्या बारगजेंनी स्वत:ला झोकून दिले. त्या सांगत होत्या, काहीतरी वेगळे काम करण्याची इच्छा होती. हे काम आवडले. आमच्याकडे येणाऱ्या मुलांची वेगळीच काळजी घ्यावी लागते. काही मुलांचे वय १८ आहे आणि काही मुले दोन वर्षांची. एक मुलगी तर आईच्या नावाचा धोशा लावायची. तिला सांभाळताना खूप कष्ट पडले. हळूहळू मीच तिला तिची आई वाटू लागले. जवळीक वाढली. तीही राहू लागली. आता ती मला आईच समजते. काही मुले खेळायचा हट्ट करतात, काही मुले वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठी अडून राहतात. काही कळती झालीत, त्यामुळे आपसात प्रेमही करतात. सासूबाई मुलींच्या वेण्या घालण्याचे काम आनंदाने करतात. पण अजूनही मदतीची गरज आहेच. दोन हजार लोकांचे वाढदिवस आणि पुण्यस्मरण लिहून ठेवले आहे. त्यांच्या नातेवाइकांना संस्थेकडून पुष्पगुच्छ दिले जाते. कारण त्यांच्याच मदतीवर संस्था चालते.
संस्थेपर्यंत कसे जाल?
बीड शहरापासून ११ किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे. तेथून दोन किलोमीटर डोंगरावर चढले, की ‘इन्फंट इंडिया’ ही संस्था दिसते.
इन्फंट इंडिया,बीड
संस्थेत चांगले काम सुरू आहे, तर त्याचा बालकाश्रम म्हणून विचार व्हावा, यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव महिला आणि बालकल्याण विभागाने अशा संस्था बोगस असतात, असे सांगून फेटाळून लावला होता.
सर्वस्व ओतले
एचआयव्हीबाधित मुले सांभाळतो त्यामुळे कोणी बारगजेंना जागा द्यायला तयार होईना. शहराच्या बाहेर एका वाडय़ात कसेबसे वर्ष काढले. सरकारी निवासस्थानावरून बार्शी नाक्यावरील वाडय़ात जाताना घरात मुलांची संख्या १७ झाली होती. या मुलांचा दवाखाना, कपडे, जेवण हे एकटय़ाच्या सरकारी पगारात भागणे कठीण झाले. भार वाढत गेला. कधी भविष्यनिर्वाह निधीतून, विम्याच्या पैशांतून, तर कधी कर्जे काढून या मुलांचा सांभाळ सुरू होता. पण संस्थेला जागा हवी, यासाठी दत्ता बारगजे यांनी नव्याने आखणी करायला सुरुवात केली. स्वत:जवळचे सगळे पैसे ओतले. पत्नीचे सगळे दागिने मोडले. शहराबाहेर एका डोंगरावरची जागा पाच लाख रुपये एकरने ठरविली. आजही त्या जागामालकाचे देणे बाकी आहे.
संस्थेची अधिकृत नोंदणी २००७ मध्ये झाली, पण काम तत्पूर्वीच सुरू झाले होते. सरकारी निवासस्थानी या संस्थेचे काम सुरू झाले, पण २००८ मध्ये मुलांची संख्या वाढली आणि संस्था एका वाडय़ात हलवावी लागली. गावातील लोकांना त्याचाही त्रास होऊ लागला. त्यामुळे बीड शहरापासून जवळ असणाऱ्या एका डोंगरावर संस्थेचा कारभार हालवावा लागला. बारगजे यांची मुखेडला बदली करण्यात आली. त्या काळातच समस्याही वाढल्या होत्या. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी हे काम पूर्ण वेळ हाती घेतले.
धनादेश या नावाने काढावेत
इन्फंट इंडिया, बीड
देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत
Infant India, Beed
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९. ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.