प्रशासन, उद्योग, क्रीडा, कला, सामाजिक काम अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लखलखते यश मिळवणाऱ्या काही निवडक तरुण- तरुणींना नुकतेच ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षमतांचे नाणे खणखणीत वाजवणाऱ्या या तरुणांच्या कार्यकर्तृत्वाची एक झलक..
लोकांसाठी प्रशासन
राहुल कर्डिले – प्रशासकीय सेवा
सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हटलं जातं. पण आपल्या पदाचा वापर लोकसेवेसाठी करायचा ठरवल्यास समाजासाठी खूप काही करता येतं. याच भावनेतून कार्यरत आहे वर्ध्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.. राहुलनं अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांतून स्वत:चा ठसा उमटवलाय. सेवादूत उपक्रमात राज्यात पहिल्यांदाच नागरिकांना काही शासकीय सेवा घरपोच दिल्या जाऊ लागल्या, शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्न मिळण्यासाठी कृषीमाल आयात-निर्यातीचा परवाना देण्यात येऊ लागला. शिक्षण विभागातील सेवांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ, नवउद्यमींसाठी इन्क्युबेशन अँड फॅसिलिटी सेंटर, सीएसआरच्या माध्यमातून दोनशे शाळांमध्ये ग्रंथालयांची निर्मिती करण्यात आली. ठेवी वाढ अभियानामुळे डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेला नवसंजीवनी मिळाली. राहुलच्या लोकाभिमुख प्रशासनामुळे शेतकऱ्यापासून विद्यार्थ्यांपर्यंत विविध घटकांची शासकीय कामं सुलभ झाली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सरकारी कामांना वेग आला. राहुलच्या उपक्रमांची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली, उपक्रमांचं कौतुक झालं, पुरस्कारही मिळाले. आपल्या जबाबदारीचं भान ठेवून कार्यकुशलतेनं राहुल लोकसेवेचं काम करतोय.
सेवादूत उपक्रमात राज्यात पहिल्यांदाच नागरिकांना काही शासकीय सेवा घरपोच दिल्या जाऊ लागल्या, शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्न मिळण्यासाठी कृषीमाल आयात-निर्यातीचा परवाना देण्यात येऊ लागला. शिक्षणातील सेवांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ, नवउद्यमींसाठी इन्क्युबेशन अँड फॅसिलिटी सेंटर, दोनशे शाळांमध्ये ग्रंथालयांची निर्मिती ही वेगवेगळी कामे करण्यात आली.
कुप्रथेला विरोध
विवेक तमाईचीकर – कौमार्य चाचणी विरोधी लढा
आपल्या देशाला लाभलेल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा आपल्याला अपार अभिमान वाटतो. पण या संस्कृतीमध्ये काही अनिष्ट रूढी परंपराही आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात सती प्रथेविरोधात तत्कालीन समाजधुरीणांनी आवाज उठवला होता. तर आजच्या आधुनिक काळात कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथेविरोधात आवाज उठवतोय विवेक तमाईचीकर.. उच्चशिक्षित असलेल्या विवेकनं स्वत:च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीच्या कौमार्य चाचणीला विरोध केला. विवेकच्या या निर्णयामुळे समाजानं त्याच्यावर बहिष्कार घातला. मात्र विवेक ठाम राहिला. उलट या अनिष्ट प्रथेविरोधात त्यानं ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ ही मोहीम अधिक तीव्र केली. स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या विवेकच्या भूमिकेचं कौतुक होऊ लागलं. अनेक तरुण-तरुणींनी या मोहिमेत सहभागी होऊन विवेकला बळ दिलं. कौमार्य चाचणी विरोधात विवेकनं सुरू केलेली मोहीम आता राज्यभरात पोहोचलीय. यूएन वूमन या आंतरराष्ट्रीय संस्थेसह महाराष्ट्र सरकारनंही विवेकच्या कामाची दखल घेतलीय. त्याच्या मोहिमेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांतूनही लिहिलं-बोललं गेलंय, त्याच्या कामाचा पुरस्कारांनी सन्मानही झालाय.
विवेक तमाईचीकरने कंजारभाट या समाजातील कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथेविरोधात लढा दिला. स्वत:च्या पत्नीच्या कौमार्य चाचणीला त्याने विरोध केला. त्यामुळे त्याच्या समाजानं त्याच्यावर बहिष्कार घातला. मात्र ठाम राहून विवेकने या अनिष्ट प्रथेविरोधात ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ ही मोहीम अधिक तीव्र केली. त्याने सुरू केलेली ही मोहीम आता राज्यभर पोहोचली आहे.
शिक्षणातून परिवर्तन
सूरज एंगडे– सामाजिक आणि वैचारिक
शिक्षण आयुष्याला दिशा देतं याचं परिपूर्ण उदाहरण ठरलाय नांदेडचा आणि आता अमेरिकेत राहणारा सूरज एंगडे. सूरजनं अनेक अडचणींना तोंड देत नांदेडमध्ये कायद्यातील पदवी मिळवली, त्यानंतर मुंबईत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शिष्यवृत्तीमुळे त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतल्या विद्यापीठातून त्यानं पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्ड विद्यापीठाची दू बोईस फेलोशिप मिळवणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान सूरजला मिळालाय. त्यानं आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका या खंडांत शिक्षण घेतलंय. जागतिक पातळीवर जात, वर्णभेद, वंशभेद अशा विषयांवर महत्त्वाचा विचारवंत म्हणून सूरजकडे पाहिलं जातं. सूरजनं द रॅडिकल इन आंबेडकर या पुस्तकाचं संपादन केलंय. त्याशिवाय त्याचं ‘कास्ट मॅटर्स’ हे पुस्तक जगभर गाजलं. संशोधन, व्याख्यानं, लेखनाच्या माध्यमातून तो तरुणांना प्रेरित करतो. २०२१ मध्ये (GQ Most Infulencial Young Indians) च्या यादीत त्याचा समावेश होता. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्याचा सन्मान झालाय. जागतिक पातळीवर ठसा उमटवलेल्या सूरजचं काम प्रत्येक महाराष्ट्रीयासाठी अभिमानास्पद आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या विद्यापीठातून सूरजनं पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्ड विद्यापीठाची दू बोईस फेलोशिप मिळवणारा तो पहिला भारतीय आहे. त्यानं आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका या चार खंडांमध्ये शिक्षण घेतलं आहे. जात, वर्णभेद, वंशभेद या विषयांवरील जागतिक पातळीवरील महत्त्वाचा विचारवंत म्हणून सूरजकडे पाहिलं जातं. ‘कास्ट मॅटर्स’ हे त्याचं पुस्तक जगभर गाजलं.
परंपरेला नवा साज
सायली मराठे –उद्योग आणि रोजगारनिर्मिती
आपली आवड, आपल्या छंदाकडे गांभीर्यानं पाहिलं, तर त्यात उत्तम करिअर घडवता येतं हे पुण्याच्या सायली मराठेनं दाखवून दिलंय. परदेशात उत्तम नोकरी सुरू असताना छंद म्हणून सायली हँडमेड दागिने करायची. समाजमाध्यमातून या दागिन्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला आणि सायलीचं आयुष्यच बदललं. नोकरी सोडून पूर्णवेळ दागिन्यांच्याच क्षेत्रात काम करायचा धाडसी निर्णय सायलीनं घेतला आणि जन्म झाला ‘आद्या’ या ब्रँडचा.. चांदीचे हँडमेड आणि मोल्ड दागिने ही आद्याची खासियत. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत केलेल्या या दागिन्यांना जगभरातून पसंतीची पावती मिळतेय. छोटयाशा खोलीत सुरू झालेला हा उद्योग आता साडेआठ हजार चौरस फुटांच्या सुसज्ज दालनापर्यंत पोहोचलाय. त्यातून २५ पेक्षा जास्त कलाकारांना रोजगार मिळालाय, देश-विदेशात आद्याचे दागिने पोहोचलेत, वर्षांगणिक उलाढाल वाढतेय. चांदीच्या दागिन्यांमध्ये लोकप्रिय ब्रँड म्हणून आद्याचं नाव घेतलं जातं. उद्योग क्षेत्रातील सायलीच्या या कामगिरीची दखल घेऊन तिला निती आयोगाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. स्वत:चं वेगळं काही करू पाहणाऱ्या मुलींसाठी सायली मराठे नक्कीच प्रेरणादायी आहे.
सायलीने पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत केलेल्या या चांदीच्या हँडमेड आणि मोल्ड दागिन्यांना जगभरातून पसंतीची पावती मिळतेय. छोटया खोलीत सुरू झालेला हा उद्योग आता साडेआठ हजार चौरस फुटांच्या सुसज्ज दालनापर्यंत पोहोचलाय. २५ पेक्षा जास्त कलाकारांना रोजगार मिळालाय, देश-विदेशात दागिने पोहोचलेत, वर्षांगणिक उलाढाल वाढतेय.
मेहनतीची जोड
ओजस देवतळे – तिरंदाजी
क्रिकेट, टेनिस, फुटबॉल यांसारख्या खेळांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र नागपूरचा तिरंदाज ओजस देवतळेची आज देशातल्या घराघरात चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या ओजसच्या तिरंदाजीच्या आवडीला त्याच्या पालकांनी प्रोत्साहन दिलं. या प्रोत्साहनाला ओजसनं मेहनतीची जोड दिली. नागपूरमध्ये तिरंदाजीचे प्राथमिक धडे गिरवत राष्ट्रीय स्पर्धेत कपाऊंड प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. तिरंदाजीच्या अधिक चांगल्या सरावासाठी नागपूर सोडून त्यानं साताऱ्यात सराव सुरू केला. आशिया चषक, विश्वचषक अशा प्रत्येक स्पर्धेगणिक आपलं लक्ष्य अधिक उंचावत हांगझो आशियाई स्पर्धेत तीन सुवर्णपदकं मिळवली. बर्लिनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय तिरंदाज ठरला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या ओजसच्या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारनं त्याला अर्जुन पुरस्कारानं गौरवलंय. मेहनतीच्या जोरावर तिरंदाजीसारख्या खेळात करिअर घडवता येऊ शकतं, हे ओजसनं सिद्ध केलंय. आशियाई, जागतिक स्पर्धामध्ये हमखास यश मिळवून देणाऱ्या तिरंदाजीकडे मुलांनी वळावं, यासाठी ओजस प्रेरणादायी ठरलाय.
ओजसने नागपूरमध्ये तिरंदाजीचे प्राथमिक धडे गिरवत राष्ट्रीय स्पर्धेत कपाऊंड प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. तिरंदाजीच्या अधिक चांगल्या सरावासाठी नागपूर सोडून त्यानं साताऱ्यात मुक्काम हलवला. आशिया चषक, विश्वचषक अशा प्रत्येक स्पर्धेगणिक आपलं लक्ष्य अधिक उंचावत त्याने हांगझो आशियाई स्पर्धेत तब्बल तीन सुवर्णपदकं मिळवली.
वाचनाचा उद्योग
ऋतिका वाळंबे – नवउद्यमी
हल्ली कोणी वाचत नाही ही रडकथा नेहमीचीच.. पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि लोकही स्वत:हून पुस्तकांपर्यंत पोहोचत नाहीत, हे परिचयाचं चित्रं. पण जोडूनिया जन उत्तम वाचावे, चैतन्य पसरवावे प्रत्येक घरी या ध्येयानं कार्यरत आहेत पुस्तकवाले.. करोनाच्या कठीण काळात पुस्तकंच आपल्याला चांगली सोबत करू शकतात या विचारातून पुण्यातल्या ऋतिका वाळंबे या वाचनप्रेमी तरुणीनं पुस्तकं घरोघरी पोहोचवण्यासाठी पुस्तकवाले हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला आणि त्याचं नवउद्यमीमध्ये रूपांतर झालं. सोसायटया, शाळा, कार्यालयांमध्ये जाऊन पुस्तकवाले विविध भाषांतील पुस्तकं उपलब्ध करून देतात. पुस्तकं वाचकांपर्यंत नेली, की लोक ती वाचतात हे पुस्तकवालेंनी सिद्ध केलंय. ऋतिकानं पुस्तकवालेच्या माध्यमातून गेल्या साडेतीन वर्षांत आठशेहून अधिक सोसायटयांमध्ये, ३० हजारांहून अधिक कुटुंबांमध्ये ८० हजारांहून अधिक पुस्तकं पोहोचवलीयेत. यातून ५० तरुणांना रोजगार मिळालाय. ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती, गुलजार अशा मान्यवरांनी पुस्तकवाले या उपक्रमाचं कौतुक केलंय, विविध पुरस्कारांनी या उपक्रमाचा सन्मानही झालाय. ऋतिकाचं काम महत्त्वाचं आहे कारण ती वाचनाचा संस्कार नव्या पिढीपर्यंत नेते आहे.
करोनाच्या काळात पुस्तकंच आपल्याला चांगली सोबत करू शकतात या विचारातून पुण्यातल्या ऋतिका वाळंबे या वाचनप्रेमी तरुणीनं पुस्तकं लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी पुस्तकवाले हा उपक्रम सुरू केला. सोसायटया, शाळा, कार्यालयांमध्ये जाऊन पुस्तकवाले विविध भाषांतील पुस्तकं उपलब्ध करून देतात. त्याचं आता नवउद्यमीमध्ये रूपांतर झालं आहे.
पथदर्शी बुद्धिमत्ता
दिव्या देशमुख– बुद्धिबळ
प्रत्येक खेळात बुद्धीला बळाची जोड द्यावी लागते. पण ६४ घरांच्या बुद्धिबळात बळाऐवजी बुद्धीच वापरावी लागते. प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा वेध घेऊन शांतपणे आपली खेळी खेळावी लागते. अशाच शांतपणानं नागपूरच्या दिव्या देशमुखनं बुद्धिबळाच्या जागतिक पटावर आपली ओळख निर्माण केलीय. दिव्याचा बुद्धिबळाकडे असलेला कल तिच्या डॉक्टर असलेल्या आई-वडिलांनी ओळखून तिला प्रोत्साहन दिलं. स्थानिक स्पर्धानंतर दिव्यानं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवलं. आशियाई युवा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकं मिळवून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. कोलकात्यात झालेल्या टाटा स्टील स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत रॅपिड प्रकारात अजिंक्यपद मिळवून दिव्यानं आपली नोंद अवघ्या बुद्धिबळ विश्वाला घ्यायला लावली. राज्य सरकारनं दिव्याला श्री शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलंय. महिला क्रीडापटूंची चर्चा त्यांच्या खेळातल्या दर्जासंदर्भातच व्हावी, असं ठामपणे सांगणारी दिव्या लहान वयातच पथदर्शी ठरते. दिव्या देशमुख उत्तम बुद्धिबळपटू तर आहेच, पण स्वत:च्या हक्कांविषयीदेखील अतिशय जागरूक आहे या जाणिवेतून तिच्याविषयी आदर अधिकच दुणावतो.
आशियाई युवा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकं मिळवून दिव्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. कोलकात्यात झालेल्या टाटा स्टील स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत रॅपिड प्रकारात अजिंक्यपद मिळवून दिव्यानं आपली नोंद अवघ्या बुद्धिबळ विश्वाला घ्यायला लावली. राज्य सरकारनं दिव्याला श्रीशिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलंय.
सुरेल कारकीर्द
प्रियांका बर्वे – गायिका अभिनेत्री
आपल्याला लाभलेल्या वारशाला सर्जनाची जोड दिली, की आपली स्वत:ची ओळख निर्माण होते. पुण्याची गायिका अभिनेत्री प्रियांका बर्वेच्या बाबतीत हेच घडलं. प्रियांकाला तिची आजी मालती पांडे यांच्याकडून आणि वडिलांकडून संगीताचा वारसा मिळालाय. तर आईकडून साहित्याची पार्श्वभूमी लाभलीय. शास्त्रीय संगीताचे धडे गिरवल्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षांपासून तिनं पार्श्वगायिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. गायक राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेल्या संगीत नाटकांतील तिच्या अभिनयाला दाद मिळाली. मुघल ए आझम या चित्रपटाच्या ब्रॉडवे नाटकात तिनं अनारकलीची भूमिका साकारलीय. तिने डबल सीट, मुंबई पुणे मुंबई २, अजंठा अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी तसंच पानिपत या हिंदी चित्रपटासाठी गायन केले आहे. अनेक मराठी मालिकांची शीर्षकगीते तिने गायली आहेत. गायिका अभिनेत्री म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. नव्या पिढीतल्या महत्त्वाच्या गायिकांमध्ये प्रियांकाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आकाशवाणीच्या गजम्ल स्पर्धेत ती भारतातून पहिली आली आहे.
वयाच्या सतराव्या वर्षांपासून प्रियांकाने पार्श्वगायिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. गायक राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेल्या संगीत नाटकांतील तिच्या अभिनयाला दाद मिळाली. मुघल ए आझम या चित्रपटाच्या ब्रॉडवे नाटकात तिनं अनारकलीची भूमिका साकारली. डबल सीट, मुंबई पुणे मुंबई २, अजंठा अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी ती गायली आहे.
नव्याचा शोध
प्रिया बापट –अभिनय, निर्मिती
आपल्याला काय आवडतं, कशात रस आहे हे लक्षात घेतलं, तर यशाचा मार्ग दिसू शकतो. वयाच्या दहाव्या वर्षांपासून बालकलाकार म्हणून काम केलेल्या मुंबईच्या प्रिया बापटनं आपली आवड ओळखली आणि ती जोपासलीही.. नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका करून अभिनेत्री म्हणून आपलं वेगळेपण तिनं दाखवून दिलंय. प्रियानं भूमिकांच्या लांबीपेक्षा त्यांची खोली अधिक महत्त्वाची मानली. भूमिकांमधलं वैविध्य जपतानाच प्रत्येक भूमिकेची गरज ओळखून त्यासाठी आवश्यक असलेली मेहनत प्रिया घेते. त्यामुळेच मराठीसह हिंदीतलं तिचं आजवरचं काम लक्षवेधी ठरलंय. अभिनयासह प्रियाला गायनाचीही आवड आहे. टीव्ही मालिका, चित्रपट, वेब मालिकांमध्ये कार्यरत असतानाच रंगभूमीवरचं तिचं प्रेम कमी झालेलं नाही. म्हणूनच अभिनयासह तिनं ‘दादा, एक गुड न्यूज आहे’, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकांची प्रस्तुती केली. भारतीय विणकरांना मदत करण्यासाठी प्रियाने तिच्या बहिणीबरोबर एक ब्रॅण्डही विकसित केला आहे. तिच्या अभिनयाचा विविध पुरस्कारांनी गौरव झालाय. नव्याच्या आणि वेगळेपणाच्या शोधातूनच प्रियानं आजवरची वाटचाल केली आहे.
भूमिकांमधलं वैविध्य जपतानाच प्रत्येक भूमिकेची गरज ओळखून त्यासाठी आवश्यक असलेली मेहनत प्रिया घेते. त्यामुळेच मराठीसह हिंदीतलं तिचं आजवरचं काम लक्षवेधी ठरलंय. अभिनयासह प्रियाला गायनाचीही आवड आहे. मालिका, चित्रपट, वेब मालिकांमध्ये कार्यरत असतानाच तिनं ‘दादा, एक गुड न्यूज आहे’, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकांची प्रस्तुती केली आहे.
सामाजिक संवेदना
अतुल कुलकर्णी –प्रशासकीय अधिकारी
पोलिसांचं मुख्य काम कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारांना शासन करणं.. पण त्या पलीकडे जाऊन काही सहृदयी, संवेदनशील पोलीस अधिकारी समाजाभिमुख होऊन काम करतात.. धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यापैकी एक.. पारधी समाजासह गुन्हेगारांचं पुनर्वसन, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतुलनं पहाट हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण, स्वमदत गट, गुन्हेगारांना दत्तक घेणं, पर्यायी उपजीविकेची व्यवस्था, शिक्षण अशा विविध स्तरांवर काम केलं जातं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतकरी प्रेरणा अभियानही राबवलं जातं. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली. अतुलच्या अभिनव उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे परिणामही दिसू लागले. शेतकरी प्रेरणा अभियानातून ३६५ विवाद निकाली काढण्यात आले. पारधी समाजातील मुली पोलीस प्रशिक्षणासाठी तयार होऊ लागल्यात. शेतकरी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रयोग करू लागलेत. अतुलच्या या कामाची दखल विविध पुरस्कारांच्या रूपात घेण्यात आलीय.
पारधी समाजासह गुन्हेगारांचं पुनर्वसन, करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतुलनं पहाट हा उपक्रम सुरू केला. त्यात प्रशिक्षण देणं, स्वमदत गट तयार करणं, गुन्हेगारांना दत्तक घेणं, त्यांच्या पर्यायी उपजीविकेची व्यवस्था, शिक्षण अशा विविध स्तरांवर काम केलं जातं. याचाच भाग म्हणून पारधी समाजातील मुली पोलीस प्रशिक्षणासाठी तयार होऊ लागल्यात.
प्रेम आणि करुणा
नेहा पंचमिया– प्राणीमात्रांची काळजी
सध्याच्या तथाकथित विकसित जगात खऱ्या जंगलांची जागा आता सिमेंटची जंगलं घेतायत आणि त्यातून निर्माण होतायत प्राण्यांचे नवे प्रश्न.. अशाच प्राण्यांना मदतीचा हात देतेय पुण्याची नेहा पंचमिया.. प्राणिप्रेमी नेहा इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेऊन भारतात परतली. जखमी प्राणी पाहून नेहाचं मन दुखावत होतं. म्हणून जखमी प्राण्यांच्या सेवेसाठी नेहानं २००७ मध्ये रेक्यू फाऊंडेशनची स्थापना केली. पशुवैद्यकाकडे रीसतर शिक्षण घेऊन सुरुवातीला श्वान, मांजरांवर उपचार सुरू केले. तिच्या या कामाला प्रतिसाद मिळत गेला. नेहाची रेक्यू फाऊंडेशन पाळीव प्राण्यांशिवाय वन विभागाच्या परवानगीनं वन्यजीवांची सुटका, त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा अधिवासात सोडण्याचंही काम करते. नेहाच्या प्रशिक्षण उपक्रमातून आतापर्यंत दहा संस्था उभ्या राहिल्यात. रेस्क्यू संस्था आता राज्याच्या वेगवेगळया भागांत कार्यरत आहेत. दर महिन्याला किमान ५०० वन्यजीवांची सुटका, त्यांची देखभाल केली जाते. नेहाच्या संस्थेत ७५ प्रशिक्षित कार्यकर्ते काम करतायत. वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण करण्याचं कामही ती करते. तिच्या या कामगिरीची दखल अनेक पुरस्कारांनी घेण्यात आलीय.
जखमी प्राण्यांच्या सेवेसाठी नेहानं २००७ मध्ये रेक्यू फाऊंडेशनची स्थापना केली. रेस्क्यू संस्था आता राज्याच्या वेगवेगळया भागांत कार्यरत आहेत. दर महिन्याला किमान ५०० वन्यजीवांची सुटका, देखभाल केली जाते. नेहाच्या संस्थेत ७५ प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण करतात.
शिक्षण हाच पर्याय
राजू केंद्रे – सामाजिक तसेच शिक्षण क्षेत्र
जिद्दीच्या जोरावर कोणत्याही अडचणींवर मात करता येते. बुलढाण्याजवळच्या पिंप्री खंदारे या गावातील भटक्या समाजातील राजू केंद्रेनं जिद्दीच्या जोरावरच यशाला गवसणी घातलीय. घरची गरिबी आणि मार्गदर्शनाचा अभाव असलेला राजू उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेला. सामाजिक आणि आर्थिक अडचणींमुळे पुणं सोडावं लागलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करतानाच मेळघाटात समाजकार्य सुरू झालं. तिथली परिस्थिती पाहून अस्वस्थ झालेल्या राजूचं आयुष्य बदललं. ग्रामीण भागातील आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी त्यानं एकलव्य इंडिया फाऊंडेशनची स्थापना केली. ब्रिटिश सरकारची चेविनग शिष्यवृत्ती मिळवून युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आजवर सातशेहून अधिक मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळालीय, वंचित गटातील किमान दोन हजार विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी देण्यासाठी ग्लोबल स्कॉलर्स हा उपक्रम त्यानं सुरू केलाय. राजूच्या कामाची फोब्र्ज, ब्रिटिश कौन्सिलसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दखल घेतलीय. त्याला अनेक फेलोशिप आणि पुरस्कारही मिळालेत.
आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी राजू केंद्रे याने एकलव्य इंडिया फाऊंडेशनची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून आजवर सातशेहून अधिक मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. वंचित समूहातील किमान दोन हजार विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी देण्यासाठी ग्लोबल स्कॉलर्स हा उपक्रम त्यानं सुरू केला आहे.
प्रयोगशील उद्योजक
अनंत इखार – उद्योगातून अनेकांना रोजगार
स्पर्धा परीक्षांमधील यशवंतांच्या यशोगाथा आपल्याला नेहमीच ऐकायला, वाचायला मिळतात. पण भंडारा जिल्ह्यातील अनंत इखार या तरुणानं स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश येऊनही स्वत:च्या आयुष्याची यशोगाथा घडवलीय. गणितामध्ये पदव्युत्तर पदवी असून स्पर्धा परीक्षांचं गणित सोडवता आलं नाही. मग खचून न जाता अनंतनं स्वत:चा अळंबी अर्थात मशरूम शेतीचा उद्योग सुरू केला. त्याला प्रयोगशीलतेची जोड देऊन मशरूम फेसपॅक, मशरूम चॉकलेट, मशरूम जॅम अशी अनेक उत्पादनं विकसित केली. समाजमाध्यमं वापरून या प्रचार-प्रसार करत उत्पादनांसाठी ग्राहकही मिळवला. ‘पायलट’ या नावानं लाखोंची उलाढाल असलेला उद्योग उभारणाऱ्या अनंतची मशरूम आणि उत्पादनं आज राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पोहोचलीयेत, पाच जिल्ह्यांमध्ये त्याची कार्यालयं आहेत. त्या माध्यमातून महिला बचत गट, युवकांना रोजगार मिळालाय. शेती, उद्योग क्षेत्रातील अनंतच्या कामगिरीची दखल घेऊन त्याचा विविध पुरस्कारांनी सन्मानही झालाय. खेडयात काय ठेवलंय, असा विचार करून शहराची वाट धरणाऱ्या ग्रामीण तरुणांसाठी अनंत इखार नक्कीच आदर्शवत आहे.
स्पर्धा परीक्षेतील अपयशाने खचून न जाता अनंतनं स्वत:चा अळंबी अर्थात मशरूम शेतीचा उद्योग सुरू केला. त्याला प्रयोगशीलतेची जोड देऊन मशरूम फेसपॅक, मशरूम चॉकलेट, मशरूम जॅम अशी अनेक उत्पादनं विकसित केली. समाजमाध्यमं वापरून ग्राहकही मिळवला. त्या माध्यमातून अनेक महिलांना, तरुणांना रोजगार मिळवून दिला.
दातांनी तिरंदाजी
अभिषेक ठावरे –अपंगत्वावर यशस्वी मात
प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं. नागपूरचा तिरंदाज अभिषेक ठावरेनं तेच केलं. पोलिओमुळे उजवा हात अधू होऊनही अभिषेक खचला नाही. तिरंदाजी करण्यासाठी अभिषेकनं हाताऐवजी दाताचा वापर सुरू केला. त्याच्या या जिद्दीला आई-वडिलांनीही प्रोत्साहन दिलं. आईनं तर दागिने गहाण ठेवून अभिषेकला तिरंदाजीचं साहित्य आणून दिलं. तिरंदाजीतील नवी वाटचाल सुरू झाली आणि भारतातला पहिला टीथ आर्चर म्हणून अभिषेकचं नाव नोंदवलं गेलं. अभिषेकनं अनेक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. तो स्वत: तर खेळतोच शिवाय आता इतर तिरंदाजांना प्रशिक्षणही देतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली चार तिरंदाज राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेत. पॅराऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवण्याचं अभिषेकचं स्वप्न आहे आणि त्यासाठी तो जीवतोड मेहनतही घेतोय. अलीकडच्या काळात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धाप्रमाणेच त्यांच्या संलग्न पॅरा स्पर्धामध्येही भारताची कामगिरी लक्षवेधी ठरू लागली आहे. पॅरा किंवा अपंग क्रीडापटूंच्या कामगिरीलाही मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे धोरण आहे. याचा लाभ देशातील अनेक युवा अपंग क्रीडापटू घेताना दिसत आहेत.
पोलिओमुळे उजवा हात अधू झालेल्या अभिषेकने खचून न जाता तिरंदाजी करण्यासाठी हाताऐवजी दाताचा वापर सुरू केला. भारतातला पहिला टीथ आर्चर म्हणून अभिषेकचं नाव नोंदवलं गेलं आहे. तो स्वत: तर खेळतोच शिवाय आता तो इतर तिरंदाजांना प्रशिक्षणही देतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली चार तिरंदाज राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेत.
छंदातून व्यवसाय
निषाद बागवडे – कल्पकतेचा व्यवसाय
अंगभूत कल्पकतेला प्रयत्नांची जोड दिली तर नवनिर्मिती घडते, याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. अशांपैकीच एक आहे, पुण्याचा निषाद बागवड. त्यानं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी केली. पण त्याच्यामध्ये असलेली कल्पकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. डॉक्टर आणि चित्रकार असलेल्या आई-वडिलांची चित्रकला स्वत:पुरतीच सीमित राहिल्याचं निषादनं पाहिलं होतं. म्हणूनच मोठया कंपनीतली नोकरी सोडून त्यानं नवोदित कलाकारांना संधी मिळण्यासाठी ‘हॉबीज स्टफ’ हे व्यासपीठ निर्माण केलं. वयाच्या १८ व्या वर्षी प्रयोग म्हणून केलेल्या मोटर व्हीलचेअरचं व्यवसायात रूपांतर करण्यासाठी पेटंट दाखल केलं. विशेष म्हणजे, बॅटरीवर चालणाऱ्या या व्हीलचेअरला तिसरं चाकही जोडता येतं. सारथी असं नाव असलेली ही व्हीलचेअर घरात, रस्त्यावर चालते आणि छोटी करून गाडीतही ठेवता येते.
निषादच्या ‘हॉबीज स्टफ’मुळे अनेक चित्रकार, हस्तकलाकारांना उत्पन्न मिळमू लागलंय, मोटर व्हीलचेअर आता विक्रीसाठी उपलब्ध झालीय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी निषादच्या कामगिरीची दखल घेतलीय, निषादचा पुरस्कारांनी सन्मानही झालाय.
नवोदितांना संधी मिळवून देण्यासाठी निषादनं ‘हॉबीज स्टफ’ हे व्यासपीठ निर्माण केलं. त्यामुळे अनेक चित्रकार, हस्तकलाकारांना उत्पन्न मिळमू लागलं. १८ व्या वर्षी प्रयोग म्हणून केलेल्या मोटर व्हीलचेअरचं व्यवसायात रूपांतर करण्यासाठी त्याने पेटंट दाखल केलं. बॅटरीवर चालणारी ही व्हीलचेअर घरात, रस्त्यावर चालते आणि छोटी करून गाडीतही ठेवता येते.
सरस्वतीचा वरदहस्त
ज्ञानेश्वर जाधवर – साहित्यलेखन, संशोधन
आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी वैचारिक श्रीमंती असल्यावर यश मिळवणं फार अवघड नसतं. मात्र हे सिद्ध करून दाखवण्याचा प्रवास मोठाच खडतर असतो. बार्शीजवळच्या छोटयाशा गावातल्या ज्ञानेश्वर जाधवरनं मोठया कष्टातून आजच्या यशापर्यंतचा प्रवास केलाय. गरीब, अशिक्षित ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेला ज्ञानेश्वर त्याच्या कुटुंबातला पहिलाच पदवीधर. आपल्या आजूबाजूचं जग, तिथले प्रश्न आणि जगणं शब्दांत मांडण्याची ऊर्मी त्याच्यात निर्माण झाली. यसन, कूस, लॉकडाऊन आणि आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य या चार कादंबऱ्यातून त्यानं परिघाबाहेरचे विषय मांडले. लॉकडाऊन कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद झालाय. त्याशिवाय एकांकिका, नाटक, कथा असे साहित्य प्रकारही त्यानं हाताळलेत. स्वत: पीएच.डी. करत असलेल्या ज्ञानेश्वरच्या कादंबऱ्यांवर सात विद्यार्थी पीएच.डी. करतायत. त्याच्या लॉकडाऊन कादंबरीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध लिहिले गेलेत. ज्ञानेश्वरच्या यसन कादंबरीला प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन होतं. राज्य वाङ्मय पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्याचा सन्मान झाला आहे. ज्ञानेश्वरसारखे तरुण लेखकच मराठी साहित्याला नवे आयाम देतायत, नव्या उंचीवर नेतायत.
यसन, कूस, लॉकडाऊन तसंच आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य या चार कादंबऱ्यांतून ज्ञानेश्वरनं परिघाबाहेरचे विषय मांडले. लॉकडाऊन कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद झालाय. एकांकिका, नाटक, कथा असे साहित्य प्रकारही त्यानं हाताळलेत. स्वत: पीएच.डी. करत असलेल्या ज्ञानेश्वरच्या कादंबऱ्यांवर पीएच.डी. केली जात आहे.
सकस निर्मिती
वरुण नार्वेकर – लेखन आणि दिग्दर्शन
नाटक, चित्रपट, जाहिरातींसारख्या माध्यमात मनोरंजनाच्या पलीकडे सकस आशयनिर्मिती करता येते हे पुण्याच्या वरुण नार्वेकरनं दाखवून दिलंय. त्याच्या कामाची सुरुवात अगदी तरुणपणापासून झाली. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या वरुणनं सुरुवात प्रायोगिक रंगभूमीवर केली. तिथं त्यानं विविध नाटकांचं लेखन-दिग्दर्शन केलं. त्यातूनच त्याची लेखक- दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण होऊ लागली. त्यानंतर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत दृकश्राव्य माध्यमाचं व्याकरण समजून घेतलं. मुरांबा हा त्याचा पहिलाच चित्रपट महोत्सवांमध्ये आणि व्यावसायिकदृष्टयाही यशस्वी ठरला, या चित्रपटाचा गुजरातीमध्ये रिमेक झाला. आपल्या आजूबाजूच्या, जगण्यातल्या गोष्टी सांगत जाहिरातीही आशयसमृद्ध करता येऊ शकतात हे वरुणनं दाखवून दिलं. त्यानं दिग्दर्शित केलेल्या कित्येक जाहिराती ‘व्हायरल’ झाल्या. वरुणनं आतापर्यंत चित्रपट, वेब मालिका, अनेक जाहिरातीचं लेखन, दिग्दर्शन केलंय. त्यातून त्यानं आजच्या समाजातले प्रश्न, मुद्दे, विषय गोष्टींच्या माध्यमातून हाताळले. काही वेळा नवा विचारही दिला. वरुणच्या कलाकृतींचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झालाय.
महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या वरुणनं सुरुवात प्रायोगिक रंगभूमीवर केली. तिथं त्यानं विविध नाटकांचं लेखन-दिग्दर्शन केलं. त्यानंतर त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत दृकश्राव्य माध्यमाचं व्याकरण समजून घेतलं. मुरांबा हा त्याचा पहिलाच चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजला गेला आणि व्यावसायिकदृष्टयाही यशस्वी ठरला.
संवेदनशील मनोरंजन
हेमंत ढोमे अभिनय, लेखन, दिग्दर्शन
सध्याचा काळ कौशल्यांचा आहे.. मुळचा पुण्याच्या असलेला हेमंत ढोमे नाटक, टीव्ही मालिका, चित्रपटांच्या क्षेत्रात बहुकौशल्य आत्मसात करत यशाच्या पायऱ्या चढला आहे. घरामध्ये नाटक, चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याला नाटकाची गोडी लागली आणि महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये त्यानं एन्ट्री घेतली. ‘लूज कंट्रोल’ या हेमंतच्या प्रायोगिक नाटकाची खूप चर्चा झाली, या नाटकाचे देशविदेशात खूप प्रयोग झाले. त्यानंतर मात्र हेमंतनं मागे वळून पाहिलं नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं, अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करत उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या. विनोदावर विशेष प्रेम असलेल्या हेमंतनं आपल्या कलाकृतीतून मनोरंजन करतानाच स्त्रीभ्रूण हत्या, शेतीविषयीची उदासीनता, गडकिल्ल्यांचं संवर्धन असे विषय चित्रपटांत आणून हळुवारपणे हाताळून स्वत:मधल्या संवेदनशीलतेचं दर्शनही घडवलं. हेमंतनं त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत १२ चित्रपटांचं लेखन, सहा चित्रपटांचं दिग्दर्शन आणि तीन चित्रपटांची निर्मिती केलीय. तसंच अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केलाय. त्याच्या कलाकृतींचा विविध पुरस्कारांनी सन्मान झालाय.
‘लूज कंट्रोल’ या हेमंतच्या प्रायोगिक नाटकाची खूप चर्चा झाली. त्यानंतर हेमंतनं मागे वळून पाहिलं नाही. त्याने प्रत्येक संधीचं सोनं केलं, अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करत उत्तमोत्तम कलाकृती दिल्या. विनोदावर विशेष प्रेम असलेल्या हेमंतनं आपल्या कलाकृतीतून मनोरंजन करताना गंभीर विषयही संवेदनशीलतेने हाताळले.