सध्या ज्ञानरचनावाद असा शब्दप्रयोग शिक्षकांमध्ये परवलीचा झाला आहे. आयुक्तांपासून ते शिक्षकांपर्यंत हा शब्द उच्चारला पाहिजे, असा दंडक असल्यासारखे वातावरण आहे. मात्र, ही अवघड संकल्पना शिकवण्यात कशी उतरवायची, हे औरंगाबादच्या वरवंटी तांडय़ावरील जिल्हा परिषदेच्या शाळेने दाखवून दिले आहे.
अध्ययन-अध्यापनाचा दर्जा वधारावा म्हणून २५ वर्षांपूर्वी ‘बिहार एज्युकेशन प्रकल्प’ केंद्र सरकारने सुरू केला. यातून पुढे ‘डीपीईपी’ नावाचा प्रकल्प ३०० जिल्ह्य़ांमध्ये राबविण्यात आला. तो संपला तेव्हा कळले की प्रत्येक मुलाचे स्वतंत्र अस्तित्व असते. त्याचा स्वत:चा भवताल असतो. त्यातून त्याची जडणघडण होत असते. शिक्षकाला त्याला शहाणं करण्यासाठी केवळ ‘उत्प्रेरक’ म्हणून काम करायचे असते. ‘वरवंटी तांडा-२’ या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे भरत काळे आणि त्यांचे सहकारी ‘शिक्षक’ म्हणून आपली ही ‘उत्प्रेरका’ची भूमिका अत्यंत ताकदीने वठवीत आहेत.
औरंगाबादपासून २३ किलोमीटर अंतरावर वरवंटी तांडय़ावरील डोंगरमाळावरची ही शाळा ऊसतोड पालकांच्या मुलांची. गावची वस्ती अवघी २७ कुटुंबांची. पण काळे आणि इतर शिक्षकांनी शाळेत प्रवाहित केलेल्या ज्ञानाच्या गंगेमुळे भोवतालच्या गावांतूनही मुले याच शाळेत येतात. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत १७१ विद्यार्थी. पूर्वी शाळांमध्ये ‘आनंददायी शिक्षण’ म्हणजे मुलांना केवळ गाणी शिकवा, असे वातावरण होते. एखादा पाहुणा शाळेत आला की, मुले एका आवाजात तीन-चार गाणी म्हणून दाखवायची. तो अधिकारी खूश व्हायचा. शाळा खूप चांगली म्हणत निघून जायचा. पण आता ‘ज्ञानरचनावादी’ शिक्षणामुळे अध्यापन-अध्ययनाची प्रक्रियाच बदलून गेली आहे. ही अवघड संकल्पना शाळेने नेमकेपणाने उतरवली आहे.
गणित कोठे चुकते?
बेरीज-वजाबाकीत हातचा घ्यायला मुले विसरतात. कारण एकक, दशक ही संकल्पनाच स्पष्ट नसते. काळे सरांनी दहा काडय़ांचे गठ्ठे केले. आधी सुटय़ा काडय़ा मोजायच्या. मग त्या बांधायच्या. दहा काडय़ा म्हणजे दशक. हे हळूहळू मूल शिकते. चुकणारे गणित दुरुस्त करण्यासाठी मग मणी, चिंचोके अशा कितीतरी वस्तू वर्गभर पसरलेल्या. फरशीभर गणिताची रांगोळी. कधी त्यातच मराठीचा अभ्यास. एका रिंगणात एक अक्षर. त्या रिंगणाभोवती अनेक वर्तुळे. त्या प्रत्येकात एक अक्षर. शिक्षकाने सांगायचे- करा नवीन शब्द. मुलं कामाला लागतात. कधी भाषा शिकतात तर कधी गणित. विषयांचे कप्पेच शाळेला मान्य नाहीत.
प्रश्न विचारा आम्हाला?
मुले कशी प्रश्न विचारतील? पालक ऊसतोड करणारे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रश्न असून असून असतील काय, असे म्हणाल तर प्रश्नांचे स्वरूप पाहून हबकून जायला होईल. इंजेक्शनला मराठीत काय म्हणतात? वडाच्या झाडाची पूजा का करायची? शिक्षकांना अशा प्रश्नांची उत्तरे माहीत असायला हवीत, असे आपण म्हणू. पण आपल्यापकी अनेकांना त्याची उत्तरे माहीत नसतात. अशी उत्तरे शोधणारी शाळा, अशी वरवंटी तांडय़ाची आता ओळख बनत आहे. शाळेत एक प्रश्नाची पेटी आहे. त्यात मुले प्रश्न टाकतात आणि दोन प्रश्नांची उत्तरे शिक्षक देतात. ती उत्तरे शोधण्यासाठी कधी पुस्तके तर कधी इंटरनेटचा वापर करतात.
शब्दांचा खेळ
वर्गात जाताना मुलांच्या नजरेसमोर रोज एक नवा इंग्रजी शब्द ठेवायचा. तो वाचून पाठ करायला सांगायचा, हा शिरस्ताच. शाळा वर्षभरात २२० दिवस चालते. वर्षभरात प्रत्येक मुलाचे किमान तेवढे अवघड शब्द पाठ होतात. हा शब्द मुलांनीच शोधायचा. तो फळ्यावर लिहायचा. शब्दांचा असा खेळ वर्षभर सुरू असतो. परिपाठात एक दिवस बोधकथेचा. ती कथा मोडक्या-तोडक्या भाषेत का असेना मुलांनी इंग्रजीत सांगावी, असा शिक्षकांचा आग्रह. मराठीसाठी वेगळा प्रयोग. तीन शब्द सांगायचे. त्या शब्दापासून वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्य पहिल्या वाक्याशी सुसंगत असले पाहिजे, असा नियम. त्यातून गोष्ट निर्माण व्हावी, असा प्रत्येकाने प्रयत्न करायचा.
शब्दांचे झाड
यात उदाहरणार्थ कुंडीचे चित्र काढले जाते. खाली कुंडीत एक शब्द लिहायचा. उदाहरणार्थ पैसा. मुलांनी वरच्या फांद्यावर त्याच्याशी संबधित शब्द सांगायचे. योग्य शब्द कोणता हे शिक्षकांच्या मदतीने ठरवायचे. पैशाला संलग्न शब्द रुपये, चलन, बँक अशा शब्दांची जंत्रीच तयार होते. मुले शिकत जातात. परीक्षेत यातील किती येईल माहीत नाही, पण मुले शिकतील, असे शिक्षक आवर्जून सांगतात.
आम्हीच आमचे ग्रंथपाल, बँक मॅनेजर
दुपारची सुटी झाली की, मुलांची बँक उघडते. बँक अगदी खरोखरीची. शाळेच्या बँकेला मॅनेजर आहे. विजय चव्हाण त्याचे नाव. कॅशिअर दिशा चव्हाण दररोजचा हिशेब ठेवते. आता बँकेच्या खात्यात ७ हजार रुपयांची अनामत आहे. मुले पाच रुपयांपासूनची बचत करतात. बँकेचे हिशेब नीट ठेवले आहेत का, याची तपासणी मुलेच करतात. अगदी बँकेत ठेवतात तशी हिशेब वहीसुद्धा ठेवण्यात आली आहे. जशी बँक तसेच वाचनालय. गोष्टीच्या, वैज्ञानिकांवरच्या विविध पुस्तकांनी समृद्ध व अद्ययावत. ग्रंथालयाची जबाबदारीही मुलांवरच.
वर्षांतले दोन दिवस बिनदप्तराचे. त्या दिवशी सर्व मुलांसाठी चिखलाचा गोळा शिक्षकांनी करून ठेवलेला असतो. हवी ती वस्तू बनवायची. ही वस्तू प्रदर्शनात मांडायची असल्याने मुले या दिवसाची वाट पाहत असतात. सगळे उपक्रम गंमत येईल असे. मुलांना इंग्रजीत आठवडय़ाची नावे शिकवायची होती. एका मुलाच्या गळ्यात ‘संडे’ अशी पाटी लावली. मग तो म्हणतो ‘आय अ‍ॅम संडे’. दुसरा मुलगा पाटी धरून म्हणतो ‘आय अ‍ॅम मंडे’. आठवडय़ाचे वार लक्षात ठेवायची गरजच उरत नाही. मुले आपोआप शिकतात. कधी आठवडय़ाची नावे तर कधी महिन्यांची.
असे एक ना नाना उपक्रम शाळेत सुरू आहेत. काळे सर सतत मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. कामाविषयीच्या प्रेमामुळे एक प्रकारचे भारावलेपण काळे यांच्या ठायी आहे. शाळेच्या फरशी, भिंती असे ते ठायीठायी जाणवते. त्यामुळे त्याची बाधा इथे येणाऱ्या प्रत्येकाला न होईल तरच नवल!
अशी झाली अंमलबजावणी
गावच्या शाळेची इमारत नीट नव्हती. दुरुस्तीस पसाही नव्हता. शेवटी मुख्याध्यापकांनीच स्वतचे २५ हजार रुपये घातले. प्रत्येक शिक्षकाने १० हजार रुपये दिले. मग गावकरीही पुढे आले. त्यांनी ३ लाख ५० हजार रुपये गोळा केले. शाळेचे रूपडे पालटले. भिंती बोलू लागल्या. भिंतींचे फळे झाले. त्यावर मुले गिरवू लागले आणि ऐन दिवाळीत स्थलांतराच्या हंगामात मुलेच आई-वडिलांना गावीच राहणार असल्याचे सांगू लागली. शाळेत वाचनालय आहे. इमारतीवर सौर दिवे आहेत. शाळेत सर्व डिजिटल वस्तू आहेत. संगणक सौरऊर्जेवर चालतो. भोवताली बाग आहे. त्यात मुलेच भाजीपाला लावतात. शाळेला विद्युत देयक भरता न आल्याने वीज कापली गेली होती. आता सौरऊर्जेचा वापर असल्याने वीज बिल भरण्याची कटकटच संपली. शाळेचे मुख्याध्यापक आर. एल. ब्रह्मनाथ, जी. ए. बारी, ए. ई. गोरे, एस. पी. माणके या शिक्षक मंडळींचे दररोज नवीन उपक्रम आखणे सुरूच असते. आता शिक्षण विभागाने या उपक्रमांना ज्ञानरचनावादात सामावून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा