वारकरी संप्रदायात वारीला खूप महत्त्व आहे. जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी होय. आजही वारीची शिस्त हा अनेकांच्या कुतूहलाचा तर एक वेगळ्या भूमिकेतून अभ्यासाचाही विषय आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग असलेला हा वारीचा सोहळा येत्या मंगळवारपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने..

पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कारप्रवाह आहे. भक्तीची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते नैतिकतेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचे ज्ञानरूप उभे केले, तर भोळ्या भाविकांनी भक्तिभावाने त्याचे भावदर्शन अनुभवले. ज्याला ज्ञानाने जाणायचे ते ‘ज्ञेय’ आणि ज्याला ध्यानाने गाठायचे ते ‘ध्येय’ असे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य जिथे विटेवर समचरण उभे आहे, त्याला प्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा मेळा म्हणजे ‘वारी’ होय.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?

मानवी जीवनातील अपूर्णता, दोषमयता, मनुष्याची सदाचाराकडे धावणारी स्वाभाविक प्रवृत्ती, या व्यापक जनविश्वात आपल्या थिटेपणाची जाणीव, विश्वाची विशालता आणि नियमबद्धता यांचा जिज्ञासू भूमिकेतून अर्थ शोधल्याशिवाय परमार्थाची वाट सापडत नाही. ज्ञानेश्वर माउली म्हणतात –

पाठी महर्षि येणे आले।

साधकाचे सिद्ध झाले।

आत्मविद् थोरावले।

येणेचि पंथे।।

याच मार्गावरून महर्षी आले, साधक सिद्धावस्थेला गेले. हा मार्ग स्वच्छ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखीने पुणे मुक्काम सोडल्यानंतर पुढचा मुक्काम येतो तो सासवड गावी. सासवडच्या अगोदर वारीच्या वाटचालीत दिवे घाट लागतो. त्या घाटातून वाटचाल करताना वारीचे दृश्य अतिशय नयनमनोहर असते. टाळ -मृदंगांच्या गजरात झेंडे-पताकांचा भार घेऊन वारकऱ्यांचा जनप्रवाह सरसर वर सरकताना दिसतो. हा वर झेपावणारा प्रवाह पाहिल्यावर माझ्या मनात नाथांचे एक रूपक उभे राहते. नाथांचे ‘कोडे’ नावाचे एक भारूड आहे. त्यात त्यांनी वर्णिले आहे –

नाथाच्या घरची उलटीच खूण

पाण्याला मोठी लागली तहान

आज सई म्या नवल देखिले

वळचणीचे पाणी आढय़ा लागले

जगातला कोणत्याही द्रवाचा प्रवाह हा वरून खाली वाहत येतो. पाण्याचा प्रवाहदेखील वरून खालीच वाहत असतो. परंतु, हा व्यापक जनलोकांचा प्रवाह जेव्हा खालून वर वाहताना दिसतो, तेव्हा ‘वळचणीचे पाणी आढय़ा लागले’ या वचनाची साक्ष पटते. हा प्रवाह खालून वर म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविचाराकडून विचाराकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, विरोधाकडून विकासाकडे, गोंधळातून व्यवस्थेकडे, भेदातून अभेदाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, ऊध्र्व दिशेने नेणारा विवेकाचा मार्ग आहे आणि या मार्गावर वैष्णवाच्या सांगाती सत्संगती घडणारी वाटचाल म्हणजे पंढरीची वारी होय. म्हणून तर ज्ञानदेव या वाटेवर स्थिरावले आणि आनंदाने गात सांगू लागले

‘माझीया जिवीची आवडी।

पंढरपुरा नेईन गुढी’

संत ज्ञानेश्वर माउलींना वेदान्ताच्या ज्ञानाने, संत तुकोबारायांना वृत्तीच्या अंतर्मुखतेने, नामदेवरायांना भक्तीच्या लडिवाळपणाने, नाथ महाराजांना व्यापक लोकसंग्रहाने तर समर्थाना लोकभ्रमंतीने जे अनुभवसिद्ध वैभव प्राप्त झाले ते जगाला देण्यासाठी संत सिद्ध झाले. संतविचारांचे हे अलौकिक वैभव वारीच्या वाटेवर ओसंडून वाहू लागले. जगाचा, सत्याचा, मानवी मनाचा, दु:खाचा, आनंदाचा, परमात्माप्राप्तीचाही शोध घेण्याचा भ्रमंती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग ठरतो. जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी होय. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र होय. ज्ञानेश्वर माउली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकोबाराय हा नि:श्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम या महामंत्रातच सर्व साधू-संतांचा आणि संत परंपरेचा समावेश होतो. आचार्य अत्रे म्हणतात, ‘मराठी भाषेतून आणि मराठी जीवनातून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ वजा केले तर बाकी काय राहील?’ सद्विचारांचे आणि सद्भावनेचे केवढे गडगंज धन त्यांनी महाराष्ट्रावर उधळून ठेवले आहे. ज्ञानेश्वर माउली या मार्गावर रंगले आणि नाचत गात सांगू लागले –

अवघाचि संसार सुखाचा करीन।

आनंदे भरीन तिन्ही लोक।।

जाईनगे माये तया पंढरपुरा।

भेटेन माहेरा आपुलिया।।

तर तुकोबाराय या मार्गावरून चालताना अवघे विठ्ठलरूप होऊन म्हणू लागतात –

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी।

विठ्ठल तोंडी उच्चारा।।

विठ्ठल अवघ्या भांडवल।

विठ्ठल बोला विठ्ठल।।

ज्ञानभक्तीच्या समचरणावर अठ्ठावीस युगे परब्रह्मरूपात विठ्ठल उभा आहे, त्याला भक्तिप्रेमाने भेटायला निघालेला वैष्णवांचा मेळा जेव्हा वारीच्या रूपात उभा राहतो, तेव्हा भक्तीचे व्यापक भावदर्शन अनुभवता येते. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली, ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली, भक्तीच्या पेठेत अद्वैत भावाची देवाण-घेवाण झाली, सदाचाराचा व्यापार फुलला, अवघाचि संसार सुखाचा झाला आणि पंढरीच्या वाळवंटात ‘एकची टाळी झाली’. ती अद्वैताची ‘एकची टाळी’ हेच वारक ऱ्यांचे लक्ष्यही ठरले आणि लक्षणही. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलते. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो आणि पारलौकिकाची अनुभूती मिळते.

पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु, पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता. परंतु, पहिली दिंडी ही पंढरपुराहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला, तेव्हा संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी संत मंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून म्हणजे पंढरपुराहून संत मंडळी माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीस आले. ज्ञानेश्वर माउलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता, पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर आदी संत परंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला आणि वैष्णवभक्तीचे वर्म, वारीचा धर्म घेऊन दिंडीच्या रूपात नाचू लागले. वारीची परंपरा तुकाराम महाराजांच्या घरात पिढय़ान् पिढय़ा चालू होती.

‘पंढरीची वारी आहे माझे घरी’ असे तुकाराम महाराज अभिमानाने सांगतात. विश्वंभरबाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष. तुकाराम महाराज हे त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज होत. विश्वंभरबाबा दर पंधरा दिवसांनी पंढरपूरला जात असत. तुकोबारायांचे वडील बोल्होबा अखंडपणे चाळीस वर्षे वारी करीत होते. असे महिपतीने वर्णिले आहे. त्यानंतर तुकोबाराय हे स्वत: ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात बांधून आपल्या टाळक ऱ्यांसह टाळ-मृदुंगांच्या गजरात पंढरीची वारी करीत. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि सांप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असे भजन करीत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज जे नेटके रूप प्राप्त झाले आहे ते हैबतबाबांमुळे.

हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते. एकदा ग्वाल्हेरहून आपल्या मुलखात परतताना सातपुडय़ाच्या पर्वतश्रेणीत दरोडेखोर भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेत कोंडून ठेवले. हैबतबाबा हे ज्ञानेश्वर माउलींचे नि:सीम भक्त होते. त्यांनी गुहेतच अखंड हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. आता माझी सुटका नाही. इथेच माझे मरण आहे, असा विचार करीत त्यांनी अखंड माउलींचा धावा केला. एक दिवस भिल्ल नायकाची पत्नी पुत्ररत्न प्रसवली आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने गुहेची शिळा उघडून हैबतबाबांना मुक्त केले. आपण एका साधू पुरुषाला विनाकारण गुहेत डांबले याचा त्याला खूप पश्चात्ताप झाला आणि अत्यंत सन्मानाने त्याने हैबतबाबांची पाठवणी केली. हैबतबाबांना वाटले की हा आपला पुनर्जन्म झाला आहे आणि त्यांच्या सातारा जिल्ह्य़ातील आरफळ या गावी न जाता अखेपर्यंत ज्ञानेश्वर माउलींची सेवा करीत आळंदीतच राहिले. खांद्यावर वीणा घेऊन माउलींसमोर ते ज्या क्रमाने अभंग म्हणत त्यातून आजची भजनी मालिका तयार झाली. हैबतबाबांनी स्वतंत्रपणे माउलींच्या पादुका पालखीतून नेण्याची व्यवस्था सुरू केली. महाराष्ट्रातील अनेक सरदार व राजे घराण्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. माउलींच्या पालखी सोहळ्याला लष्करी छावणीसारखे भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध रूप यावे आणि वाटचालीलाही एक वेगळे आकर्षण लाभावे म्हणून त्यांनी राजेरजवाडेंना आवाहन केले. त्या वेळच्या औंधच्या प्रतिनिधींकडून पालखीसाठी हत्ती, घोडे मागविले. काही दिवस हा लवाजमा येत असे. तो येण्याचे बंद झाल्यावर मग अंकलीच्या शितोळे सरदारांकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाडय़ा, नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा स्वारीचा लवाजमा मागवला, तो आजतागायत चालू आहे. म्हणून आजही वारी सोहळ्यात शितोळे सरदारांचा मोठा मान आहे. शितोळे सरकारांबरोबरच पूर्वी औंधचे राजे श्रीमंत पेशवे सरकारही या कामी येणारा खर्च करीत असत. पेशवाई नष्ट झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरू झाले आणि त्यांनीही हा लवाजम्यासाठी येणारा खर्च देण्याचे चालू ठेवले. पुढे १८५२ साली पंचकमिटी स्थापन झाली आणि तिच्या नियोजनाखाली हा सोहळा सुरू झाला. माउलींचा सोहळा निघाला की लष्करी छावणी निघाल्यासारखे वाटते. सर्वात पुढे चौघडा, त्याच्यामागे जरीपटका घेतलेला एक घोडेस्वार, त्यामागे ज्ञानेश्वर माउलींच्या स्वारीचा घोडा, मध्यभागी शिस्तीत चालणाऱ्या अनेक दिंडय़ा, मध्यभागी माउलींचा रथ आणि मागे पुन्हा अनेक दिंडय़ा नामगजर करीत जेव्हा चालू लागतात, तेव्हा माउलींचे हे वैभव पाहून ज्ञानदेवांना ‘कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती’ असे का म्हणतात हे लक्षात येते. माउलींच्या तळावरही मध्यभागी माउलींचा मोठा तंबू, त्यावर मोठा वारकरी पंथाचा झेंडा फडकतोय, बाजूला मानक ऱ्यांचे तंबू; सारा लवाजमा पाहिला की खरोखरीच लष्करी छावणीची आठवण येते. या वारी सोहळ्याला हैबतबाबांनी शिस्त दिली. या शिस्तीचे विराट दर्शन घडते ते दररोजच्या समाजआरतीच्या वेळी. हजारो वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, वीणेकरी गोलाकार उभे असतात. हजारो वारक ऱ्यांच्या मुखातून एकच गजर, हजारो वारक ऱ्यांच्या टाळांचा एकच नाद आणि हजारो मृदंगांचा एकच ताल जेव्हा एकवटतो, तेव्हा समाजआरतीच्या वेळी माउलींच्या तळावर साक्षात नादब्रह्म अवतरते. तेवढय़ात चोपदाराचा चोप उंचावतो आणि क्षणार्धात सारा आवाज स्तब्ध होतो. मग ज्या दिंडीची तक्रार असेल तिथे टाळ वाजविले जातात आणि चोपदार तिथे जाऊन तक्रारीचे निवारण करतात. तक्रार करण्याची पद्धतही केवढी आगळीवेगळी आणि शिस्तबद्ध.

वारीच्या वाटेवर वारकरी स्वयंशिस्तीने चालत असतो. वारी सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो दिंडय़ा आपल्या फडाच्या शिस्तीप्रमाणे भजन म्हणतात आणि वाटचाल करत असतात आणि अशा शेकडो दिंडय़ा वारी सोहळ्याच्या एका शिस्तीने वारी सोहळ्यात सहभागी झालेल्या असतात. जर स्वयंशिस्त नसेल, तर शेकडो वर्षे अव्याहतपणे चाललेल्या या वारी सोहळ्याला नियंत्रणात ठेवणे किती अवघड होईल.

आजही वारीची शिस्त हा अनेकांच्या कुतूहलाचा तर एक वेगळ्या भूमिकेतून अभ्यासाचाही विषय आहे. अध्यात्म, एकात्मता, प्रेमभाव, भक्ती, भजन, अभंग यांसारख्या आविष्कारातून दिसणारी      वारक ऱ्यांची भावपूर्ण शिस्त तर दुसरीकडे वाटचाल, संयम, वारक ऱ्यांचे परस्परांशी बोलणे, संवाद, नेमून दिलेल्या कामाचे यथायोग्य नियोजन, भोजन, मुक्काम व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी व्यवस्थापन कुशलता या भूमिकेतून व्यवस्थापनाने पाळावयाची शिस्त अशा दुहेरी शिस्तीने वारकरी हा वारी सोहळ्याशी बांधला गेला आहे. हैबतबाबा लष्करात होते. लष्करी शिस्तीची यथार्थ जाणीव त्यांना होती. त्यांनीच वारीला शिस्त दिली. म्हणून म्हणावेसे वाटते की वारी हा केवळ भक्तिप्रेमाचा भावदर्शी आविष्कार नाही तर तो लष्करी शिस्तीचाही आध्यात्मिक आविष्कार म्हणावा लागेल.

– डॉ. रामचंद्र देखणे