जनतेचा अपेक्षाभंग होत असल्याने अनेक सरकारी वैद्यक महाविद्यालय रुग्णालयांच्या सेवेवर नेहमी टीका होते तर कधी तेथे वाद उद्भवतात. रुग्ण तसेच कनिष्ठ डॉक्टरांच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची ही चर्चा..
लोकमान्य टिळक रुग्णालयातील तरुण महिला निवासी डॉक्टर समीधा खंदारे क्षयरोगाने मरण पावल्या. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा बोजा पडतो व त्यांची किती हेळसांड होते यावर बरीच चर्चा झाली. आता डॉ. सुमेध पझारे वारले. हे का? तसेच आरोग्य विभागाकडे उपकरणांच्या किती तरी फायली पडून आहेत, अशीही तक्रार आहे; पण खरी समस्या उपकरणांची नसून, प्रशासकीय सुसूत्रता नाही ही आहे. अनेकांना काम न करता मोकळे रान सोडले आहे व त्यामुळे जनता आणि कनिष्ठ डॉक्टर यांची कुचंबणा होते आहे.
आपल्या तीनही महाविद्यालयीन रुग्णालयांत प्रत्येक विभागात, प्रत्येक युनिटमध्ये एक प्राध्यापक, एक सह-प्राध्यापक व एक अधिव्याख्याता असे तीन ज्येष्ठ डॉक्टर सर्व वेळ सेवेत असतात. म्हणजेच सरासरी सहा निवासी डॉक्टरांबरोबर त्यांना संपूर्ण वेळ मार्गदर्शन करण्याकरिता तीन ज्येष्ठ डॉक्टर आहेत. पण दुर्दैवाने आज त्यांना धड संपूर्ण वेळ कामही दिलेले नाही व शिवाय त्यांना खासगी व्यवसाय करायला अधिकृत परवानगी दिली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व मानद  तज्ज्ञ होते. ते जवळपास फुकट म्हणजे मासिक २५० रुपये मानधनावर गरिबांची सेवा करण्याकरिता रुग्णालयात आपले सकाळचे तीन-चार तास द्यायचे. म्हणून ‘त्यांच्या’ सोयीने रुग्णालयाचे वेळापत्रक बनवले होते. एकाच दिवशी ओपीडी, तात्काळ सेवा, बाह्य़-रुग्ण शस्त्रक्रिया आटोपले म्हणजे इतर दिवशी फारसे काम नाही, पण नंतर वैद्यकीय प्रशिक्षण सुधारावे, अधिक चांगले डॉक्टर निर्माण व्हावेत व रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून मेडिकल कौन्सिलच्या आदेशानुसार या सर्व ठिकाणी  सर्ववेळ तज्ज्ञ, वरिष्ठ डॉक्टर नेमण्यात आले आहेत; तेही अधिक प्रमाणात. पण दुर्दैवाने त्यांच्या वेळापत्रकात गेल्या ६० वर्षांत, एका मिनिटाचाही फरक केला नाही आहे. रुग्णालयातील त्यांचे कामाचे तास तेवढेच आहेत. म्हणजे सकाळी ९ ते १२. शिवाय आता त्यांना खासगी व्यवसाय करण्यास महानगरपालिकेने परवानगी दिल्याने, त्यातील बहुसंख्य ज्येष्ठ डॉक्टर इथल्या कामाकडे दुर्लक्ष करून खासगी व्यवसायाकडे वळले आहेत. हेच मुख्य कारण आहे, रुग्णालयाच्या दुरवस्थेचे, जनतेच्या अपेक्षाभंगाचे व निवासी डॉक्टरांवर पडलेल्या अतिरिक्त बोजाचे. ज्येष्ठ डॉक्टर १०च्या आधी येत नाहीत व एक वाजल्यानंतर रुग्णालयात क्षणभरही सापडत नाहीत. मासिक सव्वा लाख पगार घेणारा ज्येष्ठ प्राध्यापक वर्ग मानद डॉक्टराएवढेही काम करीत नाही. सव्वा लाख रुपये म्हणजे भत्ते वगरे धरून दोन लाखांवर जातो. अर्थात काही जण समाजाशी व व्यवसायाशी प्रामाणिक आहेत.
भरपगारी सर्ववेळ शिक्षकांना खासगी व्यवसाय करण्यास बंदी असावी, असा मेडिकल कौन्सिलचा स्पष्ट आदेश आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्यावर खासगी व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. (अर्थात वेळापत्रकात काहीही बदल न केल्यामुळे त्या बंदीला काही अर्थ उरलेला नाही.) काही वर्षांपूर्वी वेतन कमी असताना शिक्षक नोकरीत टिकत नसत, म्हणून हा आदेश थोडा वादग्रस्त होता. १९९० मध्ये वेतन रु. ८५०० होते, ते प्राध्यापकाचे वेतन पाचव्या आयोगानंतर रु. ४५ हजार झाले. सहाव्या आयोगानंतर सध्या (२००६ पासून) सव्वा लाखाहून अधिक झाले आहे. फंड, रजेचा पगार, घरभाडे भत्ता वगरे धरता हा पगार दोन लाखांवर जातो. खासगी व्यवसायातील ५० टक्क्यांहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एवढे कमवीत नाहीत. मग तरीदेखील यांना खासगी व्यवसायास परवानगी का? त्यामुळे खासगी क्षेत्रातही गर्दी होऊन गरप्रकार, अनावश्यक चाचण्या व उपचार याचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही बाजूंनी समाजाचे नुकसान.
 तसेच या प्राध्यापक वर्गाला बरेच शैक्षणिक काम असते/असणार, असा एक गरसमज सर्वाच्या मनात असणार. प्रत्यक्षात प्रत्येक प्राध्यापक किंवा सह-प्राध्यापक सबंध सहा महिन्यांच्या टर्ममध्ये जास्तीत जास्त चार किंवा पाच लेक्चर्स घेतात. अधिव्याख्याते प्रात्यक्षिक घेतात- आठवडय़ात फक्त एक तास. खरे तर  ७५ टक्के वैद्यकीय शिक्षण रुग्णालयाच्या विविध भागांत प्रत्यक्ष काम करतानाच द्यायचे असते, पण रुग्णालयात ९ ते १२ च्या दरम्यान फक्त दोन तास वेळ दिल्यावर शिकवणार किती आणि कसे? रुग्णाबरोबर अशी शिक्षणाचीही आबाळ होते. निवासी डॉक्टरांचे पदव्युत्तर शिक्षण चर्चासत्रातून वगरे अपेक्षित असते, पण हल्ली बहुतेक विभाग हेही १२ ते १च्या दरम्यान उरकून घेतात. दोन वाजल्यानंतर १० ते २० टक्केही कार्यक्रम नसतो व असल्यास तेथील हजेरी हा संशोधनाचा विषय होईल.  शिवाय शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असतो. वर्गात शिकवलेले विद्यार्थी शिकत नाहीत. ते प्रत्यक्ष जे पाहतात तेच शिकतात.
पूर्णवेळ शिक्षक जेव्हा शास्त्रोक्तपद्धतीने रुग्णांना तपासतात, उपचार करतात, नीट नोंदी करून त्यावर प्रबंध लिहितात, तेव्हा अनेक विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतात; पण जेव्हा तेच शिक्षक पशाच्या मागे धावताना दिसतात, खोटे बोलून सटकतात किंवा रुग्णांना न तपासता फक्त रिपोर्ट बघून त्यांच्याशी न बोलता उपचार सांगून निघून जातात, तेव्हा हे नवे डॉक्टरही भविष्यात तसेच करायला शिकतात. तसेच संशोधन करायला रुग्णांच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजेत व त्यावर सातत्याने चर्चा व्हायला पाहिजे, पण २०० ते ३०० रुग्ण बाह्य़ रुग्ण विभागात व वॉर्डात ४० रुग्ण; दोन तासांत राऊंड आटोपून नोंदी कसल्या व संशोधन कसले? सर्वच थातूरमातूर पद्धतीने. त्यामुळे आता रुग्णसेवा व वैद्यकीय शिक्षण याबरोबरच संशोधनाचीही वाट लागली आहे. खरे उच्च प्रकारचे संशोधन शून्यावर आले आहे.
हे सर्व थांबवायचे असेल, तर ज्येष्ठ डॉक्टरांनी रोज किमान ५ तास रुग्णालयात काढलेच पाहिजेत व त्याकरिता दोन गोष्टी अगत्याने करायला पाहिजेत.
  १) (सर्वच) पूर्णवेळ भरपगारी डॉक्टर्सना, विशेषत: वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातल्या डॉक्टर्सना बाहेर खासगी व्यवसाय कोणत्याही प्रकारे करण्यास सक्त मनाई केली पाहिजे. व्यवसायाची व्याख्याही अगदी कडक पाहिजे. ‘कोणत्याही दुसऱ्या आरोग्य केंद्रात कोणत्याही रुग्णास तपासणे, उपचार करणे किंवा सल्ला देणे म्हणजे खासगी व्यवसाय. मग पसे घेतले की नाही हा प्रश्नच वेगळा’ अशीच सक्त व्याख्या केली पाहिजे.
२) वैद्यकीय रुग्णालयातील वेळापत्रकच बदलून त्यांना सर्व वेळ गुंतवून ठेवणेही आवश्यक आहे. सध्या एकाच दिवशी अनेक कर्तव्ये ठेवून कामाची खिचडी केलेली आहे. त्याऐवजी कामाची आठवडाभरात योग्य विभागणी करून एका वेळी एकच काम व त्याच वेळी त्याच ठिकाणी शिक्षण असे वेळापत्रक केले पाहिजे.
अ) ओ.पी.डी.(बाह्य़ रुग्ण तपासणीचा दिवस) व इमर्जन्सी (तात्काळ सेवा देण्याचा दिवस) हे एकाच दिवशी का? सोमवारी बाह्य़ रुग्ण तपासणी असेल तर इमर्जन्सी गुरुवारी व तसेच इतर सगळ्या दिवशी.  ब) त्याच दिवशी बाह्य़ रुग्णांवर शस्त्रक्रिया घाईघाईने उरकायची काय गरज?  बाह्य़ रुग्णांच्या ऑपरेशनचा दिवस वेगळाच असावा (सहावा दिवस).  क) आठवडय़ातून एकच दिवस तुमचे डॉक्टर तुम्हाला ओपीडीमध्ये भेटतात. शिवाय त्यांना घाई असते. नवे रुग्ण, जुने रुग्ण, गंभीर रुग्ण (तात्काळ सेवेची गरज), इतर वॉर्डातील बघायला आलेले रुग्ण (तात्काळ सेवेचाच भाग) असे का?
 ड) इतर कामे वेगवेगळ्या दिवशी ठेवल्यावर आता ओपीडी शांतपणे तीन वाजेपर्यंत चालू राहावी.   इ) शिवाय जुन्या रुग्णांना बघण्याकरिता इतर दोन दिवशी दुपारी १ ते ३ पर्यंत ओपीडी असावी.  ई) प्रोफेसरांनी स्वतंत्र बसू नये. प्रत्येक खोलीत १ शिक्षक अधिक दोन निवासी डॉक्टर अशीच व्यवस्था पाहिजे.
 ३) शनिवारी अर्धा दिवस का? हे कारकुनांचे वेळापत्रक आहे. डॉक्टर हे व्यावसायिक आहेत. त्यांना शनिवारदेखील पूर्ण दिवस काम पाहिजे.
  ४) महानगरपालिकेच्ंया प्राथमिक केंद्रातून किंवा इतर केंद्रांतून पाठवलेल्या रुग्णांना वेगळी वेळ (८ ते ११) व स्वस्त दर आणि थेट येणाऱ्यांना वेगळी वेळ (११ ते २) व चौपट दर असावेत.
५) आपल्या वॉर्डामधील सर्व गंभीर रुग्ण, मोठे आजार, मोठी ऑपरेशन्स, खालावलेली प्रकृती अशा गंभीर आजारांची पूर्ण कल्पना नातेवाईकांना वेळीच देण्याची जबाबदारी सह-सहायक किंवा प्रोफेसर यांच्यावरच असावी, निवासी डॉक्टरांवर नको.
स्वहितासाठी जनता वरील गोष्टींचा गंभीर विचार करेल व लवकर कृती करण्यास प्रशासनाला भाग पाडेल, अशी अपेक्षा .