वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक अशा विविध भूमिका प्रा. यशपाल यांनी पार पाडल्या. विज्ञानातील त्यांचे वैश्विक किरणांवरील संशोधन महत्त्वपूर्ण असून, त्यांनी विकसित केलेल्या उपग्रहाधारित शिक्षणपद्धतीची दखल तर जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. देशातील शालेय शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले. यशपाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बदलप्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून ‘एसएनडीटी महिला विद्यापीठा’च्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांनीही काम केले. त्यांनी या ऋषितुल्य शिक्षणतज्ज्ञासोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा..
‘विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव आणू नका. त्यांच्यात आवड निर्माण होईल, त्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशा पद्धतीने त्यांना शिकवा,’ ही प्रा. यशपाल यांची शिक्षणविषयक भूमिका. त्याच भूमिकेतून त्यांनी देशाच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल केले. माझी आणि यशपाल यांची पहिली भेट १९८७-८८ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठात झाली. त्या वेळी ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. विद्यापीठातील विविध विभागप्रमुखांची बैठक त्यांनी बोलावली होती. मीही त्यात होते. यशपाल यांच्याबद्दल खूप ऐकले होते, पण त्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. सामान्यत: अशा बैठकांत अनुदान आयोगाचे अध्यक्ष आयोगाच्या योजना, उपयुक्त सूचना वगैरे सांगतात. येथेही तेच घडेल असे वाटत होते, पण झाले वेगळेच. त्यांनी थेट आमच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांची बोलण्याची पद्धत इतकी मोकळी होती, की आमच्यावरचे सर्व दडपणच निघून गेले. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे केवळ विद्यापीठे किंवा अभ्यासक्रमांना मान्यता देणारी संस्था नसून, शिक्षणाचा दर्जा टिकवणारीही संस्था आहे हे त्यांच्या कार्यकाळात अधोरेखित झाले. त्यांच्या नजरेसमोर भारतातील शिक्षणपद्धती कशी असावी याचे सुस्पष्ट चित्र होते. यामुळेच त्यांचे विचारही आमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत येत होते.
त्यांच्या कर्तृत्वगाथेतील आणखी एक प्रकरण म्हणजे ‘उपग्रहाधारित दूरचित्रवाणी अध्यापन प्रयोग’ (एसआयटीई). अहमदाबाद येथील ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’चे संचालक असताना त्यांनी नासाकडून ‘एटीएस-६’ या उपग्रहाचे हक्कमिळवले. उपग्रहाचा वापर केवळ हेरगिरीसाठी होत नाही, तो शिक्षण व संवाद यासाठीही होऊ शकतो हे नासाला जगाला दाखवायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा ‘एटीएस-६’ हा उपग्रह जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना देण्याचा निर्णय घेतला. यात भारत, चीन आणि ब्राझिल या तीन देशांचा समावेश होता. या उपग्रहाचा वापर भारत कसा योग्य प्रकारे करू शकतो हे यशपाल यांनी अमेरिकी वैज्ञानिकांना पटवून दिले आणि १९७५-७६ या कालावधीसाठी त्या उपग्रहाचे हक्क मिळवले. त्याचा वापर करून त्यांनी ‘एसआयटीई’ हा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून देशात शिक्षणासाठी दूरचित्रवाणीचा वापर होऊ शकतो हे समोर आले. हा प्रयोग केवळ शिक्षणासाठीच महत्त्वाचा नव्हता तर त्या काळात बाल्यावस्थेत असलेल्या आपल्या अंतराळ उपग्रह कार्यक्रमालाही दिशा देणारा होता. यानंतर आपण शिक्षण आणि संप्रेषण उपग्रह सोडण्यास सुरुवात केली. यातून यशपाल यांची दूरदृष्टी दिसून येते. या प्रयोगात सहा राज्यांतील २० जिल्ह्य़ांतील २४०० गावे समाविष्ट केली होती. याचे नियोजन पाच वष्रे सुरू होते. या प्रयोगाबरोबरच गुजरातमधील खेडा जिल्ह्य़ातील पिज या गावी स्पेस अॅप्लिकेशन सेंटरतर्फे एक टीव्ही ट्रान्समीटर उभारला गेला. १९७५ ते १९९० या १५ वर्षांच्या कालावधीत खेडा जिल्ह्य़ात शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन आणि आधुनिकीकरण या चार विषयांसंबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. पण या ग्रामीण दूरचित्रवाणी प्रसारणाचे नेमके फलित काय? ते तपासण्याच्या उद्देशाने ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉ. सुमा चिटणीस यांच्याशी संपर्क साधला. या संशोधन गटाची धुरा माझ्यावर सोपविण्यात आली. या प्रयोगाचे फलित अभ्यासण्यापूर्वी तो नेमका कोणत्या उद्देशाने सुरू झाला याचा आढावा घेण्यासाठी मी यशपाल यांची सविस्तर मुलाखत घेतली. त्या वेळी मला त्यांच्या विचारांतील स्पष्टता अधिक उमगली. त्यांच्या मनात सतत देशातील शिक्षणव्यवस्था आदर्श कशी होईल याचाच विचार असे.
याच सुमारास १९९२ मध्ये यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली ‘ओझ्याविना शिक्षण’ कसे करता येईल यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. तिच्या अहवालामुळे देशभरात या विषयावर चर्चा रंगली. पण त्यांच्या अहवालातील केवळ दप्तराच्या ओझ्याच्याच विचार सर्वाधिक झाला. प्रत्यक्षात त्यांना मुलांच्या अभ्यासक्रमातील ओझे कमी करणे अपेक्षित होते. मुलांच्या अध्ययनाच्या मूल्यमापनाचे फार मोठे अवडंबर न करता त्यांच्यावर ताण येऊ न देता मूल्यमापन करण्याच्या पद्धती विकसित करा. मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करा. अशी शिक्षणपद्धती बौद्धिकदृष्टय़ा समृद्ध पिढी निर्माण करील, असे ते नेहमी सांगत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला थेट उत्तर न देता प्रश्नाशी संबंधित प्रक्रिया मुले लक्षात घेतील अशा प्रकारे त्यांच्या अध्ययनाची रचना करावी. त्यांना वर्गात विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने शिकविणे अपेक्षित होते. ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ने २००४ मध्ये ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ (एनसीएफ) तयार करण्यासाठी यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. २००५ मध्ये हा आराखडा तयार झाला. देशभरातील शालेय शिक्षण विषयांत काम करणाऱ्या तब्बल ५५० तज्ज्ञांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. यापैकी शिक्षण तंत्रविज्ञान या अभ्यासगटामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या अध्यक्षतेखालची प्रत्येक सभा ही आम्हाला नवीन काही तरी शिकवून जायची. हा आराखडा तयार करत असताना पाच तत्त्वे सर्वानुमते मान्य झाली होती. – १. मुलांचा भर केवळ पाठांतरावरती नसावा. २. शाळेत शिकलेला ज्ञानाचा समाजासाठी केलेला वापर. ३. मूल्यमापन हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचाच एक भाग बनावा. त्याचा फार मोठा ताण विद्यार्थ्यांच्या मनावर येऊ नये. ४. पाठय़पुस्तकांना ओलांडून जाणारा असा परिपूर्ण अभ्यासक्रम असावा. आणि ५. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा लोकशाहीवादी राज्यव्यवस्थेला पूरक असा असावा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आखणीच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत विविध विषयांचे २१ अभ्यासगट तयार केले गेले. या प्रत्येक अभ्यासगटात आठ ते १२ सदस्यांना निमंत्रित केले गेले. प्रत्येक अभ्यासगटाला वैचारिक स्वातंत्र्य होते. या अभ्यासगटांनी तयार केलेल्या अहवालांवर विचारमंथन करून एक परिपूर्ण असा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार झाला. याचे श्रेय डॉ. यशपाल यांच्या दिशादर्शनाला जाते.
त्यांनी शालेय शिक्षणाप्रमाणे उच्चशिक्षणाला नवी दिशा देण्याचा आग्रह धरला. २००९ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षणाचे नूतनीकरण आणि नवी दिशा देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यामार्फत त्यांनी पुन्हा एकदा उच्चशिक्षणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला.
अंतराळ विज्ञान क्षेत्रातील संशोधनात जगात प्रतिष्ठा मिळवलेला हा तपस्वी वैज्ञानिक तितक्याच ताकदीने आणि मनस्वीपणे शालेय आणि उच्चशिक्षणामध्ये बदल घडवून आणण्याचा विचार करतो, इतरांना विचारप्रवृत्त करतो आणि या शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणतो हे सर्वच अतिशय मनोज्ञ आहे. आम्हा शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना त्यांची ही ऊर्जा आजही काम करण्यासाठी प्रेरणा देते.
विज्ञानऋषी
प्रा. यशपाल सिंग यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६ मध्ये झांग (आत्ताचे पाकिस्तान) येथे झाला. यानंतर त्यांचे बालपण बलुचिस्तानमधील क्वेटा भागात गेले. १९३५ मध्ये या भागात आलेल्या भूकंपामध्ये त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. यानंतर त्यांनी त्यांच्या आजोळी आश्रय घेतला. काही दिवसांनी ते पुन्हा क्वेटामध्ये आले. येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनातील जिज्ञासा दिसत होती. त्यांनी १९४९ मध्ये पंजाब विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. १९५८ मध्ये पीएचडी करण्यासाठी ते एमआयटीमध्ये गेले. पीएचडी मिळवल्यानंतर पुन्हा टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत रुजू झाले. वैश्विक किरणांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. १९७३ मध्ये त्यांच्यावर अहमदाबाद येथील ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ची धुरा सोपवण्यात आली. याच केंद्रात त्यांनी १९७५-७६ या कालावधीत ‘उपग्रह अध्ययन दूरचित्रवाणी प्रयोग’ (एसआयटीई) यावर काम करून शिक्षणाच्या माध्यमाला नवी दिशा दिली. यामुळे १९८१-८२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित परिषदेसाठी त्यांची महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८३-८४ मध्ये ते नियोजन आयोगाचे सल्लागार म्हणून काम करत होते. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, जेएनयूचे कुलगुरू अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. विज्ञानाच्या प्रसारात त्यांचे महत्त्वाचे योगदान असून सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत विज्ञान पोहोचविण्यासाठी त्यांनी दूरदर्शनवर ‘टर्निग पॉइंट’ आणि ‘भारत की छाप’ या मालिकाही केल्या. त्यांच्या विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानितही केले. अनेक सुप्रतिष्ठित विज्ञान पुरस्कारांवरही त्यांच्या नावाची मोहर आहे.