लहानपणापासूनच संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात आलेल्या अनुराधा यांनी ‘अवनि’ संस्थेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. आत्तापर्यंत त्यांनी ८६ हजार मुलांसाठी शिक्षणाची पायवाट तयार केली असून वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ५७ वीटभट्टी शाळा सुरू केल्या आहेत. एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करून त्यांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या आणि मुलांसाठी आधारवड ठरलेल्या आजच्या दुर्गा आहेत, अनुराधा भोसले.

संघर्ष आणि अनुराधा भोसले हे जणू समीकरणच! त्या संघर्षाची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच झाली. जन्म अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर भोकर गावचा. लग्नाआधीचे नाव अॅगाथा अमोलिक. वडील प्राथमिक शिक्षक, आई अशिक्षित. एकूण बारा भावंडे. घरची परिस्थिती जेमतेम, साहजिकच पाचवीपासून त्या एका शिक्षकाच्या घरी राहून शिकू लागल्या. कष्ट पाचवीला पुजले होतेच.

inspirational story of loksatta durga kavita waghe gobade
Loksatta Durga 2024 : आरोग्य मित्र
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Diwali bonuses credited to Tata Motors employees accounts less than 24 hours after Ratan Tatas death
‘भारतीय’ टाटाची ‘जागतिक’ नाममुद्रा
Loksatta article on A Naxalist thought GN SaiBaba
लेख: बिनबंदुकीचा नक्षलवादी नायक की खलनायक?
loksatta durga 2024 paithani manufacturer asmita gaikwad in yeola
Loksatta Durga 2024 : जरतारी पैठणीचा वारसा
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?

अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना शौचालयाच्या साफसफाईचे देण्यात आलेले काम करण्यात त्यांनी अपमान मानला नाही. मात्र पुढे मुंबईत ‘निर्मला निकेतन’मध्ये शिकायला मिळाले. जिद्दीने त्यांनी समाजकार्याची पदवी प्राप्त केली. पुणे, जळगाव, औरंगाबाद येथे नोकरी केली. मात्र लोककल्याणाची आस असलेले मन नोकरीत रमणारे नव्हतेच. ठाणे जिल्ह्यात विवेक पंडित यांनी ‘श्रमजीवी संस्थे’ने केलेल्या कामापासूनच प्रेरणा घेऊन अनुराधा यांनी बालकांचा उत्कर्ष, वर्गसंघर्ष हे आपले जीवित कार्य ठरवले. अर्थात ते प्रत्यक्षात येण्यासाठी संघर्षाशिवाय तरणोपाय नव्हताच. त्यातच आंतरजातीय विवाह केलेला. दहा वर्षांचा सुखाचा संसार करूनही पतीची वेगळी लक्षणे दिसू लागताच त्यांनी संबंध तोडणे पसंत करत करारी बाण्याचे दर्शन घडवले.

हेही वाचा >>> Loksatta Durga 2024 : जरतारी पैठणीचा वारसा

दरम्यान, ‘वेरळा विकास प्रकल्पा’चे काम प्रा. अरुण चव्हाण आणि सहकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात चांगलेच आकाराला आणले होते. १९९४ मध्ये त्यांनी ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) संस्थेची स्थापना केली. या संस्थेत अनुराधा यांनी नोकरी करण्याचे ठरवले. नम्रता, झोकून काम करण्याची वृत्ती पाहून चव्हाण यांनी अनुराधा यांना हेच काम कोल्हापुरात स्वबळावर करण्यास सांगितले आणि कोल्हापूर त्यांची कर्मभूमी झाली. या पुरोगामी विचाराच्या शहरात आल्यावर अनुराधांच्या विचाराला वेगळी दिशा मिळाली. मान्यवरांचे विचार वेगवेगळ्या व्याख्यानांतून ऐकायला मिळाले. वर्गसंघर्ष, शोषितांचे प्रश्न त्यांनी मुळापासून समजून घेतले. या क्षेत्रातील प्रश्नांची व्याप्ती खूप मोठी असल्याचे त्यांना जाणवले. दरम्यान, कोल्हापुरात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘रंकाळा बचाओ’, ‘महिला संघर्ष’ अशा चळवळीत त्या काम करतच होत्या.

‘अवनि’चे काम करत असतानाच बालकामगारांसाठी काम करायचे नक्की झाले होते मात्र त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. अनुराधा यांनी भंगार गोळा करणाऱ्या मुलांशी मैत्री करायला सुरुवात केली. ‘तुम्ही शिकलं पाहिजे, नाहीतर आयुष्य भंगार गोळा करण्यातच जाईल,’ हे मुलांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली. त्याचबरोबरीने कोल्हापूर जिल्ह्य़ातील डवरी, लमाण, फासेपारधी, गोसावी समाजाच्या वस्त्यांवरही जायला सुरुवात केली. तिथल्या शाळेत न जाणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांनी या वस्त्यांमध्ये शाळा सुरू केल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी या शाळा सुरू केल्या. त्याची संख्या आता ३६ झाली आहे. त्यानिमित्ताने या मुलांचे थांबलेले शिक्षण तर सुरू झाले. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करून अनुराधा यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातही आणले. गेल्या ३० वर्षांत अनुराधा यांनी ८६ हजार मुलांसाठी शिक्षणाची पायवाट तयार केली आहे.

वस्तींवरच्या मुलांना शिक्षण देत असतानाच प्रश्न आला तो वीटभट्टी कामगारांच्या मुलांचा. कारण त्यांचे आयुष्य कायम फिरते असते. पावसाळा संपला की, कोल्हापूरच्या आसपास वीटभट्टय़ा उभ्या राहतात. अनुराधा यांनी २००२ मध्ये वीटभट्टीवर पहिली शाळा सुरू केली. आज कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत अशा ५७ ‘वीटभट्टी शाळा’ त्या चालवतात.

मुलांच्या शिक्षणाबरोबरच अनुराधा यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो स्त्रियांच्या हक्कांचा. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. विधवा, परित्यक्तांना निवृत्तिवेतन मिळवून देण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रंदिवस धरणे धरले होते. त्यामुळे ३,४७१ स्त्रियांचे निवृत्तिवेतन सुरू झाले. मात्र निवृत्तिवेतन मिळणे पुरेसे ठरणार नव्हते हे लक्षात आल्यावर अनुराधा यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली. विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता असणाऱ्या एकल स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी २०१२ मध्ये त्यांनी ‘एकटी’ ही संस्था सुरू केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने बेघरांसाठी निवारागृह सुरू केले. स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र निवारागृहे आहेत. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो कचरा वेचक स्त्रियांचे संघटन करण्याकडे. या स्त्रियांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. नैसर्गिक खताची मागणी वाढत असल्याने या स्त्रियांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे

हेही वाचा >>> Loksatta Durga 2024 :अनाथ नाथे..

अनुराधा यांच्या ‘अवनि’त राहून आज पन्नास मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच इतर जीवनकौशल्ये शिकवली जातात. अर्थात या सगळ्यांसाठी पैसा लागतोच. करोना साथीतील टाळेबंदीनंतर संस्थेला आर्थिक मदत खूपच कमी झाली आहे. तरीही मुलींचे जेवण, कपडे, शिक्षण यात उणीव राहू दिली जात नाही. मुलींना शाळेत सोडण्यासाठी दोन बसेस आहेत.

अनुराधा भोसले यांनी अनेक कामे आजवर केली आहेत. अजूनही खूप करायची ठरवली आहेत. संस्थेने नवी इमारत आणि अन्य उपक्रम सुरू करण्यासाठी १ कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा बनवला आहे. ‘अवनि’ संस्था शासनमान्य आहे तरीही हरतऱ्हेने प्रयत्न करूनसुद्धा शासकीय अनुदान संस्थेला मिळत नाही असे त्या सांगतात. लोकांच्या मदतीने ही संस्था मुलींना सांभाळत आहे.

५६ वर्षीय अनुराधा यांचे आयुष्य आज सगळ्या अर्थाने ‘अवनि’मय आहे. सगळ्या मुलांना त्यांच्या घरी हक्काचे शिक्षण मिळावे आणि ‘अवनि’सारख्या संस्थांची समाजात गरज शून्य ठरावी, हेच त्यांच्या आयुष्याचे स्वप्न आहे म्हणून त्या पुनर्वसनावर भर देतात. अनुराधांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाचा ‘अहल्यादेवी होळकर’ आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी अनुराधा यांना सहभागी करून ‘अवनि’चे कार्य सर्वदूर पोहोचवले आहे.

वंचित, उपेक्षित आणि असहाय मुलांच्या आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी निडरपणे उभ्या राहणाऱ्या अनुराधा भोसले यांना ‘लोकसत्ता’चा सलाम!

स्थेचे नाव अवनि संस्था कोल्हापूर

पत्ता कोल्हापूर गारगोटी रोड, जैताळ फाट्याजवळ, हनबरवाडी

संपर्क क्रमांक ९८८१३२०९४६, ९६३७३१७४३७

ईमेल : avanikolhapur@gmail. com

website : avanisanstha.in

dayanandlipare@gmail.com

Story img Loader