टय़ुनिशिया या देशात २०१०-२०११ साली झालेल्या लोकशाही क्रांतीनंतर संपूर्ण अरबस्तानात जुन्या हुकूमशाही राजवटींविरुद्ध जनआंदोलनांची लाट आली. ती ‘अरब स्प्रिंग’. त्यात अनेक राजवटी बदलल्या तर काही ठिकाणी अनिर्णित लढती चिघळत राहिल्या. त्या बेबंदशाहीचा फायदा घेऊन इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेने इराक व सीरियामध्ये वेगाने हातपाय पसरले. या संघटनेविरुद्ध अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय आघाडी तयार होऊन लढा उभा राहिला. तीन वर्षांत या आंतरराष्ट्रीय फौजांनी आयसिसच्या ताब्यातील बहुतांश प्रदेश जिंकून परत घेतला. सीरियातील रक्का हे शहर आयसिसची राजधानी मानली जात होती. तीही आयसिसने गमावली. त्यानिमित्ताने आयसिसच्या अस्ताकडच्या प्रवासाचा हा आढावा..

आयसिसची सत्ता ..

आयसिस ऐन जोमात असताना त्यांच्या ताब्यात ३४ हजार चौरस मैल इतका प्रदेश होता. सीरिया, इराक, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यापासून बगदादच्या दक्षिणेकडील प्रदेशापर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांतील आठ दशलक्ष लोकांवर आयसिसची हुकुमत होती. आयसिसला विविध माध्यमांतून दर वर्षी दोन अब्ज डॉलर इतका निधी मिळत होता. त्यात करवसुलीतून ३६० दशलक्ष डॉलर, खनिज तेल विक्रीतून ५०० दशलक्ष डॉलर, बँकांच्या लुटीतून ५०० दशलक्ष ते एक अब्ज डॉलर आणि अपहरण व खंडणीतून २० ते ४५ दशलक्ष डॉलर इतका निधी वर्षांला मिळत होता. विविध देशांतून आयसिसला दर महिन्याला साधारण १५०० नवे लढवय्ये येऊन मिळत होते. २९ जून २०१४ रोजी अबु-बक्र-अल-बगदादी याने इराकच्या मोसुल शहरातील शाही मशिदीतून भाषण करून नव्या खिलाफतच्या स्थापनेची घोषणा केली.

अत्याचारांचा कळस..

आयसिसने त्यांच्या ताब्यातील प्रदेशात कट्टर शरियत कायदा लागू केला. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली. महिलांच्या स्थितीत तर कमालीचा बदल झाला. अनेक महिलांना आयसिसच्या दहशतवाद्यांनी लैंगिक गुलाम म्हणून वापरले. त्यांचा व्यापार करून पैसा कमावला आणि त्यांचे शोषण करून झाल्यावर निर्घृणपणे ठार मारले. परदेशी नागरिक व पत्रकारांना अपहरण करून जिवंत जाळणे आणि शिरच्छेद करून त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे यात आयसिसच्या दहशतवाद्यांना आसुरी आनंद मिळू लागला.

प्रतिहल्ला आणि आयसिसची पीछेहाट ..

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ६९ देशांच्या आणि चार संघटनांच्या आघाडीने २०१४ साली इराक व सीरियात ‘ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्व्ह’ नावाने लष्करी कारवाई सुरू केली. अमेरिका, युरोपीय देश व रशियाच्या लढाऊ विमानांनी आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले. जमिनीवरील लढाईसाठी इराक व सीरियाच्या फौजांना तसेच कुर्द पेशमरगा व अन्य गटांच्या लढवय्यांना अमेरिकी लष्करी तज्ज्ञ मार्गदर्शन करू लागले. दोन ते तीन वर्षे चाललेल्या या संघर्षांला अखेर फळे मिळू लागली.

आयसिसच्या ताब्यात २०१४ साली ३४ हजार चौरस मैल इतका प्रदेश होता. २०१६ सालापर्यंत आयसिसच्या ताब्यातील प्रदेशाचे क्षेत्रफळ घटून ते २३,३२० चौरस मैलांवर आले होते. २०१७ सालाच्या ऑक्टोबपर्यंत आयसिसच्या ताब्यातील इराकमधील ६१ टक्के तर सीरियातील २८ टक्के भूप्रदेश आंतरराष्ट्रीय फौजांनी जिंकून परत घेतला आहे. मोसूल, रक्का आणि अन्य महत्त्वाची शहरे आयसिसच्या ताब्यातून परत घेतली आहेत.

आयसिसचा भूमध्य समुद्राशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यांचे वेगवेगळ्या स्तरावरील महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. नव्या दहशतवाद्यांची भरती जवळपास थांबली आहे. निधीचा ओघ खूपच आटला आहे. अनेक तेलविहिरीवरील ताबा आयसिसने गमावला आहे.

अद्याप पुरता बीमोड नाही ..

मात्र आयसिसचा अद्याप पुरता बीमोड झालेला नाही. तुर्कस्तानच्या सीमेजवळील ९८ किलोमीटरच्या पट्टय़ात अजूनही आयसिसचे नियंत्रण आहे. तेथून ते आंतरराष्ट्रीय सीमापार हल्ले व शस्त्रास्त्रांचा व्यापार सुरू ठेवत आहेत. पॅरिस आणि ब्रसेल्स येथील दहशतवादी हल्ल्यांसाठी याच मार्गाचा वापर केला गेला. हा भाग परत मिळवणे हे आता आंतरराष्ट्रीय फौजांचे प्राधान्याने उद्दिष्ट आहे. याशिवाय युफ्रेटिस नदीच्या मध्य भागातील खोऱ्यात अद्याप आयसिसचा प्रभाव आहे. आयसिसकडे अजूनही ६५०० दहशतवादी आहेत आणि रक्कामध्ये त्यांचे १०० दहशतवादी शिल्लक आहेत असे मानले जाते. त्यांचा लवकर बीमोड करणे हे आता आंतरराष्ट्रीय फौजांचे ध्येय आहे.

राजकीय गुंतागुंत ..

अमेरिकेने सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांना पदच्युत करण्यासाठी चालवलेले प्रयत्न फसले आहेत. असाद यांना रशियाचा पठिंबा असल्याने बहुराष्ट्रीय फौजांमध्ये पुरते एकमत नाही. या विभागातील अस्थैर्याचा फायदा घेऊन इराकच्या उत्तरेकडील कुर्द रहिवाशांनी स्वतंत्र कुर्दिस्तानच्या लढय़ाला बळ दिले आहे. शेकडो कुर्दिश पेशमरगा लढवय्ये आयसिसविरोधात लढत आहेत. आयसिसच्या ताब्यातून सोडवलेल्या इराकमधील प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्दय़ावरून इराकी केंद्रीय शासन आणि कुर्दिश नेत्यांमध्ये तणाव निर्माण होत आहे. तुर्कस्तानमध्येही काही प्रमाणार कुर्द रहिवासी आहेत. इराकमधून स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण झाला तर तुर्कस्तानमधील कुर्द प्रदेशही त्याला जोडण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे इराक व तुर्कस्तानच्या सीमेवर कुर्द प्रदेशांना विभागण्यासाठी मध्ये आयसिस किंवा अन्य कोणत्या तरी गटाचा प्रदेश ठेवण्यासाठी तुर्कस्तान प्रयत्नशील आहे. इराणही शेजारच्या इराकमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे. अशा परिस्थितीत या प्रदेशात संघर्ष थांबून शांतता प्रस्थापित होणे हे अद्याप दूरवरचे स्वप्न असल्यासारखेच भासते आहे.

Story img Loader