धुळ्यातील ‘स्त्री शिक्षण संस्थे’च्या ‘कमलाबाई शंकरलाल कन्या शाळे’त वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल आहे. या उपक्रमांच्या बरोबरीने गुणवत्तेच्या अनेक कसोटय़ांवर उतरत शाळा कायम अग्रस्थानी राहिली आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण देण्यासाठी शाळा वेगळ्या वाटा धुंडाळत असते. म्हणूनच धुळे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या भाऊगर्दीतही शाळा आपले वेगळेपण टिकवून आहे.
सखाराम त्र्यंबक जोहरे यांनी १९२३ मध्ये या संस्थेची स्थापना केली. अन्नपूर्णाबाई भांडारकर यांनी दिलेल्या जागेवर आकाराला आलेल्या या छोटेखानी शाळेच्या पहिल्या वर्गात केवळ पाच विद्यार्थिनी होत्या. मराठी माध्यमाच्या आणि मुलींसाठीच असलेल्या या शाळेनंतर धुळ्यात अनेक शाळा उभारल्या गेल्या. परंतु, कमलाबाई शाळेच्या दर्जावर आणि लोकप्रियतेवर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. प्रारंभापासूनच गुणवत्तावाढीवर शाळेत विशेष भर देण्यात आला. त्यासाठी शाळा राबवीत असलेल्या उपक्रमांकडे पाहिले की शहरातील इतर शाळांशी तुलना केल्यास या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. या शाळेत बालवाडीच्या किमान १६ तुकडय़ा असून पाचवीपासून पुढे प्रत्येक वर्गाच्या किमान सात तुकडय़ा आहेत. अनेक वर्षांपासून या आकडेवारीत वाढच होत आहे. सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या शाळेचे वैशिष्टय़ मानले जाते.
स्वविकसित शिक्षण पद्धती
गणित किंवा विज्ञानासारखे कठीण व किचकट समजले जाणारे विषय शिकविण्यासाठी कृतियुक्त खेळाचा आधार घेतला जातो. पारंपरिक अध्यापन व अध्ययन कौशल्याची कास धरताना काळाची गरज ओळखून नव्या स्वविकसित शिक्षण पद्धतीला संस्थेने विशेष चालना दिली आहे. सण, उत्सव, धार्मिक परंपरा किंवा सामाजिक पातळीवरील जबाबदारीचे आकलन आणि कृती अशा बाबींनाही येथे महत्त्व दिले जाते. शाळा जुनी असली तरी अध्ययन व अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका अर्चना नाईक यांनी नमूद केले. कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींची कामगिरी सुधारावी यासाठी खास जास्तीचे तास घेतले जातात.
व्यवहारज्ञान
प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना भाजी खुडणे, निवडणे यांसह स्वयंपाकघरातील प्रत्येक भांडय़ाचे महत्त्व व उपयोग पटवून दिले जातात. अलंकार कसे तयार केले जातात, चिखलाच्या गोळ्यापासून मडके कसे बनविले जाते, हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी विद्यार्थिनींना नेऊन समजावले जाते.प्रत्यक्ष बाजारात नेऊन खरेदी कशी करावी, विविध वस्तूंचा भाव करणे हे शिकविले जाते. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थिनींना निसर्गाच्या सान्निध्यात नेले जाते.
संस्थेच्या लताबाई आगीवाल बालमंदिर, कमलाबाई शंकरलाल दलाल प्राथमिक विद्यालय, संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय, विधि महाविद्यालय, व्यवसाय शिक्षण संशोधन केंद्र या उपशाखांची जोड कन्या शाळेस मिळालेली असल्याने एकदा का या शाळेत प्रवेश घेतला की पुढे थेट बारावी किंवा विधि शाखेचे शिक्षण पूर्ण करता येऊ शकेल अशी येथे सोय असल्याने शाळेत प्रवेशासाठी गर्दी असते. केवळ मुलींचीच शाळा असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेला महत्त्व देणारा वर्ग येथे आहे.
लघुपटांमधून ज्ञानसंवर्धन
शाळेचे शिक्षक केदार नाईक लघुपटांद्वारे ‘निसर्ग शिक्षण’ हा उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पुस्तकांशिवाय प्रत्यक्ष अनुभवातून नेमके काय केले पाहिजे, या विचारातून लघुपट निर्मितीची संकल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. ‘एकदा काय झाले’ या लघुपटासाठी लेखक अनिल अवचट यांच्या ‘काडेपेटी’ या कथेचा संदर्भ घेण्यात आला. कलाकार म्हणून शाळेतीलच बालमंदिरातील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. संवाद सुलभाताई भानगावकर यांनी लिहिले. दिग्दर्शन, निर्माता, संगीतकार अशी तिहेरी भूमिका नाईक यांनी निभावली. डोंगर, पाणवठा, वृक्ष यांसह नैसर्गिक संपदा असलेला परिसर यात अपेक्षित होता. म्हणून शहरापासून जवळ असलेल्या लळिंग किल्ल्यावर चित्रीकरण करण्यात आले. एखादी शहरी मुलगी निसर्गाविषयी किती अनभिज्ञ असू शकते, तिला जंगलातील वनस्पती, पक्षी काय शिकवितात, माणसे जंगल नष्ट करीत असताना निसर्ग त्याला कशी शिक्षा करतो, हे लघुपटात दाखविण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे, हे सोप्या शब्दांत व दृकश्राव्य माध्यमातून पटवून देण्यात आले. शालेय गुणवत्ता वाढीसाठीही अशा प्रकारच्या लघुपटांचा कसा फायदा होतो हे शाळेच्या लक्षात आले.
‘पाडय़ावरचे पांडुरंग’ या लघुपटाचे चित्रीकरण साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे करण्यात आले. पालेभाज्या आणि जंगली भाज्यांचे महत्त्व, त्यांची ओळख, फळ, फुले, अन्य वनस्पती, जंगल सफर, प्राणी-पक्षी याविषयीची सर्व माहिती या लघुपटाद्वारे देण्यात आली. चिखलात शुभ्र तांदूळ कसा पिकतो किंवा फुलातील चिकट मधात मधमाशा का चिकटत नाहीत, रांगेत चालणाऱ्या मुंग्यांच्या शिस्तीचे गमक काय, याची प्रत्यक्ष अनुभूती बालकलाकारांच्या माध्यमातून सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या या उपक्रमाचे ‘महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदे’कडूनही कौतुक करण्यात आले.
शाळेत अभ्यासिका आहे. मुलींना विविध विषयांची पुस्तके देण्यात येतात. त्यावर नंतर प्रश्न विचारण्यात येतात. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संकल्पनांना चालना देण्याकडे आमचा कल असतो, असे संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांनी सांगितले. अभ्यासाबरोबरच योगासन, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, कराटे, तायक्वांदो यासारख्या क्रीडा प्रकारातही शाळेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील वैशिष्टय़पूर्ण अध्ययन आणि अध्यापनाचेच हे फलित मानावे लागेल.
संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com
संतोष मासोळे