कवलापूरची काळी माती आणि सवाळ पाणी हे गाजराला आवश्यक घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर लागवड केली जात आहे. तीन महिन्यांचे पीक असले, तरी थंडी सुरू होताच, दिवाळीनंतर गाजर बाजारात विक्रीसाठी तयार होते. संक्रांतीला तर गाजराचे महत्त्व अधिक आहे. याचबरोबर रोजच्या आहारात कच्चे गाजर खाण्याची पद्धतही आहे. भरपूर पोषणमूल्य, मधुमेहींनाही त्रासदायक न ठरणारे कंदमूळ म्हणून गाजराचा उल्लेख आढळतो. यामुळे लहानापासून थोरापर्यंत आवडीचे कंदमूळ म्हणून गाजर आवडीने खाल्ले जाते. बहुसंख्य चित्रपटांत तर गाजर हलवा मायेने करून खाऊ घातला जात असल्याने याकडे ओढाही जास्त पाहण्यास मिळतो. गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्चे खाण्यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्या म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टिदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलका, जॅम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. गाजराच्या चकत्या करून सुकवून त्या साठविल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान आणि जमीन

गाजर हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान १५-२० अंश सेल्सिअस असावे लागते. १० ते १५ अंश सेल्सिअस तापमानाला, तसेच २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाला गाजराचा रंग फिकट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी १८ ते २४ अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक आहे.

गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्हणून गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ, भुसभुशीत असावी. भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करून जमीन भुसभुशीत करावी. गाजराच्या लागवडीसाठी खोल, भुसभुशीत, गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामू ६ ते ७ असणारी जमीन निवडली जाते.

महाराष्ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. रब्बी हंगामातील गाजराची लागवड १५ ऑगस्टपासून कवलापुरात केली जाते.

लागवड पद्धती

गाजराच्या लागवडीसाठी जमीन खोल उभी-आडवी नांगरून घ्यावी. जमीन सपाट करून घ्यावी. बी सरी-वरंब्यावर पेरावी. दोन वरंब्यातील अंतर ४५ सेंमी ठेवावे. बियांची टोकून पेरणी करताना ३० ते ४५ सेंमी अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी १५ सेंमी अंतरावर टोकन पद्धतीने लागवड केली जाते. पाभरीने बी पेरताना दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी अंतर ठेवून नंतर विरळणी करून दोन रोपांतील अंतर ८ सेंमी ठेवले. एक एकर टोकन पद्धतीने क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे ४ ते ६ किलो बियाणे लागते. तर कवलापूरमध्ये बी पेरणी केली जात असून, यासाठी एकरी १२ किलो बियाणे वापरले जात असल्याचे शेतकरी दत्तात्रय माळी यांनी सांगितले. घरातच बी तयार केले जात असून, या बियाण्याचा दर सर्वसाधारण ४०० रुपये किलो असतो.

माळी यांनी सांगितले, ‘गावात गाजरासाठी जमिनीत खरीप पीक घेतले जात नाही. वर्षात एकच पीक घेतले जाते. पेरणीनंतर सरी सोडणे, भांगलण करणे ही कामे करावी लागतात, तर दसऱ्यानंतर गरजेनुसार तीन ते चार वेळा पाणी दिले जाते. एकरी ५० किलो सुफला हे वरखत दिले जाते. याशिवाय उन्हाळ्यात शेणखताचा वापरही केला जातो. एकरी २० ते ३० गाड्या शेणखत दिले जाते. गाजरासाठी ठेवलेल्या रानात खरीप हंगामातील एक पीक घेता येऊ शकते. मात्र, यामुळे गाजराची प्रत खालावत असल्याने कवलापूरमध्ये प्रामुख्याने एकच पीक घेतले जाते. गाजर लागवडीसाठी एकरी २५ हजार रुपये मजुरी, खते, बियाणे खर्च येत असून, उत्पादन ३ ते ५ टन मिळते. सातारा, सोलापूर, पुणे, हुबळी, संकेश्वर आदी ठिकाणी गाजरे विक्रीसाठी पाठवली जातात. सध्या गाजराचा दर प्रतवारीनुसार २० ते २७ रुपये किलो असा मिळत आहे. दुबार पीक घेतलेल्या रानात उत्पादन घेतलेल्या गाजराची गुणवत्ता, चव, रंग दुय्यम दर्जाचे असल्याने दुबार पीक घेणे टाळले जाते. मोठी झालेली, दुय्यम दर्जाची गाजरे आणि पाला जनावरांना उपयुक्त ठरत असून, यामुळे दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढण्याबरोबरच दुधातील स्निग्धांशही वाढत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे गाजरकाढणीनंतर पाला जनावरांसाठी वापरला जातो.

कीडरोग आणि त्यांचे नियंत्रण

गाजराच्या पिकावर साड्या भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रुटफ्लाय या किडीचा उपद्रव होतो. सोंड्या भुंगा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रुटफ्लाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्या ते काळसर रंगाची असते. या किडीच्या अळ्या पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असून, त्या गाजराची मुळे पोखरून आत शिरतात आणि आतील भाग खातात. त्यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३ मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे.

काढणी उत्पादन आणि विक्री

गाजराची काढणी बियाणाच्या पेरणीनंतर ७० ते ९० दिवसांत करतात. गाजरे चांगली तयार व्हावीत म्हणून काढणीपूर्वी पिकाला १५ ते २० दिवस पाणी देण्याचे बंद केले जाते. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नांगराच्या साहाय्याने गाजराची काढणी करावी लागते. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुऊन बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात.

गाजराचे फायदे

गाजरात आढळणारे अँटिऑक्सिडंट ल्युटिन आणि झेयसॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहेत. गाजरात भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. मधुमेही रुग्ण आरामात गाजर खाऊ शकतात. गाजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे गाजर खाल्ल्यामुळे केस, डोळे आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारते. गाजरापासून हलवा, बर्फी, लोणचे, कोशिंबीर इ. पदार्थ तयार केले जातात.

गाजराचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेल्या कवलापूरच्या गाजराचा प्रसार आता तासगाव आणि मिरज तालुक्यातही होत आहे. गव्हाच्या रानात खाण्यासाठी लावल्या जाणाऱ्या गाजराचे उत्पादन आता व्यावसायिक पद्धतीने करण्यात येत असून, यामुळे नगद पैसे तर मिळतातच, पण महिलांना रोजगार, जनावरांसाठी चारा मिळत असल्याने कमी कष्टात अधिक उत्पादन मिळणारे पीक म्हणून आता द्राक्ष बागायतदारही या पिकाकडे वळत आहेत. दत्तात्रय माळी, गाजर उत्पादक शेतकरी, कवलापूर

गावातील शेतकऱ्यांनी वाडवडिलांपासून गाजर पिकवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कमी कालावधीत ताजे व चांगले उत्पादन व उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी त्यास पसंती दिली आहे. कवलापूरची गाजरे सांगली, कोल्हापूर, कराड याप्रमाणे कर्नाटकातदेखील जातात. त्या दृष्टीनेही गावातील अर्थकारणास चालना मिळत आहे. शासन व संस्थांनी द्राक्ष, ऊस शेतीप्रमाणे गाजर शेतीलादेखील अर्थसाहाय्य करावे. शरद पवळ, ग्रामपंचायत सदस्य

digambarshinde64@gmail. com